Oct 24, 2021
कथामालिका

वधू संहिता भाग 7

Read Later
वधू संहिता भाग 7

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

वधू संहिता भाग 6 खालील लिंकवर वाचा

http://irablogging.com/com/blog/the-bride-code-part-6_7078

वधू संहिता भाग  7
अंजलीला गावात कोंबडा आरवला की जाग आलीच म्हणा. पण इथे मुंबई कुठून आरवनार कोंबडा. त्यात तिला विचार करता करता उशिरा झोप लागलेली. जया आणि मेघा दोघीही अंघोळ करून तयार झालेल्या. पण अंजुचा उठायचा पत्ता नाही.

"अग हिला उठव. कशी घोरतेय बघ." जया म्हणाली. 

"झोपू दे ना मग. कालच आली प्रवास करून. थकली असेल. नवीन ठिकाणी झोप लागत नाही गं लवकर. मलाही नव्हती लागली. आठवतेय ना तुला?" मेघा 

"मला आठवते, पण तु विसरलीस वाटतं? तुला झोपू दिलं म्हणून परांजपे मॅमनी मला किती झापलं होतं ते." जया 

"ए हो. मी लगेच हिला उठवून तयार करते. तु आपली खोली आवरून घे. योगा होताच मॅम खोली नीट आहे की नाही पाहायला येतील." मेघा 

"हो हो आवरते मी." जया 

अंजली गाढ झोपेत होती. उठायला तयार नाही. मेघाने तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं तशी ती धांदरून उठली.

"मंदार पाऊस आला. बाज आत घे. चल चल धाव." इतकं बोलून अंजली उठून धावत सुटली. अन खोलीच्या बंद दाराला जाऊन धडकली. 

मेघा आणि जयाला हसू आवरलं नाही.

"कसं होईल तुझं?" जया म्हणाली. 

"अरे मी घरी नाही बम्बईला आहे." अंजली भानावर आली, "गावात आम्ही गच्चीवर नाहीतर अंगणात बाज टाकून मस्त हवेशीर झोपतो. मग एखादे वेळी पाऊस आला  की आमची अशी धांदल उडते." अंजली गाव आठवून सांगू लागली. 

"ए बाई तुझं गाव पुराण आम्ही वर्ग झाल्यावर ऐकू आरामात. आता घूस बाथरूममध्ये." जयाने तिला हात धरून बाथरूममध्ये नेलं.

"हो मी तुला टॉवेल देते." मेघा तिला मदत करू लागली. 

"जया खूपच घाईत असते आणि धुसफूस करते तर मेघा तितकीच शांत सोज्वळ. या कशा सोबत राहत असतील?" अंजलीच्या मनात आलं.

घट्ट वेणी घातल्याने केस वेडे वाकडे होतात म्हणून मेघाने अंजलीच्या केसांना फक्त रबर लावायला सांगितलं. पण अंजली ऐकायला तयारच नाही. म्हणून मग मेघाने तिची अगदीच सैलसर वेणी घालून दिली. 

तिघीही पटपट आवरून इमारतीच्या माळीवर गेल्या.

एकूण तेरा मुली आणि स्वतः परांजपे मॅम पांढरा शुभ्र शॉर्ट कुर्ता पायजामा घालून सूर्य नमस्कार करत होत्या.

"पाच मिनिट उशीर ." तिघींना बघून योगा शिक्षिका गीता म्हणाली, "मेघा जया उशिरा यायची शिक्षा माहितच आहे तुम्हाला."

"हो." दोघीही एका सुरात म्हणाल्या आणि उठबशा काढू लागल्या.

"पण मास्तरीण बाई त्यांना उशीर माझ्यामुळे झाला. प्लीज त्यांना शिक्षा नका देऊ." अंजली सफाई देऊन म्हणाली. हिरव्या रंगाचं परकर पोलकं घातलेल्या अंजलीला वर पासुन खाली न्याहाळत गीता तिला म्हणाली, 

"उशीर का झाला हे इथे महत्वाचं नाही. तर शिस्त महत्वाची. उशीर झाला तर शिक्षा ही मिळेलच. तुझा आजचा पहिला दिवस. तु आज फक्त निरीक्षण कर. तसंही परकर पोलकं घालून तुला योगासन जमणार नाहीत."

"हो आज रामलाल ला बोलावलं आहे मी तूझ्या मापाचा कुर्ता पायजामा घेऊन. मग उद्या पासून तुही योगासन करणं सुरु कर." श्रीमती परांजपे म्हणाल्या. 

"पण मी तर परकर पोलकं घालूनही हे सर्व योगासन करू शकते." इतकं बोलून अंजलीनी समोरील परकरचा काठ दोन्ही पायाच्या मधून मागे घेऊन काष्ठ्या सारखा कंबरेत खोचला आणि योगासन करू लागली.

सर्व मुली उभ्या होऊन तिलाच बघू लागल्या. अंजली रानात कितीतरी मेल चालायची, झाडांवर माकडासारखी उडया मारायची, अन गावातल्या आखाड्यात मल्ल खांब करणाऱ्या पैलवानांना गुपचूप लपून बघून स्वतःही त्यांच्या सारख्याच कवायती करून पाहायची. ज्यानं तिचं शरीर छान लवचिक झालं होतं.

"खूप छान." गीता अंजलीला म्हणाली, "पण गणवेश हा आपल्यात एक शिस्त आणतो म्हणून गणवेश गरजेचा आहे. उद्या गणवेश घालून यायचं."

"हो नक्कीच."

"चला बाकी मुलीही योगासन करा."

योगा वर्ग झाल्यावर मुली दहा चहापाणी घेऊन इंग्रजी संभाषण वर्गात गेल्या. वर्गाच्या भिंतीवर एका पेक्षा जास्त व्यक्ती इंग्रजी भाषेत संभाषण करत आहेत अशी चित्र लावलेली होती.

इंग्रजी संभाषण वर्ग घ्यायला मिस नेहा आली. श्रीमती परांजपेनी अंजलीची ओळख करून दिली आणि तिला इंग्रजी समजून घ्यायला थोडा वेळ द्यायला सांगितलं. 

"Good morning my dear elegant ladies." नेहा सर्व मुलींना म्हणाली.

"Good morning dear Neha mam." मुलींनीही नेहाला एका सुरात ग्रीट केलं. 

अंजली फक्त सर्वांना बघत होती. तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं. आपल्याला हे असं बोलणं, वागणं जमणार की नाही याचं दडपणही तिला आलं. पण ती चेहऱ्यावर काहीच न दाखवता शांत बसली होती.

"ओके girls as we know there is a new girl, Anjalee joined us from today. So as per our rule Miss Anjalee please come here and introduce yourself."

अंजलीला नेहा काय बोलली काहीच समजलं नाही. पण तिने आपल्याला तिच्या जवळ बोलावलं हे तिच्या हावभावा वरून कळून आलं. अंजली पस्तीशीतल्या वर्षाच्या, डोक्याच्या टिकली पासुन ते पायातील चप्पल पर्यंत सगळं (कानातले डूल, गळ्यातील माळ, बांगड्या, साडी) एकाच रंगाचं मॅचिंग घातलेल्या नेहा जवळ जाऊन उभी झाली.

"Good, now let's start." नेहा म्हणाली. 

"मला इंग्रजी नाही समजत. मी चौथी नंतर शाळेत नाही गेली. मास्तरांनी घरी येऊन मला शिकवलं आणि तेही फक्त मराठीतच."

"बापरे इतकी गावंढळ मुलगी इथे कशी आली." किंजलनी शारदाला कोंबा मारून विचारलं. 

किंजल सुरत च्या हिरे व्यापारी सुंदरलाल ची मुलगी. ती कला शाखेत पदवीच्या तिसऱ्या वर्षाला इंग्रजी विषयाचा अभ्यास करत होती. त्यामुळे तिला स्वतः वर खूप गर्व होता. तिचं लग्न कॅनडाच्या एका फाईव्ह स्टार हॉटेल मालकाच्या मुलासोबत पक्क झालेलं होतं. तिची इथे वसतिगृहात राहून गैरसोय होऊ नये म्हणून सुंदरलालने सरळ मुंबईत तिच्या साठी एक फ्लॅट विकत घेतला. त्यात ती एकटीच तिची सर्व कामं करणाऱ्या मोलकरीनी सोबत राहायची.

"मलाही जास्त नाही माहित. कालच संध्याकाळी परांजपे मॅमनी तिच्याशी भेटवलं आम्हाला." शारदा उत्तरली. 

"ओके पण इतकी गावंढळ मुलगी आपल्यात राहणार. So cheap!"

"ओके girls keep quite !" नेहाला कळलं की अंजलीवर तिला जास्त मेहनत घ्यावी लागेल, "मी तुला तुझा परिचय द्यायला सांगत आहे. आता तु मराठी भाषेत परिचय देऊन दे. मी तुला इंग्रजीत तुझा परिचय लिहून देते. त्याचा रट्टा मारायचा. आपल्या रूम मेट्स म्हणजे ज्या तूझ्या सोबत खोलीत राहतात, त्यांच्या मदतीने समजून घ्यायचं आणि परवा इंग्रजीत परिचय द्यायचा."

"बरं."

अंजलीने तिच्या बद्दल, तिच्या घरी कोण कोण राहतं, तिचं गाव वगैरे वगैरे जुजबी गोष्टी सांगितल्यावर नेहाने तिला विचारलं?

"What's your fiancé do? म्हणजे तुझा होणारा नवरा काय करतो?"

"ते ASP आहेत." अंजली उत्तरली. 

"म्हणजे?"

"पोलीस अधिकारी आहेत."

अंजलीचा होणारा नवरा पोलीस आहे हे ऐकताच पोरींची आपापसात चर्चा सुरु झाली, 

"अय्या पोलीस आहे, म्हणजे तो हिला घरात कैदी बनवून ठेवेल."

"आणि हिने पळायचा प्रयत्न केला की हिचे लांब केसं खुंटीला बांधून ठेवणार."

"माझे काका पोलीस अधिकारी आहेत. खूपच खाष्ट. ते घरात असेपर्यंत शुकशुकाट असतो घरात."

"माझा शेजारी पोलीसवाला तर बायकोला रोज पट्ट्याने झोडपतो."

"असं म्हणतात की माणसानं पोलीस स्टेशनची पायरी कधी चढू नये. ही तर सरळ पोलिसाच्या घरात जात आहे."

"तसा माझा मामे भाऊही पोलीस. स्वभावाने खूप छान, प्रेमळ. बायकोला जीव लावणारा. पण मागल्या वर्षी गुंडांसोबत चकमकीत त्याला गोळी लागली अन बिचारा जागीच गेला." कोणीतरी डोळ्यात पाणी आणून म्हणालं. 

हे सगळं ऐकून अंजलीचं डोकं गरगर करू लागलं. तिला वाटलं थोड्या दिवसातच ती ठाम वेडी होऊन जाणार. 

"Enough chit chat girls. Don't discuss nonsense in my class." नेहा मुलींना गप्पात गुंग झालेलं पाहून ओरडली. 

"अंजली ASP चं फुलफॉर्म सांग."

"माहित नाही."

"Who will tell us full form of ASP?"

"Assistant Superintendent of Police." किंजल पटकन उत्तरली. 

"Nice Kinjal." मग नेहा अंजलीकडे वळली, "And you Anjalee, तु सर्व वर्ग झाल्यावर शंभर वेळा ASP चं फुलफॉर्म लिही आणि उद्या मला दाखव. आपल्या होणाऱ्या नवऱ्या बद्दल तु इतकी निष्काळजी कशी असू शकतेस?"

"ओके मॅम !"

काही मुलींना अंजलीची कीव आली तर काहींना अंजलीवर हसू आलं. अंजली मात्र विचार करू लागली की, 

"लग्न झाल्यावर त्याचीच काळजी घ्यायची आहे मग आता फक्त स्वतःचीच घेतली तर काय विशेष. बापरे यांना जर कळलं की मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो न बघताच चुलीत फेकून दिला तर? माहित नाही काय शिक्षा देतील?"

"Ok girls, every monday we have to practice introduction. After or before marriage whenever you meet anyone from high class you must know how to talk in english?  understand you all!"

"Yes mam!"

"So now who will come here and show Anjalee that how one should give proper  introduction in english language?"

किंजल, शारदा, जयाने हात उंच केला. त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्ट झळकत होता. म्हणून की काय नेहाने हात खालीच असलेल्या आणि दुसरीकडे कुठेतरी लक्ष असलेल्या कविताकडे बघितलं. 

"Kavita come here and give your introduction." नेहाने कविताला म्हटलं. 

"Ok mam!" कविता उठून उभी झाली. घाबरत घाबरतच आठवून बोलू लागली, "Good morning all my dear elegant ladies. I am kavita. Me in 12 class. My father do job. Mother do home work. Brother go school......... (तिने एक पॉझ घेतला. पुढे तिला काही आठवेना म्हणून ती सरळ म्हणाली, 
" sorry mam!" 

"What is it kavita?" नेहा तिला भयंकर रागावली, "तुझे बाबा एक साधारण वरिष्ठ कारकून आहेत बम्बई मुन्सिपॅलिटीत. तरीही त्यांनी त्यांच्या सहा महिन्यांच्या पगारा इतकी रक्कम, पाच हजार रुपये इथे जमा केली. का तर दोन महिन्या नंतर तु जेव्हा त्यांच्या बॉसच्या मुलाच्या  लग्नात जाशील तेव्हा तिथे तुझं चांगलं इम्प्रेशन पडावं आणि तुला एखादं चांगलं हाय सोसायटीतलं स्थळ सांगून यावं. अन तु.. तु थोडी सुद्धा मेहनत घेत नाही आहेस. दहा दिवस झालेत तुला क्लासला येऊन, अजून साधं introduction तुझं पाठांतर झालं नाही. I am not going to tolerate this. आज पन्नास वेळा पूर्ण introduction लिहून उद्या दाखव मला."

"Yes mam."

"Sit down now."

कविता आसू पुसत आपल्या जागेवर जाऊन बसली. अंजलीला तिला असं रडतांना पाहून नेहाचा खूप राग आला. थोडं नीट बोलता नाही आलं तर इतकं रागवावं का तेही सर्वांसमोर? लग्न ही खूपच वाईट बला आहे. काय काय सहन करावं लागतं मुलींना एका चांगल्या घरात, एक चांगली..  नव्हे सर्वगुण संप्पन्न सून होण्यासाठी.

पण अंजलीला माहित नव्हतं की ही तर फक्त सुरवातच आहे. 

क्रमश :

तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी. 

धन्यवाद !

फोटो साभार गुगल, Pinterest वरून 

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Archana Wasatkar

HR assistant

An optimistic person. Like to express myself through writing stories, articles & poems. Thank you