Login

हळुवार भाग पाच

Some Love Stories Never Ends


हळुवार भाग पाच

देव अमरावतीला निघून गेला. दुपारी रमा मीनाताईंच्या खोलीत तिच्या अभ्यासाच्या नोट्स वाचत होती, तेवढ्यात बाहेर काहीतरी आवाज आला.

म्हातारी -"मीने ए मीने कुठं हाय ग? देवचं लगन केलं अन मले बालवलबी नाय तुन!" एक म्हातारी  वर्हाडी  भाषेत बोलत होती.

मीना -"तसं नाही आई, पण आता देवही तिशीचा झाला आहे. चांगलं स्थळ आलं उरकून टाकलं लग्न."

म्हातारी -"म्हन उरकून टाकल. मान नाही पान नाही. दाखव बर मले तुई सुनगट. कोणती बया धरून आणली त का मालुम!"

मीना -"हो हो बोलावते हां. रमा ये रमा जरा बाहेर ये ग." मीनाताईंनी रमाला बोलावले.

रमाने म्हातारीला वाकून नमस्कार केला. रमाला बघून म्हातारी खुश झाली.

म्हातारी -"मीने साजरी हाय तुई सुन. नाव काय ग पोरी?"

रमा -"रमा."

म्हातारी -"झ्याक हाय नाव. मी नेहाची आजी म्हणजे आईची आई. तुले पायले आली. सुखी राय, चांगला संसार कर. माया देवले संभायजो." म्हातारीने तोंड भरून आशीर्वाद दिला. "पण मीने, म्हातारी मीनाताईंशी बोलत होती. "मले वाटलं का तू मायी नेहा करशीन, पण ठीक हाय जे झालं ते बेस हाय. येतो मी. सुखी रहा." म्हातारी निघूनही गेली.

रमाने संध्याकाळी देवा जवळ दिवा लावला. तेवढ्यात मीनाताईंनी रमाला देवच्या खोलीत पाठवले.

मीनाताई -"रमा आधी देवच्या खोलीत जाऊन उद्याची तयारी करून ठेव."

रमा -"कसली तयारी?"

मीनाताई -"त्याचे कपडे, जॅकेट सगळे जागेवर आहे की नाही ते पाहून घे. शूज दारा जवळ,साॅक्स दारा मागच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये आणि टाय…

रमा -"कपाटातल्या आतल्या हॅंगरला...."

मीना -"अगदी बरोबर! कोणी सांगितलं तुला हे?"

रमा -"नेहाने."

मीना -"अच्छा! जा लवकर."

रमाने देवची खोली आवरली. तेवढ्यात तिला तिच्या आईचा फोन आला. ती तिथेच आईशी बोलत बसली. बाहेर दरवाजा जवळ उभ राहून देव आत कोण आहे याचा कानोसा घेत आत आला. रमा खोलीच्या खिडकीतून बाहेर बघत बोलत होती. देव तिच्या अगदी जवळ गेला. तिला त्याने कमरेतून पकडले, आपली हनुवटी रमाच्या खांद्यावर ठेवली. जेव्हा देवने रमाला पकडले तेव्हा रमा जरा दचकली, पण देवला बघून लगेच सावरलीही. देवने खुणेनेच विचारले कुणाचा फोन.

रमा -"आईचा फोन. आई मी नंतर बोलते, ठेवते आता. तुम्ही आत कधी आलात?" रमाने देवला विचारलं.

देव -"का? नको यायला?\"

रमा -"नाही तसं नाही."

देव -"काय नाही?"

रमा -"नाही म्हणजे हो." रमा पूरती बावरली होती. "म्हणजे नाही असं नाही. तुम्ही लवकर येणार ते माहिती नव्हतं ना!"

देव -"माहिती होणार तरी कसं? फोन लावला तर तू उचलत देखील नाही, मग माणसाने काय करावं? सकाळपासून तीनदा फोन लावला एकदाही नाही उचलला! कुठे बाहेर गेली होतीस का?"

रमा -"अं, नाही घरीच होते." रमाची धांदल उडली होती.

रमाच्या हातातला फोन काढून घेत देव बोलत होता.

देव -"मग फोन का नाही उचललास? खूप काम होतं का घरी?"

रमा -"नाही, सकाळी मीराशी बोलले. तेव्हा तुमचा कॉल वेटिंग वर होता. तुमचा फोन घेईपर्यंत तो कट झाला. मग दुपारी आईंच्या रूममध्ये वाचन करत होते. खूप मेसेज येत होते म्हणून सायलेंट केला फोन. नंतर….

देव -"नंतर काय?"

रमा -"आजी आल्या होत्या. नेहाची आजी."

देव -"अच्छा! नंतर?"

रमा -"संध्याकाळी तुमच्या खोलीत आले."

रमाच्या प्रत्येक उत्तरावर देवचे प्रश्न वाढतच होते. त्याने डोळे रमावर रोखले होते आणि आवाजातल्या जरबेने रमाची उत्तर देण्यात गडबड होत होती.

देव अतिशय प्रेमळ स्वरात रमाला समजावत होता…
"हे बघ रमा ऑफिसमध्ये खूप काम असतं मला. कम्प्युटर्सच नेटवर्किंग करताना, डील फिक्स करताना, शंभर लोकांशी बोलावं लागतं. त्यांच्या हजार तर्हा सांभाळाव्या लागतात, मग अशा तणावात तुझ्याशी बोलावसं वाटलं आणि तू जर फोन नाही उचलला तर……तर मी फार अस्वस्थ होतो. तुला समजतंय ना मला काय म्हणायचे ते?"

रमा -"सॉरी. म्हणजे मी तुम्हाला फोन करणारच होते, पण विसरले. नंतर फोन करावासा वाटला पण मग तुम्ही मीटिंगमध्ये बिझी असणार असं वाटलं, म्हणून नाही केला फोन. म्हणजे मला कळत आहे तुमच्या भावना. मी शब्द देते तुम्हाला यानंतर मी तुमचा फोन कधीच मिस होऊ देणार नाही." रमाने चाचरत उत्तर दिले. तेवढयात रमाला काहीतरी आठवलं.

रमा मीनाताईंच्या खोलीतून काहीतरी आणायला गेली. तेवढ्या वेळात देवन रमाचा फोन चेक केला. कुणाचे कॉल आले, कुणाचे कॉल मिस झाले ते त्यांन फोनवर स्क्रोल करून पाहिल.

रमा -"मी तुमच्यासाठी काहीतरी आणल आहे."

देव -"काय?"

रमा -"म्हणजे लग्न ठरल्यावरच हे घेतलं होतं." रमाच्या हातात एक सोन्याच लॉकेट होतं, इंग्रजी आर आणि डी असं अक्षर असलेलं.

"आवडलं का तुम्हाला."

देव -"हो आवडलं. पण हे असे एकमेकांना गिफ्ट देतात का? म्हणजे मला काही माहिती नाही, समजतही नाही, म्हणून विचारत आहे."

रमा -"तसंच काही नाही. तुम्ही घरी आले होते तेव्हा तुमच्या गळ्यात फक्त चेन दिसली मग मीरा म्हणे की, मी तुम्हाला लॉकेट गिफ्ट द्यावं."

देव -"हे लॉकेटही मीरानच निवडलं का?" देवचा चीडका स्वर.

रमा -"नाही, अजिबात नाही. मीच बनवून घेतलं. खास तुमच्यासाठी." रमाच सारवा सारवीच उत्तर.

देव -"मी काय देऊ तुला? सांग ना! मला नाही कळत काही बायकांचं. बायकांना काय आवडतं? तू सांग काय देऊ तुला?"

रमा -"तुम्ही काही दिलंच पाहिजे असं काही नाही, आणि ज्याला गिफ्ट देणार त्यालाच विचारताय, तुला काय हवंय? असं नसतं."

देव रमाला स्वतःकडे वळवून "मग कसं असतं?"

रमा -"आपल्याजवळच्या माणसांन काहीही दिलं तरी ते छानच असतं कारण…"

देव -"कारण?"

रमा-"कारण ती व्यक्ती आपल्या हृदयाच्या अगदी जवळ असते. अगदी हृदयातच असते."

देव -"मग या जवळच्या व्यक्तीला तुझ्याजवळ यायची परवानगी आहे?" देव स्वतःचा चेहरा रमच्या चेहऱ्यावर झुकवत बोलत होता.

रमा -"आई आलेच."

देव घाबरून मागे झाला. रमा लाजून खोलीतून बाहेर पळाली.


©® राखी भावसार भांडेकर.