वधू संहिता भाग 24 #मराठीकादंबरी

Romantic, comedy & suspense story of a young bride & groom

अंजली दार उघडत नाही हे बघून अजय संतापला खरा. पण लगेच त्याच्या ओठांवर स्मितही उमटलं. तो मागे बागेत गेला. त्याला वाटलं तसंच निघालं. अंजलीने मागचं दार उघडं ठेवलं होतं. तो सरळ बेडरूमच्या आत गेला. कपाट उघडून संजयने अंजलीचा फोटो पाठवला होता तो लिफाफा शोधू लागला. 

इकडे अजयची काही  चाहूल नाही हे पाहून अंजलीने दार उघडलं. बघते तर समोर कोणीच नाही. तिने हरीशला विचारलं, 

"साहेब बाहेर गेले का?"

"नाही मॅडम, ते तर आतच गेले."

"नक्की?"

"नक्की मॅडम !" अंजलीला चिंतीत पाहून त्यानं विचारलं, "काही झालं का मॅडम?"

"नाही काहीच नाही. बसा तुम्ही." अंजलीने घराला दाराला नीट बघितलं. तिला मागच्या बाजूला जाणारी बोळ दिसली. अंजली तिथून मागे गेली.  

"अच्छा तर साहेब मागच्या दाराने गेले आत." ती स्वतःशीच बोलली, "छान !"

अजयला शोधाशोध करतांना बघून अंजलीने त्याला विचारलं, "तुम्हाला काही हवं आहे का? मी देऊ शोधून?"

"नको, मिळालं मला." त्याला कागद पत्रात ठेवलेला लिफाफा मिळाला. लिफाफा बघून त्याला खूप आनंद झाला. 

"चला आता ही मिस्ट्री संपणार." इतकं म्हणून त्यानं लिफाफा उघडला. फोटो काढायला गेला. पण फोटो खूप दिवस ठेवल्याने कि काय लिफाफ्याला चिपकला. तो काही बाहेर येईना. ओढला तर फाटेल म्हणून अजयने लिफाफा कैचीने आजूबाजूने कापला आणि फोटो खूप हळूहळू काढला. फोटो बघताच त्याला शॉक बसला.

"How can this possible?" त्याची सहनशीलता जणू संपुष्टात आली, "If is it, why didn't she recognized me? This is being more complicated."

अजयला स्वतःवर खूप राग आला. आधीच त्यानं अंजलीचा फोटो बघून घेतला असता तर आज असं झालं नसतं? त्याने रागात हात जोरात कपाटावर मारला.

"कोणाचा फोटो आहे?" त्याच्या मागे उभ्या अंजलीने त्याला विचारलं. तो भानावर आला. स्वतःला शांत करू लागला. 

"बापरे काय झालं या खडूसला?" अंजलीच्या मनात आलं, "रागात एखादी मलाही ठेऊन द्यायला मागे पुढे पाहणार नाही हा."

 ती घाबरून मागे होऊन त्याला म्हणाली, 

"सॉरी ! मी आज खूप त्रास दिला तुम्हाला. पण असं माझा राग स्वतःच्या हातावर का काढताय?"

अजयचा चेहरा नेहमीसारखाच भावहिन, शांत झाला. त्याने फोटो आणि लिफाफा फाडून, त्याचे छोटे छोटे तुकडे करून अंजलीच्या जवळ जाऊन तिच्या हातात ठेवले. 

"माझ्या प्रेयसीचा फोटो होता हा." अजय तिला सांगू लागला, "तिच्यामुळेच मी लग्न करत नव्हतो आणि लग्न केल्यावरही तुम्हाला दिल्लीला घरी सोडून इथे निघून आलो."

"काय?" अंजली शॉक झाली, "खरंच?"

"हो जीवापाड प्रेम करायचो आम्ही एकमेकांवर. मी पोलीस अधिकारी तिच्यामुळेच झालो. कारण तिला पोलीस अधिकारी खूप आवडतात. तिच्या घरात सर्व पोलीस पेशात आहेत. म्हणून तिलाही पोलीस अधिकारी बनल्यावरच लग्न करायचं होतं. आम्ही रोज एकमेकांना प्रेमपत्र लिहायचो, एकमेकांसोबत जीवन जगण्याच्या मरणाच्या आनाभाका खायचो. भेट झाली की कितीतरी वेळ एकमेकांना बघत बसायचो. आपलं आधीच लग्न ठरलेलं याचा जणू मला विसर पडलेला. पण आपल्या लग्नाचं बोलणं सुरु होताच मी सांगितलं तिला. आम्ही ती पोलीस अधिकारी बनताच तुम्हाला सगळं सांगून, तुमच्या सोबत घटस्फोट घेऊन मग लग्न करू असं ठरवलं होतं."

अजय इतक्या गंभीरतेने सांगत होता की अंजलीचे डोळे भरून आले.

"म्हणजे मला खडूसच्या डोळ्यात जे माझ्यासाठी दिसलं ते केवळ माझा भ्रम होता. सगळं एकतर्फीच होतं तर !" ती स्वतःशीच पुटपुटली. तिने मागे पलटून पदरानं डोळे पुसले. 

"तुम्ही रडताय ?" अजयने तिच्या खांद्यावर हात ठेऊन विचारलं.  तिला वाटलं तसंच त्याला बिलगून, त्याच्या छातीवर डोकं ठेऊन खूप रडावं. पण तिने स्वतःला सांभाळून खोटं खोटं हसत विचारलं, 

"इतकं प्रेम मग फोटो का फाडला तिचा?"

"कारण, तिला जसं कळलं की तुम्ही इथे माझ्यासोबत राहायला आल्या आहात. ती माझ्याशी खूप भांडतेय. मी कंटाळलो आता या नात्याला. म्हणून दोघांनी एकमेकांना त्रास न देता जगायचं ठरवलं आहे. ती तिच्या मार्गाने मी माझ्या. आता तुम्हाला माझ्या समोर असं डोक्यावर पदर घेऊन राहावं नाही लागणार."

"मेली मी. काय करतोय हा?" 

अजयने तिच्या चेहऱ्यावरून पदर बाजूला समोर केलेला हात तिने थांबवला.

"इतकी घाई ठीक नाही. होऊ शकतं आज ती रागात असेल आणि तुम्हीही. उद्या समजा ती बोलायला आली, तुम्ही विरघळून परत तिच्याशी आधी सारखं जुळणार. मग माझं काय? तेव्हा स्वतःला वेळ द्या."

"वेळ द्यायची काही गरज नाही. आता परत फिरणे नाही. आता फक्त तुम्ही माझ्या आणि मी तुमचा." अजय तिच्या जवळ जवळ जाऊ लागला आणि ती मागे मागे जाऊ लागली. ती त्याच्या बगलेखालून बाजूला आली. 

"समजता काय स्वतःला तुम्ही?" अंजलीने तिचा पवित्रा बदलला, "आतापर्यंत मी तुमच्या सावलीलाही हवी नव्हती तुम्हाला. आणि आता त्या मुलीने भांडण केलं तर माझ्या जवळ येऊ पाहता. हे मला अजिबात चालणार नाही. मी काही रस्त्यावर पडलेली नाही, की कोणी येऊन कसंही वागेल माझ्याशी. समजलं तुम्हाला. दूर राहा माझ्यापासुन."

"टेम्पर आणि आवाजही अगदी तिच्यासारखाच आहे आणि ही वधू संहिता मधेही गेली होती ." अजय आठवत स्वतःशीच बोलला.

"हे असं तोंडातल्या तोंडात बडबड नाही करायचं माझ्या समोर. जे काही आहे मोठ्याने बोलायचं."

"मला माहितेय तुम्ही कोण आहे?"

"मी कोण आहे? मी अंजली आहे, श्री गुणवंत पाटीलची मुलगी आणि आता मिस्टर अजय दीक्षितची बायको. त्यात काय माहित करायचं?" आपलं पितळ उघडं पडलं का या भीतीने अंजली घाबरली. पण होईल तितकं सामान्य असण्याचा आव आणून ती बोलली. 

"तुम्ही वधू संहिताच्या विद्यार्थीनी आहात, ज्यांना गुप्तहेर खूप आवडतात, ज्यांनी जुहू बिचवर मुलांना मारलं होतं, ज्या मुलाचा वेष करून मुलांच्या वसतिगृहात आल्या होत्या तिथे आपली पहिली भेट झाली, मग दुसरी भेट क्लबमधे झाली, जिथे तुम्ही मला किस करून जिवंत राहायला सांगितलं होतं."

अजयने अंजलीच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला केला. तिचा गोरा गोरा चेहरा लाजेनं लाल झाला आणि आपली चोरी पकडली गेली म्हणून तिची घाबरगुंडी उडली. तिने पटकन खाली बसून त्याचे पाय धरले.

"प्लीज मला माफ करा. पण मलाही..... " तिला मधेच थांबवून तो बोलू लागला. 

"खरी अंजली, माझी बायको कुठे आहे, मी जो लिफाफा आणि फोटो फाडला तो अंजलीचा माझ्या भावानं पाठवलेला फोटो. तोही तुम्हीच बदलला ना काल रात्री? " अजय तिला बोलत होता. पण अंजलीला तो असं का बोलतोय काहीच कळत नव्हतं, 
"तुम्हीच बॉस बद्दल माहिती त्यांना पुरवली ना?"

"कोणाला?"

"ज्यांच्या इशाऱ्यावर तुम्ही इथे माझी पत्नी बनून आल्या आहेत."

"मी लग्न होऊन इथे आली आहे ." 

"मला सरळ सरळ सांगा कोणाच्या इशाऱ्यावर, काय मिळवण्यासाठी इथे आल्या आहे? त्यांनी जर तुमच्या कोणा आप्त जनाला बंदी बनवून ठेवलं असेल तर मी सोडवेल त्यांना. पण सगळं मला खरं खरं सांगा."

"अजय मीच अंजली आहे. वाटलं तर तुम्ही माझ्या आई बाबाला विचारा किंवा वधू संहिताच्या कार्यालयात विचारा."

"बंद करा हे नाटक. अंजली अक्कलकोट मधून फक्त परीक्षा द्यायला सोलापूरला गेलेली. 
तेव्हा उगीच लेडीज पोलीसला बोलवण्याची तसदी घ्यायला लावू नका. कारण ती आली तर आता तुमचा चेहरा फक्त लालच झाला,  त्याला काळ निळं व्हायला वेळ नाही लागणार."

"मिस्टर अजय दीक्षित" अंजली त्याला बोट दाखवून म्हणाली, "नाही मिस्टर खडूस, मी अंजली गुणवंत पाटील आहे. तुम्हाला विश्वास नाही माझ्यावर नका ठेऊ. लेडीज पोलीसला बोलवायचं, बोलवून घ्या. राना वनात मोठी झाली आहे मी. काळी निळी पडायच्या भीतीने नको तो आरोप कधीच कबूल करणार नाही."

अंजली मागच्या अंगणात जाऊन रडत बसली.
"आता काय करायचं? हा खडूस खरंच मला लेडीज पोलीसच्या हातात देईल? मग त्या मला टॉर्चर करतील, मारतील, जाऊदे गुदगुल्या करायचं सोडून काहीही करो. पण बाबाला काय वाटेल, जावईने त्यांच्या मुलीला तुरुंगात टाकलं हे कळल्यावर? आणि मंदार...  त्याला किती त्रास होईल. त्याची बायको त्याला नेहमी टोमणे मारेल, 'तुमची बहीण तुरुंगात गेली, गुन्हेगार आहे ती' असं म्हणून. मीरा.." अंजलीने डोक्यावर हात मारला आणि ती आणखी रडु लागली, 
"मी तुला माझ्या भरवश्यावर सोबत आणलं मीरा. मला माफ कर. मला नव्हतं माहित असं काही होईल."

अंजली तिथेच भिंतीला टेकून रडता रडताच झोपली.

अजयने तिच्या सर्व सामनाची तपासणी केली. त्यात त्याला  अंजलीच नाव असलेलं राशन कार्ड दिसलं. वधू संहिताच आय कार्ड दिसलं ज्यावर तिचा फोटो होता. आतंकवाद्यांशी संबंधित असं काहीच दिसलं नाही.

"खरंच अंजली खरं बोलत असेल का? मीरा ! अंजलीची बालपणीची मैत्रीण, तीच खरं काय ते सांगु शकते. आजोबाला फोन करून, अंजलीला एकटं करमत नाही म्हणून तिला लवकरात लवकर पाठवायला सांगतो."

मेजर दीक्षितने उद्याच मीराला पाठवतो म्हणून सांगितलं. 

रात्री आठ वाजता जेवणाचा डबा आला तेव्हा त्याला अंजलीची आठवण झाली. ती काय करतेय हे बघायला तो बेडरूममधे गेला. ती तिथे नव्हती. स्वयंपाक खोलीतही नव्हती.

मागच्या अंगणात अंधार झालेला. त्यानं लाईट लावला तेव्हा अंजली त्याला भिंतीला टेकून, दोन्ही हात छात्याशी घट्ट गुंडाळून पडलेली दिसली. त्यानं तिला आवाज दिला, 

"अंजली उठा आणि जेवण करून घे."

ती काहीच बोलली नाही.

"अंजली नाटक पुरे. मी अजून तुम्हाला काहीच केलेलं नाही कि पोलिसांच्या हवाली केलं नाही. तुम्हाला मी एक चान्स नक्कीच देईल तुम्ही गुन्हेगार नाही हे दाखवायला."

पण तरीही ती शांतच. त्याला आधी वाटलं ती नाटक करत असेल. पण लगेच त्याला काळजी वाटली. त्याने तिला हलवलं तशी ती गाढ झोपेतून जागी झाली. 

"जेवण करून घ्या ."

"मला इच्छा नाही. प्लीज तुम्ही जेवून घ्या." अंजली उठून उभी होऊन म्हणाली.

"तुम्ही जर खरंच गुणवंत पाटीलची मुलगी आहात, तर मग माझा फोटो तर आजोबा स्वतः घेऊन आलेले तुमच्या घरी, सर्वांनी बघितला, तुम्ही कसा नाही बघितला?"अजयला खूप प्रश्न पडले होते, 
" आणि बघितला तर मला ओळखलं का नाही, कि ओळखूनही गंम्मत घेत होत्या माझी? म्हणून हे पदराने तोंड लपवायचं नाटक केलं."

"हे सगळंच मी तुमच्या बाबतीतही बोलु शकते."

तो काहीच बोलला नाही. 

"मला काहीच सफाई द्यायची इच्छा नाही. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा." अंजली निराश होऊन बोलली.

अंजलीने दोघांना जेवण वाढलं. जेवण करून अजय बेडरूममधे बेडवर झोपला. त्याला आता अंजलीला एकटं सोडणं योग्य वाटलं नाही. तसेच जर ती खरंच काही कारणाने शत्रू पक्षासाठी काम करत असेल तर मग तिचा मागोवा घेणं महत्वाचं. 

क्रमश :

धन्यवाद !

तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी. 

फोटो साभार गुगल, Pinterest वरून 

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

🎭 Series Post

View all