हळुवार भाग सात

Some Love Stories Never Ends


हळुवार भाग 7

रमा खिडकीतून बाहेर आकाशात बघत होती. गुलमोहराच्या फांद्या हवेच्या तालावर हळुवार हलत होत्या. त्यांच्या त्या लयबद्ध हालचालीमुळे आकाशातल्या चंद्रावर नाचणारी नक्षी उमटत होती. चंद्र आज स्वतःच्या चंद्र प्रकाशाची चौफेर मुक्त हस्ताने उधळण करीत होता. रमा तो पौर्णिमेचा चंद्र आणि त्याचे टिपूर चंदेरी चांदणं पाहण्यात भान हरपली होती. नकळत तिच्या ओठांवर गाण आलं,

ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा

रमा अगदी मनापासून गाण म्हणत होती. खोलीच्या दरवाजा जवळ उभं राहून देव तीचे गाणे ऐकत होता. पण यावेळी देवने रमाला पाठीमागून बहुभाषात घेतले नाही. तो शांतपणे रमाच्या अगदी बाजूला उभा राहून तिचे गाणे ऐकत होता. गाण संपल्यावर रमाने देवकडे पाहिले आणि एक मंद स्मित केले.

देव -"आज मला बघून चपापली नाहीस?"

रमा -"नाही."

देव -"का? आता माझी भीती वाटत नाही?" देवने रमाचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला.

रमा -"खरं तर आधीही भीती अशी वाटत नव्हतीच फक्त…" रमाने स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

देव -"फक्त काय?"

रमा -"फक्त एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती."

देव -"कोणती गोष्ट?"

रमा -"आधी मला शब्द द्या, तुम्ही चिडणार नाही आणि माझ्याशी अबोला धरणार नाही."

देव -"मी शब्द दिला नाही, तरी एव्हाना तुला हे कळायला हवं की, तू काही जरी केलेस तरी मला तुझ्यावर चिडता येत नाही."

रमा -"मला, म्हणजे मी त्या दिवशी अगदी पहिल्यांदा जेव्हा उपमा केला होता…"

देव -"छान झाला होता उपमा."

रमा -"ऐका ना! मध्ये नका न बोलू."

देव -"बर बाई हाताची घडी तोंडावर बोट." देवने म्हटल्या प्रमाणे कृती केली.

रमा -"तो उपमा मी नव्हता केला. आईनी  करून दिला होता."

देव काहीच बोलत नव्हता केवळ रमाचं म्हणणं शांतपणे ऐकत होता.

रमा -"अहो बोला ना काही तरी!"

देवने मंद स्मित केले. रमा बावरली.

देव -"कमाल आहे तूझी, आधी म्हणते बोलू नका आता म्हणते बोला. माझ्या सारख्या पामराने काय करावे बरं?"

देवच्या या वाक्यावर रमाने लटका राग दाखवला.

देव तिची समजुत काढत बोलला "हो मला ते माहिती आहे."

रमा -"आईंनी तुम्हाला सांगितले का?"

देव -"अजिबात नाही. इतकी वर्ष तिच्याच हातचं खातो आहे, त्यामुळे पहिल्या घासातच लक्षात आलं."

रमा -"मी तुमच्याशी खोटं बोलले, खोटं वागले. आय एम सॉरी तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला मान्य आहे."

देव -"कोण म्हणत तू खोटं बोललीस?"

रमा आश्चर्याने देवकडे बघत होती.

देव पुढे बोलत होता "अग वेडाबाई उपम्याची प्लेट माझ्यासमोर ठेवताना, तु मला काही हे म्हटलं नव्हतं की, तो उपमा तू बनवला आहेस. जेव्हा पहिला घास मी खाल्ला आणि त्याच क्षणी मला कळलं होतं की उपमा आईने बनवला आहे."

रमा -"मग तरीही तुम्ही माझ्या कानात का कुजबुजलात की उपमा छान झाला म्हणून?"

देव -"लग्न करून,  स्वतःचं घर सोडून तू इथे, या अनोळखी लोकांमध्ये आलीस, सगळ्यांसोबत मिळून मिसळून वागण्याचा प्रयत्न करत होतीस, आणि या घरातल्या सगळ्या रितीभाती समजून घ्यायचा अगदी प्रामाणिक प्रयत्न करत होतीस, मग तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांना कौतुकाची पावती नको का?"

रमा -"चला तुमचं आपलं काहीतरीच आणि एवढे दिवस माझ्या जीवाला नुसता घोर लागून राहिला होता."

देव -"आणखी एक सांगू का?"

रमा -"सांगा ना!" रमा अधीरतेने बोलली

देव -"मला चहात आलं घातलेलं अजिबात आवडत नाही."

रमा -"अरे देवा!" रमाने दाताखाली जीभ चावली. "पण मग हे आधी का नाही सांगितलं तुम्ही? रोज विनाकारण तुम्हाला आलं घातलेला चहा पिण्याची शिक्षा."

देव -"पण आता मला आवडतो आलं घातलेला चहा."

रमा -"खरंच? रमा देवच्या जवळ जाऊन त्याच्या छातीवर डोकं ठेवत विचारत होती.

देव -"मॅडम तुम्ही एवढ्या जवळ याल तर या गरीब माणसाचं कसं होणार? तुमचा नवरा माझा जीवच घेईल." देवने रमाला छेडले.

रमा -"ओ मिस्टर माझ्या नवऱ्याला गरीब नाही म्हणायचं हां!"

देव -"मग काय म्हणायचं?"

रमा -"मनाचे राजे आहेत माझे अहो."

देव -"खरच?"

रमाने फक्त मान डोलावली.


देव -"रमा रात्र फार झाली आहे. जा आईच्या खोलीत जाऊन झोप."


रमा -"नाही आजपासून मी ईथेच झोपणार, आपल्या खोलीत."

देव -"पण तुला तर वेळ हवा होता ना आपल्या नात्यासाठी?"

रमा -"एखादी व्यक्ती ओळखायला एक क्षण ही पुरेसा असतो, नाहीतर जन्मभर सोबत राहूनही काही नाती समजण्याच्या पलीकडेच असतात."

देव -"आज रात्री मी काही गडबड केली तर?"

रमा -" तर काय? मी तुमची हक्काची बायको आणि आणि तुम्ही माझे…."

देव -"मी तुझा कोण आहे?" दोन्ही भुवया उंचावत देव मिश्किल स्वरात विचारत होता.

रमा -"जा मी नाही सांगणार." रमा लाजून देवाच्या कुशीत शिरली.

देव -"एक सांगू?"

रमा -"हं."

देव -"तू जर आयुष्यभरही मला वाट पाहायला लावली असतीस ना, तरी मी वाट पाहिली असती तूझी. तुझं माझ्या आयुष्यात असणं मी नाही सांगू शकत. फक्त एकच कर माझा विश्वास मोडेल असं काही करू नको, वागू नको."

देव रमाला कुरवाळत, तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलत होता. "बर आता तुझा पाय कसा आहे? जखम झाली का बरी?"

रमा -"जखम ही बरी झाली आणि मी पण!"

देव -"मग लाईट बंद करू?"

रमाने नुसतीच मान हवली. देव-रमाच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात झाली.

दिवस वाऱ्याचे पंख लावून, फुलपाखराप्रमाणे उडत होते. रमा-देवच नात अधिकच गहीरं होत होतं.

रमा -"अहो मी काय म्हणते?"

देव -"हां बोल ना!" रात्री देव कुठल्या तरी फाइल्स चाळत होता.

रमा -"आता परीक्षा पंधरा दिवसावर आली आहे. मी माहेरी जाऊ?"

रमाच्या या प्रश्नावर देवने हातातली फाईल एकदम जोरात बंद केली. देवच्या त्या कृतीने रमा फारच दचकली.

देव -" का इथे करमत नाही का तुला? की माझा कंंटाळा आला आहे?" देवचे हे  वाक्य रमाला  खुप लागले होते. "हे बघ रमा आता कुठे आपलं खरं आयुष्य सुरू झालय. तू माहेरी जाशील तर माझं कसं होणार?" देव हळवा होत बोलला. "एक काम कर परीक्षेच्या दोन दिवस आधी अमरावतीला जा. हवं तर मी पोहोचून देईन."

रमाने स्वतःची नाराजी लपवत, बळेच हसत ठीक आहे म्हटलं.



©® राखी भावसार भांडेकर.

**********************************************

🎭 Series Post

View all