वधू संहिता 23 #मराठीकादंबरी

The romantic, comedy & suspense story of a young bride & her groom

अंजलीने बेडरूमचं दार लावून बेडवर अंगं टाकलं. तिचा हात सारखा कमरेला खाजवायला जात होता. खोलीत आपण एकटेच मग कशाला ही साडी घालून झोपायचं? तिने परकरची गाठ सैल केली. साडी सुटू नये म्हणून ती परकरच्या नाड्याची खूप घट्ट गाठ बांधायची. ज्याचा तिच्या कमरेवर चांगला चर्रर्र व्रण पडला. 

अंजलीने कमरेला खोबऱ्याचं तेल लावलं. खूप दुखत होतं. तिला रडू आलं. पण आवाज बाहेर जाऊ नये म्हणून तीने ओठ दाबून ठेवले. 

"एका मुलीला लग्न करून मान सन्मान मिळवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात, हे या मिस्टर खडूसला कसं कळणार? याला कुठे घर सोडावं लागलं, जन्मापासून जुळलेली नाती विसरावी लागली की हे असे अंगाला व्रण देणारे कपडे घालावे लागले." अंजली स्वतःशीच बडबड करत होती. तोच बेडरूमच्या दारावर थाप पडली. 

"अंजली मला माझं काही महत्वाचं सामान घ्यायचं आहे. दार उघड."

"मी झोपली, तुम्हीही झोपा."

"झोपलेली माणसं अशी सांगत नसतात झोपली म्हणून. दार उघड. मी माझं कामाचं सामान घेऊन हॉलमध्ये झोपतो."

"हा माणूस... " अंजलीला त्याचा खूप राग आला. पण उपाय नव्हता. अंजलीने परत परकरची गाठ बांधली. तिला चांगलंच दुखलं. डोळे पुसत जमेल तशी साडी गुंडाळून तिने दार उघडलं. 

अजयने तिच्याकडे न बघता आत जाऊन आलमारीतुन त्याचं काही सामान घेतलं आणि बाहेर पडला.

"आणखी काही हवं असेल तर आताच घेऊन घ्या. मी परत दार उघडणार नाही." अंजली भडकून म्हणाली तर अजय तितक्याच थंडपणे बोलला, 

"मला दार तोडता येतं."

अंजलीला वाटलं त्याला काही तरी फेकून मारावं. किती बदमाश आहे हा. ती दार लावून निवांत झोपली. पण रात्री एक दोन च्या दरम्यान पोटातल्या उपाशी कावळ्यानी तिला उठवलं.

तिने स्वयंपाक खोलीत जाऊन बघितलं. खरंच काहीच नव्हतं खायला. अजय हॉलमधे खाली चटईवर झोपला होता. बाजूलाच डबा ठेवला होता.

तिने डबा उघडून बघितला. दोन पोळ्या, अळूची भाजी, वरण भात सर्वच होतं.

"म्हणजे साहेबांनी अर्धाच डबा खाल्ला तर. इतका ही वाईट नाही मिस्टर खडूस." अंजली स्वतःला म्हणाली आणि तिथेच जेवायला बसली.

डबा बंद करून ती उठली तो अजय डोळे बंद ठेऊनच बोलला, 
"जेवण झाल्यावर डबा धुवून ठेवावा. खरकटी भांडी ठेवल्याने घरात मुंग्या, माकोळे आणि झुरळं होतात."

"इतका मोठा झुरळ तर माझ्या समोर झोपला आहे. तो घरात असतांना दुसरं कसं येणार."

"जास्त बडबड न करता डबा धुवून झोपून जावं."

अंजलीने डबा धुवून पुसून ठेवून दिला. तिला अक्कलकोटची आठवण झाली. आजी किती ओरडायची, 

"धुणे भांडी घासायला शिक. सासरी सासूबाई नाही धुवून देणार तुझे कपडे."

पण अंजलीने कधी मनावर घेतलंच नाही. तिच्या मनात आलं, तिकडे दिल्लीला असतो तर नोकर चाकर असल्यामुळे तिला काही करावं नसतं लागलं पण मिस्टर खडूसच्या मेहरबानीमुळे आता ती मुंबईला एकटी आहे आणि सर्व घरकाम मीरा येईपर्यंत तरी तिला एकटीलाच करावं लागेल.

अजय मुंबई पोलीस तर्फे मिळालेल्या 2बीएचके बंगल्यात बांद्राला राहत होता. त्याने अंजलीच्या हातात पैसे दिले आणि कॉन्स्टेबल हरीश सोबत गाडीत जाऊन घरासाठी तिला हवं असेल ते सामान घेऊन यायला सांगून तो कामावर निघून गेला. अंजलीला काय किती आणावं कळत नव्हतं. कधी कळून घ्यायची तसदीच घेतली नाही मग असंच होणार. इथे मदत मागावी तरी कोणाला? आजूबाजूच्या बंगल्यातील बायकांनी तिला फक्त कोण आहे, कशी आहे म्हणून डोकावून बघितलं. अंजलीला वाटलं जाऊन त्यांच्याशी बोलावं. पण त्यांच्या वागण्यात तिला नवऱ्याच्या ऑफिसरगिरीचा तोराच जास्त दिसून आला. 

दुपार झाली. तिला वधू संहिताच्या श्रीमती परांजपेची आठवण झाली. त्या तिला नक्कीच मदत करतील. अंजलीने त्यांना भेटायचं ठरवलं. पण पोलीस बंगलो वसाहत बांद्राला तर वधू संहिता जुहूला. आता कसं, कोणत्या रस्त्याने जायचं? तिने कॉन्स्टेबल हरीशला वधू संहिता माहित आहे का विचारलं. तो नाही म्हणाला. अजयने केवळ अंजलीला मदत म्हणून त्या हवालदार हरीशला ठेवले होते. तो एकटा असतांना बंगल्याच्या आजूबाजूला त्याच्या परवानगी शिवाय फिरायलाही सर्वांना मनाई होती. 

एक महिना वधू संहिता मधे राहून आणि उचापती करून तिला तो जुहू चा एरिया छान पाठांतर झालेला. तिने कॉन्स्टेबल हरीशला गाडी आधी जुहू बिचवर घ्यायला लावली. तिथून तिला वधू संहिता पटकन आठवलं. 

अंजलीला असं हातभर हिरवा चुडा आणि साडी घातलेल्या सौभाग्यवतीच्या वेषात बघून श्रीमती परांजपेला खूप आनंद झाला. त्यांनी अंजलीला पंधरा दिवसांसाठी काय, कोणतं, कसं, किती सामान घ्यायचं समजावून सांगितलं. अंजलीनेही त्यांनी सांगितली तशी पूर्ण यादी बनवून घेतली. 

 तिकडे हॉस्पिटलमधे भरती असलेल्या बॉसवर हल्ला झाला. राजेश आणि अजयने मिळून त्या हल्लेखोराला पकडायचा प्रयत्न केला. पण त्यानं हॉस्पिटलच्या टेरेसवरून खाली उडी मारली आणि तो मरण पावला.

"मला वाटतं बॉस आता ठीक आहे आपण त्याला एखाद्या गुप्त जागी हलवू." राजेश म्हणाला. 

"हो हेच योग्य होईल. तिथेच मी त्याची चौकशी करेल. त्याला दवाखान्यात ठेवणं म्हणजे त्याचा जीव धोक्यात टाकणं आहे." अजयने राजेशला दुजोरा दिला. 

"ते तर आपण करूच. पण बॉस या दवाखान्यात भरती आहे ही गोष्ट लीक झाली कशी? आपल्या टिम मधल्या फक्त आठच लोकांना याबद्दल माहित होतं." कमिशनर गंभीर होऊन बोलले.

"म्हणजे आपल्यातल्याच कोणीतरी ही गोष्ट लीक केली असं वाटतं सर तुम्हाला?" अजयने कमिशनरला विचारलं. 

"शंका येतेय मनात तशी."

"पण सर आपली टिम एकदम विश्वासु आहे."

"आहे ना! पण आपला वैरी कधी कोणाची कमजोर नस दाबून त्याला विश्वासघात करायला भाग पाडेल सांगता येत नाही ना."

"मला तर अजय वरच शंका येतेय." राजेश म्हणाला.

"Rajesh ! are you crazy?" कमिशनर त्याला म्हणाले, 
"मस्करी पुरे राजेश, This is a very serious matter." 

"सर मी सिरीयसलीच बोलतोय." 

अजय दोन्ही हाताची घडी मारून त्याच्याकडे बघत उभा होता, "आणखी काही?"

"सॉरी अजय, पण बघ ना मागील एक महिन्या पासून बॉस पोलीसच्या कस्टडीत आहे. त्याच्यावर कधीच हल्ला झाला नाही आणि तु लग्न करून परत येताच असं हल्ला होणं नको तो विचार करायला लावतं."

"सर तुम्हालाही असंच वाटतं का?" अजयने शांतपणे  कमिशनरला विचारलं. 

"अजय, राजेशच्या बोलण्यात दम आहे राजेश. पण हा निव्वळ योगायोगही असू शकतो ना."

"पण राजेशच्या मनात माझ्याबद्दल डाउट आला म्हणजे नक्कीच पाणी कुठेतरी मुरतंय. काय राजेश?"

" खरं तर मला मिस्टर अजय नाही तर मिसेस अजय वर डाउट येतोय."

"तिचा या केस सोबत काय संबंध राजेश?" कमिशनरने राजेशला प्रश्न केला. 

"सर बोलू द्या त्याला." अजय त्याला म्हणाला, " राजेश मोकळे पणाने सांग तुला काय म्हणायचं आहे, तुला का डाउट आला त्या मुलीवर?"

"अजय मला सांग, दिल्लीचं ऐशो आरामाचं आयुष्य, मोठं घर दार सोडून ती इथे मुंबईला का आली?"

"माझ्या सोबत राहता यावं म्हणून."

"अच्छा ! मग तुमचं लग्न झालं तेव्हापासून तिने तुला तिचा चेहरा का दाखवला नाही? एक शिकली सवरलेली मुलगी असूनही पूर्ण तोंड झाकणार इतका मोठा पदर का घेते? बरं दिल्लीला सर्व मोठी मंडळी होती त्यांचा मान राखता यावा म्हणून तिथे ठीक आहे. इथे दोघेच असतांना काय गरज आहे घुंघट ची"

" Actually ते एक व्यक्तिगत मॅटर आहे."

"कितीही व्यक्तीगत असलं तरीही चेहरा लपवायची काय गरज?" राजेश त्यांना सांगू लागला, "मला काही तरी काळं बेरं असल्याची गहन शंका येतेय. आपल्याला डिचवण्यासाठी आतंकवादी कोणत्याही थराला जाऊ शकतात. तेव्हा तु आधी तिचा चेहरा बघ आणि ही तिच आहे का जिच्याशी तुझं लग्न ठरलं होतं का याची खात्री करून घे."

राजेश पुढे भावुक होऊन म्हणाला, " मी खूप बालिश आहे अजून. मला तुझ्या सारख्या मित्राकडून खूप काही शिकायचं आहे. मला पदोपदी तुझं मार्गदर्शन लागणार आहे. म्हणून खूप काळजी वाटते तुझी. तुला काही झालं तर कमिशनर अंकलला एकट्यानेच मला झेलावं लागेल. तेव्हा प्लीज काळजी घे."

अजयने त्याला मिठी मारून थोपटलं, "नक्कीच !"

"पण खात्री कशी करू? आजोबांनी पाठवलेला फोटो तर मी बघितलाच नाही आणि कुठे ठेवला तेही आठवत नाही."  अजय स्वतःशीच बडबडला.

"अजय तुला काय वाटतं?" कमिशनरने अजयला विचारलं , "हे बघ राजेशच्या मनात फक्त डाउट आला आहे. त्याच्यामुळे उगाच तूझ्या नवीन नात्यात काही ताण निर्माण होईल असं काही करू नको. बाकी आपण इतर टिम मेंबर्स वरही नजर ठेऊन आहोतच."

"हो सर. मी लक्षात ठेवेल तुम्ही सांगितलेलं. चला येतो मी. मला थोडं पेपर वर्क पूर्ण करायचं आहे."

"हो हो, चल टेक केयर."

"जय हिंद अजय !" राजेश बोलला.

"जय हिंद राजेश !"

अजयच्या मनात राजेशचे बोलने घुमत होते.

"काल रात्रभर अंजली माझ्या बेडरूममध्ये एकटी होती. मी   सामान घ्यायला तिकडे जाई पर्यंत सर्व महत्वाची कागद पत्र आणि फाईल्स असलेलं कपाट उघडं होतं. तिने चेक केलं असेल का? खरंच ती माझी पत्नी अंजली नसून आतंकवाद्यांची गुप्तहेर असेल का? मग खऱ्या अंजलीचं काय झालं असेल? कुठे असेल ती? तिला काही झालं तर तिच्या आई बाबांना आणि आजोबाला काय उत्तर देणार मी? लवकरात लवकर तिचा चेहरा बघायला हवा. पण तिचा चेहरा बघितला तरी मला कसं कळेल कि ती अंजली आहे कि आतंकवाद्यांचं प्यादं? " अजयचे मन असंख्य प्रश्नांनी घेरलं गेलं.

"यावर एकच उपाय. संजयने मला पाठवलेला तिचा फोटो शोधून काढणं. त्यानं मला पोस्टाने तो फोटो पाठवला होता आणि मी तो लिफाफा तसाच कागद पत्रात टाकून दिला होता. म्हणजे कपाट आवरावं लागेल असं दिसतं." अजय विचारातच घरी गेला.

बंगल्याच्या गेटवर खुर्चीत बसून असलेल्या हरीशने  अजयला दिसताच सॅल्यूट मारलं, 
"जय हिंद सर !"

"जय हिंद हरीश !" अजयने त्याला विचारलं, "मग आज मॅडमला घेऊन कुठे कुठे गेला होता?"

"जुहू बिच जवळ एक वधू संहिता म्हणून संस्था आहे तिथे आणि मग सामान घ्यायला दुकानात."

"वधू संहिता?" अजयला आश्चर्याचा धक्का बसला, "तु नेले कि मॅडमने सांगितलं न्यायला?"

"मॅडमने ! त्यांना इथून कसे जायचं माहित नव्हतं. पण जुहू बिचवर गेल्यावर त्यांना समजलं कसे जायचं ते."

"अंजलीला वधू संहिता कसं माहित? नक्कीच राजेश म्हणतोय तसा काहीतरी घोळ आहे. माझ्याकडून दुर्लक्ष झालं कसं?"

अजयला आतून खूप टेंशन आलं. पण तसं किंचितही चेहऱ्यावर न दाखवता तो हरीशला म्हणाला, 

"गुड ! मॅडमकडे नीट लक्ष देत जा आणि त्यांना एकटं कुठे सोडत नको जाऊ."

"हो सर !"

दारावरची बेल खराब असल्याने त्यानं दारावर थाप दिली. अंजलीने दुर्बिनितुन बघितलं अजय आहे म्हणून. पण तिला त्याची गंम्मत घ्यायची इच्छा झाली म्हणून तिने दार उघडलं नाही आणि विचारलं, 

"कोण आहे?"

"मी आहे."

"मी कोण? नाव गाव वस्तू प्राणी सांगा."

"कशाला? तु दाराची साखळी कडी लावून बघू शकतेस कोण आहे ते?" अजय स्वतःला शांत ठेऊन उत्तरला. 

"माझ्या डोळ्यात काहीतरी गेलंय म्हणून मला नीट दिसत नाहीये."

"अंजली, मी अजय दीक्षित."

"मी अशा नावाच्या कोणत्याच व्यक्तीला ओळखत नाही." अंजली हसू दाबत बोलली. 

" अंजली मस्करी पुरे, चुपचाप दार उघड." अजयचा पारा चढला.

क्रमश :

धन्यवाद !

तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी. 

फोटो साभार गुगल, Pinterest वरून 

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

🎭 Series Post

View all