हळुवार भाग आठ

Some Love Stories Never Ends


हळुवार भाग 8

खरंतर रमाला आता हे कळून चुकलं होतं की, देवचं तिच्यावर कितीही प्रेम असलं तरी, या नात्यात तिला एका मर्यादे पलीकडे स्वातंत्र्य नाही. देवचं प्रेम ती अमान्य करतच नव्हती, पण त्याचा पझेसिव्हनेस तिला खूप त्रास देत होता. रमा एका मोकळ्या वातावरणात वाढली होती. तिच्या घरी तिचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं. कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी तिचं मत विचारात घेतलं जायचं. फक्त लग्नाच्या वेळी गोंधळ उडाल्यामुळे तिच्या बाबांनी आडमूठी भूमिका घेतली होती. पण लग्नानंतर एकंदरीतच देवचा स्वभाव बघून कधी कधी रमाला फार पेच पडे की, कसं वागावं? देवला ती हवी होती. देवच प्रेमही होतं तिच्यावर, पण देवच्या वागण्याचा अंदाज मात्र रमाला येत नव्हता.

त्या दिवशीचा प्रसंग इच्छा असूनही रमा विसरुच शकत नव्हती. देवच्या आक्रस्ताळे पणामुळे रमा प्रचंड दुखावल्या गेली होती. नेहमीच हसतमुख असणारी रमा एकदम गप्प झाली होती. रोजची सगळी काम ती करत होती, पण त्यात रमा कुठेच नव्हती. यंत्रवत करायचं म्हणून ती प्रत्येक गोष्ट करत होती. तिच्या या अवस्थेमुळे देव पण मनातून प्रचंड घाबरला आणि हादरला होता.

त्याचं झालं असं की, त्यादिवशी रमाला काही खरेदी करायची होती. देवला महत्वाचं काम असल्याने तो सकाळीच ऑफिसला निघून गेला होता. नेहाचं फायनल प्रॅक्टिकल असल्याने ती पण रमासोबत खरेदीला गेली नाही. शेवटी रमाच एकटी खरेदीला गेली. पण दुपारी बारा वाजता गेलेली रमा संध्याकाळचे चार वाजले तरी परतली नव्हती. एव्हाना देव घरी आला होता. त्यांने रागातच मीनाताईंकडे रमाची चौकशी केली.

देव -"आई रमा कुठे दिसत नाही? घरी नाही का ती?"

आई -"अरे तिला काही खरेदी करायची होती, दुपारी बारा वाजताच गेली आहे ती?"

देव -"नेहा आहे का तिच्यासोबत?"

आई -"नेहा जाणार होती तिच्या सोबत, पण नेहाची प्रॅक्टिकल एक्झाम होती म्हणून मग रमा एकटीच गेली."

देव -"कोणती गाडी घेऊन गेली?" देवचे प्रश्न संपत नव्हते.

आई -"अरे किती प्रश्न विचारतो आहे? तिने कोणती गाडी नेली ते मला कसं माहिती असणार?" मी घरात होती ना!"

देव -"ठीक आहे." देव रमाला शोधायला बाहेर पडला. रमा त्याला फाटका जवळच भेटली.

रमा -"अरे तुम्ही? कुठे निघालात?"

देव -" तुला शोधायला निघालो होतो." देवचं चिडकं उत्तर.

रमा-"मी काय हरवली नव्हती किंवा लहान मुलंही नाहीये रस्ता विसरायला." रमाने वातावरण हलका करण्याचा प्रयत्न केला.

देव -"मग घरी यायला एवढा वेळ का लागला?" देवच्या आवाजात संताप जाणवत होता.

रमाने हातातल्या पिशव्या दाखवल्या "खरेदीला गेले होते म्हणून वेळ झाला."

देव -"फक्त दोन साड्या खरेदीला चार तास? तुझा फोनही लागत नव्हता. नक्की खरेदीलाच गेली होतीस की अजून कुठे दुसरीकडे?"

रमा -"खरेदीलाच गेले होते." रमाला आता राग आला होता पण आवाजात  शक्य तेवढी नम्रता ठेवत ती बोलली.

देव -"तरीपण एवढा वेळ? माझा विश्वास बसत नाहीये." देवने सरळ रमाच्या दंडाला घट्ट पकडले आणि तिला हलवून हलवून विचारायला लागला
"खरं खरं सांग कुठे गेली होतीस?"

रमा घाबरून चाचरत बोलली"म मैत्रिणीकडे."

देव -"नाव काय आहे तिचे? कुठे राहते ती?"

रमा -"जया, अमरावतीची कॉलेज मैत्रीण आहे माझी. मॉलमध्ये भेटली होती. आग्रह करून तिच्या घरी घेऊन गेली होती."

देव -"कुठे राहते." देव परत चिडून विचारत होता.

रमा -"ल लक्ष्मी नगर."

देव -"चल." देव रमाला ओढत होता.

रमाने स्वतःचा दंड सोडवण्याचा प्रयत्न करत विचारले -"कुठे?"

देव -"तु ज्या मैत्रिणी कडे गेली होतीस ना तीच्याकडे."

देव रमाला गाडीत बसवून जयाकडे घेऊन गेला. रस्ताभर गाडीत रमा देवला समजवण्याचा खूप प्रयत्न करत होती, हजार वेळा त्याची माफी मागत होती, पण देव मात्र इरेलाच पेटला होता. जयाकडे गेल्यावर देव रमाचा मोबाईल घेऊन घरभर वेड्यासारखा फिरत होता, तिला विचारत होता की, जर घरात मोबाईलला सगळीकडे रेंज आहे तर रमाचा फोन का लागत नव्हता? रमा जवळ या प्रश्नाचं उत्तरच नव्हतं. ती देवला विनवण्या करत होती, घरी चलण्याचा आग्रह करत होती, पण देव काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

देवचा अवतार बघून जया आणि तिचा नवरा आवाक झाले होते. रागा रागात देव रमाला घरी घेऊन आला आणि दंडाला धरून त्यानं  तिला सरळ घरात जमिनीवर ढकलून दिलं त्यामुळे रमा जमिनीवर अक्षरशः आदळली.

देवची ज्या हॉटेलात मीटिंग होती त्या हॉटेलच्या बाहेर उतरताना, देवला रस्त्याच्या पलीकडे रमा कोणाशी तरी बोलताना दिसली, पण वाहनांची खूप वर्दळ असल्यामुळे देव तिच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. त्यानंतर काही क्षणातच रमा कुठल्यातरी गाडीत बसून निघून गेली होती.

भर रस्त्यात रमा कुणाशी तरी बोलत होती, रमा घरी लवकर आली नाही, रमाचा फोन लागत नाही ही गोष्टच देवला सहन होत नव्हती. रागाच्या भरात तो अगदी बेभान, बेफाम झाला होता. त्याचं ते रुद्र रूप रमाला बघवत नव्हतं. रमाच्या विव्हळण्याने मीनाताई तिथे आल्या. त्यांनी देवला चांगलेच फटकारले.

आई -"देव काय सुरू आहे हे? खबरदार रमाच्या अंगाला हात लावलास तर!"

देव -"आई ही बाई खोटी बोलली माझ्याशी, माझा विश्वासघात केला आहे हिने. ही मला नजरेसमोर नको आहे."

रमा, नेहा, मीनाताई सगळ्यांनी श्वास रोखले. देव रागाच्या भरात वेडा झाला होता. त्याने रमाचा मोबाईल भिंतीवर आपटून फोडून टाकला. तो वारंवार रमाला एकच प्रश्न विचारत होता.

देव -"सांग तू माझ्याशी खोटी का बोललीस? खोटं वागणार नाही असा शब्द देऊन तू तुझा शब्द मोडलास, विश्वासघातकी आहेस तू!"

आई -"देव शांत हो आणि सांग नक्की काय झालं ते!"

देव -"आई ही बाई मॉल मध्ये जायचं सांगून दुसरीकडेच कोणाशी तरी बोलत होती. गावभर हिंडत होती. मी हिला फोन लावला तर हीचा फोनही लागत नव्हता."

आई -"अरे नेटवर्क इशू असेल."

देव -"नाही आई हिच्या सारख्या बायका आधी नवऱ्याचा विश्वास जिंकतात आणि नंतर स्वतःचं खरं रूप दाखवतात."

आई -"देव शब्द सांभाळून वापर! तुझी बायको आहे ती, कुणी रस्त्यावरची बाई नाही."

देव -"मग ही माझा फोन का उचलत नव्हती? सांग ना का उचलला नाही तू फोन?" देव तावातवाने रमाला विचारत होता आणि रमा नुसतीच रडत होती. काय उत्तर द्यावे? देवला काय समजून सांगावे ते रमाला कळत नव्हते.

आई -"रमा काय झालं होतं? तू देवचा फोन का नाही उचलला बाळ?" मीनाताई प्रेमळ स्वरात रमाशी बोलल्या.

रमा -"आई फोन माझ्या जवळ होता. पण, पण नाही माहिती यांचा फोन का नाही आला?" रमा रडायला लागली.

देव -"कारण तू दुसऱ्या सोबत होतीस. ही बाई मला माझ्या घरात नको."

आई -"देव तू काय बोलतेस तुला कळतंय का? तुझं डोकं सध्या ठिकाणावर नाही आहे. तू शांत हो आणि आपल्या खोलीत जा."

देव -"मी माझ्या खोलीत नाही हे घर सोडून जातो आहे. ज्या व्यक्तीवर मी जीव ओवाळून टाकला, स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, तिने आज माझा विश्वासघात केला."

रमा -"नाही हो! खरंच मी तुमचा विश्वासघात केला नाही. मी खरच सांगते मी जयाकडेच होती."

देव -"तू अशी खरं बोलणार नाहीस, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्याशिवाय तुला शांती मिळणार नाही."

देव रागाने वेडापिसा झाला होता. गैरसमजाचं भूत पक्क त्याच्या मानगुटावर बसलं होतं. रमाला देवचा अंदाज आला, शेवटी तिनेच माघार घेत म्हटलं


रमा -"हो मी खोटं बोलले तुमच्याशी. पण प्लीज तुम्ही कुठेही जाऊ नका. स्वतःला त्रास करून घेऊ नका. मी तुमचा पाया पडते, हात जोडते."

पण देवने रमाचं काही एक ऐकलं नाही आणि तो तावा- तावात घराच्या बाहेर निघून गेला.


©® राखी भावसार भांडेकर.

लेखिका कुठल्याही घरगुती हिंसाचाराचे समर्थन करत नाही.

*********************************************

🎭 Series Post

View all