हळुवार भाग सहा

Some Love Stories Never Ends


हळुवार भाग सहा


दुसऱ्या दिवशी रविवार होता. सकाळची कामं आवरून रमा सासूच्या खोलीत नोट्स वाचत बसली होती. मीनाताई कुठल्या तरी महिला मंडळाच्या मिटींगला गेल्या होत्या. तेवढ्यात देव आईला हाका मारत तिथे आला.

देव -"आई, ए आई कुठे आहेस ग तू?"

रमा -"आई नाहीत, त्या महिला मंडळाच्या मिटींगला गेल्या आहेत."

रमाने दारात उभ्या असलेल्या देव जवळ जाऊन उत्तर दिलं. देव हळूहळू एक एक पाऊल समोर टाकत पुढे येत होता, रमा एकेक पाउल मागे सरकत होती.

देव -"ही खोली खूप मोठी आहे, हो ना?"

रमा -"हो, म्हणजे छान आहे."

देव -"इथला बेडही छान प्रशस्त आहे."

रमा -"हम्म."

देव -"ए.सी.च कुलिंग पण छान होतं इथे."

रमा -"हां."

देव -"या खोलीच्या खिडकीतून बाहेरचा व्ह्यू पण छान दिसतो नाही?"

रमा मागे सरकत सरकत, जरा घाबरत हो ला हो करत उत्तर देत होती.

देव -"म्हणूनच तुला ही खोली सोडवत नाही, आणि तू माझ्या खोलीत येत नाहीस." रमावर नजर रोखत देव ठामपणे बोलला.

रमा -"काय?" मागे सरत रमा आता भिंतीला टेकली होती.

देव -"अगं माझ्या खोलीत तुला रात्री यायला बंदी आहे. दिवसा आलीस तर काही जगबुडी होणार नाही."

रमा लाजेने चूरू झाली. देव तिच्या अगदी जवळ आला होता. रमाने डोळे गच्च बंद केले. तेवढ्यात मागून नेहाने आवाज दिला.

नेहा -"वहिनी ए वहिनी!"

देव झटक्यात मागे झाला आणि जरा चिडतच खोली बाहेर गेला.

नेहा -"वहिनी आज रविवार, देव दादा घरीच आहे. चल आपण फुटाळ्यावर जाऊया! तू दादाला म्हण ना! तो नक्की घेऊन जाईन आपल्याला."

रमा -"नको बाई! मला भीती वाटते. अभ्यासही आहे."

मीनाताई खोलीत येत बोलल्या-

मीना -"कशाची भीती वाटते रमा तुला? देवची?"

रमा -"नाही, नेहा म्हणाली की आज संध्याकाळी फिरायला जाऊया!"

मीना -"अरे हो, तुम्ही लोक जाऊन या ना!"

नेहा -"नाही आत्या, तूला दादाचा स्वभाव माहिती आहे ना! तू पण चल आमच्याबरोबर."

नेहा लडिवाळा स्वरात बोलली. मीनाताईनी मानेने होकार दिला. संध्याकाळी फुटाळ्यावर जाताना रमा गाडीच्या मागच्या सीटवर जाऊन बसली. बाजूलाच नेहा होती, मीनाताईनी रमाला समोरच्या सीटवर बसायला लावले, पण रमाच्या मनाची तयारी नव्हती, उलट तीनेच मीना ताईंना समोरच्या सीटवर बसायला लावले.

देवने गाडी चालवताना, गाडीतला आरसा असा अड्जस्ट केला की त्यात त्याला रमा दिसत होती. फुटाळ्यावर नेहा, रमा, मीनाताई, देव बोलत बसले होते. काहीतरी खायला आणायचं म्हणून नेहा एका हॉटेलात काहीतरी आणायला गेली. रमा तलावाच्या पाण्यात पाय बुडवून बसली होती. मीनाताई बाजूला जाऊन फोनवर काहीतरी बोलत होत्या. देव रमाच्या अगदी बाजूला जाऊन बसला. रमानं संकोचून स्वतःच अंग आक्रसल.

देव -"माझी सोबत आवडत नाही का?"

"नाही तसं नाही." रमाने चाचरत उत्तर दिलं.

देव -"मग कसं? तु नेहमी माझ्यासमोर संकोचून बोलते, वागते. माझी भीती वाटते का तुला?"

रमा -"भीती वगैरे नाही वाटत."

देव -"मग काय वाटतं माझ्याबद्दल?"

रमा -"ते मला शब्दात नाही सांगता येणार. पण खूप….."

देव -"खूप काय? सांग ना! खूप काय?"

रमा -"लग्न फारच गडबडीत झालं."

देव -"पण तू स्वतःहून तयार होती ना या लग्नाला मग?"

रमा -"आता परीक्षाही अगदी जवळ आली आहे."

देव -"हां मग?"

रमा -"मला, मला थोडा वेळ हवाय."

देव -"कशासाठी?"

रमा -"आपल्या नात्यासाठी. तुम्हाला समजून घेण्यासाठी."

देव -"बर ठीक आहे. तू जसं म्हणशील तसं, पण आता निदान जाताना तरी गाडीत समोरच्या सीटवर बसशील ना?"

रमाने खाली मान घालून हो म्हटले.

घरी परत जाताना मागच्या सीटवर नेहा अखंड बडबड करत होती. मीनाताई तिच्या हो ला हो करत होत्या. रमा गाडीच्या खिडकीतून बाहेर बघत होती. गाडी चालवता, चालवता देवने रमाच्या हातावर अलगद स्वतःचा हात ठेवला. रमा त्या स्पर्शाने शहरली आणि तिने चमकून देवकडे पाहिले. देव समोर बघत एका हाताने गाडीचे स्टेअरिंग सांभाळत होता. रमा खुदकन हसली आणि तिने देवच्या हाता खालून हात काढला. देवने मग हात गाडीच्या गिअर वर ठेवला. आता रमान स्वतःचा हात देवच्या हातावर हळुवार ठेवला. देवच्या करड्या चेहऱ्यावर एक गोड लकेर उमटली.

रात्री रमा आणि देव दोघांनाही झोप येत नव्हती. देव मीनाताईंच्या खोलीत डोकावला. मीनाताईंना देवची चाहूल लागली.

मीनाताई -"काय रे देवा काही पाहिजे का?" मीनाताई मिश्किल हसत बोलल्या.

देव -"आई तू अजुन जागीच आहेस?"

मीनाताई -"हो आणि रमा पण! काय ग रमा?"

रमा -"अं काय आई."

मीना ताई -"अग देवला काही तरी हवं आहे. जा बरं काय पाहिजे ते दे त्याला."

रमा खोली बाहेर आली.

देव -"झोपली नाहीस?"

रमा -"तुम्ही पण जागेच आहात ना!"

देव -"पाणी, पाणी पाहिजे मला." देवने सारवा-सारव केली.

रमाने देवला पाणी दिले.

देव -"बर मग मी झोपतो आता."

रमा -"ठीक आहे. मी पण झोपते. गुड नाईट."

देव -"गुड नाईट."

पण दोघांचाही किचन मधून पाय निघेना.

रमा -"कॉफी?"

देव -"चालेल."

कॉफी पीता-पीता रमा-देव गप्पा मारत बसले होते.

देव -"रमा खूप लहान असताना घराची जबाबदारी माझ्या अंगावर आली. लहान वयात खूप कटू अनुभव आलेत जगाचे. ज्या वयात आई आपल्या लेकराच्या अभ्यासाची, जेवणाची काळजी करते त्या वयात मी घरचा कर्ता पुरुष झालो. बाबांनी वडिलोपार्जित सगळी इस्टेट दारूच्या व्यसनात घालवली. मला तर माणसांवर लवकर विश्वासच ठेवता येत नाही. समोरच्या माणसाला बघूनच कळतं की, तो किती पाण्यात आहे."

रमा देवच बोलणं अगदी मन लावून ऐकत होती.

देव -"मला असं कळलं की, ती तू खूप छान गाणं म्हणतेस."

रमा -"छे अजिबात नाही."

देव -"मला ऐकायचा आहे तुझा आवाज."

रमा -"एवढ्या रात्री? काहीतरीच काय?"

देव अगदी रागीट स्वरात म्हणाला "एकदा म्हटलं ना की गाणं म्हण, तर म्हणायचं. मराठीत बोललेलं कळत नाही का तुला?" देवचा बदललेला आवाज ऐकून रमा जरा चपापली पण मग तिनं गाणं म्हणायला सुरुवात केली.

"चांदण्यात फिरताना धरलास माझा हात

सख यारे आवरही सावरही चांदरात चांदराssत."

देव अगदी तल्लीन होऊन रमाचं गाणं ऐकत होता. गप्पा मारता-मारता रात्र कशी संपली ते दोघांनाही कळत नाही.

दुसऱ्या दिवशी देव त्याच्या खोलीतच लॅपटॉपवर काम करत बसला होता. चहा नाश्ता करायलाही तो बाहेर आला नव्हता. रमा नाश्त्याचा ट्रे घेऊन देवीच्या खोलीत आली.

रमा -"तुम्ही चहा नाश्ता काहीच घेतलं नाही?"

देव -"आज खूप काम आहे. एक महत्त्वाच प्रोजेक्ट पूर्ण करायच आहे. टेंडर पण फायनल होणार आहे. नाश्ता करायला अजिबात वेळ नाही."

रमा -"मी खाऊ घालू?"

देव -"नेकी और पूछ,पूछ?"

रमा देवला चमच्याने घास भरवत होती.

रमा -"आई विचारत होत्या, तुम्हाला परवा वेळ आहे का?"

देव -"का? कशासाठी?" लॅपटॉप वर टाईप करत देव बोलला.

रमा -"असं काय करता? पूजा करायची आहे."

देव -"कोणती पूजा?"

रमा जरा संकोचाने बोलली "गर्भदानाची."

देव -"ते काय असत?"

रमा -"तुम्हाला काहीच कसं माहिती नाही?"

देव -"आजचा सेन्सेक्स काय आहे? लँन, मॅन,
मधलं काही कळतं का तुला?"

रमा -"नाही?

देव -"मग सगळंच मलाही माहिती नसतं! कसली पूजा आहे?"

रमा -"ती पूजा झाल्यावर आपण फिरायला जाऊ शकतो." रमा लाजत बोलली.

देव -"अच्छा अस आहे का? मग मला उद्या ही वेळ आहे."

रमा -"मी प्लेट घेऊन जाते." रमा तिथून हळूच सटकली.

दुसऱ्या दिवशी पूजा झाली. गुरुजी आशीर्वचन देऊन, दक्षिणा घेऊन निघून गेले.

देव त्याच्या खोलीतून ओरडतच बाहेर आला. "माझ्या खोलीत कोण गेलं होतं? किती वेळा सांगितलं आहे, मला नविचारता माझ्या कागदपत्रांना हात लावायचा नाही."

मीनाताई, नेहा, नोकर माणसं सारी हॉलमध्ये जमली.

देव -"माझ्या कागदपत्रांना कोणी हात लावला? कोण गेलं होतं माझ्या खोलीत? सगळे मूग गिळून का उभे आहात? उत्तर द्या मला." रागाने त्याने टेबलावरचा कचेचा पेला खाली फेकला. त्या काचेच्या पेल्याचे तुकडे तुकडे झाले. त्या आवाजाने रमा बाहेर आली.

देव -"रमा तू माझ्या कागदपत्रांना हात लावलास का?" देव रागाने रमाला विचारत होता.

रमा काही उत्तर देणार तेवढ्यात तिच्या पायात काचेचा एक तुकडा गेला. रमा वेदनेने कळवली. देवने रमाकडे पाहिले. तिच्या पायातून रक्त येत होते. पण देवचा रागावलेला चेहरा पाहून रमाने तोंडावर हात ठेवला. देव धिम्या पावलाने रमा जवळ आला. त्याने रमाच्या पायातून काचेचा तुकडा ओढून काढला. रमा परत एकदा वेदनेने कळवली. देवने रमाला दोन्ही हातात उचलून घेतलं. सगळ्यांसमोर देवने असं उचलल्यावर रमाला अवघडल्यासारखं वाटलं. तिने त्याच्या हातातून सुटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, पण देवची भक्कम पकड रमाला सोडवता आली नाही.

देव -"काय झालं?" रमा काहीच बोलली नाही. सगळ्यांकडे बघुन "रमाचा पाय दुखतोय, खोलीत घेऊन जातोय. कुणाला काही प्रॉब्लेम?"

सगळेजण आपापल्या कामाला गेले. देवने रमाला स्वतःच्या खोलीत नेलं. रमाच्या पायात काचेचा एखादा तुकडा राहून गेला का? त्याकरिता तिचा तळपाय हाताने दाबला. रमा परत वेदने कळवळली. देवने रमाच्या पायाचं ड्रेसिंग केलं.

देव -"आता तीन-चार दिवस पाण्यात पाय टाकायचा नाही." रमानं केवळ होकारार्थी मान हलवली.©® राखी भावसार भांडेकर.

🎭 Series Post

View all