Oct 24, 2021
कथामालिका

वधू संहिता भाग 6

Read Later
वधू संहिता भाग 6

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

वधू संहिता भाग 5 खालील लिंकवर वाचा 

http://irablogging.com/blog/the-bride-code-part-5_7057
वधू संहिता भाग 6

"बाबा," अंजली धावतच पाटलांकडे आली. पाटील मुन्शीजी सोबत बसून हिशोब बघत होते. अंजली सरळ त्यांच्या समोर बसून त्यांना म्हणाली, "मी तुम्हाला खूप त्रास देते म्हणून तुम्हाला इतकी घाई झाली ना मला या घरातून पळवून लावायची?"

"नाही असं काहीच नाही."

"मग मला मुंबईला त्या संस्थेत जिथे जास्त बोलणाऱ्या मुलींच्या जिभेला चटके देतात तिथे का पाठवत आहे तुम्ही?"

"काय?" पाटलांना काही समजलं नाही, "कोणी सांगितलं तुला हे?"

"आजीनं!" अंजली हात जोडून म्हणाली, "मी यापुढे एकदम चांगली, सुशील, सोज्वळ आणि सर्वगुण संपन्न मुलगी बनून राहणार. अजिबात कोणाची हेरगिरी करणार नाही की कोणाच्या शेतात जाऊन आंबे, बोरं, पेरू तोडणार नाही. सीमा आईला स्वयंपाक करायला मदत करेल. रोज तुम्हाला आणि मुन्शी काकाला चहा बनवून देत जाईल."

 तिने हसून मुन्शीकाका कडे बघितलं. त्यांनी दुरूनच हात जोडले. एकदा मुन्शी काकांनी चहा नीट केला नाही म्हणून बायकोला मारलं होतं. अंजलीला कळताच तिने मुन्शीजी हिशोब करायला तिच्या बाबा सोबत बसले असतांना  त्यांना जमाल घोटा मिळवून चहा दिला आणि मुन्शीजी दोन दिवस पोट धरून बिछान्यावर पडले. तेव्हापासून त्यांना अंजलीची धास्तीच बसली. 

"तुम्ही मला त्या संस्थेत नका पाठवू ना."

"अंजु, पहिली गोष्ट आजीनी तुझी गंम्मत केली. दुसरी अशी की तूच तर नेहमी म्हणतेस, मला अक्कलकोटच्या बाहेर जायचं आहे, जग बघायचं आहे. मग आता ही संधी जाऊ देऊ नकोस. मी ज्या संस्थेत तुला पाठवतोय ना, तिथं तुला स्वयंपाका सोबतच खूप काही नवीन शिकायला तर मिळेलच पण भरपुर मज्जा येईल. तुला नवीन मैत्रीनी मिळतील. पुढील आयुष्य कसं जगायचं यासाठी व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल. सोलापूरच्या पोस्ट ऑफिस मधून फोन लावून मी बोललोय तिथल्या मास्तर आणि मास्तरीण बाई सोबत. खूप प्रेमळ आहेत ते दोघं. त्यात मंदारलाही तूझ्या सोबत पाठवतोय इंग्रजी शिकायला. तेव्हा तुला कसलाच त्रास होणार नाही."

"हुम्म्म, म्हणजे तुम्ही आधीच सर्व तयारी करून ठेवली तर."

"हो कारण या संस्थेच्या जवळच मोठ्ठा समुद्र किनारा आहे. आणि मला माहित आहे अंजुला समुद्र खूप आवडतो."

"काय?" अंजलीने आनंदून विचारलं, "खरंच?"

"अगदी खरं."

"मग मी नक्कीच जाईल."

"बाळ असं समज की हा एक महिना फक्त तुझाच एकटीचा आहे. तुला जसं जगायचं तसं जग." पाटील अंजलीचा हात पकडून म्हणाले.

"तुम्ही खूप छान आहे बाबा." अंजली पाटलांच्या हातावर हात ठेवून म्हणाली. 

दोन दिवसांनी पाटील अंजली आणि मंदारला घेऊन स्वतःच्या गाडीने मुंबईला निघाले. पुण्यात मित्राकडे मुक्काम झाला. सकाळीच दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन आणि शनिवार वाडा बघून परत मुंबईच्या रस्त्याला लागले.  दोन्ही मुलांना प्रवासात खूप मज्जा आली. थंडीचे दिवस असल्याने वातावरणही प्रसन्न होते.

मंदार आणि अंजलीला 'वधू संहिता' च्या संस्थापक दाम्पत्य श्री आणि श्रीमती परांजपेच्या हवाली करून पाटील व्यवसाया बाबत सुरतला गेले.

'वधू संहिता' या संस्थेचे संस्थापक श्री आणि श्रीमती परांजपे वयाची पन्नाशी पार केलेलं जोडपं. मूळचे मराठवाड्यातल्या शेतकरी कुंटुंबातील. पण लग्नाला पाच सहा देवाने मुलबाळ पदरी दिलं नाही. श्रीमती परांजपेला आया बाया टोमणे मारायच्या. तर श्री परांजपेला घरचीच माणसं नामर्द, बायला म्हणायचे. कारण ते श्रीमतीला सोडून दुसरं लग्न करायला नकार देत होते. 

एका रात्री शब्दाला शब्द वाढत गेला अन दोघांनी घर सोडलं. मुंबईत आले. श्री परांजपे पाच वर्ग शिकलेले होते. त्यांनी एका मास्तरांच्या हाताखाली मुलांची शिकवणी घेणं सुरु केलं. श्रीमतीही वर्गात बसून इंग्रजी शिकू लागल्या.

हळूहळू परिसरात त्यांची चांगली ओळख झाली. आजूबाजूची परिस्थिती बघून त्यांनी मुला मुलींचे वेगवेगळे इंग्रजी भाषा वर्ग सुरु केले. मुलांच्या इंग्रजी वर्गाला छान प्रतिसाद मिळाला. पण मुलींच्या वर्गाला एकट दुकटच मुलगी यायची. त्यांच्याही आयांची सतत कुरबुर असे, 

"लग्न जुळलं तरीही पोरीला हे नाही येत, ते नाही येत."

"चार चौघात काय बोलावं, कसं बोलावं ते समजत नाही."

"नुसती शरीरानं वाढून वाया गेली." 

"हीला हे येत नाही, ही असेच कपडे घालते, हिच्यावर काहीच शोभून दिसत नाही, म्हणून हिचं लग्न जुळत नाही." वगैरे वगैरे.

तेव्हा श्रीमती नी श्री परांजपे कडे फक्त भावी वधू साठी म्हणून वर्ग घ्यायचा प्रस्ताव मांडला. त्यांनाही श्रीमतीची कल्पना आवडली आणि जाहिरात करणं सुरु झालं.  सुरवातीला त्यांच्यावर बरीच टीका टिपणी झाली. पण हळूहळू त्यांना छान प्रतिसाद मिळू लागला.

आता विस वर्षांनी मुंबईत जुहू मधे त्यांच्या दोन मोठया इमारती झाल्या. एक 'मुलांच्या इंग्रजी भाषा आणि व्यक्तिमत्व विकासाची.' आणि दुसरी 'वधू संहिता' ची. 'व्यक्तीमत्व विकासाच्या' इमारतीत पहिल्या मजल्यावर बाहेरून इंग्रजी भाषा शिकायला आलेल्या मुलांचे वसतिगृह  तर तळ मजल्यावर तीन खोल्यात मुलांचे वर्ग चालायचे आणि एका खोलीत श्री परांजपेचे ऑफिस होते. 

दुसऱ्या इमारतीत तळमजल्यावर श्री व श्रीमती परांजपे राहायचे. तिथे मुलींना स्वयंपाक करणं आणि वाढनं शिकवण्यासाठी सुंदर अशी आधुनिक स्वयंपाक खोली आणि डायनिंग हॉल होता. पहिल्या मजल्यावर मुंबईच्या बाहेरील मुलींचे वसतिगृह होते. तर दुसऱ्या मजल्यावर वेगवेगळे वर्ग चालायचे. 

दोन्हीही इमारती एकमेकांना लागून होत्या.

एका खोलीत तीन मुली अशा बारा मुली चार खोल्यांमधे राहायला होत्या आणि त्यांच्यासाठी दोन बाथरूम आणि टॉयलेट होते. जवळ जवळ सर्वच मुली श्रीमंत घरातून आलेल्या दिसत होत्या. 

श्रीमती परांजपेनी अंजलीला पहिल्या मजल्यावर नेले. सर्व मुलींना जिन्यात बोलवून अंजलीची ओळख करून दिली. 

"इतकी मोठी होऊनही पोलकं परकर घालते."

"भुवया बघ कशा वाढल्या आहेत."

"तेल लावून घट्ट बांधलेल्या दोन वेण्या. अर्रर्रर्र !"

"आणि ते हनुवटीवरच गोंदण."

"रंगानं गोरी आहे ते तरी बरं."

"हो ना, बघ तरी आताच रानातून पकडून आणल्या सारखी दिसतेय."

"साधी सरळ दिसतेय बिचारी."

"गावाची वेस पहिल्यांदाच ओलांडली असेल."

पोरींची एकमेकींसोबत कुजबुज सुरु झाली. 

"बस झालं मुलींनो. अंजली आजपासून आपल्या परिवाराचा एक हिस्सा आहे. मला आशा आहे तुम्ही तिला सामावून घ्याल आणि तिला डेव्हलप व्हायला मदत कराल."

"हो हो नक्कीच मॅम !" शारदा उसनं हसून म्हणाली. 

"ओके !" श्रीमती परांजपे मेघा व जया कडे वळून म्हणाल्या, "अंजली तुमच्या सोबत राहणार आहे. उद्या सकाळी वर्गात तिला व्यवस्थित तयार करून आणणं तुम्हा दोघींची जबाबदारी."

"माझी मी होईल तयार मॅडम. मला माझी येणी फणी सगळंच येतं ." अंजली आत्मविश्वासाने बोलली.

"हो मला माहितेय तुला तुझं येतं सगळं. पण ते इथे पुरेसं नाही. म्हणून मेघा आणि जया सांगतील तसं तयार होऊन यायचं."

"हो." अंजलीने होकारार्थी मान हलवली 

"उद्या हेमा मॅडम तूझ्या साठी कोणत्या कपड्याची आणि रंगाची कापडं शिवायची सांगतील तेव्हा नवीन कपडेही शिवून घेऊ."

"पण मी सोबत दोन कापडं आणली आहेत."

"ती इथे चालणार नाहीत अंजली."

"का बरं?"

"कळेल तुला हळूहळू. आता खोलीत जा आणि झोप निवांत. सकाळी लवकर उठायचं असतं योगा करायला."

"पण.... " अंजलीला आणखी काहीतरी विचारायचं होतं. पण तिला पाटलांनी, श्रीमती परांजपेला जास्त प्रश्न विचारून भांडावून सोडू नको, हे सांगितलेलं आठवलं. तशी ती थांबली. 

"चला मग मुलींनो गुड नाईट."

"गू SSS" अंजलीला या शब्दावर मनातल्या मनात खूप हसू आलं. 

मेघा तिला तिच्या खोलीत खोलीत घेऊन गेली. खोलीत थोड्या थोड्या अंतरावर तीन छोटे छोटे लोखंडी पलंग टाकलेले होते. समोरच भिंतीला लाकडी दार असलेल्या तीन आलमाऱ्या होत्या.

आत जाताच मेघाने अंजलीला तिचा पलंग आणि आलमारी दाखवली. अंजली पलंगावर बसून खोलीतल्या वस्तूंचे निरीक्षण करू लागली. 

तिची नजर जयावर गेली. पलंगावर बसून जयाने तिचा कुर्ता काढून फेकला तसं अंजलीने डोळयांवर हात ठेवला. 

"तुला काय झालं? ती रोजच फक्त स्लिप घालून झोपते." मेघा अंजलीला डोळे झाकतांना पाहून म्हणाली. 

"अच्छा, पण सीमा आई म्हणते मुलगा असो की मुलगी असं उघडं इतरांसमोर जात नसतात. शरीराला नजर लागते  आणि माणूस बिमार होतो. मला जया ताईला बिमार नाही करायचं."

"हो का. तुझ्या सीमा आईच्या गावाला होत असेल तसं. इथे नाही होत. डोळयांवरून हात काढ आणि हे ताई बाई बिलकुल म्हणायचं नाही. मी काही इतकी मोठी नाही तूझ्या पेक्षा." जया तिच्या अंगावर उशी फेकून म्हणाली.  

"हो गं. आपण सर्व मैत्रिणी आहोत. नाव घ्यायचं सरळ." मेघाने जयाच्या बोलण्याला दुजोरा दिला. 

"चल वेण्या सोड." जया अंजलीला म्हणाली. 

"काय? इतक्या रात्री?"

"परांजपे मॅम नी तुला तयार करायला सांगितलं आहे आम्हाला."

"उद्या सकाळी ना."

"तुझ्या लांब जटा मोकळ्या करायला सकाळी अजिबात वेळ मिळणार नाही. म्हणून आताच विंचरून ठेऊ आम्ही तुझे केसं. मेघा चल तू पकड एक वेणी अन मी पकडते."

"हो हो चल सकाळी मग आपण तयार होऊ की हिला तयार करू." 

इतकं बोलून दोघीही अंजलीच्या केसांवर भिडल्या.

"अरे मला केसं मोकळे सोडून झोप नाही लागत. परत वेणी बांधावीच लागेल. समजून घ्या ना." अंजली बडबड करत होती. पण दोघीनींही तिच्या बडबडी कडे लक्ष दिलं नाही. आपलं काम करून, अंजलीच्या केसांना फक्त रबर लावून झोपायला सांगितलं.

"माझ्या गावात, घरात मजाल कोणाची माझ्या मर्जी विरुद्ध काही करणार म्हणून आणि इथे या पोरींनी आल्या बरोबर माझ्या केसांवर धावा बोलला. हे होत काय आहे?" अंजली विचार करता करता झोपली. 

क्रमश :

तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी. 

धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Archana Wasatkar

HR assistant

An optimistic person. Like to express myself through writing stories, articles & poems. Thank you