Oct 24, 2021
कथामालिका

वधू संहिता भाग 1

Read Later
वधू संहिता भाग 1

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

वधू संहिता भाग 1


प्रस्तावना : आपली ही गोष्ट आहे एका भोळ्या भाबड्या, चूळबुळ्या, थोडीशी खोडकर, थोडी हुशार, थोडीशी खुळी आणि मेणाच्या बाहुली सारख्या नाजूक, सुंदर सतरा वर्षाच्या मुलीची, अंजलीची. जी तिच्या बाबांची (सोलापूरच्या सोलापुरि चादरींचे मोठे व्यापारी गुणवंत पाटील यांची ) परी आहे. जी अकरावीत गणित शिकत आहे आणि जी स्वतःला झाँसीची राणी लक्ष्मी बाई यांची स्वयं घोषित शिष्या म्हणते.

अंजलीला तिच्या वयाच्या मुलींसारखं लग्न, नटणं थटणं कशातच रस नाही. लग्न म्हणजे केवळ आयुष्याची वाट लावणं आणि पारतंत्र्य पत्करून जगणं असं तिला वाटतं. तिला तिच्या बाबांच्या व्यवसायात हातभार लावायला आवडतं. ती लहानपणापासूनच श्री गुणवंत पाटीलांना हिशोब करायला मदत करते. अंजलीला रोमांचक, हेरगिरी आणि थरारक कादंबरी वाचायला खूप आवडतं तसेच स्वतःही एक अशीच जासूसी कादंबरी लिहायची इच्छा आहे. कुठे काही संशयीत आढळून आलं तर ती स्वतः कधी कधी हेरगिरी सुद्धा करते. पाटील जेव्हाही व्यापारा निमित्त मुंबई सुरत जायचे अंजलीची वाचनाची आवड लक्षात घेऊन न चुकता तिला वाचायला चरित्र वर्णन, कादंबरी आणि कथा संग्रह घेऊन यायचे. राणी लक्ष्मी बाई, शिवाजी महाराज, संत तुकाराम यांची चरित्र तिला परत परत वाचायला आवडायची. ज्ञानेश्वरी तिला मुखपाठ करायची होती. पण तिच्या चंचल स्वभावापायी ते काही झालं नाही.

अंजलीची आई तिला जन्म देताच देवा घरी गेली. तर सावत्र आई सीमाला अंजली अजिबात भाव देत नाही. सीमालाही अंजली सोबत कसं वागावं काही कळत नाही. म्हणून ती कधीच अंजलीच्या वाटी जात नाही. त्या दोघीही फक्त गुणवंत राव मुळे सोबत आहेत. पण अंजलीचा तिच्या लहान, सावत्र भावावर, मंदारवर खूप जीव आहे.

तर अशा आपल्या अंजलीला एक दिवस कळतं की तिचं लग्न लहानपणीच जुळलं आहे आणि कथानकाला एक नवीन वळण मिळतं.


काळ : 1980 चा, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा व्हाट्सअपचं दूर दूर पर्यंत नामो निशान नव्हतं. मोबाईलचा उगम होण्यासाठी कुठेतरी जगाच्या कोपऱ्यात प्रयत्न सुरु होते. टेलिफोन फक्त काही मोठया लोकांच्या घरी आणि सरकारी कार्यालयात होता आणि  खूपच गरज असेल तेव्हा वापरला जाई.

या कादंबरीतुन आपण काही सामाजिक मुद्द्यांवरही प्रकाश टाकू. तसेच योग्य असा संदेश देण्याचा प्रयत्न होईल. 

आशा आहे की तुम्हाला ही कथा कादंबरी नक्कीच आवडेल. ही कादंबरी लिहितांना आणि पात्र रंगवतांना जितकी मी एंजॉय करतेय, मला मज्जा येतेय, तितकी मज्जा तुम्हालाही वाचतांना येईल.

.........................................

वधू संहिता भाग पहिला 

स्थळ : मातोश्री घरकुल, अक्कलकोट, सोलापूर

डिसेंबर महिना. सकाळची वेळ. सूर्य हळू हळू वर येत होता. चिमण्यांची चिव चिव सुरु होती. कुठे आया बाया शेणामातीनं चूल सारवत होत्या. तर काही घरातून निखाऱ्यावर टाकलेल्या गरम गरम भाकरीचा सुगंध भूक चाळवत होता. पोरी अंगणात सडा शिंपडून त्यावर रांगोळी टाकण्याच्या तयारीत होत्या. शेतकरी रातची उरलेली भाकरी न्याहरी करून, बैल गाडीला जुंपून शेताच्या वाटेला लागले होते.

कपाळावर आणि गालावर चंदन टिळा, अंगावर पांढरा शुभ्र कुर्ता आणि धोतर चढवून, गळ्यात केशरी शेला त्यावर रुद्राक्ष माळ, डोक्यात मोरपीसांची टोपी, खांद्याला झोळी आणि हातात झांझ वाजवत वासुदेव दारोदारी अभंग, भजन गात भिक्षा घ्यायला फिरत होते. मंदिरात स्वामींच्या नावाचा गजर सुरु होता. मनाला प्रसन्न करणारी अक्कलकोट गावाची सकाळ आणि तिकडे स्वामींच्या दर्शनाला आलेल्या भाविकांचं मनोभावे आदरातिथ्य करणारं श्री गुणवंत पाटीलांचं घर !

मीरा, अंजलीच्या घरी घरकाम करणाऱ्या विजाबाईची मुलगी पण अंजलीसाठी अगदी जवळची मैत्रीण, सडा टाकलेल्या अंगणात रांगोळी टाकत होती तोच मेहंदी रंगाचं आणि खन कापडचं परकर पोलकं घातलेली, कमरे खाली लांब असणाऱ्या केसांची दोन वेण्या टाकलेली, गोरी गोमटी, तिखट, पाणीदार डोळ्यांची अंजली तिथं आली. मीराचा हात पकडून तिला घराच्या मागच्या बाजूला घेऊन गेली.

"अंजु अगं काय झालं? रांगोळी काढू दे मला पूर्ण."

"नंतर, आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे." अंजलीने गुणवंत पाटीलची लाकडी छर्र्याची बंदूक फुक मारून स्वच्छ करत मीराला विचारलं,
"लग्न काय आहे?"

"आयुष्याची बरबादी." मीरा मान खाली घालून, रांगोळीचा हात परकराला पुसत उत्तरली.

"लग्न करणे म्हणजे काय ?"

"स्वतःच्या पायात न दिसणारी, अदृश्य अशी बेडी घालून घेणं."

"म्हणजे स्वतःला पारतंत्र्यात टाकणं, असं म्हण सरळ."

"हा तेच."

"इतकं माहित आहे तरी होकार दिलास लग्नाला ! अजुन तर काहीच नाही शिकवलं मी तुला. तु माझी प्रथम शिष्या आणि तूच अशी मान खाली टाकून लग्न करणार तर भविष्यात माझ्या भावी शिष्यांना काय सांगणार मी तुझ्याबद्दल?"
अंजली तिच्याकडे एक पेरू फेकून म्हणाली, "डोक्यावर ठेव."

"काय?" मीराच्या तोंडून आश्चर्यानं निघालं.

"तू माझा सल्ला न घेता लग्नाला हो म्हटलं म्हणून तुला शिक्षा."

"अंजु माफ कर ना गं. आई आजोबा पुढे माझं काहीच चाललं नाही बघ. आई तर म्हणत होती की तिचं लग्न ती चौदाची असतांनाच झालं. माझं तरी तुझे बाबा म्हटले म्हणून कायद्याने अठराची झाल्यावर करताहेत. आणि आई तर म्हणाली की लग्नात मला नवीन कापडं घालायला मिळतील. माझा नवरदेव माझ्यासाठी भरजरी पातळ, तोरड्या, बिचवे, डोरले, मंगळसूत्र, हातभर बांगडया आणि नथ आणणार. सगळी मेंदी लावतील हातावर, बायका गाणी म्हणतील, जागरण होईल, फुगडी खेळतील, आपण दोघी मस्त पिंगा घालू. गोड धोड पदार्थ बनतील. शिरा पुरीची पंगत बसेल. लय मज्जा येईल बघ."

"झालं तुझं? ही मोठी माणसं नुसती मुलींना घरातून बाहेर काढायच्या मागे लागली असतात. पण तुला त्यांच्या जाळ्यात अडकून चालणार नाही कारण तु माझी प्रथम शिष्या आहेस आणि मी झाँसीची राणी लक्ष्मी बाईची शिष्या आहे."

अंजलीने मीराने डोक्यावर ठेवलेल्या पेरूवर निशाना लावला. ती बंदुकीतून छर्रा सोडणार तोच तिच्या कानावर आजीची हाक पडली.

"अगं ए झाँसीच्या राणीची शिष्या, कुठे आहेस तु?"

"ही इथेच आहे मी आजी." हातातली बंदूक बाजूला झुडपात फेकून अंजली बोलली, "या मीराला सूर्य नमस्कार करायला शिकवत होती. सकाळी स्वामींचे नाव जपत सूर्य नमस्कार करणं किती छान असतं ना. तुही नाम जप कर आमच्या सोबत. तेवढीच घरात शांतता." शेवटचे शब्द बोलताच अंजलीने जीभ चावली.

"काय? " आजी भडकली, "मला चांगलं ठाऊक आहे तु काय शिकवत होतीस मीराला. ए मीरा या अंजुच्या नादी अजिबात नाही लागायचं आणि हिने बोललेलं मनावर घ्यायचं नाही. हिचा बाप, माझे जावई बापू व्यापारी हाईत. त्यांनी डोक्यावर चढवली हिला. तोंड भरून हुंडा देईन पोराले नाहीतं घर जावई शोधणार ते हिच्यासाठी. मग काय सासरची मंडळी नखरे झेलणारच हिचे."

"आजी मी लग्नच नाही करणार आहे मुळी."

"असं म्हणणाऱ्या पोरीच लग्न झाल्यावर माय बापाला विसरतात सासरच्या सुखात."

"असं कधीच होणार नाही."

"होणार."

"नाही."

मीरा खाली बसून डोक्यावरचा पेरू खात त्या दोघी आजी नातीचं भांडण मिटायची वाट बघू लागली.

"माई, मोठया मालिकची तब्येत नाही बरी म्हणून मालकीण बाईंनी डॉक्टरला बोलावलं हाय." विजाबाई, मीराची आई आजीला सांगू लागली, "म्हटलं तुम्हाला बी सांगावं."

हे ऐकताच अंजली धावतच बाबाच्या खोलीत गेली.

"काय झालं जावईबापूला? आता तर बरे होते." आजीने विजाबाईला विचारलं. मग तिला डॉक्टर साठी चहा पाणी करायला सांगून स्वतः गुणवंत पाटीलांच्या खोलीत गेली.

अंजली सोळा पंधरा सोळा वर्षाची झाली नाही की तिच्यासाठी स्थळ सांगून येऊ लागली. पण गुणवंत पाटलांनी नम्रतेने,
"अंजली अठराची झाल्यावरच तिच्या लग्नाचा विचार केला जाईल." असं बोलून सर्व स्थळाला नकार दिला. त्यांना माहित होतं अंजली किती साधी भोळी, चंचल आणि खोडकर पण तितकीच प्रेमळ आहे म्हणूनच त्यांना होईल तितका वेळ तिला द्यायचा होता.

पण अंजलीचा सतरावा वाढदिवस होऊन चार महिने झाले असतील एका दुपारी गुणवंत पाटीलकडे पोस्ट मास्तर पत्र घेऊन आले.

पत्र दिल्लीच्या सेवानिवृत्त कर्नल वसंत दीक्षित कडून आलं होतं. नाव वाचताच पाटलांच्या मनात शंकेची पाल चूक चुकली. त्यांनी पत्र वाचायला सुरवात केली. 

"स्वामी कृपा

नमस्कार, मी सेवानिवृत्त कर्नल वसंत दिक्षित ! आशा आहे आपण सर्व कुशल मंगल आहात. पत्र लिहिण्यास कारण की, माझा मोठा नातू अजय आता लग्नाला योग्य झाला आहे. आपल्याला आठवत असेलच आठ वर्षांपूर्वी मी स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आलो असतांना आपल्या इथेच निवासी होतो. माझं आणि आपल्या वडिलांचं छान जमलं. तेव्हा मी माझ्या नातवासाठी आपल्या मुलीचा, अंजलीचा हात मागितला होता आणि आपल्या वडिलांनीही होकारही दिला होता. आपले वडील देवा घरी गेले तेव्हा मी आजारी होतो म्हणून येणे झाले नाही. आता माझी तब्बेत बऱ्यापैकी सुधारली आहे. आपले वडील या जगात नाहीत. पण त्यांना दिलेलं वचन मोडून चालणार नाही. मी चुकलो नसेल तर अंजलीही सतरा वर्षाची पूर्ण झाली असं मला वाटतं. म्हणून मी आपल्या नात सुनेला पाहायला आणि लग्नाची बोलणी करायला येत्या रविवारी म्हणजे दहा डिसेंबरला  अक्कलकोटला येत आहे. आशा आहे आपल्याला काही हरकत नसेल. 
धन्यवाद !"

पाटलांनी कालनिर्णय बघितलं. दहा डिसेंबर तर उद्याच आहे. इतक्या कमी वेळात अंजलीला काय सांगावं आणि कसं समजवावं? कर्नलला नाही म्हटलं तर वडिलांच वचन तुटेल, त्यांचा अपमान होईल. त्यात नका येऊ म्हणून तार करावी तर आता पर्यंत कर्नल दिल्ली वरून रवाना झाले असतील यात काही शंकाच नाही. खरं तर वडील गेल्यावर कर्नलचा काहीच अता पता किंवा संपर्क नसल्याने पाटलांना वाटलं होतं की वडिलांसोबतच ते लग्नाचं  वचनही गेलं. म्हणून ते निर्धास्त होते आणि त्यांनी कधीच याबद्दल अंजलीला सांगितलं नाही. पण आता हे असं सर्व एकाएकी समोर आलं. ज्याचा प्रचंड ताण त्यांना आला. रात्रभर या कुशीवर होत होते. सीमाने विचारलं काय बिनसलं तर तिलाही त्यांनी काहीच सांगितलं नाही. पण तिलाही शंका आली की अंजली बाबतच काहीतरी झालं आहे.

पहाटे पहाटे पाटलांच्या छातीत दुखायला लागलं तसं सीमाने मंदारला डॉक्टर साहेबांना घेऊन यायला पाठवलं. 

"पाटलांनी  खूप ताण घेतलेला दिसतोय. मी विचारलं. पण मला काही सांगायला तयार नाहीत. तुम्ही विचारा त्यांना. आणि काळजी घ्या. असं छातीत दुखणं बरं नाही. अजुन काही फार वय नाही झालं त्यांचं. मी इंजेकशन दिलं. तीन चार तास आरामात झोपतील ते." डॉक्टर सीमाला म्हणाले. 

"हो !" सीमाने होकारार्थी मान हलवली. ती पाटलांच्या जवळ त्यांना न्याहाळत बसली. तिच्या नजरेला त्यांच्या उशी खालून अर्ध बाहेर आलेलं एक पत्र पडलं. तिची शंका बरोबर होती. मुद्दा अंजलीशीच निगडित होता ज्यात ती काहीच करू शकणार नव्हती. तिला हस्तक्षेप करायची परवानगीच नव्हती.

"काय झालं बाबाला? आणि तुझ्या हातात काय आहे?" अंजलीने सीमाला विचारलं. पण सीमा काही बोलणार त्या आधीच तिच्या हातातलं पत्र घेऊन वाचायला लागली. वाचतांना अंजलीचे हाव भाव सांगतच होते की तिला किती राग आला आहे ते.

"हे असं कसं कोणी माझं लग्न ठरवू शकतं?" अंजली सीमाला बोलली.

"दुसरं तिसरं कोणी नाही तुझे आजोबा होते ते." सीमा तोंडावर बोट ठेऊन शांत राहायचा इशारा करून दबक्या आवाजात अंजलीला म्हणाली.

"असो पण मला मान्य नाही." ते पत्र चोळा मोळा करून, जमिनीवर फेकून, त्यावर पाय मारून अंजली बोलली आणि धावत खोलीतून निघून गेली.

सीमाला माहित होतं तिला थांबवून उपयोग नाही. आजी किंवा पाटीलच समजावतील तिला. म्हणून सीमा चुपचाप पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयारी करू लागली. 

क्रमश :

धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Archana Wasatkar

HR assistant

An optimistic person. Like to express myself through writing stories, articles & poems. Thank you