Sep 25, 2021
कथामालिका

वधू संहिता भाग 19 #मराठीकादंबरी

Read Later
वधू संहिता भाग 19 #मराठीकादंबरी
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अंजलीच्या लग्नाची तारीख दहा मार्च पक्की झाली. त्या आधी विस फेब्रुवारीला मीराचं लग्न होतं. अंजलीने स्वतः नवरीला सजवलं. नवरदेव वरात घेऊन आला.  ठरलेली लग्न घटका जवळ आली आणि कोणीतरी ओरडत आलं, 

"नवरदेव गेला, नवरदेव गेला."

झालं असं की फटाक्याच्या आवाजाने की काय घोडा अचानक बिथरला आणि जोरात उडया मारू लागला. अशातच नवरदेव मुलगा घोड्यावरून खाली पडला तो सरळ दगडावर त्याचं डोकं आपटलं अन जागीच त्याचा मृत्यू झाला. 

लग्न मंडपात एकच चर्चा सुरु झाली, 

"मुलीचा पायगुण, अजून काय?"
"कुलक्षणी हाय पोरगी."
"खाल्लं पोराले मांडवातच."
"पांढऱ्या पायाची हाय."
"काय माय हळदीतच गेला नवरदेव, मुंजा होऊन भटकीन आता."
"या पोरीला गावात नाही ठेवाची आता."

अंजली काहीतरी बोलायला पुढे सरसावली पण आजीने तिचा हात दाबला आणि शांत राहायचा इशारा केला.
"जा तु मीराला बघ."

आत मीरा, तिची आई रडून रडून बेजार झालेली. दहा बारा  दिवस गेले. गुणवंत पाटीलला नाईलाजाने अंजलीच्या लग्नाच्या तयारीला लागावं लागलं. त्यांच्यासाठी अंजली सारखीच मीरा. त्यांनी काही दिवस मीरा आणि तिच्या आईला दोघींना घरातच राहायला सांगितलं. नजरेस पडताच उगाच लोकं तोच विषय काढायचे. त्यात अंजलीचं लग्न पुढे ढकलणं त्यांच्या हातात नव्हतं. मेजर वसंतची तार आली. अंजलीच्या साड्या आणि दाग दागिने घेऊन अजयचे मामा अक्कलकोट साठी निघाले होते.

मेहंदी, हळद, संगीत कशातच अंजलीची जिवलग सखी तिच्या सोबत नव्हती. का तर ही मंडपात बसून वाट बघत असतांना तिचा होणारा नवरा घोड्यावरून पडून देवाला प्रिय झाला. अंजलीला अवती भवती इतकी लोकं असूनही सगळं सुनं सुनं वाटु लागलं. 

"आजी, बाबा ऐका ना, झालं ते झालं प्लीज मीराला हळद लावू द्या ना मला आणि मेहंदी कोण काढेल तिच्या शिवाय माझ्या हातावर? येऊ द्या ना तिला सर्व कार्यक्रमात." अंजलीने रडून रडून डोळे सुजवले.

"अंजली मीरा आमच्या साठी कोनी गैर नाही. पण काही संकेत पाळावे लागतात. विधवा बाईला सर्व शुभ कार्यात प्रवेश निषेध असतो." आजी बोलली. 

"मीरा विधवा नाही. लग्न लागायच्या आधीच नवरदेव गेला मग ती विधवा कशी?"

"त्याच्या नावाची हळद तर लागली होती ना तिला. झाली मग विधवा ती. तेव्हा ती तूझ्या लग्नाच्या कोणत्याही विधीत सहभागी होणार नाही. समजलं !" आजीनं खडसावून सांगितलं. 

"बाबा तुम्हालाही असंच वाटतं. तुम्ही मानता हे सर्व?"

"अंजु माझ्या मानून किंवा न मानून काय होणार आहे? पण मी कोल्हापूरला विधवा आश्रमात सांगून मीरा साठी चांगलं स्थळ शोधून स्वतः तिचं लग्न लावून देईल. हे वचन देतो तुला."

"तेव्हापर्यंत ती अशीच घुसमटत राहणार का घरात? एक सीमा आई नशीबवान म्हणून त्यांना तुमच्या सारखा समजदार नवरा मिळाला. मीराला नाही मिळाला तर?"

पाटील काहीच उत्तरले नाही. अंजलीचं मन कोणत्याच विधीत, कार्यक्रमात कशातच लागत नव्हतं. मशिनी सारखी आई, आजी, मोठी मंडळी सांगतील तसं ती करत होती. एक तर आधी अजयच्या त्या पत्राने तिचं हृदय पिळवटून निघालं होतं. त्यातून सावरत नाही तो मीराचं हे असं झालं. तिची दशा अंजलीला पाहवत नव्हती.

अंजली सर्व झोपले की मंदारला हाताशी घेऊन चोरून लपून मीराला गोड धोड खाऊ घालायची. लग्नाच्या आधल्या रात्री मीरा अंजलीच्या कुशीत डोकं ठेऊन ढसा ढसा रडली.

"अंजु ताई हे काय झालं?"

"हो ना मीरा, तुला तर नवीन भरजरी शालू, दाग दागिने मिळणार होते ना गं. मग ते सारं घालून तु माझ्या लग्नात नववधू म्हणून मिरवणार होती."

"हो ना, पण देवाला आपलं सुख पाहावलं नाही अंजु. मला खूप भीती वाटते. तु इथून गेल्यावर गावातील लोकं शिव्या देऊन, टोचून बोलून मारतील मला."

"मी बाबा सोबत बोलली. ते लवकरच चांगला मुलगा बघून तुझं लग्न लावतील म्हणाले."

"नाही अंजु, मला परत नाही चढवायचा तो नवरीचा साज. मला फक्त शांतता हवी आहे अंजु. मला फक्त आपलं जुनं आयुष्य हवं आहे. मला भूतकाळात जायचं आहे. मला आपलं उनाड, बिनधास्त माळरानात फिरायचं आहे, आंब्याच्या झाडाला दोर बांधून उंच झोका घ्यायचा आहे."

लग्नाचा दिवस उगवला. सकाळी अकरा वाजताची लग्न घटका भरत आली. भटजींनी नवरदेव नवरीला मंडपात आणायला सांगितलं.

"मी मेजर वसंत सोबत बोलल्या शिवाय मंडपात येणार नाही." अंजली गुणवंत पाटीलला म्हणाली. 

"अंजली काय हे नाटक. लग्न लागल्यावर हवं तितकं बोल त्यांच्याशी. आता मंडपात चल गपचूप." आजीनं हुकूम सोडला. 

"हो अंजु, तुझं असं वागणं बरं नाही दिसत." मामा समजावून म्हणाले. 

पाटील तेव्हापर्यंत मेजर वसंतला घेऊनही आले.
"बोला सुनबाई काय म्हणता? आमच्या कडून काही चुकलं का की काही कपडालत्ता दाग दागिने आपल्याला आवडलं नाही?"

"तसं काहीच नाही आजोबा." अंजली नम्रपने त्यांना म्हणाली, "एक विनंती करायची आहे."

"बोला."

"माझी सखी मीरा. तिच्या विषयी तुम्हाला माहितच असेल."

"हो गुणी पोर आहे ती. वाईट घडलं तिच्या बाबतीत."

" गावात प्रथांच्या जाळ्यात अडकून प्राण गमवेल ती अशी भीती आहे मला म्हणून तिला माझ्या सोबत दिल्लीला आणायची परवानगी हवी आहे आपल्या कडून.''

"दिली. आणखी काही."

"बस इतकंच ! धन्यवाद !" अंजली मेजरच्या पायी डोकं टेकवून म्हणाली, "मी सदैव आपली आभारी राहणार."

"सदा सुखी भव:" मेजर आशीर्वाद देऊन मंडपात परत गेले. मागोमाग अंजलीचा अर्धा चेहरा झाकेल एवढा पदर तिच्या डोकयावर देऊन, बाशिंग बांधलेल्या तिला  घेऊन सीमा, तिचे  मामा, पाटील सारं मंडळ गेलं. मेजर वसंत दिक्षितचे मुळ जरी मुंबई असले तरी त्यांना समज आली तेव्हापासून त्यांचं आयुष्य दिल्लीतच गेलेलं. मुलांवरही तिथलेच संस्कार. म्हणून त्यांच्या मुलीने म्हणजे अजयच्या आत्याने अंजलीने दिल्लीला घरी जाईपर्यंत चेहरा झाकून ठेवायला सांगितलं. अंजलीनेही काही म्हटलं नाही. तसंही तिला अजयला म्हणजेच नवरदेवाला चेहरा दाखवायची किंवा त्याचा चेहरा पाहायची काही घाई नव्हती.

तिचं सर्व लक्ष मीरात होतं. तिला सोबत नेल्यावर पुढे तिला काय शिकवायचं? तिच्या पायावर उभं करायचं, अर्थार्जण करायला प्रोत्साहन द्यायचे आणि मग तिला कोणी आवडलं किंवा तिची इच्छा झाली तर बोहल्यावर चढवायचं. अशी सर्व आखणी तिच्या मनात सुरु होती. केव्हा मंगलाष्टकं सुरु होऊन पूर्ण झाली, अंतरपाट बाजूला होऊन हार एकमेकांच्या गळ्यात टाकले गेले. यज्ञात आहुती देऊन फेरे झाले. कशाचंच तिला भान नव्हतं. 

अजयची परिस्थितीही काही वेगळी नव्हती. तो दहा बारा वर्षाचा असतांना मिलिटरी इंजिनियर असलेल्या त्याच्या बाबांना त्याच्या आणि त्याच्या आई समोर गोळया झाडून ठार करण्यात आलं होतं. ती केस परत काढून गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठीच तो पोलीस अधिकारी झाला. फावल्या वेळेत तो त्या केस संबंधी माहिती गोळा करत असे. त्यात त्याला इतकं कळून आलं होतं की त्याचे बाबा मरण्याआधी सीमेवर तैनात जवानांना दिल्या जाणाऱ्या रायफल आणि काडतूसच्या टेंडरवर काम करत होते. 

बॉसच्या बोलण्यातून त्याला कळलं कि त्याचा मुलगाही तितक्यातच सीमेवर नकली रायफलमुळे  दुश्मन देशाच्या शिपायांचा सामना करू शकला नाही आणि लवकरच धारातीर्थ पडला. अजयला हे लग्न समारंभ वगैरे आटोपून लवकरात लवकर मुंबईला परत ड्युटीवर जायचं होतं. 

लग्न आटोपलं. पाठवणीची वेळ झाली. अंजलीला सार करतांना सर्वांचेच डोळे भरून आले. कधी नव्हे ते पाटीलही रडू लागले. अंजली स्वतःला कसं तरी आवरून त्यांना म्हणाली, 

"आता रडता कशाला. तुम्हालाच तर मोठी घाई झाली होती मला घरातून काढून द्यायची. जातेय आता. स्वतःला जपा. मंदारला कामाचं ओझं नका देऊ आताच."
मग ती सीमाला बोलली, " सीमा आई मी जातेय तुझ्यावर हे घर आणि ही माणसं सोपवून. आळस करू नको. सांभाळ नीट यांना."

सीमाने तिला मिठी मारली, "माझं काही चुकलं असेल तर माफ कर. पण मी कधीच तुला दुःख होईल असं वागली नाही."

"माहितेय मला. मूर्ख आहेस तु. आजी रागवत नको जाऊ हिला."

"हो हो मा, चांगली राहा सासरी. नांद सुखाने. अशी बडबड नको करत जाऊ अन उलट उत्तर तर अजिबात नाही द्यायचं. समजलं!"

" हो हो माझ्या आज्जी. समजली!"

चार वाजायला आले होते. त्यांना रात्रीच्या आत मुंबईला पोहचायला पाहिजे होतं. रात्रभर मुंबईला मुक्काम करून सकाळी सकाळी ते विमानाने दिल्लीला जाणार होते.

दिल्ली वरून अक्कलकोट चांगलंच दूर असल्यामुळे लग्नाला मेजर वसंत सोबत फक्त दहाच लोकं आली होती. लग्नानंतर दिल्लीतील आप्तेष्टांसाठी खास रिसेप्शन आयोजित करण्याचं ठरलं होतं.

अंजलीला कारमधे बसन्यासाठी पुढे जाऊ लागली. पण हातातला मंदारचा हात सुटेना,

"आई बाबा आजीला भांडू नको देऊ. वयानं मोठी असली तरी बुद्धीनं लहानच आहेत ती अजून. लक्ष दे त्यांच्याकडे."

"हो ताई ! I will miss you !"

"जास्त इंग्रजी झाडू नको." अंजली हसून म्हणाली.

"हो !" तोही हसला. 

अजयने कारचे दार उघडले. पहिल्यांदा इतके दाग दागिने, भरजरी शालू आणि त्यात भर म्हणून ते घुंघट. गाडीत बसावं कसं? अंजलीला क्षणभर सुचलंच नाही. 

"अजय हात दे तिला." मेजर वसंतने अजयला सांगितलं. अजयने त्याचा हात समोर केला. तो हात बघताच अंजलीच्या छातीत धस्स झालं. 

क्रमश :

धन्यवाद !

तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी. 

फोटो साभार गुगल, Pinterest वरून 

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Archana Wasatkar

HR assistant

An optimistic person. Like to express myself through writing stories, articles & poems. Thank you