Oct 24, 2021
कथामालिका

वधू संहिता भाग 27 #मराठीकादंबरी

Read Later
वधू संहिता भाग 27 #मराठीकादंबरी

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

अजयने एक हात अंजलीच्या हातात आणि दुसरा तिच्या  कमरेवर ठेवला. अंजलीने त्याला डोळे वटारून बघितलं. त्यानेही, "मी काय करू? ही वेळेची मागणी आहे." असं डोळ्यांनीच सांगितलं.

आर्केस्ट्राची गायिका गाऊ लागली,

"लग जा गले 
के फिर ये हसी शाम हो ना हो 
शायद फिर इस जनम मे 
मुलकात हो ना हो|

लग जा गले से ए... "

अंजलीच्या डोळ्यासमोरून आता पर्यंत अजय आणि तिच्यात झालेले प्रसंग एक एक करून जाऊ लागले. तिने ज्याची आस सोडून दिली होती ते घडलं. आज ती तिच्या पसंतीच्या मुलाच्या हातात हात देऊन समाजात वावरतेय.  तिला स्वतःशीच हसू आलं.

"जास्त खुश होऊ नका मॅडम." अजय अंजलीच्या कानाशी म्हणाला, "मी फक्त नाटक करतोय. मला तुमच्यात काहीच इंटरेस्ट नाही. तेव्हा उगीच अपेक्षा वाढवू नका."

"मिस्टर खडूस, you are so mean. Just go to hell." अंजली त्याचा हात सोडून जाऊ लागली. त्याने तिला थांबवलं.

"गाणं पूर्ण व्हायचं आहे आणि मी आधीच सांगितलं होतं नीट वागायचं. आपल्यात जे काही आहे ते फक्त घरी. समाजात आपण पती पत्नी आहोत."

"लवकर समजलं तुम्हाला."

एकदाचं गाणं संपलं. अजय अंजलीला घेऊन कमिशनर मॅडमकडे गेला. मॅडमचे आभार मानून त्याने अंजली आणि मीराला घरी सोडून दिलं. तो मात्र कपडे बदलवून परत कुठेतरी जायची तयारी करू लागला. 

"मीरा, तु घरीच थांब. मी आज अजय साहेबांच्या सिक्रेट मिशनचा छडा लावून येते."

"अगं पण खूप रात्र झाली आहे. तु कशी, कुठे जाणार दाजींच्या मागे?"

"कान दे इकडे." अंजली मीराच्या कानात पुटपुटली. 

अजयने जीप सुरु केली तोच मीराने त्याला आवाज दिला, "दाजी, एक मिनिट थांबा हो."

"काय झालं?"

"ते अंजुला सकाळी बिचवर जायचं मन आहे. तुम्ही या म्हटलं सकाळी जरा लवकर. मला बरं नाही वाटत तुमच्या दोघांना असं टेंशन मधे बघून."

"टेंशन घेऊन काही होणार आहे का? तु काळजी नको करू होईल सर्व ठीक. मी नाही आलो सकाळी लवकर तरी हरीश आहे. तो नेईल हवं तिथे."

"थँक्यू दाजी." मीरा गोड हसून आत गेली. तिचं काम संपलं. रात्री बारा एक च्या सुमारास जीप एका जुन्या इमारती जवळ येऊन थांबली. आजूबाजूला झाडांची गर्दी आणि किट्ट अंधार. अजयने टॉर्च लावून वर दाखवली. इमारतीतुनही त्याच्याकडे टॉर्चचा उजेड आला. हा त्यांचा एकमेकांना द्यायचा इशारा होता. 

अजय टॉर्चच्या उजेडात इमारतीत जाऊ लागला. त्याला त्याच्या मागोमाग पाला पाचोळा चुरगळल्याचा आवाज आला. तो क्षणभर थांबला. त्याला वाटलं एखादा प्राणी साप वगैरे असेल. तो कानोसा घेत, पावलं बघत आत गेला.

"Everything is ok?" अजयने बॉसच्या तैनातीत ठेवलेल्या दोघांना विचारलं.

"यस सर !"

"बॉस विचारत होता तुम्ही कधी येणार म्हणून?"

"ओके, दार उघडा. मी भेटतो त्यांना !"

"यस सर."
अजय बॉसच्या जवळ गेला. तो खिडकीतून बाहेर बघत बोलला, "तु पाखरू सोबत घेऊन आलास अजय."

"मी?" अजयने स्वतःचे खिशे वगैरे चाचपडले, "नाहीतर, मी कोणालाच सोबत नाही आणलं."

"कळेलच काही क्षणात."

त्याला जीपच्या मागच्या बाजूला बघून हसत घरात गेलेली मीरा आठवली. अंजलीचा किंचाळण्याचा आवाज आला. त्याला समजलं कि ती नक्कीच अंधारात कुठेतरी धडपडली आणि घाबरून किंचाळली. तो चेहऱ्यावरची माशी हलू न देता शांततेत खोलीतून बाहेर आला. त्याला अंजली त्याच्या दिशेने धावत येतांना दिसली. त्याला बघताच तिला हायसं झालं. ती त्याला बिलगणार तोच तो बाजूला झाला आणि ती तोल जाऊन धडकन खाली जमिनीवर पडली.

इन्स्पेक्टर तिला उठण्यासाठी हात द्यायला पुढे झाला तसा अजय खोकलला.

"सॉरी सर !"

"खूप बहादूर मुलगी आहे अंजली. तिला कोणाच्या मदतीची गरज नाही. ती उठेल स्वतः. काय अंजली?"

"You, cold hearted man !" अंजली उठण्याचा प्रयत्न करत चिडून म्हणाली, "असं वागते का कोणी माणूस एखाद्या मुली सोबत."

तिला बाहेरून असं काही जास्त लागलेलं दिसत नव्हतं. पण मुका मार चांगलाच बसला होता.

"मग मुलीनेही मुली सारखं वागावं. असं लपून छपून गाडीत बसून, अर्ध्या रात्री एखाद्या माणसाचा पिच्छा पुरवणं बरं नव्हे." अजय तिच्या जवळ जाऊन म्हणाला. 

"म्हणजे तुम्हाला माहित होतं मी गाडीत लपली म्हणून. तरीही तुम्ही मला एकटं अंधारात,  गाडीत सोडून इमारतीत निघून आले."

"म्हटलं, मॅडमला माझी जासूसी करायची आहे तर करू द्यावी."

"मला फक्त बघायचं होतं कि तुम्ही रात्रभर कुठे असता."

"इतकी इनसिक्योरिटी का?"

"तुम्ही प्रेम करनार कोणावर तेव्हा कळेल तुम्हाला?" अंजली त्याच्या नजरेला नजर देऊन म्हणाली. त्याने पटकन दुसरीकडे नजर वळवली. अंजलीला उचलून खुर्चीत बसवलं. 

"इन्स्पेक्टर फर्स्ट एड बॉक्स दे."
अजयने अंजलीला बँडेज करून दिलं. पेन किलर दिली.

"थँक्यू !"

"चल आत. तुला कळेल मी कोणासोबत इथे असतो ते." तो तिला उभं करून बॉसच्या खोलीत घेऊन गेला.

"बॉस !" अंजली आश्चर्य चकित झाली, "तुम्ही रात्रभर इकडे असता तर? मला नव्हतं माहित तुमची आवड अशी आहे म्हणून."

"अंजली मस्करी पुरे. बॉसने आम्हाला खूप महत्वाची माहिती पुरवली आहे आणि आणखी माहिती देणार आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे, म्हणून मी इथे असतो."

"अरे हे तर क्लब मधलंच पाखरू आहे." बॉस अंजलीला बघून म्हणाला, " म्हणजे पोरीनं लग्न केलंच तुझ्याशी!" अंजलीच्या गळ्यातले मंगळसूत्र बघून बॉस म्हणाला.

"हो !" अंजली अजयकडे बघून लाजली, ""सॉरी मी दुसरंच काही समजली होती. मीराचे नव्हतं ऐकायला मी. मी जाते आता."

"माझं पोरगं बिन लग्नाचंच गेलं अन त्याच्या अकाली मृत्यूला कारण असणाऱ्याचा मुलगा संसार थाटतोय. मी हे होऊ देणार नाही." बॉस आतापर्यंत हातात लपवलेला खिडकीचा धारदार काचेचा तुकडा अंजलीच्या गळ्याशी लावून म्हणाला. "त्याला त्याच्या मुलाचं दुःख पाहावं लागणार."

"तिला सोडा महेंद्र. मला तिच्याशी काहीच घेणंदेणं नाही. आमच्यात पती पत्नी सारखं काहीच घडलेलं नाही आणि घडणारही नाही. म्हणूनच ती माझा पाठलाग करत इथे आली. त्यामुळे तिच्या मृत्यूने मला दुःखही होणार नाही."

"मला चकवू नकोस ASP.  तुझा जीव आहे हिच्यात आणि मी तो घेऊन तुझ्या बापाला दाखवणार कि मुलाच्या अकाली मरण्याचे दुःख काय असते."

"पण माझा तो बाप केव्हाच मेलाय बॉस, हे विसरताय तुम्ही." अजय त्याला ओरडला, "तुम्ही मला सांगणार होते कि माझ्या बापाला कोणी मारलं? मी तुमच्या मुला सारखाच आहे. अंजली आणि मी पुढील आयुष्य तुमचा मुलगा आणि सून बनून तुमच्या सोबत एकत्र राहू."

बॉसने अंजलीला सोडून दिलं. काचेचा तुकडा खिडकी बाहेर फेकून दिला.
अंजली जाऊन अजयला बिलगली. इन्स्पेक्टर बॉसचे हात पाय दोराने बांधायला पुढे आला. 

"असू दे. बाहेर जा मी आत बोलवलं तेव्हा ये."

खोलीत काही काळ शांतता पसरली. अंजली पाण्याचा ग्लास घेऊन  खुर्चीत बसली.

"तुम्हाला खरंच वाटतं माझे बाबा तुमच्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार होते म्हणून?" अजयने बॉसला विचारलं. 

"तेच खरं आहे. माझा मुलगा धारातीर्थ पडल्यावर मी सुन्न पडलं होतो. पण मान गर्वाने ताठ होती कि तो आपल्या राष्ट्र हितासाठी शहीद झाला. पण काही दिवसांनी नकली गोळा बारूद आणि बंदूक, रायफल घोटाळा समोर आला. त्यावेळी मला शंका आली. मी माझ्या एका गुप्तहेर मित्रा करवी माहिती जमवली. ज्यात तुझ्या बापच मुख्य करता धरता निघाला."

"मुळीच नाही. त्यात माझ्या बाबांचा काहीच हात नव्हता."

"तुझ्या आजोबांनी सांगितलं असेल हे, हो ना?"

"हो ! मला त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे."

"चांगलं आहे. पण ते खोटं बोलले तुझ्याशी."

"का खोटं बोलतील ते? काय मिळेल त्यांना माझ्याशी खोटं बोलून?"

अजयचा स्वतः वरून ताबा सुटत चाललेला बघून अंजलीने  त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानं एक लांब श्वास घेतला. परत शांत होऊन तो बॉसला म्हणाला, 

"तुम्हाला जे काही बोलायचं आहे, माहित आहे ते सरळ सरळ बोला. माझा धीर सुटतोय आता."

"ठीक आहे. ऐक, खरंतर माझ्या हातूनच मरणार होता तुझा बाप. पण जेव्हा मी त्याला मारायला पिस्तूल घेऊन तुमच्या घरी गेलो, मी बघितलं कि तुझ्या आजोबांनी, मेजर वसंत दीक्षितने स्वतः आपल्या मुलाला मारलं."

"खोटं खोटं बोलतोय तु." अजयने बॉसची कॉलर पकडली, "माझं लक्ष भरकटावं म्हणून हा सापळा रचला आहे तु त्या देशद्रोही लोकांसोबत मिळून. बोल.. " अजयच्या डोळ्यात आग लागली होती. शॉक झालेल्या अंजलीने इन्स्पेक्टर सोबत मिळून अजयच्या हातून बॉसची कॉलर सोडवली.

"मला वाटतं आपण घरी गेलेलं बरं अजय."

"अजिबात नाही, या माणसा कडून खरं उगवल्या शिवाय तर नाहीच नाही."

"उद्या येऊन परत चौकशी करा."

"नाही, तुला हवं असेल तर जा. पहाट झाली आहे. इन्स्पेक्टर सोडून देईल घरी तुला." अजय अंजलीला बोलला,  "माझ्या आजोबांवर आरोप करणाऱ्याला मी असंच सोडणार नाही."

"तुझी आई सुद्धा उपस्थित होती तिथे. तिच्या मांडीवरच प्राण सोडला तुझ्या बापाने. म्हणून इतकी वर्ष मुक बनून होती ती. विचार जाऊन तिला." बॉस म्हणाला. 

नेहमी सारखा खिडकी जवळ जाऊन बाहेर चिवचिवाट करणाऱ्या चिमण्यांना बघू लागला. कोणी तरी अजयवर निशाना साधत असल्याचं त्याला दिसलं. तो जाऊन अजयवर लपकला तशी एक गोळी येऊन त्याच्या पाठीतुन छात्यात लागली आणि तो खाली पडू लागला. 

अजयने त्याचं डोकं मांडीवर घेतलं,
"मी खोटं नाही बोलत अजय. रागाच्या भरात मी आपल्याच देशाचा शत्रू बनलो. मी मेलो तर काहीच बिघडणार नाही. पण तुला काही झालं तर खूप मोठ नुकसान होईल या देशाचं. सदा सुखी राहा." बॉसने प्राण सोडला.

"सर गोळीबार होतोय. चला सर, मी तुम्हाला कव्हर देतो." इन्स्पेक्टरने अजयला आवाज दिला. 

"अजय प्लीज उठ !"  अंजली अजयला हलवून बोलत होती.

अजय सुन्न झाला होता. त्याच्या मनात एकच प्रश्न घोळत होता. 

"आजोबा?? का आजोबा??"

क्रमश :

धन्यवाद !

तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी. 

फोटो साभार गुगल, Pinterest वरून 

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Archana Wasatkar

HR assistant

An optimistic person. Like to express myself through writing stories, articles & poems. Thank you