प्रेमाचा अंकुर (भाग ६)

About Love
प्रेमाचा अंकुर ( भाग ६)


दोन बहिणीनंतर अमितचा जन्म झाला होता. त्यामुळे अमित घरात सर्वांचा लाडका ... अमितला सोबतीला भाऊ असावा अशी मनात इच्छा आणि सुदैवाने दोन वर्षांनी मुलगाच झाला. त्यामुळे अमितच्या आईबाबांच्या आनंदात अजून भर पडली होती.

आईबाबा,दोन मुली,दोन मुले असे अमितचे छान कुटुंब गावात राहत होते. अमितच्या वडिलांची बागायती शेती होती. शेतीचे उत्पन्न चांगले होत होते. शेतीला पूरक असे बाकीचे व्यवसाय ही करीत होते. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली होती. घरात सर्व काही होते . कशाचीही उणीव नव्हती. आईबाबा आपल्या सर्वांवर खुप प्रेम करतात ,लाड पुरवितात पण घरात आपल्या बहिणींपेक्षा आपल्यावर आणि भावावर त्यांचे थोडे विशेष प्रेम आहे ,हे त्याला जाणवत होते. मुलामुलींमध्ये असा भेदभाव का करतात ? असे तो अनेकदा आईबाबांना विचारायचा पण त्याला समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. अमितचे आपल्या बहिणींवर आणि भावावर खुप प्रेम होते.

बहिणींचे कॉलेजचे शिक्षण सुरू असतानाच लग्ने झाली आणि त्या संसाराला लागल्या होत्या. अमित अभ्यासात हुशार होता आणि त्याने पुढील शिक्षण घेऊन नोकरी करावी अशी आईबाबांची इच्छा होती. त्याच्या कडून त्यांना खुप साऱ्या अपेक्षा होत्या. आणि अमितलाही त्याची जाणीव होती.

अमितच्या घरचे वातावरण संस्कारी होते. त्यामुळे त्याच्यावर चांगलेचं संस्कार होते. आपला अभ्यास करणे, सर्वांशी चांगले वागणे,वाईट संगतीत राहू नये अशी आईबाबांची शिकवण होती. आणि अमितही त्याचे पालन करीत होता. शाळेत किंवा गावात मुलींशी बोलू नये, मैत्री करू नये. असे पण सांगितले जायचे.

पण मनाला कितीही आवर घातला तरीही ते ऐकते थोडीचं...

"मन वढायं वढायं
उभ्या पीकांतलं ढोरं,
किती हांकला हांकला फिरी येतं पिकांवर ."

बहिणाबाईंच्या कवितेत वर्णन केल्याप्रमाणे अमितचेही तसेचं होत होते.

आपल्या वर्गातील संध्या आपल्याला आवडू लागली हे त्याला कळलेचं नाही. साध्या राहणीतील तिचे सौदर्य आवडत होते. अभ्यासात ही हुशार होती. बोलण्यात माधुर्य होते. इतर मुलींपेक्षा हिच्यात काहीतरी वेगळंपण आहे , असं सारखं जाणवत होत. एखादे दिवशी ती कधी शाळेत आली नाही ,तर मन खट्टू व्हायचे. तिला पाहिले की दिवस खुप छान जात होता. फक्त पाहूनच किती समाधान मिळत होते.

प्रेम म्हणतात ते हेचं का ?
असे त्याला वाटू लागले होते.


कधीतरी तिच्याशी बोलण्याचा प्रसंग आला तर , तिने कधी नजर वर करून बघितले नाही.
आपल्याला वाटते तसेचं तिला ही आपल्या बद्दल काही वाटत असावे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न निष्फळचं गेले..
कितीदा मनातले ओठांवर आणण्याचा प्रयत्न केला पण मनात नको ते विचार येत होते.

\" आपल्या घरातील व्यक्तींना हे चालेल का ? त्यांच्या आपल्याकडून खुप साऱ्या अपेक्षा आहेत आणि आपल्या या गोष्टीमुळे त्यांना काही त्रास झाला तर ?
संध्याला आपल्या बद्दल तसे काही वाटत नसेल तर ?
आपण तिला मनातले सांगितले आणि तिने घरी जाऊन सांगितले,शाळेत शिक्षकांना सांगितले तर ..
आपल्या बद्दल काय वाटेल सर्वांना? काही चांगले होण्याऐवजी काही विपरीतचं घडले तर ...
तिचेही आयुष्याचे नुकसान आणि माझ्या मुळे माझ्या घरातल्यांना ही त्रास. तिच्या वर प्रेम तर आहे पण पुढे मार्ग दिसत नाही .

समजा, तिलाही आपण आवडत असल्याचे काहीतरी जाणवले असते तर , काही मार्ग शोधला असता. पण त्यासाठी खुप हिंमत लागते.

प्रेम होणे,प्रेम करणे सोपे. पण शेवटपर्यंत निभावणे खुप अवघड असते.

अशा कितीतरी प्रेमकथा आहेत ज्यात , प्रेम करणाऱ्यांना त्रास दिला जातो, मारले जाते, घरातून बाहेर काढले जाते.
जीवन नकोसे झाल्यावर त्यांना मरणाशिवाय पर्याय नसतो. समाज प्रेम करणाऱ्या व्यक्तींना वाईट दृष्टीनेच बघत असतो.


नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाचं प्रत्येक गोष्टीला ही दोन बाजू असतात.

प्रेम करणे म्हणजेचं प्रेम होणे ही चांगली भावना आहे पण प्रेमात होणारी फसवणूक, फक्त आकर्षण म्हणून केले जाणारे प्रेम.
धर्म,जात,पैसा,प्रतिष्ठा वगैरे निकषानुसार प्रेमाकडे बघणारा समाजाचा दृष्टीकोन .
यामुळे प्रेम करणे पाप ठरले जाते आणि प्रेमात पडलेल्यांना प्रेम केले म्हणून खुप त्रास सहन करावा लागतो.

समाज काय म्हणेल ? या भीतीपोटी आणि कुटुंबाची प्रतिष्ठा ,इज्जत अशा अनेक सबबीवर प्रेमाला घरातूनचं विरोध होतो आणि जेव्हा घरातील माणसेच स्विकार करीत नाही तिथे समाजाकडून काय अपेक्षा ठेवणार ?


"प्यार किया तो डरना क्या? "

ह्या वाक्याचा आदर्श घेऊन प्रेम करणारे , आपल्या प्रेमाच्या आड येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करून लग्न करतात आणि सुखाचा संसार करतात.

पण सर्वांनाच एवढी हिंमत नसते. अनेकदा परिस्थितीने लाचार झालेल्यांना प्रेमात हार मानावी लागते.\"


अशा अनेक विचारांमुळे अमितने मनात असूनही संध्याला काही सांगितले नाही.
नात्यात आणि गावात ही अशी प्रेमप्रकरणे झाली होती. तेव्हा घरातील व्यक्तींचे विचार ऐकलेले होते .
\"आणि अजून आपले वय तरी काय ? आणि आपण आयुष्यात आपल्या पायांवर उभे राहू तोपर्यंत संध्या थांबेल का आपल्यासाठी? \" हे ही प्रश्न मनात होते.

त्यामुळे अमितने मनातील भावनांना आवर घालून शिक्षणाकडे ,भविष्याकडे लक्ष देण्याचे ठरविले.


दहावीच्या निरोपसमारंभाच्या दिवशी वाटले होते ,\" आता ही शेवटची भेट. यापुढे कधी भेट होईल माहित नाही . आपले प्रेम खरे असेल तर निश्चितच भेट होईल . तोपर्यंत तिचे हसरे रूप आणि आज काढलेला ग्रुप फोटो आठवण म्हणून आहे सोबतीला...\"


पुढील शिक्षणासाठी संध्या तालुक्याच्या गावी राहण्यास गेली होती.

अमितने ही दहावीला चांगले गुण मिळवून तालुक्याला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले.
पण कॉलेजमध्ये त्याला संध्या भेटली नाही. \" तिने पण ह्याचं कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले असते तर आपली भेट तरी झाली असती \" असे त्याला वाटले.

आपल्या मनात देवाने संध्याबद्दल प्रेम तर निर्माण केले पण ते पुढे नेण्यासाठी ना दिशा दिली ना ते व्यक्त करण्याची हिंमत .

आयुष्यात देखील शाळेसारख्या परीक्षा द्याव्या लागतात . शाळेतील परीक्षांचा अभ्यासक्रम आणि वेळापत्रक ठरलेले असते . पण आयुष्यातील परीक्षांचे काय ? ना वेळापत्रक ना अभ्यासक्रम ...
प्रश्न ही इतके अवघड असतात की उत्तरे कोठेचं भेटत नाही आणि प्रत्येकाला ती उत्तरे स्वतः चं शोधावी लागतात.

अशा अनेक विचारांमुळे त्याला वाईट वाटायचे.

पण त्याला आपल्यावरील जबाबदाऱ्यांची जाणीव झाली की तो विचारांतून बाहेर यायचा आणि अभ्यासावर फोकस करायचा.


शिक्षणावर लक्ष केंद्रित  करून त्याने कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले आणि  MBA करण्यासाठी दुसऱ्या शहरात गेला .

MBA  झाल्यानंतर त्याला एका मोठ्या शहरात चांगल्या कंपनीत नोकरी ही मिळाली .

शिक्षण करीत असताना त्याच्या आयुष्यात अनेक मित्र तसेच मैत्रिणी ही भेटल्या. काही मुलींना तो आवडला ही होता पण त्याने कधी त्यात इंटरेस्ट घेतला नाही.

शिक्षणाबरोबर कॉलेजलाईफ ही एन्जॉय केले पण बाकीच्या गोष्टींपासून दूरचं राहीला.

संध्याचा पत्ता ,फोन नंबर मिळविण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला पण यश मिळाले नाही.

आईबाबा,बहिणींचा आग्रह म्हणा किंवा त्यांच्या सर्वांच्या इच्छेसाठी त्याने लग्न केले.

लग्नामुळे आईबाबा ,बहिणी सर्व खुश म्हणून तो ही खुश होता.
बायकोही दिसायला चांगली, मनमिळाऊ स्वभावाची,सर्वांशी चांगली वागणारी आणि त्याच्यावर खुप प्रेम करणारी मिळाली. त्यामुळे अमितला संसाराची गोडी लागली होती आणि पुढे ओमचा बाबा झाल्यानंतर तर त्याच्या जीवनात आनंदच आनंद ...

असेचं सुखाचे आयुष्य सुरू होते.
नोकरीच्या गावी स्थायिक झाल्यामुळे गावी कधीतरी जाणे होत असे.

अधूनमधून शाळेतील एक दोन मित्र भेटत होते. प्रत्येक जण गाव सोडून नोकरी च्या गावी राहत होते तर काही गावात राहून शेती वगैरे करत होते .

सर्व जण नोकरी, व्यवसाय, संसार यात बिझी होते.

अमित आईबाबांचा चांगला मुलगा,बहिणींचा लाडका भाऊ होता. पण लग्नानंतर चांगला पती आणि ओमचा चांगला बाबा म्हणूनही वागत होता. आपली कर्तव्ये व्यवस्थित पार पाडीत होता.


असेचं एके दिवशी अचानक
शाळेतील मैत्रीण अर्चना ने फोन करून सरप्राईज दिले. त्यादिवशी त्याला पुन्हा भूतकाळ आठवला आणि संध्याच्या आठवणीने तिला भेटण्याची त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली.

आणि त्याची इच्छा देवाने ऐकली की काय ?

थोड्याचं दिवसांत अर्चनाने तयार केलेल्या शाळेच्या ग्रुपमध्ये संध्या त्याला भेटली . त्यामुळे अमितला खुप खुप आनंद झाला.

भेटण्यास खुप उशीर झाला तरी ,भेटणे हे महत्त्वाचे ! आणि इतक्या वर्षांनी भेटल्यानंतर
आपण तिच्याशी कधी बोलू आणि कधी नाही असे त्याला वाटत होते.
अनेकदा तिला फोन करण्याचा ,मेसेज करण्याचा प्रयत्न ही केला पण यावेळी ही हिंमत होत नव्हती .

आणि एके दिवशी तिनेचं तिच्या दुसऱ्या नंबरने फोन करून त्याला आनंदाचा,आश्चर्याचा
धक्काचं दिला होता.
आणि हा सुखद धक्का
त्याला आवडला होता .



क्रमशः

🎭 Series Post

View all