वधू संहिता भाग 9

Story of a young mischievous bride to be & her groom. Thank you

वधू संहिता भाग 9

"गुड मॉर्निंग माय डियर एलीगंट लेडीज." व्यक्तीमत्व विकास चा वर्ग घेणाऱ्या मॅडम गौरी आल्या. केसांची हिप्पी, गळ्यात मोत्याची माळ, अंगावर दुधाळ रंगाचा शर्ट आणि बेल बॉटम, पायात हाय हिल्स घातलेल्या तिशीतल्या गौरीला अंजलीने डोळे फाडून वरून खाली न्याहाळलं. 

"ही बाई आहे की माणूस, पण पोरी मॅडम म्हणाल्या म्हणजे बाईच आहे. मग माणसाचे कपडे का घातलेत?" तिच्या मनात आलं. ती विचारणारही होती पण तोच जयानं तिला चिमटा काढला आणि शांत बसायला सांगितलं. मॅडमने मुलींना बॉडी लँग्यूयेज बद्दल शिकवलं. 

हे तर अंजली साठी एकदमच नवीन होतं. 

"आपलं शरीरही बोलतं. म्हणूनच आजी नेहमी आपल्याला अशी बस, तशी उभी नको राहू, असं सतत टोकत राहायची तर." अंजली परत तिच्या विचार चक्रात हरवली. 

तिकडे गौरी मॅडमने एकेका मुलीला त्यांच्या जवळ चालत यायला सांगितलं. जयाने जातांना तिला उठवलं. 

अंजली बेफिकीर, दोन्हीही हात हवेत उडवत मोठ्ठ हसू चेहऱ्यावर घेऊन, पायांचा फटफट आवाज करत गौरी समोर जाऊन उभी झाली. किंजल आणि गँग तिच्यावर हसू लागली. तर बाकी पोरींना तिच्यावर दया आली.

"स्टॉप लाफिंग !" गौरीने सगळ्यांना शांत केलं , "अंजली नाव आहे ना तुझं?"

"हो !" अंजलीला समजलं की तिने परत काहीतरी गडबड केली.

"अंजली, आता तु लहान नाही आहेस. काही दिवसात तुझं लग्न होणार आहे. तु एका चांगल्या मोठया घरची सून होणार आहेस. तूझ्या चालण्या, बोलण्यात, शरीराच्या प्रत्येक हालचालीत शिष्टता आणि सभ्यता दिसायला हवी.

 असं हवेत हात उडवत चालणं किती असभ्य दिसते माहितेय. आधी नीट सरळ उभी राहा. असं समज की तूझ्या पाठीला कोणीतरी भाला लावला आहे. पाठीचा पोक काढलास तर तो भाला तुला टूचेल. समोर बघ, दोन्हीही हात समोर पोटाजवळ घेऊन पंजे एकमेकांत लॉक कर आणि चेहरा प्रसन्न दिसेल इतकंच दात न दाखवता ओठांतल्या ओठांत हसून, हळूहळू, एलिगंटली चालत तूझ्या जागेवर जाऊन बस."

अंजलीने हात छातीशी लपेटून घेतले आणि दात न दाखवता हसायचा प्रयत्न केला पण तिला काही जमलं नाही. कोणी तरी हसलं आणि तीही दात काढून हसू लागली. सर्व मुली परत हसू लागल्या. 

"गर्ल्स.... " गौरी अंजलीच्या जवळ गेली "हात एकात एक  लॉक कर म्हणजे दोन्ही हातांची बोटं एकमेकांत गुंतव, जसं आपण शेक हॅण्ड करतांना करतो."

"ते कसं करतात?" अंजलीच्या या प्रश्नानं गौरीला समजलं की हिला एकदम बेसिक पासुन शिकवावं लागेल. 

"तुझी बोटं अशी एकात एक टाक." स्वतः दोन्ही हात एकमेकांत टाकून गौरीने तिला दाखवलं, "हातात नेहमी एक छोटासा रुमाल ठेवायचा. आणि ओठ न उघडता डोळ्यांनी हसायला शीक."

"हो मॅडम !" अंजलीचा चेहरा नर्व्हस झाला.

 "नर्व्हस नको होऊ. हळूहळू जमेल तुला सगळं." गौरीने तिच्या पाठीवर थापटलं , "जा मी सांगितलं तसं प्रयत्न करून बघ आणि बस जागेवर."

अंजली हळूहळू हात हातात गुंतवून, पायांचा आवाज न करता जागेवर जाऊन बसली. 

"बापरे हे किती तापदायक आहे? यापेक्षा तर घरी आजीची बोलणी खाणं चांगलं." अंजली डोकयावर हात मारून स्वतःला म्हणाली. 

शेजारच्या खुर्चीत बसलेल्या मेघाने ऐकलं. ती अंजलीला म्हणाली, 

"तापदायक म्हणजे काय ते तुला लंच मधे कळेल. त्यापुढे हे काहीच नाही." 

"लंच?"

"दुपारच्या जेवणाला लंच म्हणतात."

"बरं. पण त्यात यापेक्षा ताप दायक काय असू शकतं?" अंजलीला प्रश्न पडला.

लंच ब्रेक झाला. सर्व मुली जेवायला बुफे हॉल मध्ये गेल्या. ताट वाटीत जेवण वाढून घेऊन जेऊ लागल्या. अंजलीही बसून जेऊ लागली. तिला खूप जास्त भूक लागली. परत उठायचं काम नको म्हणून तिने सर्व पदार्थ एकाच वेळी ताट भरून घेतले आणि पटपट मोठे मोठे घास घेऊन खाऊ लागली. तिचं भरलेलं ताट, तोंडाचा चपड चपड आवाज ऐकून मुली एकमेकींना पाहून हसू लागल्या.

श्रीमती परांजपेनी येऊन अंजलीच्या पुढचं ताट बाजूला केलं आणि तिला हात धुवून दुसरं ताट वाटी चमचा आणायला सांगितलं.

"असं ताटा वरून उठवणं पाप असतं मॅडम. जेवल्यावर तुम्ही सांगणार तसं करेल." अंजली श्रीमती परांजपेला म्हणाली. 

"गेली ही आज." कोणीतरी कुजबुजले. 

"अंजली" श्रीमती परांजपे अंजलीला समजावत म्हणाली, "तु म्हणतेस ते अगदी खरं आहे. पण माझं काम आहे तुम्हा मुलींना व्यवस्थित वळण लावणं. उद्या लग्न झाल्यावर सासरच्यांनी तुमची काही तक्रार केली तर तुमचे आई वडील मला म्हणतील आणि वधू संहिता संस्थेचे नाव खराब होईल. म्हणून मला तुला ताटा वरून उठवाव लागत आहे. प्लीज जाऊन ताट वाटी आन."

अंजलीला श्रीमती परांजपेने प्लिज म्हटलेलं ऐकून पोरींना आश्यर्य वाटलं. सहसा त्या कोणालाच कधीच प्लिज म्हणत नव्हत्या. पण अंजलीचा निरागस पणा पाहून त्यांना तिला प्रेमाने समजावून सांगायची इच्छा झाली. अंजली ताट वाटी चमचा घेऊन आली. 

"आता या रिकाम्या ताटात, यातलं थोडं थोडं घ्यायचं आणि आवाज न करता खायचं. आवाज झाला तर तुला रात्रीचे जेवण मिळणार नाही हा नियम आहे. म्हणून छान शांत बसून, प्रार्थना म्हणून किंवा हात जोडून मग जेवणाला सुरवात कर. आपण कुठे पळून जाणार नाही ना जेवणाला पाय आहेत. ओके !"

"हो मॅडम."

"गुड" श्रीमती परांजपेनी इकडे तिकडे बघितलं तसं इतर मुलीही आपापल्या ताटात बघून जेऊ लागल्या.

"तसंच समजा तु एखाद्या मोठया कार्यक्रमात, समारंभात जेवायला गेली आणि तिथे तु असं पूर्ण ताट भरून घेतलं. तर काय म्हणतील? अरे या मुलीला सासरी / घरी जेवायला नाही देत का? हिने कधी खाल्लं नाही का? किती हावरट मुलगी आहे? 

म्हणून ताटात आवश्यक तितकंच एकावेळी घ्यायचं. ताट छान सुटसुटीत दिसायला हवं. मग एक एक पदार्थ चाखायचा. जेवण करणे ही एक कला आहे. अन्नाचा आस्वाद घेऊन ते खाल्लं म्हणजे त्याचं पचनही चांगल्याने होतं.

गोड पदार्थ हा सर्वात शेवटी घ्यायचा. समजलं !"

बापरे एकाच दिवशी, काहीच तासात इतकं ज्ञान ! अंजलीला खूप जड झालं. घसा कोरडा पडला. समोर चा ग्लास तोंडाला लावून तिने गटगट पाणी पिऊन टाकलं.

"हेही शेवटचं अंजली, असं पाणी पित नसतात. बाळा तुमच्या प्रत्येक गोष्टीत सौम्यता दिसली पाहिजे." श्रीमती परांजपे रागवून म्हणाल्या. 

त्यांनी आणखी भाषण देऊ नये म्हणून अंजलीने सरळ हात जोडले आणि ती श्रीमती परांजपेच्या पाया पडली.

"धन्य झाली मी इथे येऊन. मी माझ्यात बदल नक्कीच घडवून आणेल आणि तुम्ही सांगितलेलं सगळं लक्षात ठेवेल. तुम्ही खरंच खूपच छान कार्य करत आहात." अंजली खोटं खोटं सौम्य हसून बोलली. 

"बरं बरं, चला जेवण करा, आराम करा. चार वाजता माया ब्युटी पार्लर कडून लग्न झाल्यावरही व्यस्त दिन चर्येत आपलं सौंदर्य कसं टिकवून ठेवावं? यावर मिस माया टिप्स देणार आहेत. तसेच त्यांच्या असिस्टंट तुम्हा मुलींचे आयब्रो आणि हाता पायाचं  वॅक्सिंगही आज करून देतील."

अंजलीच्या पल्ले हे काहीच पडलं नाही. पण मुलींचे हावभाव पाहून काहीतरी चांगलंच असेल असं तिला वाटलं. श्रीमती परांजपे गेल्यावर अंजलीने आरामात पोट भरून जेवून घेतलं आणि खोलीत जाऊन निवांत झोपली. 

चार वाजता मिस माया आणि ब्युटी पार्लर कंपनी आली. मायाने आधी चेहऱ्याच्या सौंदर्यावर काही टिप्स दिल्या. मुलींना काही प्रश्न असतील तर विचारले. तेव्हापर्यंत तिच्या असिस्टंटने कैची, कंगवा, आयब्रो करायचा धागा , waxing आणि इतर सामान बाहेर काढून आरशा जवळ टेबलवर लावलं.

"चला मग कोण येईल आधी waxing करायला?" Waxing गरम झाल्याचं असिस्टंटने सांगताच मायाने विचारलं. पण एकही उठायला तयार नव्हती. सगळ्या एकमेकींना बघू लागल्या. तु  जा आधी, तु जा म्हणू लागल्या.  

"देवानी या केसांना वाढच का दिली कळत नाही." शारदा किंजलला म्हणाली, "waxing  हा प्रकार किती त्रासदायक आहे."

"हुम्म्म." एका कोपऱ्यात आपल्याच धून मधे पेनने वहीवर काहीतरी लिहीत असलेल्या अंजली वर किंजलचे लक्ष गेले आणि तिच्या  चेहऱ्यावर एकदम चमक आली, "मॅडम अंजलीला बोलवा आधी. तिचा पहिला दिवस आहे आणि मला वाटतं तिला खूप गरज आहे ग्रूमिंग ची."

अंजलीने डोकं वर करून बघितलं. बापरे हिने आपलं नाव का घेतलं? तिला प्रश्न पडला.

"हो गं, हिला खरंच गरज आहे?" माया अंजलीच्या हातावरची लव आणि वाढलेल्या भुवया पाहून म्हणाली, "अंजली ये, छान रिलॅक्स होऊन बस खुर्चीत."

"आता येईल खरी मजा बघ." किंजल, शारदाच्या कानात कुजबुजली. 

अंजली बसली जाऊन. पण तिला सगळं खूपच साशंक वाटलं.  म्हणून तिने गरम waxing चं पातेलं घेऊन आलेल्या मायाच्या असिस्टंटला विचारलं, 
"तुम्ही काय करणार आहे याचं?"

"याचं? हे वॅक्स आहे. याला या स्पॅचूलानी मी तूझ्या नीट हातावर पसरवून, त्यावर ही पट्टी ठेऊन, थोडं थापून, लगेच जोरात ओढून घेईल तेव्हा त्या सोबत तूझ्या हातावरचे सर्व केसं निघून येतील आणि तूझ्या हातांचा रंग आणखी नितळ दिसेल."

"काय?" अंजलीने डोळे विस्फारून विचारलं, "इतका तर नितळ आहे रंग. आणखी किती नितळ हवा? किती वेदना होईल मला तुम्ही ते ओढणार तेव्हा?"

"वेदना हा आपल्या स्त्रियांच्या जातीचा अविभाज्य अंग आहे अंजली. वेदना सहन केल्या शिवाय स्त्रीला कोणतंच सुख प्राप्त होत नाही." माया तिला समजावत म्हणाली. 

"मला नको असलं सुख." अंजली उठून उभी झाली.

"असं चालणार नाही. Waxing, threding हा ग्रूमिंगचा एक भाग आहे. शांत बस पंधरा विषय मिनिटात सगळं निपटेल. चार पाच वेळा करून झालं कि सवय होईल तुला. मग तूच स्वतः ब्युटी पार्लर मधे जाऊन हे सर्व करत जाशील बघ."

"अजिबात नाही." अंजली ठामपणे बोलली. 

"जया मेघा इकडे या आणि हिच्या पायांची waxing होईपर्यंत हिचे हात पकडून ठेवा." मायाने हुकूम सोडला. तशा जया आणि मेघा जागेवरून उठल्या अन अंजली खाली धावत सुटली. जया,  मेघा,  माया, तिची असिस्टंट सर्व अंजलीला पकडायला तिच्या मागे धावल्या. 

तर किंजलनी इतर मुलींसोबत, कोण जिंकणार, माया कि अंजली? अशी शर्यत लावली. जो शर्यत हरणार, त्याला जुहू बीचवर गेल्यावर एका अनोळखी मुलासोबत हसून बोलावं लागेल. असं ठरलं. 

गेटवर सिक्युरिटी गार्ड बसलेला होता तेव्हा बाहेर जाणं अशक्य. म्हणून अंजली सरळ त्या दोन इमारतीना वेगळं करणाऱ्या कंपाउंड भिंतीवरून उडी मारून 'इंग्लिश स्पिकिंग & पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या' मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीत गेली. 

क्रमश :

धन्यवाद !

तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी. 

फोटो साभार गुगल, Pinterest वरून 


©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

🎭 Series Post

View all