वधू संहिता भाग (अंतिम ) 28 #मराठीकादंबरी

Romantic suspense story of a young couple.

त्याच दिवशी संध्याकाळी दिल्ली येथे अजयच्या घरी. अजयला प्रभा आणि मेजर वसंत दीक्षित सोबत खोलीत बोलायला सोडून अंजली त्यांना कोणी डिस्टरब करू नये आणि त्यांचं  बोलणं कोणी ऐकू नये म्हणून दाराशी उभी झाली. तिच्या एका मनाला मेजर वसंतचं वागणं पटत होतं तर दुसऱ्याला नाही आणि अजयचं टेंशनही बघवत नव्हतं. 

"आजोबा तुम्ही असं कसं स्वतःच्या मुलाला मारलं? आणि आई तु पण आजपर्यंत माझ्यापासून हे लपवलं!" अजय प्रभा आणि मेजरला विचारत होता, 
"रात्रंदिवस माझ्या डोक्यात एकच चालायचं कोणी आणि का मारलं माझ्या बाबाला? अन बघतो काय मारेकरी माझ्याच घरात, माझ्या सोबत राहतात."

"अजय मला माहित होतं हे सत्य तुला त्रास देईल. म्हणून तुझ्या कडून लपवलं." प्रभा त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली.

"पोलिसांच्या ताब्यात द्यायचे ना ! मारलं का? होऊ शकतं त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं असेल? फसवण्यात आलं असेल? तुम्ही सरळ स्वतःच्या मुलाला त्याच्या बायको देखत मारलं."

"मग काय करायचं होतं? ढिंढोरा पिटायचा होता सगळीकडे? तुझ्या बापाला पैशाची, महाग वस्तूंची चटक लागली होती म्हणून त्याने काही आपल्याच देशाला विकून खाणाऱ्या माणसांसोबत हात मिळवनी केली होती. माझ्यासमोर तु आणि संजय, तुमची बहीण होती, आपल्या पूर्ण कुटुंबाला हाल सोसावे लागले असते, म्हणून मी स्वतःच मारलं त्याला." मेजर डोक्यावर हात ठेऊन खाली बसले. 

"पण असा कायदा हाती घ्यायला नको होतं तुम्ही?"

"तुला जर तसं वाटत असेल तर मी विष प्राशन करून किंवा गळफास लावून प्रायश्चित घ्यायला तयार आहे. पण पोलिसांना समर्पण करायला सांगु नको. मी माझ्या मुलाच्या कर्माचे भोग तुम्हा मुलांना भोगायला लावणार नाही."

"अजय आजोबा म्हणतात ते योग्य आहे. तुझं एक ठीक आहे. तु खंबीर आहेस. पण संजय हळवा आहे. आता कुठे तो IAS ची लेखी परीक्षा पास झाला आहे. त्यात हे सगळं बाहेर आलं तर तो मौखिक परीक्षा कसा देईल? आणि मामा आपल्या घरात मुलगी देणार नाही. ताईला माहेरी येण्यावर बंदी लावली जाईल. जो निर्णय घ्यायचा आहे घे. पण नीट विचार करून. भूतकाळासाठी भविष्यकाळाचे वाटोळे करू नको."
प्रभाचे बोलने ऐकून अजयच्या डोक्याचा भुगा झाला. पहिल्यांदा त्याला वाटलं की सत्य माहित नव्हतं तेव्हा पर्यंत तो खूप सुखात होता. माहित करून उलट जन्मभर जीवाला बोचरी झाली. खोलीत अगदी सुई पडली तरी आवाज येईल इतकी शांतता पसरली. 

"आजोबा, आई, दादा कुठे आहे तुम्ही?" त्यांच्या कानावर संजयचा आवाज आला, "हे बघा संध्या वर्तमान पत्रात काय छापून आलं?"

मेजर वसंतला अगदी धडकी भरली, सत्य जगासमोर आलं की काय? आता आपल्या नातवंडांचं काय होईल? ते छातीवर हात ठेऊन खाली बसले. एव्हाना संजय त्यांच्या खोलीत आला. 

"काय झालं भाऊजी? काय छापून आलं?" अंजलीचा जीव धडधड करू लागला.

"जे तुम्ही सर्वांनी लपवून ठेवलं होतं माझ्याकडून." संजय म्हणाला. मेजरला अजूनच कसंतरी झालं.

"संजय कोड्यात बोलणं पुरे. आम्ही कधीच काही लपवलं नाही तुझ्याकडून आणि लपवलंही असेल तर तुझ्या काळजी पोटी." अजय बोलला. 

"आणि मला तुमची काळजी वाटतेय त्याचं काय? तु आणि वहिनी मृत्यू मुखातून परतले अन मला काहीच माहित नाही."

"तु पहाटे झालेल्या चकमकी बद्दल बोलतोय?"

"मग काय? हे बघ वहिनींचा फोटो आला आहे वर्तमान पत्रात. काय डॅशिंग दिसत आहे ना त्या पिस्तूल हातात पकडून? त्या विवाहित नसत्या तर त्यांना लग्नासाठी मागणी करणार्यांची लाईन लागली असती." संजय बोलत होता. अजयने अंजलीकडे बघितलं. तिला हसु आवरत नव्हतं. 
"आता मी तुम्हा दोघांना कुठेच जाऊ देणार नाही माझं लग्न होईपर्यंत." संजय पुढे बोलला, "हो ना एक तर मामा आधीच म्हणाला आहे IAS झाल्यावरच पोरगी देणार. नाही झालो IAS तर माझी पैरवी करायला हवं नको का कोणी."

"म्हणजे तुला आमची काळजी फक्त तुझ्या लग्नापुरतीच आहे तर?"

"हो " संजय हसून म्हणाला. 

"थांब तुला चांगलं शेकतो आज."

"आई बघ ना गं !" संजय आईच्या मागे जाऊन लपला. वातावरण हलकं फुलकं झालं. मेजरला जरा बरं वाटलं. पण अंजलीचा वर्तमान पत्रात आलेला फोटो बघून चिंताही वाढली. कोणी आपल्या मुलांची सुपारी देऊ नये म्हणून मेजरने घरात कुठेच मुलांचे वयात आलेले फोटो लावले नव्हते. बाहेर कोणाला फोटो देण्यासाठीही बंदी होती. 

झालं असं होतं की अंजलीला एक गुंड बंदूक घेऊन खिडकीतून आत प्रवेश करतांना दिसला. तिने अजयला हलवलं, आवाज दिला. पण तो काहीच प्रतिसाद देत नाही हे बघून तिने अजयच्या कमरेची पिस्तूल काढून त्या गुंडांवर जमेल तशी गोळी झाडली. त्या गुंडाला गोळी लागली तर नाही. पण तो बिथरला आणि तोल जाऊन खिडकी बाहेर खाली पडला. तेव्हाच त्यांच्या मागावर असलेल्या एका पत्रकाराने अंजलीचा पिस्तूल पकडलेला फोटो काढून तो वर्तमान पत्राला विकला.

वर्तमान पत्राने तो फोटो, "आजच्या युगातील सावित्री आणि झाँसीची राणी " या हेडिंग खाली संध्या वर्तमान पत्रात छापला. 

दीक्षितच्या घरचा फोन सारखा खणखनु लागला. त्यातील एक फोन श्री आणि श्रीमती परांजपेचाही होता. त्यांनी अंजलीला आपल्या संस्थेची ब्रँड अँबेसेडर बनवून, ती म्हणेल त्या गोष्टी वधू संहिताच्या भावी विद्यार्थीनीच्या  अभ्यासक्रमात सहभागी करू असं आश्वासन दिलं.

एकीकडे कौतुकाने अंजली भारावून गेलेली तर अजय त्याच्या समोर आलेल्या सत्य गोष्टीमुळे अस्वस्थ झालेला. त्याला सत्य माहित झाल्यावर क्षणभरही दिल्लीला राहायची इच्छा नव्हती. 

"आपल्या नात्याला प्रेमाची झालर लावायला मला अजून थोडा वेळ हवा आहे." असं अंजलीला सांगून तो तातडीने विमानाने मुंबईला रवाना झाला. म्हणून अंजली होईल तितकं शांत राहायचा प्रयत्न करत होती. तिला त्याच्या वेदनेची जाणीव होती.

"आता अजयची सर्व जबाबदारी तुझ्यावरच आहे. असं समज जगात तो पोरका आहे आणि सांभाळ त्याला." मेजर दीक्षित अंजलीला तिची मुंबईला पाठवणी करतांना म्हणाले.

अंजलीला काय बोलावं कळत नव्हतं. तिने कधीच विचार नव्हता केला कि तिच्या घरी तोऱ्यात ताठ मानेनं तिच्या साठी स्थळ घेऊन आलेला मेजर तिच्या समोर अश्रू गाळणार. 

"मी अजयला कधीच एकटं सोडणार नाही. तुम्ही काळजी घ्या स्वतःची." अंजली त्यांचा आशीर्वाद घेऊन मीरा सोबत रेल्वेत बसली.

मुंबईला आल्यावर अंजली मीराला हाताशी घेऊन वधू संहिताच्या कामाला लागली. अजय अंजली दोघेही दिवसभर आपल्या कामात व्यस्त असायचे. पण रात्रीच जेवण नक्कीच सोबत करायचे. अंजलीने ही एकच तर मागणी घातली होती अजयला.

हळूहळू तो अंजली सोबत मोकळा होऊ लागला. ते एखाद्या रविवारी चौपाटीवर पाणी पुरी खायला, कधी सिनेमा बघायला जाऊ लागले. मीराला एकटं वाटू नये म्हणून राजेश सोबत यायचा.  त्या दोघांचीही बऱ्यापैकी गट्टी झाली.

एक दिवस चहा प्यायच्या निमित्ताने मीराला भेटायला आलेल्या राजेशला अजयने विचारलं, 

"काय विचार आहे मीरा बद्दल?"

"विचार आहे कि फुल नाही तर फुलाची पाकळी सही."

"म्हणजे अंजली नाही तर तिची मैत्रीण... "

"तु म्हणू शकतोस तसं. पण मला वाटतं मी जास्त सुखी राहणार."

"हा त्यात काही शंकाच नाही म्हणा जी मुलगी लहानपणापासून अंजलीला झेलतेय ती नक्कीच तुलाही झेलेल."

"काय? म्हणायचं काय आहे तुम्हाला?" मागून मीरा सोबत चहाचे कप आणि बिस्कीट घेऊन आलेल्या अंजलीने त्यांचं बोलणं ऐकलं.

"अर्रर्रर्र, असं बायकोची टवाळकी करते का कोणी?" राजेशने आगीत तेल ओतलं.

"हो ना भाऊजी" अंजली डोळ्यात पाणी आणून बोलू लागली, "विचारा मीराला काय होती मी आणि आता यांच्याशी लग्न झाल्यावर काय झाली मी?"

मीराने होकारार्थी मान हलवली.

"असं काय केलं मी?" अजयने विचारलं.

"लोकं नाही दूर तर लोणावळा तरी जातात लग्न झाल्यावर फिरायला. तुम्ही हा दुसरा पावसाळा जातोय नेलं का कुठे?"

"बरोबर बरोबर !" राजेश मीराकडे बघत म्हणाला, "मग मी काय म्हणतो आमच्या डोक्यावर अक्षता टाका लवकर. चौघंही जाऊ फिरायला."

"ईश्श !'' मीरा लाजून आत पळून गेली.

समाप्त !

धन्यवाद !

तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी. 

फोटो साभार गुगल, Pinterest वरून 

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

🎭 Series Post

View all