प्रेमाचा अंकुर (भाग 1)

About Love


प्रेमाचा अंकुर
भाग - १


"बाबा,तुमचा मोबाईल वाजतो आहे." असे ओम ने सांगितले तेव्हा अमितचे मोबाईल कडे लक्ष गेले आणि कॉल घेतला."हॅलो ,हॅलो कोण?" नंबर ओळखीचा वाटत नव्हता.

पलीकडून एका स्त्रीचा आवाज येत होता."हॅलो,अमित मी अर्चना देसाई.आपण एका शाळेत,एका वर्गात होतो.आपण लहानपणी चे फ्रेंड्स आठवले का ? "

सुरूवातीला त्याच्या लवकर लक्षात आले नाही कारण तो सुट्टी घेऊन कुटुंबासह पिकनिक ला आलेला होता आणि मस्त एन्जॉय करीत होता.तेचं विचार डोक्यात होते .अचानक फोन आला आणि इतक्या वर्षांनी तिचा आवाज ऐकला.पण नंतर थोड्याच वेळात त्याला लक्षात आले आणि म्हणाला "हो,हो.. आठवले,आज कसे एकदम सरप्राइझ आणि ते ही इतक्या वर्षांनी ? "

काय बोलावे आणि किती बोलावे असे दोघांना वाटत होते.एकमेकांबद्दल विचारपूस, इतर मित्रमैत्रीणींची चौकशी ,शाळेतील आठवणी अशा अनेक विषयांवर बोलणे झाले. खुप खुप बोलावेसे वाटत होते , पण ओम सारखा आवाज देत होता.त्याला आपल्या बाबांबरोबर पिकनिक एन्जॉय करायची होती. शेवटी मगं दोघांनीही इच्छा नसतांना एकमेकांचा निरोप घेऊन बोलणे थांबवले.दोघांनाही खुप छान वाटत होते.
अर्चना सोशल मिडिया वर शाळेतील मित्र मैत्रीणींना शोधत होती आणि फोन करून सरप्राईज देत होती.आज अमितशी बोलून तिला खुप बरे वाटले.
अमितलाही खुप बरे वाटले.
पिकनिक संपवून अमित घरी आला , पिकनिकच्या मजेची धुंदी तर होतीचं पण अर्चनाचा फोन आल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर वेगळ्याचं आनंदाची छटा उमटली होती.
पिकनिकची मजा करून आल्यानंतर अमितचे रूटीन सुरू झाले. तो एका मोठ्या कंपनीत नोकरीला होता.M.B.A करून तो चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी गाव सोडून मोठ्या शहरात राहत होता.


शाळा सोडल्यानंतर पुढील शिक्षणासाठी काही जण गाव सोडून कोठे ना कोठे गेले तर काही गावातचं राहिले होते. गावात फक्त १० वी. पर्यंत शाळा. पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी नाही तर दुसरीकडे शहरात जायचे.ज्यांना जसे शक्य तसे केले.
अमित हा वर्गातील हुशार विद्यार्थ्यांपैकी एक होता आणि घरची परिस्थिती चांगली असल्याने त्याने दहावी नंतर शहरात शिक्षण पूर्ण केले .
मनासारखी नोकरी मिळाली.निशा सारखी चांगली लाईफ पार्टनर आणि सर्वांच्या लाडक्या ओम चा प्रेमळ बाबा झाला. शिक्षण,नोकरी,लग्न आणि राजाराणीचा संसार असे सुरळीत जीवन अमित चे सुरू होते.

अर्चना ही शाळेतील हुशार विद्यार्थ्यांनी होती.वडिलांची बदली दुसऱ्या गावी झाली त्यामुळे १० वी.नंतर त्यांना नोकरीच्या गावी जावे लागले आणि पुढील शिक्षण तिकडेचं सुरू झाले. त्यामुळे गाव,शाळा,शाळेतील मित्रमैत्रीणी यांचा नंतर संबंध आला नाही.
नवे गाव,नवे मित्रमैत्रीणी यात अर्चना रमून गेली.
शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न करून संसारात मग्न झाली. अर्चना आपल्या गुणांनी छान संसार करीत होती.
सोशल मिडियावर तिने शाळेतील मित्रमैत्रीणींचे नाव शोधून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणे ही सुरू केले.
मगं शाळेतील मित्रमैत्रीणींचा एक ग्रुप बनवला.

शाळा सोडल्यानंतर सर्व जण वेगवेगळ्या ठिकाणी.
मुलींचे लग्न होऊन सासरी तर मुले ही नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी .त्यामुळे सहसा कोणाचा कोणाशी जास्त संबंध आला नाही. एक दोन मित्रमैत्रीणीचीं अधूनमधून काही कामानिमित्ताने भेट होत असे.

आता सोशल मिडिया मुळे एकमेकांना भेटणे शक्य झाले. नाही तर कोण, कधी आणि केव्हा भेटले असते ? माहित नाही..
अर्चना ने सर्वांना शोधून ग्रुप बनवला त्यामुळे तिचे सर्वांनी आभार मानले. तिच्यामुळे आज इतक्या वर्षांनी सर्व जण एकमेकांना भेटत होते. सर्वांना एकमेकांबद्दल जाणून घेण्याची, पाहण्याची आणि भेटण्याची उत्सुकता होती.


गाव म्हटले म्हणजे तेथील लोकांची विचारसरणी आणि घरातील वडीलधारी लोकांचा धाक,भीती,घरातील संस्कार, चालीरीती यामुळे तेव्हा मुले मुली शाळेत असताना एकमेकांशी जास्त बोलत नसतं. मैत्री वगैरे तर अशक्यचं.गावात एक वेगळेचं वातावरण होते.मुले मुली एकमेकांशी बोलू शकत नसतं.साधेही काही बोलणे असले तरी लोक संशयी वृत्ती ने बघत असतं.


पिकनिक वरुन परत आल्यापासुन आणि शाळेतील मित्रमैत्रीणींचा ग्रुप झाला तसा अमितला आनंद तर झालाचं होता, पण त्याचं मन काहीतरी शोधत होतं.ग्रुपमध्ये जे भेटले त्या सर्वांना भेटून त्याला खुप बरे वाटले होते ,पण त्याला जे नाव हवं होतं ,ते दिसत नव्हतं म्हणून मन थोडसं खट्टू झालं होतं.
जीवनात आपलं सर्व व्यवस्थित सुरू आहे .नोकरी, संसार सर्व छान सुरळीत आहे.पूर्णतः समाधान! मगं सध्या आपलं मन का कोणाला शोधत आहे ? शाळेचे नाव काढताचं का आठवण येते त्या व्यक्तीची? ...
असे प्रश्न, अमितच्या मनात येत होते.
सर्व जण ग्रुप एन्जॉय करीत होते ,तसा तोही एन्जॉय करीत होता. पण मनातले कोणाला काही सांगत नव्हता.
असेचं छान चालले होते.
अर्चना ने अजून काही मित्रमैत्रीणींना ग्रुप मध्ये जॉईन केले.
प्रत्येकाने आपल्या फोटोसहित आपली माहिती सांगितली. कोणत्या गावाला राहतात,काय करतात वगैरे वगैरे...
आणि मगं अमितला हवा असलेला चेहरा दिसला.त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.
खुप वर्षांनी पाहिल्यानंतर खुप बदल झालेले होते, तरीही सर्वांनी एकमेकांना ओळखले.
शाळा,शाळेतील आठवणी, बालपणीचे दिवस हे सर्व आठवून प्रत्येकाला बालपणात गेल्यासारखे वाटले.आणि प्रत्येकाला बोलावेसे वाटले .
"जाने कहाँ गये वो दिन ...."

अमित विचार करत होता.
शाळा सोडल्यानंतर त्या व्यक्तीचा कॉन्टॅक्ट नंबर मिळविण्याचा आपण अनेकदा प्रयत्न केला.त्या व्यक्ती बद्दल विचारपूस ही केली पण ती व्यक्ती ही कधी भेटली नाही आणि तिचा फोन नंबर वगैरे ही नाही.

आता तर ग्रुप मध्ये ती व्यक्ती ही होती आणि तिचा नंबर ही होता.
मगं त्या व्यक्ती शी बोलावे ,फोन करावे असे मनात असूनही आपण का बोलत नाही?

आपण बोलण्याचा प्रयत्न करावा आणि समोरून काही वेगळीचं प्रतिक्रिया आली तर..
जुने मित्रमैत्रीणी असलो तरी आता लग्नानंतर प्रत्येकाचं एक वेगळं आयुष्य असतं.समोरच्या व्यक्तीला आपलं बोलणं आवडतं की नाही...
असे अनेक विचार अमितच्या डोक्यात येत होते.
त्यामुळे कित्येकदा मनात येऊनही फोन करीत नव्हता किंवा मेसेज ही करीत नव्हता.

ग्रुप मध्ये वातावरण छान खेळीमेळीचे होते.छान छान मेसेजेस, विनोद, थट्टा,मस्करी सुरू असायची .सर्वांच्या वागण्या बोलण्यातून सर्वांचे आयुष्य छान असावे असे प्रत्येकाला वाटत होते.प्रत्येक जण सुखाचा संसार करीत आहे असे स्पष्ट दिसत होते.
शाळेत फक्त कामापुरते बोलणारे आता इतक्या वर्षांनी भेटल्यानंतर खुप मनमोकळे बोलत होते.सर्वांचे लग्न झालेले होते,मुले,संसार असं एक छान आयुष्य प्रत्येकाचं होतं.आणि आता विचारसरणी ही बदलली होती. जीवनातील अनेक गोष्टींचा अनुभव होता.जबाबदारींची जाणीव होती.शाळेत असताना देखील सर्वांची वागणूक चांगलीचं होती.
आता कोणाच्याही मनात कोणतीही भावना नव्हती. होती ती फक्त निखळ, निरागस मैत्री!

आयुष्यात आपल्याला खुप सारे मित्रमैत्रीणी भेटतील पण शाळेतील मित्रमैत्रीणींना कोणीही विसरत नाही. शाळेतील मैत्रीला तोड नसते.शाळेबद्दल, शाळेच्या मित्रमैत्रीणींबद्दल प्रत्येकाच्या मनात एक वेगळीचं भावना असते आणि या मैत्रीची आठवण आयुष्यात सदैव येत असते.


ग्रुप मध्ये कोणी लेखक,कवी होते तर कोणी विनोद करून सर्वांना हसवणारे, कोणी खवय्ये होते तर कोणी निसर्ग प्रेमी होते .काही बोलके होते तर काही कामापुरते बोलणारे..
वाढदिवसाच्या, लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा देवून आनंद दिला जात असे.
प्रत्येकाने आपल्या घरातील व्यक्तींना आपल्या ग्रुप बद्दल ,आपल्या मैत्रीबद्दल सांगितले. त्यांनाही खुप आनंद झाला.
ग्रुप मधील एका कवीने आपल्या भावना ही व्यक्त केल्या..

खुप वर्षांनी आपण भेटलो
आणि पुन्हा बालपणात गेलो
काही बोलके तर काही मितभाषी
जुळले नाते सर्वांचे ग्रुपशी
सर्वांचे स्वभाव व गुण कळाले
प्रत्येकाचे सुखदुःख ही समजू लागले
हरवलेले बालपण पुन्हा लाभले
मैत्रीचे नाते अजून घट्ट झाले
नाही राग, नाही रूसवा,ना अबोला
खुप छान आहे ग्रुप आपला
मैत्रीच्या ओढीने ग्रुप तयार झाला
बालमैत्रीचा आनंद पुन्हा मिळाला
असेचं सदैव आनंदी राहू या
मैत्रीचे निरागस नाते जपू या
हसणं-बोलणं अन् मौज-मस्ती
अशी छान आहे आपली दोस्ती..


क्रमशः

🎭 Series Post

View all