हळुवार भाग तीन

Some Love Stories Never Ends


हळुवार भाग तीन


रमा आणि देवदत्त बाहेर आले होते.

देव -"मला तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे आहेत."

रमा -"त्याकरिता तुम्ही नागपूरहून इथे अमरावतीला आला आहात! केवळ दोन प्रश्न विचारण्यासाठी?"

देव -"हो. या दोन प्रश्नांसाठीच मी सगळ्या मीटिंग्ज कॅन्सल करून, नागपूरहून अमरावतीला आलोय. त्यामुळे हे दोन प्रश्न माझ्यासाठी किती महत्त्वाचे असतील याचा तुम्ही नक्कीच विचार करा."

देवदत्तच्या या वाक्यावर रमाला जरा ताण आला होता. तिला प्रश्न पडला होता की, देवदत्त आता तिला कुठले प्रश्न विचारणार आहे.

रमा -"हा विचारांना."

देव -"तुम्ही मनापासून या लग्नाला तयार आहात का? आणि तुमच्या आयुष्यात या आधी एखादा मुलगा किंवा तुमचं कुणावर प्रेम वगैरे……."

रमा -"माझ्या आयुष्यात आजपर्यंत कुठलाही मुलगा नव्हता. हे लग्न मी माझ्या आई-बाबांच्या इच्छे खातर करतेय. त्यांची इच्छा तीच माझी मर्जी."

देव -"म्हणजे तुमचा या लग्नाला होकार नाही?"

रमा -"अगदी तसंच काही नाही, पण…."

देव -"पण काय? घरून लग्नासाठी दबाव वगैर?"

रमा -"नाही, नाही अजिबात तसं काही नाही."

देव -"मग कसं?"

रमा -"मी एम. ए. च्या शेवटच्या वर्षाला आहे. दोन महिन्यावर अंतिम परीक्षा आली आहे. माझा अभ्यासही झाला आहे. पण आता लग्नामुळे…."

देव -"तुमची परीक्षा हुकणार असंच ना?"

रमा -"हो."

देव -"लग्नानंतरही तुम्ही परीक्षा देऊ शकता."

रमा -"मला पुढे अजूनही शिकायचं आहे. पी.एच.डी., नेट, सेट करायच आहे."

देव -"एवढे शिकून नोकरी पण करायची असेल होय ना?"

रमा -"त्याबद्दल अजून काही ठरवलं नाहीये."

देव -"तुमच्या शिकण्याला माझा काही विरोध नाहीये. पण आपल्या लग्नानंतर तुम्ही नोकरी केलेली मला आवडणार नाही."

रमा -"तुम्ही मला शिकण्यासाठी परवानगी दिलीत हेच खूप आहे माझ्यासाठी. आणि नोकरीचे म्हणाल तर, मी घर आणि काम दोन्ही सांभाळू शकते."

देव -"असं तुम्हाला वाटतं!"

रमा -"हो अगदी."

देव -"चला एक तास संपत आला, वेळेत घरी जायला हवं. मग लग्नाकरिता मी होकार समजू?"

रमा -"अं हो."

देव गाडी चालवता चालवता रमाकडे डोळ्यांच्या कोपऱ्यातून बघत होता. रमा मात्र गाडीच्या काचातून बाहेरचा पळणारा रस्ता, झाडे आणि विचार यात रमली होती.

देव -"रमा एक गोष्ट सांगू?"

रमा -"हा बोला ना!"

देव -"मला खोटं अजिबात आवडत नाही. खोटी माणसं, खोटं बोललेलं मी सहन करू शकत नाही. आणि वेळ चुकलेली मला पटत नाही."

रमाने केवळ होकार भरला. रमा घरी परतली. देवदत्तच्या बोलण्यावर आनंद वाटून घ्यावा की, नाराजी दाखवावी हेच तीला कळेना. तेवढ्यात आजीची हाक कानावर आली.

आजी -"रमे आलीस का ग?"

रमा -"हो आजी मघाशीच आले."

आजी -"काय ठरवलेस मग?"

रमा -"कशाचं?"

आजी -"परीक्षेच आणि लग्नाचही."

रमा -"आजी तू किती मनकवडी आहेस ग!"

आजी -"अग बाई हे केस काय मी उन्हात पांढरे केलेत का?"

रमा -"मग कसे पांढरे झाले तुझे केस?" रमा मस्करी करत बोलली.

आजी -"अग बाई तुम्ही आज कालच्या पोरी, लग्न, शिक्षण, नोकरी असं सगळं तुमचं त्रांगड झालेलं. तुझ्या मलूल चेहऱ्याकडे बघून मला तेवढही कळणार नाही होय?"

रमा -"आजीss!" आजीच्या कुशीत शिरून रमा स्फुंदत होती.

आजी रमाच्या डोक्यावरून मायेन हात फिरवत फिरवता बोलत होती.

"अगं तुला मनातून वाटत असेल तरच बोहल्यावर उभी रहा, नाहीतर मी बोलते रमेशशी."

रमा -"देवदत्तही तेच म्हणत होते. मला पुढे शिकण्याचीही परवानगी दिली त्यांनी, पण मी नोकरी केलेली आवडणार नाही त्यांना असं म्हणाले!"

आजी -"सासरी गेल्यावर तिथल्या चालीरीती, परंपरा, आणि नवऱ्याची मर्जी सांभाळणे यासारखी मोठी \"नोकरी\" म्हणजे जबाबदारी नाही. त्यांनी शिकायला परवानगी दिली, तू प्रेमाने सासरच्यांना आपल्यास कर. मग सगळेच किंतू संपतील."

आजीच बोलण रमा मन लाऊन ऐकत होती. आजी प्रेमाने रमाच्या डोक्यावरून हात फिरवत होती. आजीच बोलण ऐकता ऐकता रमा आजीच्या कुशीत झोपी गेली.

दुसऱ्या दिवशी देवने रमला हॉटेलमध्ये कॉफीसाठी बोलावलं. त्या कॅफेमध्ये काही मुलं उनाडक्या करत होते. देव दुरून ते बघत होता. त्या उनाड मुलांनी सॉफ्ट ड्रिंक उघडून सगळीकडे त्याचा फेस उडवला. नेमकं त्याचवेळी ते ड्रिंक रमाच्या ओढणी वर आणि चेहऱ्यावर उडाल. त्यातला एकाने रमाकडे बघून जास्तच हसत रमाची खिल्ली उडवली. देवला ते सहन झालं नाही. त्याने त्या मुलाला झोडपायला सुरुवात केली. बाकीची मुलं आ-वासून नुसती बघत होती. देवदत्तचा हात काही थांबत नव्हता. त्या मुलांपैकी एकाने काचेचा ग्लास फोडून देवला फेकून मारला, देवने तो हाताने अडवला पण त्यामुळे देवचा हात रक्ताळला. रमा हे बघून फारच घाबरली. तेवढ्यात कॅफे मधल्या लोकांनी त्या उनाड मुलांना हॉटेल बाहेर काढलं.

रमा -"तुम्हाला खूप लागलय, हात दाखवा मी रुमाल बांधते."

देव -"तुम्ही आधी चेहरा धुऊन या. तुम्हाला कोणी त्रास दिलेला मला आवडत नाही, आवडणारही नाही."

रमा -"पण आधी ती हाताची जखम मला बांधू द्या. फार रक्त गळतय."

देव -"मला सवय आहे याची."

रमा -"काय?"

देव -" दहा-बारा वर्षाचा असताना बाबा त्यांच्यासोबत मला बार मध्ये काम करायला घेऊन जायचे. तेव्हा पासून मी बारमध्ये काम करताना अशा हाणामार्या नेहमीच पाहिल्या आहेत. स्वतःच्या मेहनतीने मी शून्यातून सर्व निर्माण केले आहे."

रमा -"अरे वा! छान."

देव -"तुम्ही माझी तारीफ करावी म्हणून मी सर्व केलेलं नाहीये! जा फ्रेश होऊन या."

रमा फ्रेश होऊन आली आणि तिने हळुवारपणे रुमाल देवच्या हाताला बांधला. कॉफी पिऊन दोघं घरी निघाले.

देव -"आजच्या प्रसंगाने तुम्ही आपल्या लग्नाचा फेरविचार…."

रमा -"अजिबात करणार नाही. बाबांनी एकदा ठरवले ना! मग फायनल."

देव -"तुम्ही तुमच्या बाबांवर फारच प्रेम करता?"

रमा -"हो त्यांचा शब्द माझ्यासाठी काळया दगडावरची रेघ आहे."©® राखी भावसार भांडेकर.

🎭 Series Post

View all