Oct 24, 2021
कथामालिका

वधू संहिता भाग 3

Read Later
वधू संहिता भाग 3

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

वधू संहिता भाग 2 खालील लिंकवर वाचा 

http://irablogging.com/blog/the-bride-code-part-2_6981


वधु संहिता भाग 3

"मला वाटतं रामायण असो कि महाभारत किंवा इतर धार्मिक ग्रंथ ! ते  फक्त आयुष्य जगताना आपण कसं जगावं याबद्दल मार्गदर्शनपर भाष्य करतात. आता बघा रामायणात जर मंथराने कैकयीचे कान भरले नसते तर कैकयी भरतच्या भविष्याबद्दल चिंतीत झाली नसती आणि रामाला वनवासात जावं लागलं नसतं, दुसरं प्रजेने राणी सीते वर शंका घेतली नसती तर ती गोष्ट पसरली नसती आणि श्री रामावर सीतेचा त्याग करायची पाळी आली नसती. यातून एकच बोध घ्यावा कि आपण काहीही बोलायच्या आधी विचार करावा कि हे असं बोलण्याने कोणाचं काही वाईट तर होणार नाही ना.

आता गोष्ट, श्री रामांनी प्रजेचं ऐकून सीतेचा त्याग का केला? तर याबाबत माझं व्यक्तीगत मत आहे कि राम सीता हे कोणी सामान्य स्त्री पुरुष नव्हते तर एका महान राज्याचे राजा राणी होते.  त्यांच्यावर स्वतःच्या आधी प्रजेला पुढे ठेवायचे संस्कार होते. म्हणून माता सीतेला जेव्हा प्रजेच्या तिच्या विषयीच्या चर्चे बद्दल कळलं तेव्हा तिला वाटलं कि राजा राम सोबत राहून प्रजेचे नको ते आरोप ऐकल्या पेक्षा आणि श्री रामाला स्त्री मोहाचा दोष लावण्या पेक्षा तिने अरण्यात एकांतात राहिलेले बरे." 

कर्नल वसंत दीक्षित बोलत होते आणि सर्व त्यांना लक्ष देऊन ऐकत होते.

"अंजु बाळ श्री राम आणि सीता एक आदर्श जोडपं मानलं जातं म्हणून एखादं एकमेकांना शोभणारं जोडपं दिसलं कि मुखातून सहज निघून जातं कि अगदी राम सीतेची जोडी आहे. बस यापेक्षा जास्त मी काहीच बोलणार नाही."

वातावरण गंभीर झालं. अंजलीला वाटलं आता इथून निसटलेलं बरं.

"आजी मी कोशिंबीर करायला जाऊ? सीमा आई म्हणाली होती कि आज कोशिंबीर तु कर." अंजलीने आजीला गुणी मुली सारखं विचारलं. 

"हो हो जा." आजीने लगेच होकार दिला. आजीला वाटलं अजून जास्त काही बडबड केल्यापेक्षा अंजली तिथून गेलेली बरी. 

"फोटोही द्या तिला बघायला." कर्नल आजीला म्हणाले.

 "हो हो हा फोटोही बघ आणि आईलाही दाखव." आजीनं फोटो अंजलीच्या हातात दिला.

"माफ करा कर्नल, मी अंजलीला रोक टोक करत नसल्याने ती थोडी बिनधास्त झाली आहे आपलं मत मांडायला." पाटील नम्रपने म्हणाले. 

"अहो माझे बाबा स्वातंत्र्य सेनानी होते. आईही निर्भीड स्वभावाची. तिने त्यांच्या कार्याला खूप महत्वपूर्ण हातभार लावला. म्हणून मला वाटतं स्त्री निर्भीड असली, स्व मत  मांडणारी असली तर संसार आनंदी चालतो. नाहीतर बाई आपली कुढत बसते आणि पुरुष आपले विचार तिच्यावर थोपवत जातो. अशा संसारात काय अर्थ? त्यात माझा नातू पोलीस अधिकारी. त्याची बायको कणखरच असायला हवी." कर्नल हसून म्हणाले, "मला अंजलीत असलेली ऊर्जा आवडली. मी तिला योग्य ठिकाणी खर्च करायला नक्कीच मदत करेल."

तिकडे अंजली स्वयंपाक खोलीत जाताच मीराने तिच्या हातातला फोटो घेतला.

"अय्या काय मस्त दिसतोय तुझा होणारा नवरा." 
"मीरा दाजी म्हणायचं." विजाबाई मागून फोटो बघून म्हणाल्या, "खरंच आपल्या अंजुला अगदी शोभून दिसतील जावई."

"नजर नको लागायला." सीमा फोटो वरून हात ओवाळून, कडकडून बोट मोडून म्हणाली.

अंजलीला वाटलं अजून लग्न झालं नाही आणि याची इतकी काळजी सगळ्यांना. तिने फोटो न बघताच, मीराच्या हातातून हिसकावून चुलीत टाकला. सीमा, विजाबाई आणि मीरा तिघीही डोळे फाडून बघतच बसल्या. 

"चला ताटं करू लवकर. माझा जीव जातोय भुकेनं." अंजली मीराला काकडी खिसायला देत म्हणाली.

रात्रभर पाटलांकडे राहून दुसऱ्या दिवशी स्वामींचं दर्शन घेऊन कर्नल दिल्लीला रवाना झाले. 
लग्ना आधी मुलीचं मुलाच्या घरी जाणं योग्य नाही म्हणून साखरपुडा न करता फक्त गुणवंत पाटलांनी अंजलीच्या मामाला सोबत घेऊन कर्नल साहेबांच्या मागोमागच त्यांचं घर आणि माणसांना बघून भेटून आले तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

पण आजीचा काही जीव लागत नव्हता. अंजलीची आई आशा देवा घरी गेली आणि पाटलांनी दुसरं लग्न केलं तेव्हापासूनच आजी दर तीन चार  महिन्यांनी सावत्र आई सीमा, अंजलीला त्रास तर देत नाही ना, चांगली वागणूक देते ना हे पाहायला पाटलांकडे येत असे अन मग 15-20 दिवस मुक्काम करूनच जात असे.

"येऊ का आत?" पाटील आणि सीमाला पलंगावर बसून बोलतांना पाहून, आजीनं खोलीच्या दारातूनच विचारलं.

सीमाने पलंगावरून पटकन उठून डोक्यावर पदर घेतला आणि बाजूला उभी झाली.  
"आई या ना आणि तुम्ही असं परवानगी मागून येणे बरं नाही वाटत. बरं मला बोलवायचं होतं. तुम्ही कशाला त्रास घेतला?" पाटील पुढे होऊन आजीला म्हणाले. 

"काय सांगू जावई बापू ते कर्नल येऊन गेले तेव्हापासून माझं मन लागत नाहीये. जीव घाबरल्यागत होतोय."

"सीमा आईला पलंगावर पडायला मदत कर, मी डॉक्टरला घेऊन येतो." पाटील कोंड्याला अडकवलेला शेला खांद्यावर घेऊन बोलले. 

"तसं नाही जावईबापू. बसा तुम्ही आरामात."

"पण आई तुम्हाला बरं नाही वाटत ना मग डॉक्टरला दाखवायला हवं आपण."

"मला अंजुच्या काळजीने बारे नाही वाटत आहे."

अंजलीची गोष्ट येताच सीमा, चहा पाणी आणते म्हणून खोलीच्या बाहेर जाऊ लागली.

"ते नंतर, इथेच उभी राहा आणि ऐक माझं." आजीने सीमाला थांबवलं. 

"हो सीमा, अंजु तुझीही मुलगी आहे." पाटलांचे ऐकून सीमा थांबली, "बोला आई काय झालं? माझ्या गैर हजेरीत अंजुनी गुल्लेरने परत कोणाला मारलं का? कि कोणाची हेरगिरी करायला सुरु केलं तिने? कि तुमच्याशी वाद घातला कशावरून? कि शेजारच्या मुलांसोबत मारामारी केली?"

"नाही जावईबापू असं काहीच नाही केलं अंजुनी. सहजच चिंता वाटते तिच्या सासरची मंडळी कशी असेल ते?"

"त्या बद्दल अजिबात चिंता करू नका. अंजुच्या मामाने, महादेवने तर सांगितलंच असेल तुम्हाला की कर्नल वसंत दीक्षितने दिलेली सर्व माहिती एकदम खरी आहे आणि अंजुची होणारी सासू तर इतकी प्रेमळ आहे ना कि अंजुला त्यांच्या रूपात आईच मिळाली असं म्हणावं लागेल. आजी सासूबाई लखवा मारला म्हणून मागील काही वर्षांपासुन अंथरुणात आहेत. बाकी घर तर हवेलीच आहे मोठी. चार पाच नोकर चाकर आहेत चोवीस तास दिमतीला."

"हो हो मला हे सगळं सांगितलं महादेवने. पण त्याबरोबर हेही सांगितलं कि कर्नल सायबांची सून मास्तरनी आहे मोठया शाळेत, मोठी नात एका विधायकची सून आहे आणि त्यांच्या घरी मोठ मोठे नेता, सरकारी अधिकारी यांचं येणं जाणं असतं."

"हो मग छानच आहे ना."

 आजी कळवळुन म्हणाली, "मी तिच्या लग्ना नंतरच्या आयुष्या बद्दल चिंतीत आहे. वाटतंय नाही म्हणावं कर्नलला. पण तुमच्या वडिलांचा अपमान होईल. म्हणून मग लग्न तरी अजून एक दोन वर्ष पुढे ढकलून द्यावं."

"हे काय म्हणताय आई तुम्ही? आता तर काही महिन्यांपूर्वी तुम्ही सीमाला रागवत होत्या कि मी अंजु च्या लग्नाची गोष्ट नाही काढत म्हणून आणि सीमाला पैसा अडका खर्च होईल याची धास्ती आहे म्हणून तीही अंजुच्या लग्नाकडे दुर्लक्ष करायला लावते मला." पाटील आश्चर्यानं बोलले, "आता इतकं छान घरी बसल्या बसल्या स्थळ आलं. आम्ही घरदार पाहून आलो आणि तुम्ही म्हणताय लग्न पुढे ढकलून द्यावं? अहो कर्नल साहेबांनी मे महिन्यातली लग्नाची तारीखही काढायला सांगितली. आता त्यांना कसं काय नाही म्हणावं? तुम्ही सांगा बरं मला स्पष्ट काय झालं ते?"

"जावईबापू कर्नलच घर, सगळं छान आहे पण आपली पोर अजूनही गल्लीतल्या पोरांसोबत विटी दांडू खेळते त्याचं काय? दहा वर्ग शिकली तरीही गुल्लेर घेऊन आंबे, पेरू तोडायला जाते, रागावलं कि एकटीच माकडागत झाडावर जाऊन लपून बसते. स्वयंपाक खोलीत तर वाढून घ्यायलाही ती क्वचितच पाय ठेवते इतकं तुम्ही दोघांनी तिला लाडावून ठेवलं." आजी पाटील आणि सीमा दोघांकडे बघून म्हणाली, " पाळीच्या पाच दिवस वेगळं बसायला, राहायला सांगते तेव्हाच तर डोकं भांडावून सोडणारे कितीतरी प्रश्न विचारते, वेगळं का बसायचं? मलाच रक्त का येतं? मग मंदारलाही येईल का? देवा जवळ का नको जायला? त्यानंच दिलं मग त्याला का जमत नाही? मला हे पटत नाही." 

आजीनं डोक्याला हात लावला, "अरे देवा. मला तर खात्री आहे कि नवरा बायकोच्या नात्या बद्दलही तिला काही ज्ञान नाही. कारण तिच्या सीमा आईनी तिला तसं काही समजावून सांगायची तसदीच घेतली नाही." आजीने परत सीमावर एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला, "माफ कर सीमा, तू सावत्र असली तरी आई आहेस अंजुची पण तूही तिला काहीच शिकवू शकली नाही ना एका आई सारखी सक्ती कधीच केली नाही तिच्यावर."

"मला माफ करा आई त्याबद्दल. पण हेही खरं आहे कि मी अंजुवर कसल्याही प्रकारे सक्ती केली असती तर सर्वांनी मी सावत्रपन दाखवतेय असंच म्हटलं असतं."

"अगं पण म्हणून काय पोरीला इतकं डोकयावर बसवायचं कि ती तुला भिंगरी सारखी गोल गोल फिरवेल. माझ्यात तर अंजुशी डोकं लावायची ताकद नाही. अशात तिचं लग्न लावून देणं योग्य नाही. इतकंच मला वाटतं."

"हो हेही बरोबर आहे. पण यावरही एक उपाय आहे माझ्या डोक्यात. मी विचारच करत होतो. पण म्हटलं तुम्ही हो म्हणाल कि नाही?"

"सांगून तर बघा जावईबापू, माझी नात असली तरी तुमचीही मुलगी आहे ती. तुम्ही उत्तमच निवडाल तिच्यासाठी अशी खात्री आहे मला."

क्रमश :

तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी. 

धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

 

​​​​​

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Archana Wasatkar

HR assistant

An optimistic person. Like to express myself through writing stories, articles & poems. Thank you