झोपडी

What Is In The Cottage ?
झोपडी ( भयकथा )
भाग १

सुर्यास्त होऊन गेला होता. पक्ष्यांचा किलबिलाट, येणाऱ्या जाणाऱ्या एखाद दुसऱ्या गाड्यांचे आवाज पूर्णपणे थांबलेले. सगळीकडे चिडीचूप शांतता पसरली होती.
अरूंद, सरळ पायवाट. दोन्ही बाजूला घनदाट जंगल. एका कडेला गोपी उभा होता. जरा वैतागलेला दिसत होता. मित्रासोबत त्याच्या बाईकने एके ठिकाणी जात असताना बाईक नेमकी या जागी येऊन बंद पडली. तरी बरं, ते फार आतपर्यंत आले नव्हते. मग काय मित्र बाईक ढकलत ढकलत परत मागे गेला, तो अजून आला नव्हता. त्यात दुपारपासून ढग जमा व्हायला सुरुवात झाली होती. आता तर अधूनमधून ढग गरजायला ही लागले होते. कधीही पाऊस पडायला लागण्याची शक्यता तयार झाली होती. त्याने हातावरच्या घड्याळात नजर टाकली. पावणे सात वाजले होते. तो स्वतःशीच बडबडू लागला. -

" च्यायला ह्याच्या. तास होत आला. अजून कसा परतला नाही. इतका टाईम लागतो का ?" मग आकाशाकडे बघत म्हणाला. " देवा एवढं झालं. पण आता पाऊस नको येऊ देऊ रे बाबा."
पण बहुतेक आज त्याचा दिवसच खराब होता. थोड्याच वेळात जोरदार पाऊसाला सुरूवात झाली. आता मात्र इथे उभ राहणही शक्य नव्हतं. - थोड आत जाऊन जरावेळ आडोशाला थांबण्यासाठी एखादं घर, झोपडी दिसते का पहाव - त्याच्या मनात आलं. त्या जंगलात शिरण्याची त्याला अजिबात इच्छा नव्हती ; पण आता दुसरा पर्यायच नव्हता. नाईलाजाने तो मागे वळून जंगलात शिरला.
खरंतर जवळपास काही दिसेल की नाही, त्याला शंकाच होती ; पण थोडंसं पुढे जाताच त्याला एक छोटीशी, टुमदार झोपडी दिसली. त्याला जरा हायसं वाटलं. तो झपाझप चालत झोपडी जवळ जाऊन पोहोचला. दार लोटून घेतल होत. तो क्षणभर शांत उभा राहिला. आत कुणाच्या बोलण्याचा किंवा हालचालींचा काहीच आवाज येत नव्हता. स्वत:शी आश्र्चर्य करीत त्याने दरवाजावर टकटक केली. प्रतिसाद आला नाही. मग तो म्हणाला -

" कुणी आहे का ? " तरी काहीच उत्तर नाही अंग भिजल्यामुळे थंडी वाजत होती. त्याने जरा वैतागून परत दारावर टकटक केली, आणि जरा मोठ्याने तोच प्रश्न विचारला. मग.. अंधाऱ्या रात्री, शांततेत त्याला तो विचित्र आवाज स्पष्ट ऐकू आला.

" हह्ह.. सस्स..."

कदाचित पावसाचा किंवा वाऱ्यावर हलणाऱ्या झाडांचा आवाज असेल. ( ही खोटी समजूत होती. पाऊस बराच मंदावला होता. वाराही नव्हता. मन जरा शंकित झालच होतं. ) तरीही त्यान दाराला कान लावून चाहूल घ्यायचा प्रयत्न केला.

हह्हस.. सस्ससस..ह्ममम..." पुन्हा तो विचीत्र आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू आला.

तो अभद्र, किळसवाणा आवाज ऐकून त्याच्या अंगावर काटा आला. तो दोन पावलं मागे सरून बधीरपणे तसाच उभा राहिला. मिनीटभर शांतता. मग दरवाजाकडे काहीतरी सरपटत येऊ लागले. मग मात्र तो खाड्कन भानावर आला. शरीरावरची बधिरता गळून तो सर्व शक्तीनिशी पळू लागला. थोडं पुढे गेल्यावर त्याचा मित्र येताना दिसला. त्याचा हात पकडून गोपी रस्त्याकडे धावू लागला. पोहोचताच त्याला गाडी स्टार्ट करायला सांगितले. स्वत: मागे बसला. बाईक सुसाट वेगाने पळू लागली

क्रमशः


🎭 Series Post

View all