बदल

How life has changed with time

  बदल

        उंच उंच इमारतींच्या कुठल्यातरी अनेक खिडक्यांतून कोवळी उन्हं तिला हळूच कुरवाळते,"अगं उठ आता"असं तिच्या कानात कुजबुजत राहते, पण तिला उठायचं नसतं, मऊ बिछान्यात ती आणखीन थोडा वेळ लोळत राहते.





        एखाद्या दिवशी ऊन पावसाचा लपाछपीचा खेळ सुरू असतो. कधी ऊन तर कधी पावसाची जोरदार सर असा सगळा खेळ रंगलेला असतो. तिला पावसाचे टपोरे थेंब लुटायची असतात पण ती आपली छत्री सावरत घरचा रस्ता धरते निमूटपणे.



        कधी कधी तिला एकटं राहायचं असतं कोवळ्या सकाळी किंवा एखाद्या मुग्ध संध्याकाळी थोडा वेळ स्वतः सोबत राहायचं असतं , पण ती तसं करत नाही. दुसऱ्या दिवशीच्या मिटिंगच्या नोट्स काढायला सुरुवात करते.



       लहानपणी फुलपाखरामागे धावतांना वाऱ्यामुळे अस्ताव्यस्त झालेले केस घरी आई छान शिकेकाई ने धुऊन, खोबरेल तेल लावून विंचरून द्यायची. ती गोड आठवण मनातल्या एका कोपऱ्यात ती जपून ठेवते आणि आता मोठं झाल्यावर सलून मध्ये जाऊन हेअर्स स्पाच घेते.



       आजीने केलेलं खमंग थालीपीठ किंवा धिरडे ती आवडीने आणि चवीने खायची. घरातल्या बायकांना कुटुंबासाठी आवडीनं राॱधताना पाहायची, पण आता घरबसल्या आवडीचे पदार्थ ती सहजच ऑनलाइन बोलावते.



      डिगर, लगोरी, पकडापकडी ,लंगडी भातुकली ,लपाछपी ,कॅरम ,पत्ते किंवा अष्टचंग, सापशिडी हे खेळ खेळताना मैत्रिणींबरोबर ची मज्जा तिला आठवत राहते पण टीव्ही आणि मोबाईल मध्ये गुंतलेल्या आपल्या मुलांना बघून मात्र ती आताशी गप्पच राहते.



       अनेक दुकान, असंख्य साड्या, हात लावून, निरखून, रंगरूप, पोत ,कापड ,वारंवार स्पर्श करून ,चिकित्सा करणारी ती आता मोबाईलच्या स्क्रीनच्या चित्रातून साड्या ऑनलाइन बोलावते.



          वाचनाची आवड असल्याने खूप पुस्तकं वाचणारी ,महिन्याला एक तरी पुस्तक विकत घेणारी, ती आता ई- बुक वाचू लागली आहे.

  

            खरंच आपण आता बदलत आहोत त्याची जाणीव तिला झाली आहे.




🎭 Series Post

View all