Oct 24, 2021
कथामालिका

वधू संहिता भाग 21 #मराठीकादंबरी

Read Later
वधू संहिता भाग 21 #मराठीकादंबरी

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

प्रभाने अंजलीच्या चेहऱ्यावरून पदर बाजूला केला. मीराने डोळे मिटून देवाला प्रार्थना केली. सर्व बायका अंजलीला बघून दंग झाल्या. लाल शालूत अंजलीचं गोरं गोमटं रूप आणखीनच खुलून दिसत होतं.

"ए दादा वहिनी तर फोटो पेक्षाही सुंदर दिसतेय." संजय म्हणाला. 

"खरंच रे काय तेज आहे ना वहिनीच्या चेहऱ्यावर?" हेमंत म्हणाला. 

"अगदी शिवाच्या पार्वती सारखं." संजय बोलला.

"हम्म हिंदी मराठी सिनेमा नटीही मात खातील आपल्या वहिनी पुढे."

"ह्या त्यांची काय लायकी आपल्या वहिनी समोर. आपली वहिनी म्हणजे अस्सल सौंदर्याची खान. अन त्या सिनेमा नटी, चेहऱ्यावर मेकअप पोतुन आणलेलं नकली सौंदर्य."

"हा पण सुंदर दिसतात ना?"

"मग काय माझ्या वहिनीची तुलना करशील का त्यांच्याशी?"

"वहिनी माझीही आहे."

"मी कधी नाही म्हटलं? अजय दादा सांग मी म्हटलं का तसं?" संजयने अंजलीकडे बघतच अजयला विचारलं. 

"म्हटलं नाही पण अर्थ तर तसाच निघतो ना दादा? सांग बरं ह्याला समजावून." हेमंतही समोर बघतच अजयला म्हणाला.

"दादा तु काही बोलत का नाहीस?" संजय आणि हेमंतने एका सुरात मागे पलटून अजयला विचारलं. पण बघतात तर अजय तिथे नव्हता. 

"दादा कुठे गेला?" हेमंतने संजयला विचारलं. 

"मला कसं माहित असेल?" संजय म्हणाला.

"वहिनीला बघून हनिमूनची तयारी करायला तर गेला नाही ना?"
"दादा आणि हनिमून? झालं मग?"

"का नाही? तूच तर म्हणाला वहिनी अस्सल सौंदर्याची खान आहे म्हणून."

"हो पण दादा वेगळा आहे."

"चल त्यालाच जाऊन विचारू." हेमंत म्हणाला आणि ते दोघं अजयच्या खोलीत जाऊ लागले. पण त्यांच्या कडे माळीकाम करणाऱ्या गणु काकानी त्यांना थांबवलं. 

"संजय बाबा, छोटे मालक खोलीत नाहीत.!" 

"तुम्हाला कसं माहित काका?"

"ते आताच ड्रायवर सोबत गाडी घेऊन बाहेर गेले. जातांना ही चिट्ठी तुम्हाला द्यायला सांगून गेले." गणु काकांनी एक चिट्ठी संजयला दिली.

झालं असं होतं की तिकडे प्रभाने अंजलीच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला केला आणि हॉलच्या वर असलेल्या लायब्ररीत ठेवलेला फोन खणखणला. अजयचे कान टरकावले. जणू तो फोनची वाटच बघत होता. मुंबई वरून कमिशनर साहेबांचा फोन होता, 

"हॅलो !"

"हॅल्लो अजय, लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !"

"धन्यवाद सर ! पण मला माहिती आहे कि तुम्ही फक्त लग्नाच्या शुभेच्छा द्यायला हा फोन अजिबात केलेला नाही."

"You are right अजय !" कमिशनर हसून म्हणाले, "सॉरी तुला डिस्टरब करतोय. पण बॉसला परवा रात्री अटॅक आला."

"काय?"

"Don't worry. तो जिवंत आहे. आम्ही त्याला हॉस्पिटलमधे हलवलं. पण माझा तूझ्याशिवाय आणखी कोणावरही विश्वास नाही. एक राजेश आहे पण तुला तर माहितेय तो किती निष्काळजी आहे ते. म्हणून म्हटलं तु मेजर साहेबांना समजावून ये उद्या."

"मी आताच निघतोय सर. तुम्हाला माहितेय ना माझ्यासाठीही किती महत्वाचा आहे तो."

"हो, म्हणूनच तुझ्या लग्नाला दोन दिवस झाले नाही तो तुला मुंबईला बोलावतोय."

"सर.. ."

"नीट ये."

"यस सर ! जयहिंद !"

"जयहिंद !"

चिट्ठीत  अजयने संजयला त्याची बाजू आजोबा व आईला समजावून सांगायला आणि त्याच्या कडून माफी मागायला सांगितलं होतं. तसेच नवीन वहिनीकडे लक्ष द्यायलाही सांगितलं. चिठ्ठी वाचून संजयने कपाळावर हात मारला. 

"तरी मी त्या फोनची केबल काढून ठेवली होती असं होणार म्हणून. माहित नाही कोणी ती परत लावली?"

"मी !" हेमंत भीत भीत म्हणाला. 

"काय तु?"

"हो मला वाटलं की साफसफाई करतांना निघाली असेल चुकून. लग्नाचं घर आहे. कोणी काही महत्वाचा फोन करू शकतं म्हणून मी लावली केबल आणि तु तरी कुठे मला सांगितलं होतं की दादा फोन आल्यावर आपल्या नवविवाहित, सुंदर अशा बायकोला सोडून, आजोबांच्या रागाची पर्वा न करता असा जाईल म्हणून तु फोन डिसकनेक्ट करून ठेवला ते !" हेमंत म्हणाला.

"आता आजोबांना काय सांगायचं? त्यांनी मला अजय सोबत सावली सारखं राहायला सांगितलं होतं." संजय चिंतीत होऊन खाली बसला. 

तिकडे हॉलमधे बायकांची छान चर्चा रंगली. 

"पौर्णिमेचा चंद्रच आहे हो सुनबाई."

"प्रभा कुठून शोधली गं मेजर साहेबांनी हिला?"

"आता कळलं, लग्नाच्या भानगडीत कधीच पडणार नाही असं म्हणणारा अजय कसा बोहल्यावर चढायला तयार झाला?"

"तो तर लट्टू झाला असेल फोटो बघताच."

"अगं प्रभा लगाम लाव अजयला आतापासूनच नाहीतर निसटायचा हातातून."

"हो ना, आजकालच्या मुली लग्न होत नाही तो मुलाला घेऊन वेगळा संसार थाटतात."

"कानामागून आली अन तिखट झाली, असं व्हायला वेळ नाही लागत हो."

अंजलीला त्यांच्या गप्पा ऐकून हसू आलं. 

"ए बायांनो गप राहा. काय आजच भांडण लावाल का सासु सुनेत?" बायकांचं पुराण ऐकून आत्या मधे पडली.

"अहो आत्या, बोलू द्या ना त्यांना. काय मजेदार बोलताहेत त्या." अंजली उत्साहात म्हणाली.

"अंजु काय हे?" मीरा अंजलीला म्हणाली तशी अंजली खाली मान घालून शांत बसली. 

बायकांनी चकित होऊन अंजलीकडे बघितलं. 'लयच वस्ताद आहे ही मुलगी ' असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर आले. 

"चला ओटी भरा नवीन सुनेची." आत्याने हुकूम सोडला. 

मीराने दाराकडे बघितलं, अजय, संजय व हेमंत तिघेही दारात नव्हते. तिने मोकळा श्वास घेतला. कार्यक्रम पार पडून बायका आपापल्या घरी गेल्या. तनु अंजलीला प्रभाच्या खोलीत घेऊन गेली.

"हे हे Anjali you are great ! मस्त बोललीस. त्या बायकांना तर शॉकच बसला." तनु खुश होऊन म्हणाली.

"धन्यवाद तनु !" काहीतरी विचार करून अंजली तनुला म्हणाली, "मला यांचा एखादा फोटो दाखव ना."

"फोटो कशाला, प्रत्यक्षातच बघ ना. मी जाऊन घेऊन येते दादाला इकडे नाहीतर संजयला सांगते."

"नको नको, त्यांना काय वाटेल? किती उतावीळ, अशिष्ठ मुलगी आहे. मला तर सहजच हवा होता फोटो."

"अगं बाई lफक्त उद्या रात्री पर्यंत दुरावा हां अंजु. फिर मिलन की रात !" तनुने अंजलीची मस्करी केली. 

"काहीही तुम्ही !" अंजलीही गंम्मतच लाजून बोलली.

"तनु तुम्ही दमल्या असणार प्रवासाने. आराम करा. मी आहे अंजु जवळ." मीरा म्हणाली. 

"हो खरंच दमले मी. आई आत्याच्या खोलीत जाऊन आराम करते. काही लागलं तर मावशीला आवाज द्या."

"हो हो. नक्कीच!"

तनु गेली तसं मीराने दार लावलं आणि अंजली साडीचा पदर कमरेला खोचून इकडे तिकडे भिंतीवर, आलमारीत काहीतरी शोधू लागली.

"काय करतेय तु?" मीराने तिला विचारलं. 

"अगं सासूबाईची खोली ना ही. इथे अजयचा फोटो असायलाच हवा. तो शोधतेय."

"हा घे." मीराने दिवाणच्या बाजूलाच ठेवलेल्या टेबल वरची एक फोटो फ्रेम उचलून अंजलीच्या हातात दिली. संजय आणि अजयचा लहानपणीचा फोटो होता तो. 

"तुझ्या टाळक्याला हातोडीने फोडू की स्क्रू ड्रायवरने नट बोल्ट फिट करू?" अंजली चांगली संतापली, "लंगोट घातलेल्या फोटो वरून कसं कळेल तरुणपणी अजय कसा दिसतो ते?"

"सोरी !" मीरा कान पकडून म्हणाली. 

"सॉरी असं प्रोनाऊन्स करतात."

"प्रोना... "

"जाऊदे ते !" अंजली डोकं धरून बसली, "काय लोकं आहेत या घरचे? इतकं मोठं घर आणि त्यात स्वतःच्या मुलाचा एकही फोटो नाही कुठेच घरात. बाकी वाघ, सिंह, घोडे, निसर्ग अन काय काय चित्र घरभर लावून ठेवलेत." अंजली बडबड करत होती.

"मला वाटतं दाजींच्या खोलीतच तुला त्यांचा फोटो मिळेल पाहायला." मीराने डोकं लावलं. 

दार वाजलं.

मीराने दार उघडलं. प्रभा आली.

"अगं बसली का आहेस? आराम कर." प्रभा अंजलीला म्हणाली. 

"हो, हे शालू घालून झोपायला जमत नाही."

"असं आहे तर माझी साधी साडी घाल. तुझं सर्व सामान अजयच्या खोलीत आहे. काही लागलं तर सांग आणून देते. " प्रभा आलमारीतुन साडी काढत म्हणाली. 

"मी जाऊन घेऊन येते माझं परकर पोलकं घालायला."

"अंजली बाळ बघ या घरात मी अगदी तुझी आईच आहे. पण कालच तुझं लग्न झालं. इथे अजयची आत्या, मामा मामी आहेत. त्यांना नाही आवडणार तु परकर पोलकं किंवा साडी सोडून आणखी काही घातलेलं. म्हणून फक्त काही दिवस तरी साडीच घाल आणि अजयची खोली जरा आवरत आहोत म्हणून उद्या संध्याकाळी पूजा झाल्यावरच तिकडे तुला जाता येईल." प्रभा केविलवाणा चेहरा करून म्हणाली.

"तुम्ही जसं सांगणार तसंच करेल मी."

"छान ! संध्याकाळ पर्यंत आराम कर. संध्याकाळी तुला काहीतरी गोड बनवायचं आहे सगळ्यांसाठी."

अंजलीने होकारार्थी मान हलवली. 

क्रमश :

धन्यवाद !

तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी. 

फोटो साभार गुगल, Pinterest वरून 

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Archana Wasatkar

HR assistant

An optimistic person. Like to express myself through writing stories, articles & poems. Thank you