Oct 24, 2021
कथामालिका

वधू संहिता भाग 20 #मराठीकादंबरी

Read Later
वधू संहिता भाग 20 #मराठीकादंबरी

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

अजयने पुढे केलेल्या हातात अंजली तिचा हात देणार तोच तिला त्याच्या तळ हातावर एका घावाचा व्रण दिसला. धारदार चाकूनेच झालेला तो व्रण जास्त जुना दिसत नव्हता. तिला एकदम अजयची आठवण झाली आणि ती जागीच थबकली. 

अंजलीचा हात त्याच्या हाताजवळ जाऊन थांबलेला पाहून अजयचंही लक्ष स्वतःच्या तळ हातावर गेलं आणि तो व्रण पाहून त्याला आठवलं, कशाप्रकारे क्लब मधे अंजलीला वाचवतांना तिच्यावर आलेला चाकू त्याने हातात पकडल्याने त्याचा तळहात चांगलाच कापला गेला.  
त्याचाच हा व्रण. 
तेव्हा कशी अंजली किस करून, त्याला I LOVE You म्हणून आणि जिवंत राहायला सांगून गेली.

"कुठे असेल, कशी असेल, काय उचापती करत असेल ती आता?" त्याच्या मनात आलं.

 ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या त्याच्या आत्या भावाने, हेमंतने गाडीचा हॉर्न वाजवला तसा अजय वर्तमानात परतला. 

त्याला वाटलं जखमेचा व्रण पाहून अंजली घाबरली की काय. म्हणून तो तिला म्हणाला, 

"मला तुम्हाला घाबरवायचं नाही. पण पोलीस अधिकाऱ्याचा हात आहे हा. रोज गुंडांसोबत दोन दोन हात करणं आलंच. तेव्हा असले व्रण अंगावर राहतीलच."

" निघायचं? आपल्याला वेळ होतोय." हेमंतने आवाज दिला. 

अंजलीने काहीच न बोलता अजयच्या हातात हात दिला पण तिचं हृदय आणखीनच धडधड करायला लागलं. त्याकडे दुर्लक्ष करत ती गाडीत बसली. गाडी सुरु झाली. स्वामींचं दर्शन घेऊन अक्कलकोटच्या बाहेर निघाली. अजयची मोठी बहीण, गिरीजा, तिची दोन मुलं, तिचा नवरा गौरव, आत्या, मामा, मामी, मामे बहीण तनु , संजय, मेजर वसंत आणि त्यांचा ड्रायवर मिनी बसने निघाले तर मीरा, अंजली, अजय आणि हेमंत कारने निघाले. 

पण अजयच्या हाताचा तो स्पर्श आणि तो जखमेचा व्रण ! अंजलीचं मन शंकाकुल झालं. 

"एकदा घुंघट वर करून बघु का याला?" तिच्या मनात आलं. पण लगेच तिचं मन तिला म्हणालं, "अगं वेडे जर तु घुंघट वर करून त्याला बघितलं तर तुझाही चेहरा दिसेल ना त्याला आणि हा खरंच तो असेल तर... तर त्याने अजिबात तुझा चेहरा पाहता कामा नये. आठवतंय ना काय लिहिलं होतं त्याने पत्रात, 

'तसं तर मी आशा करतो की आपली परत आयुष्यात कधीच भेट होऊ नये. पण कधी भेटलोच तर मला तुम्ही ओळखू नये हीच सदिच्छा.'

 म्हणजे त्याच्या कामात त्याला मोठा अडथळा वाटते मी आणि त्याला त्याच्या कामगिरीत कोणताच व्यत्यय नकोय." 

तिचं मन तिला सांगू लागलं, 
''त्याला जर कळलं की क्लबमधे इतक्या गंभीर परिस्थितीत, लोकांसमोर त्याला किस करून, 'I LOVE YOU ' म्हणणारी बावळट मुलगी तूच आहेस तर कदाचित तो जाणून बुजून तुझ्याशी अंतर ठेऊन राहणार. तुझ्यात गुंतून त्याचं मिशन दुर्लक्षित होऊ नये म्हणून तूझ्याकडे दुर्लक्ष करणार, होऊ शकतं भांडणारही. तेव्हा जे जसं सुरु आहे तसंच राहू दे. आततायीपणा करू नकोस. कमीत कमी यामुळे त्याला तुझं हे शांत सोज्वळ रुप तरी अनुभवता येईल आणि नवीन नवरी म्हणून तो तुझ्याशी चांगलं वागायचा प्रयत्नही करेल. नाहीतरी आतापर्यंत तर तु त्याला उचापती करतांनाच दिसलीस. ज्या कोणत्याच नवऱ्याला आपल्या बायकोत नको असतात. पण हे घुंघट तर फक्त उद्या दुपारी गृह प्रवेश पर्यंतच घ्यायचं आहे. नंतर तर त्याला कळेलच की मी तीच आहे." अंजलीचं डोकं ठणकायला लागलं. तिने तिच्याच डोक्यावर थापड मारली. 

तिच्या शेजारी बसलेल्या अजयला हे जरा विचित्र वाटलं.

"तुम्ही ठीक आहात ना?" त्यानं अंजलीला विचारलं.

"हो हो, मी अगदी ठीक आहे." अंजली भानावर येऊन म्हणाली, "डोकं जरा ठणठण करतंय बस."

"हो का? सांगायचं तसं. औषध आहे आपल्याकडे. दिवसभरच्या वेगवेगळ्या विधी आणि कार्यक्रमाने होतं असं." अजय तिला म्हणाला.

"आवाज तर अगदी तसाच आहे याचा. पण असे तर किती लोकांचे आवाज सारखेच असतात. बापरे किती विचार करतेय मी. आधी हा तोच आहे का हे तर कन्फर्म होऊ दे. नंतर बाकीचं बघु. कारण फोटो तर दिला होता बाबांनी माझा मेजर आजोबाला. मग हा तो असेल तर याने मला ओळखलं का नाही? की यानेही माझ्या सारखंच केलं. मी फोटो माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो न बघता चुलीत फेकायला नको होतं."  तिच्या विचारात गुंग तिने परत डोक्यावर जोरात थापड मारली. तोपर्यंत अजयने हेमंतला गाडीत ठेवलेला सेफ्टी बॉक्स मागितला. त्यातून गोळी काढून अंजलीला देऊ केली. त्याला वाटलं अंजलीला जास्तच त्रास होतोय. 

"तु ही गोळी घे मग मी समोर बसतो आणि मीराला मागे पाठवतो तुझं डोकं दाबून देईल ती." अजय तिला म्हणाला.

"नको मी ठीक आहे. पहिल्यांदा घर सोडून जातेय, तेही नेहमीसाठी आणि सर्व रडत होते. मी त्यांना असं कधी बघितलं नाही. त्यामुळे जरा त्रास होतोय." अंजली त्याला टाळायचा प्रयत्न करू लागली. तो मीरा म्हणाली, 

"दाजी मला वाटतं अंजुला त्या पदराचा त्रास होतोय. एक तर आपण गाडीत आणि हा असा पूर्ण तोंड झाकून घेतलेला पदर. तुमची हरकत नसेल तर...."

"काय?" अंजली दचकून बोलली, "नाही नाही अजिबात पदर काढणार नाही. मीरा अगं आत्याबाईंनी सांगितलं उद्या सकाळी पूजा होईल तेव्हाच रीती रिवाजाने घुंघट काढायचं."

"अंजु तु कधी पासून रीती रिवाज पाळायला लागली. तूच तर म्हणतेस जे रीती रिवाज आपल्याला त्रासदायक असतात त्यांना न पाळल्याने जर कोणाचं नुकसान होत नसेल तर नाही पाळले तरी चालतं." मीरा तिला म्हणाली. 

अंजलीला समजत नव्हतं की मीराला कसं समजावून सांगावं की तिला आताच अजयला चेहरा नाही दाखवायचा. आज तिची मैत्रीणच तिचं पितळ उघडं पाडेल की काय अशी भीती तिला वाटु लागली.

"मीरा तेव्हा लग्न व्हायचं होतं माझं. पण आता मी विवाहित आहे. मला सासरी माझ्या माहेरचा मान जपायला हवं."

"अंजली मला वाटतं तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही वर करायला हरकत नाही तो पदर." हेमंत म्हणाला, "तसंही आपण चौघच आहोत. अजयला तर आवडेलच तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला आणि मीरा तुमची मैत्रीण आहे. अन मी कोणाला काहीच सांगणार नाही."

"हेमंत जास्त बोलतोय तु आजकाल. थांब मुंबईला जाताच आत्याचे कान भरतो आणि तुलाही लग्नाची बेडी ठोकतो." अजय हेमंतला म्हणाला. मग अंजलीकडे वळून तिला बोलला, "अशी कोणतीच परंपरा पाळायला मलाही आवडत नाही ज्यानं स्वतःला त्रास होईल. तेव्हा तुम्ही निसंकोच तोंडावरून पदर बाजूला करून मोकळा श्वास घेऊ शकता."

"या लोकांचं काय करू मी. मला लवकरात लवकर अजयचा चेहरा बघावा लागेल आणि त्यानुसार स्ट्रॅटेजी बनवावी लागेल." अंजली स्वतःशीच पुटपुटली.

"काही बोलल्या का तुम्ही?" अजयने विचारलं. 

"हो, मी म्हणत होती की गोळी घेतल्यावर बरं वाटतंय मला आणि झोपही येतेय. मी झोपते आता." अंजलीने मागे डोकं टेकून लगेच डोळे मिटून घेतले.

मीरा मात्र समजून चुकली की काहीतरी घोळ नक्कीच आहे. नाहीतर अंजलीचं असं वागणं अगदीच अशक्य. मुंबईला पोहोचल्यावर योग्य वेळ पाहून बोलावं लागेल तिच्याशी.

 रात्री 09 - 10 च्या दरम्यान ते मुंबईला एअरपोर्ट हॉटेलमधे पोहोचले. अंजली, मीरा, तनु, आत्या आणि मामी साठी एका मोठया सूटमधे बेड लावण्यात आले होते. वॉशरूममधे मीराने अंजलीला गाठलं.

"अंजु मी बघतेय जेव्हापासून तू दाजींच्या हातावर तो व्रण बघितला तु खूप विचित्र वागतेय. अगं पोलीस आहेत ते. तु इतकी चिंता नको करुस."

"मीरा आता मी तुला कसं सांगू?  गोष्ट ती नाही आहे."

"मग काय आहे ते तर सांग."

"मीरा, अंजली चला या लवकर झोपा. सकाळी आठचं विमान आहे. पाचला उठून अंघोळ वगैरे उरकून जायचं आहे दिल्लीला." आत्याने आवाज दिला.

"हो ना, अगं तिथं दिल्लीत गेल्यावर बोला किती बोलायचं. सोबतच राहणार आहे तुम्ही." मामी बोलली.

"हो हो, आलोच आत्या. जरा माझ्या केसांचा गुंता काढून देतेय मीरा." अंजलीने त्यांना सांगितलं. मग ती मीराला म्हणाली, "काहीतरी आहे. तुला खरंच सांगेल आधी सर्वांना झोपू दे."

"नक्की?"

"नक्की !"

दोघीही झोपायला गेल्या. रात्री बारा एक च्या दरम्यान सर्व झोपलेत याची खात्री होताच अंजली उठून बसली झाली. तिला बसलेलं बघताच मीराही उठली. 

"तु झोपली नाहीस?" अंजलीने मीराला विचारलं. 

"नाही आणि तु?"

"मी पन नाही. यांच्या झोपायची वाट बघत होती."

"का?"

"तुला कथा पुराण सांगायचं आहे ना?"

"अरे हो ! सांग मग आता."

"गॅलरीत चल. इथे आपल्या आवाजाने उठल्या तर परत झोपावं लागेल."

"होहो !"

दोघीही गॅलरीत जाऊन बसल्या. अंजलीने मुंबईला घडलेलं सगळं मीराला सांगितलं. 

"काय? बापरे ! हा तर मोठ्ठा घोळ झाला. म्हणून तु  तोंडावरून पदर काढत नव्हतीस."

"हुम्म्म्म !''

"तो फोटो न बघता फाडायला नको होतं तु. कमीत कमी इतकी भानगड झाली नसती."

"मीरा प्लीज मला त्याची आठवण नको देऊ आता."

"पण मग उद्या ते हिंदी लोकांची ती परंपरा सून मुख काय ती तनु म्हणाली होती... "

"मुह दिखाई !"

"हा तेच ते होईल तेव्हा हा तोंडावरचा पदर काढला जाईल. मग काय करशील तु?"

"तेव्हापर्यंत घरातील फोटो वगैरे वरून मला कन्फर्म होऊन जाईल हा ASP अजयच माझा गुप्तहेर आहे का म्हणून."

"आणि हेच तुझे गुप्तहेर  असतील तर?"

"तर मला तुझी मदत लागेल."

"माझं अहोभाग्य की मी तुला मदत करू शकेल. तु फक्त सांग काय करायचं ते?"

"जास्त ताशेरे नको ओढू. फक्त मी जे बोलेल त्याला हो ला हो लावायचं."

"अगं पण काय बोलणार ते तर सांग. म्हणजे मी उजळणी करून ठेवते कारण तुझ्या मिस्टर गुप्तहेरचं जे तु वर्णन सांगितलं ना अगदी तसेच आहेत दाजी.

"हुम्म्म्म, ठीक आहे. बघ अजयच्या तळ हातावर जखमेचा व्रण पाहून मी जागीच थबकली हे सर्वांनीच बघितलं आहे. तेव्हा मी सर्वांना हेच सांगणार की अजयची मला खूप काळजी वाटत आहे म्हणून मी सव्वा महिना उमा महादेवचं आपल्या गावात करतात ते व्रत करणार आहे. या व्रत नुसार सव्वा महिना आम्ही नवरा बायको एकमेकांचा चेहरा बघता कामा नये."

"छान शक्कल आहे ही. पण सव्वा महिना झाल्यावर काय?"

"ते नंतरच बघु. तेव्हापर्यंत काही ना काही मार्ग निघेलच."

"हो !" मीराच्या डोक्यात शंका आली, "अगं पण हे तेच असतील तर त्यांनी तुझा स्पर्श किंवा आवाज का नाही ओळखला?"

"त्याच्या डोक्यात सदैव त्याचं मिशन, पोलिसी रुतब्याची जबाबदारी असतं गं म्हणून त्यानं इतकं नोटीस नसेल केलं. किंवा ओळखला असेल पण त्यालाही चेहरा पाहून कन्फर्म करायचं असेल माझ्यासारखं."

"बापरे मला तर वाटतेय मी एखादी रहस्य कथाच वाचतेय."

"मी तर जगतेय. चल झोपू आता."

"हो हो, आता माझ्या डोक्यातले किडे जरा शांत झालेत. परत वळवळ करायच्या आधी झोपलेलं बरं ."

सकाळी अकराला मंडळी नव वधू सह दिल्लीला अजयच्या घरी गेलं. अजयची आई, प्रभा आरतीचं ताट घेऊन त्यांची वाटच बघत दारात उभी होती. नवीन जोडप्याचं स्वागत करण्यात आलं. त्यांच्यावरून भाकर तुकडा ओवाळून प्रभाने  अंजलीला माप ओलांडून घरात यायला सांगितलं. अलता असलेल्या ताटात पाय ठेऊन लक्ष्मीची पावलं उमटवत अंजली घरात गेली. आजूबाजूच्या आणि नातेवाईक बायका अंजलीला बघायला आलेल्या होत्या. 

आत्या आणि मामी घाई करू लागल्या. तनु आणि मीराने पटपट अंजलीला तयार केलं. तिला इकडे तिकडे, कुठेच काही बघायला वेळ मिळाला नाही. संजय आणि हेमंत, अजयला बळजबरीने हॉलच्या दारात चोरून अंजलीला  बघायला घेऊन आलेत हे मीराने बघितलं. प्रभाने अंजलीच्या तोंडावरून पदर बाजूला केला. 

क्रमश :

धन्यवाद !

तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी. 

फोटो साभार गुगल, Pinterest वरून 

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Archana Wasatkar

HR assistant

An optimistic person. Like to express myself through writing stories, articles & poems. Thank you