प्रेमाचा अंकुर (भाग ५)

About Love


प्रेमाचा अंकुर ( भाग ५)

लग्न करून सासरी आलेली संध्या भूतकाळातील जुन्या आठवणींना विसरून आपल्या संसाराला लागली होती. आणि अधूनमधून मनातचं गाणे गुणगुणायची.

" माझ्या मनी प्रियाची
मी तार छेडिते,
संसार मांडते मी
संसार मांडते ! "

नवे घर ,नवी नाती सर्व काही नवीनचं..
माहेरचे घर ,माहेरची माणसं विसरणं खरचं खुप अवघडं..

माहेरी , सकाळी उठायला कधी उशीर झाला तर न रागवता उठवणारी , एखादे सांगितलेले काम आपल्या कडून करायचे राहून गेले तर लाडाने रागवणारी आणि समजावून सांगणारी , चेहऱ्यावरुन मनातले भाव ओळखणारी आई .
आवडता खाऊ आणणारे , आपल्या गुणांचे कौतुक करणारे बाबा. आपल्याबरोबर गप्पा मारणारे , मनातले सुखदुःख शेअर करणारे बहीणभाऊ.

हे सर्व आठवून संध्याचे मन भरून यायचे. सासरची माणसे ही चांगली होती. पण कितीही म्हटले तरी माहेर ते माहेरचं ..

संध्या आपल्या संसारात रूळायला लागली होती. जुने आयुष्य ती हळूहळू विसरू लागली होती. चांगली सून ,चांगली पत्नी म्हणून आपली कर्तव्ये पार पाडू लागली. कोणालाही कसल्याही तक्रारीची संधीचं देत नव्हती.

काही गोष्टी अगदी मनापासून करत होती तर काही गोष्टी कर्तव्यं म्हणून करत होती .

सासरी भरपूर पैसा होता, सर्व सुखसोयी होत्या , कसलेही टेंशन नव्हते.
पण नवरा व्यवसायानिमित्त नेहमीच कामात असायचा , हवा तेवढा वेळ तिला देत नव्हता. त्याच्या मते , घरात सर्व सुखसोयी आहेत. भरपूर पैसा आहे. कोणत्याही गोष्टीचा त्रास नाही. त्यामुळे नवरा म्हणून तो त्याची कर्तव्ये पूर्ण करतो. असे त्याला वाटायचे.

संध्याला या सर्व बाबतीत काहीही तक्रार नव्हती. तिला वाटायचे की, \" मी पूर्ण वेळ नाही मागत पण काही क्षणचं तर मागते . जे फक्त आपल्या दोघाचेचं असतील.

कधीतरी दोघांनीचं बागेत फिरायला जावे, कधी एखाद्या सिनेमाला जावे , एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घ्याव्यातं.


स्त्रीने सून म्हणून, बायको म्हणून चांगले वागले तर ती आदर्श सून ,पतिव्रता मानली जाते.

पण हे सर्व करीत असताना आपल्याला कितीदा आपले मन मारावे लागते .\"

हे तिला पदोपदी जाणवत होते.
पण ती कधी मनातले बोलून दाखवत नसे.

ती वाचलेल्या प्रेमकथा आठवायची . \" कथांतील पात्रे एकमेकांवर किती प्रेम करतात ? लग्न ही करतात आणि लग्नानंतर सुखाने,प्रेमाने संसार ही करतात.

आपल्या मनात देवाने प्रेमाचा अंकुर निर्माण केला. पण त्याला पुढे काही वाढूचं दिले नाही .
मगं तरीही त्याला प्रेम म्हणावं का ?

आणि आता लग्न झाल्यानंतर नवऱ्याकडून ही प्रेमाची उपेक्षाचं ...

जीवनात पैसा तर हवाचं पण आपल्या नात्यांसाठी वेळ नसेल तर काय फायदा?


समजा , माझे आणि अमितचे लग्न झाले असते तर ..
लग्नानंतर तो ही असाचं वागला असता का ?

मैत्रीण म्हणून ,प्रेयसी म्हणून आवडणारी स्त्री बायको झाल्यानंतर , तिच्याबरोबर वागण्यात फरक का पडतो ?

लग्नाअगोदरचे प्रेम लग्नानंतर ही तसेचं राहिले किंवा अजून वाढले आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकले तरचं ते खरे प्रेम! \"

अशा अनेक विचारांचे काहूर संध्याच्या मनात चालू होते.

स्वतः च्या मनाची समजूत घालून ती छान संसार करून , सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न करीत होती.

सून, पत्नी या नात्याबरोबर एका प्रेमळ आईची भूमिका पार पाडण्यासाठी गोड अशा आर्या ची आई झाली होती .

आर्याच्या जन्मापासून , संध्याला स्वतः बद्दल विचार करायला वेळही मिळत नव्हता . आर्याची काळजी घेणे , तिचे लाड पुरविणे यातचं तिला खुप आनंद मिळत होता .
आर्याच्या येण्याने तिच्या मनावरचा ताण हलका होऊन तिच्या मनात नवचैतन्य निर्माण झाले होते . जगण्याला एक वेगळाचं अर्थ मिळाला होता.

अशीचं आनंदाने वर्षे जात होती .


शाळा , ट्युशन , इतर क्लास यामुळे आर्या बिझी असायची . संध्यालाही घरातील कामे करून दुपारी थोडा वेळ मिळायचा . तेव्हा ती वाचन वगैरे करायची .

असेचं एके दिवशी मोबाईल वर काही तरी शोधत असताना तिला सोशल मिडिया वर अर्चना देसाईने पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट दिसली . तिने पटकन ऍक्सेप्ट केली .
आपली बालमैत्रीण अर्चना खुप वर्षांनंतर भेटली म्हणून तिला खुप आनंद झाला .
आणि तिच्या मनात पुन्हा शाळेच्या आठवणी जागा झाल्या . शाळेची आठवण होताचं अमितच्या आठवणीने तिच्या मनाची चलबिचल झाली.

आणि तिच्या मनात शब्द उमटले..

\" तुझ्या आठवणीने
आजही मन भरून येतं
आणि तुझ्या भेटीसाठी
मन कासावीस होतं ..


काही दिवसांनी अर्चना ने शाळेच्या मित्रमैत्रीणींचा ग्रुप बनवला . संध्याला शाळेतील मित्रमैत्रीणी भेटल्याचा आनंद तर होतोचं पण अमित भेटल्याचा जास्त आनंद झाला होता .

तिला वाटले की, \" आपण आयुष्यात परत कधी एकमेकांना भेटू . असे वाटले ही नव्हते . पण अर्चनाचे प्रयत्न आणि सोशलमिडिया ची जादू यामुळे अशक्य ते शक्य झाले . खरचं अमितचे भेटणे हे एखादे स्वप्नचं वाटत आहे . इतक्या वर्षांच्या ताटातुटीनंतर परत आपण एकमेकांना भेटत आहोत . \"


तिला तर विश्वासचं होत नव्हता . असे काही होईल म्हणून आयुष्यात .

तिच्या मनात विचार सुरू झाले .
\" अमितची आणि आपली भेट झाली . ती पण केव्हा , जेव्हा लग्न होऊन मुले ,संसार या जबाबदाऱ्या असताना .

दैव,कर्म, नशीब म्हणतात ते यापेक्षा काही वेगळं असावं का ?

शाळा सोडल्यानंतर कधी , कोठे? भेटला असता तर...

आपण सांगितले असते का त्याला , आपल्या मनातले ?

आपल्यात होती का एवढी हिम्मत ?

घरातल्यांचा विचार की मनाचा विचार ? काय निवडले असते आपण ?

पण देवाने ती वेळचं येवू दिली नाही .

खरचं आयुष्य ही एक लिखित नाटक असतं आणि आपण सर्व फक्त नाटकातील कलाकार . स्क्रिप्ट अगोदरच लिहिलेलं असतं. आपण फक्त आपली भूमिका पार पाडत असतो . \"

संध्या कामातून वेळ मिळेल तसे ग्रुपवर बोलत होती. सर्वांशी जसे बोलत होती ,तसेचं अमितशी ही बोलत होती . आपल्याबद्दल त्याची काही वेगळी प्रतिक्रिया असावी असे तिला वाटत होते . पण तो ही इतरांशी बोलत होता तसेचं संध्याशी ही बोलत होता . सर्वांना भेटून खुप आनंद झाला वगैरे वगैरे असे...

अमितला फोन करून किंवा मेसेज करून सांगायचे का ? " तु शाळेत असताना मला आवडायचा असे. "

\" पण तो आपल्या वेडेपणाला हसला किंवा काही वेगळाचं अर्थ घेतला तर ...

आणि इतक्या वर्षांत
त्याचा स्वभाव, वागणे बदलले असले तर ...

शाळेत असताना तर खुप सभ्य वाटायचा.

पण आता आपल्या चांगुलपणाचा काही गैरफायदा घेतला तर ...\"

बापरे ! कसे विचार येतात आपल्या मनात ...

सध्या समाजात अशा अनेक घटना घडत असतात आणि त्या ऐकल्या की लवकर कोणावर विश्वास ठेवू नये असे वाटते.


पण अमितची गंमत करावी म्हणून एके दिवशी संध्याने आपल्या दुसऱ्या नंबरने त्याला फोन केला . खुप गप्पा मारल्या . पण आपले नाव शेवटपर्यंत सांगितले नाही . नंतर मेसेज करून आपणचं फोन केला होता हे अमितला सांगितल्यावर त्याची गंमत केल्याचा तिला आनंद झाला.

या फोनमुळे संध्याला तर आनंद झालाचं. पण अमितही खुप खुश झाला. त्याला या भेटीतून झालेला आनंद त्याच्या वागण्याबोलण्यातून जाणवायला लागला होता.




क्रमशः

🎭 Series Post

View all