हळुवार भाग नऊ

Some Love Stories Never Ends
देव रागा-रागाने घराच्या बाहेर निघून गेला. रमा ही घराच्या दारात जाऊन बसली. मीनाताईंनी रमाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला.पण रमा काहीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती.

मीनाताई -"रमा अग असं काय करतेस? देवचे डोकं ठिकाणावर नाहीये, पण तू तरी जरा समजूतदारपणे वाग ना! चल घरात ये, चल बाळ चल."

रमा -"आई समजूतदारपणेच वागते आहे. त्यांनी मला घराबाहेर जायला सांगितले आहे, पण मी घराचा उंबरठा कधीही ओलांडणार नाही. पण हेही तेवढेच खरे की, मी त्यांच्यासमोरही जाणार नाही."

मीना -"म्हणजे तू माझंही ऐकणार नाहीस का?"

रमा -"आई तुमचा शब्द मी कधीच खाली पडू देत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. पण प्लीज आज मला काही सांगू नका! मी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये."

मीनाताईंना रमाचा स्वभाव माहिती होता. एवढ्या गुणी, सालस मुली सोबत देव असा कठोर वागला हे त्यांना मुळीच आवडले नव्हते. त्यांनी नेहाला मीतला फोन करायला सांगितले. मीत-मीनाताईंचा धाकटा, देवचा लहान भाऊ.

मीनाताईंनी झालेला सगळा प्रकार मीतच्या कानावर घातला आणि देवला शोधून आणायला सांगितले.

मीना -"मीत काहीही कर पण देवला घरी घेऊन ये. अरे रागाच्या भरात तो काय करेल काही सांगता येत नाही."

मीत -"आई दादाच्या या स्वभावामुळेच मी या घरात राहत नाही. त्याला नेहमी जसं वाटतं तसंच व्हायला हवं असतं. समोरची व्यक्तीही एक माणूस आहे, एखाद्या बाबतीत तिचंही काही मत असू शकतं, तिलाही तिच्या भावना असतात, ही गोष्ट दादा कधीच मान्य करत नाही म्हणूनच मी ह्या घरात राहत नाही. होस्टेलवर राहतो."

मीनाताई -"मीत आता ही वेळ हे सगळं बोलायची नाही. लवकर काहीतरी कर."

मीत -"आई तू काळजी करू नको. मी आणतो दादाला शोधून."

मीतने देवला साऱ्या नागपूर भर शोधले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो देवला घरी घेऊन आला होता. दिवसभर उन्हात-तान्हात, उपाशी-तापाशी अनवाणी फिरून देव पुरता थकला होता. अंगणात पाय टाकल्यावर घराच्या मुख्य दरवाजा बाहेर अंगाच मुटकुळ करून बसलेली रमा त्याला दिसली. तेवढ्यात मीतने जयाला तिथे बोलावले.

मी -"दादा ही जया ताई रमावहिनींची अमरावतीची मैत्रीण. त्यादिवशी ह्या दोघीजणी जया ताई कडेच खूप गप्पा मारत बसल्या होत्या. मॉलच्या बाहेर रमा वहिनी माझ्या मित्राला आणि त्याच्या बायकोला बाय करत होती. तो माझा मित्र जया ताईचा लहान दीर आहे. खरंतर मी, माझा मित्र आणि त्याची बायको त्या दिवशी मॉलमध्ये गेलो होतो. योगायोगाने रमा वहिनी पण तिथे भेटली. आम्ही खुप गप्पा केल्या. मला सारखा एक फोन येत होता, पण माझ्या फोन मध्ये आवाज येत नव्हता, रेंज नव्हती, म्हणून मी मॉल बाहेर रेंज शोधत होतो. रमा वहिनी माझ्या मित्राला आणि त्याच्या बायकोला बाय करायला बाहेर आली होती. आणि तिथूनच ती जया ताईच्या गाडीत बसून तिच्या घरी गेली." जयाने मीतच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

तुला माहिती आहे ना दादा, सगळ्या मोबाईल कंपन्या थ्रीजी वरून फोरजी वर अपग्रेड होत आहेत. रेंजचा प्रॉब्लेम सगळीकडेच होतो आहे. तुझ्या ऑफिसमध्येही नेटवर्क इशू आहेत, वाय-फाय काम करत नाहीये, म्हणून तू तुझं सिम पोरटॅबिलिटी मध्ये टाकलं. जर तुझ्या फोनला इशू होऊ शकतो, तर वहिनींच्या फोनला पण इशू होऊच शकतो ना! दादा अरे बघ त्या वहिनीकडे, कशी झाली आहे ती दोन दिवसात? काय केले तिने स्वतःच!"

"मग ती हे का म्हणाली की ती खोटं बोलली?" देव अजूनही स्वतःच म्हणणं सोडत नव्हता.

मीत -"दादा त्यादिवशी संशय पिश्च्याने तुला पुरतं घेतलं होतं. वहिनी काहीही बोलली असती तरी, तुला हेच ऐकायचं होतं की ती खोटं बोलते आहे. दादा बायको आहे ती तुझी! आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला साक्षीपुरावे कसे काय मागू शकतोस तू तिला?"

देव चिडून बोलला -"मीssत!"

मीत -"दादा माझ्यावर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम केलंस ना तू? अरे लहान वयात माझा बाप झालास तू! म्हणूनच आज त्याच बाप लेकाच्या नात्यांनं मी तुला आहे बोलतो आहे. दादा सावर स्वतःला आणि वहिनीलाही."

देव धीम्या पावलाने रमा जवळ गेला. त्यानं रमाच्या खांद्यावर अलगद हात ठेवला. त्या स्पर्शाने रमा दचकली.

"तुम्ही?" रमाच्या डोळ्यात आसवं दाटून आली होती. "मी तुमच्याशी खोटं वागले नाही, मी तुमचा विश्वास नाही मोडला. मी खरच सांगते मी जयाकडेच गेले होते."

देव -"रमा चल,आत चल. मी चुकलो."

त्याचवेळी रमा चक्कर येऊन बेशुद्ध होऊन खाली पडली. डॉक्टरांनी रमाला अती ताणाने चक्कर आल्याचं निदान केलं. देव मनातून खजील झाला होता. त्याला मनातून खूप अपराधी असल्यासारखं वाटत होतं. तो रमाच्या उश्याशी बसून तिचा हात हातात घेऊन सारखा परमेश्वराचा धावा करत होता. त्याच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. देवाला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली होती, पण त्याच्या वागण्यांनं रमाच्या मनावर मात्र ओरखडे पडले होते.

दुसऱ्या दिवशी रमा शुद्धीवर आली. देव मान खाली घालून तिच्या जवळ बसला होता. तो तिच्या डोक्यावरून सतत हात फिरवत होता. रमाला या सगळ्या मुळे फार अवघडल्यासारखे वाटत होते.

देव -"रमा मला माफ कर. माझी चूक झाली. मी खूप वेड्यासारखं वागलो आहे तुझ्याशी. तु जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे. तू कर मला शिक्षा कर, पण प्लीज मला, माझ्याशी बोल. रमा रमा प्लीज."

रमा काहीच न बोलता तिथून उठून जायला निघाली.

देव -"रमा माझ्याशी एक अक्षरही बोलणार नाहीस का?"

रमा -"सगळ्याच बाबतीत तुमचा ऐकलं आहे. पण आता मला थोडा वेळ हवा आहे या सगळ्यातून सावरायला."


©® राखी भावसार भांडेकर.

**********************************************

🎭 Series Post

View all