वधू संहिता 18 मराठी कादंबरी

A romantic, adventures love story of a mischievous young girl & her groom. Thank you

अंजलीला पूर्ववत हसतांना, बोलतांना पाहण्यासाठी तिच्या मैत्रिणींनी केलेली उठाठेव बघून ती समजून चुकली की तिने आनंदी राहणं हे फक्त तिच्यासाठीच नाहीतर तिच्याशी जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाचे आहे. म्हणून तिने चार चौघात असतांना आधी सारखं स्वतःला खुश मिजास दाखवायचं ठरवलं. 

कारण,
आपल्याशी जुळलेल्या व्यक्तींसाठी 
इतकं तरी करावंच आपण, 
अंतःकरनात वेदनांचा पूर वाहत असला
तरीही त्याला थांबवून ठेवावं आपण , 
भरून आलेला ऊर 
एकट्यात बसून मोकळा करावा आपण.
सारं दुःख विसरून 
ओठांवर स्मित हास्य फुलवावं आपण !

या विचारसरणीची अंजली. 
पण अजयचा विचार मनात येताच तिचं हृदय पिळवटून निघे. तिच्या मनात विचार येई, 

" आपल्यात असं काय कमी दिसलं असेल त्याला की त्यानं परत कधी भेटलो तरीही ओळखू नये बोलू नये असं म्हटलं? आपण अतिच वागलो का त्याच्या सोबत? थोडा वेळ घ्यायला हवा होता आणि थोडा वेळ द्यायला ही हवा होता? ही मोठी माणसं लेकरांची लग्न का ठरवून ठेवतात आधीच?  की मुलीची जात असून पुढाकार घेतला हे आवडलं नाही त्याला? अशा विचारसरणीचा तर वाटला नाही तो. मग का बरं असा बोलला?"

अंजलीला कितीही विचार केला तरीही हवं ते उत्तर मिळेना. 

वधू संहिताच्या या बॅचचा आता शेवटचा आठवडा. डॉक्टर सुप्रिया लैंगिक शिक्षण आणि प्रजनन प्रक्रिया चा वर्ग घेऊ लागल्या. एका मागे एक मुलींचे आवाज येऊ लागले. 

"हुम्म्म्म !"
"ऑ !!!!"
"असं असते?"
"I know it!"
"बापरे.... "
"ईईईई !!"
"डेंजर !"
"ईश्श !!!"
"काहीही !"

अंजली मात्र स्वतःशीच खदखद हसू लागली. 

"अंजली स्टॅन्डअप " डॉक्टर सुप्रियाने तिला उभं व्हायला सांगून विचारलं, "हसायचं काही विशेष कारण? मिमिक्री सुरु आहे का?"

"नाही तसं नाही मॅडम. माझा एक गैरसमज होता तो आज दूर झाला. म्हणून मला माझ्या मूर्ख पणावर खूपच हसू येतंय." अंजली कसंबसं हसू आवरून बोलली. 

"अच्छा, मग आम्हालाही कळू दे. आम्ही हसू जरा." मॅडम म्हणाल्या. 

"इतकं काही खास नाही मॅडम. राहू द्या !" अंजली 

"तु इतकं हसली म्हणजे खास असेलच. चल सांग पाहू."

"मॅडम प्लीज, वाटलंच तर मी क्षमा मांगते, पूर्ण वर्गाला आणि तुम्हाला डिस्टर्ब् केलं म्हणून."

"अंजली सांग म्हटलं ना."

"ओके सांगते, ते ते, मला वाटत होतं की बाळ पोटातून बाहेर आपण शी करतो तिथून येतं." अंजलीनं डोळे मिटून एका श्वासात सांगून टाकलं आणि वर्गात एकच हशा पिकला.

"बरं झालं अंजलीच्या बाबांनी हिला इथे वधू संहिता मधे पाठवलं.  नाहीतर हिच्या सासूबाईनी दिवसातून दहा वेळा हिच्या आईचा उध्दार केला असता." वर्ग झाल्यावर शारदा किंजलला म्हणाली.

"आईचं नाव नको घेऊ प्लीज." अंजली तिला म्हणाली. 

"हो गं आईचा दोष नाही. आपली ही पोरगीच अवखळ, धबधब्याचं खळखळ वाहतं पाणी." किंजल भावुक होऊन  म्हणाली, "तूझ्या बाबांनी तुला इथे पाठवून योग्यच निर्णय घेतला. नाहीतर आम्हाला इतकी गोड मैत्रीण कशी मिळाली असती."

"ए बाई अजून आठ दिवस बाकी आहेत समारोप समारंभाला. तु आजच इतकी भावुक होऊ नको." अंजली किंजलला मिठीत घेऊन म्हणाली. 

"हो आपण हे आठ दिवस खूप धमाल करू !" मेघाने त्यांना मिठी मारली. तिच्या पाठोपाठ जया आणि शारदानेही त्यांना मिठी मारली. 

आठ दिवस हवेत विरल्या प्रमाणे निघून गेले. समारोप समारंभात मिस वधू संहिता साठी स्पर्धा आयोजित करण्यात आली. सर्व मुली सुंदर असा त्यांचा पारंपरिक पोशाख घालून व्यासपीठावर आल्या. प्रत्येकीला दोन शब्द लग्न या विषयावर बोलायला सांगितलं गेलं. 

सर्व प्रथम जयाने 'वधू संहिता' मधे दाखला घेतलेला म्हणून ती बोलायला व्यासपीठावर आली. राजस्थानची म्हणून मारवाडी कथ्या रंगाची घागरा चोळी, कपाळावर बिंदी, त्याखाली गर्द लाल टिकली, नाकात बांगडीच्या आकाराची गोल नथ आणि हातात हस्ती दंताचा कोपराभर घातलेला चुडा, डोकयावर पदर, अशी जया एखाद्या महाराणी सारखी दिसत होती. तिचं हे रुप वधू संहिता च्या मुलींनीही पहिल्यांदाच बघितलेलं. तिने हात जोडून सर्वांना अभिवादन केलं. 

"आपण सर्व मान्यवरांच्या आशिर्वादाने आज आम्हा मुलींचे  प्रशिक्षण पूर्ण झाले. 

माझ्या साठी लग्न म्हणजे दोन भिन्न लिंगी, भिन्न परिवाराच्या व्यक्तींना कुटुंब सुरु करण्यासाठी मिळालेला संस्कार. हा संस्कार प्रत्येकाला नवीन आयुष्य देतो. दोन व्यक्तींचेच नाही तर दोन परिवारांना जवळ आणतो. म्हणूनच पालक योग्य असा परिवार बघूनच तिथे आपल्या हृदयाच्या तुकड्याला नांदायला पाठवतात. म्हणून आपण मुलींनीही संसार नीट करायची आणि नवीन घराला आपलं करून घेण्यासाठी प्रयत्नरत राहावं. आपल्या आई बाबांचा उध्दार होईल असं काहीच बोलू किंवा वागू नये. असं मला वाटतं. 

पण बरेचदा आम्हा मुलींना सर्व सांसारिक गोष्टींचं ज्ञान नसतं. कधी प्रेमा पोटी तर कधी संकोचापायी पालकही त्याकडे दुर्लक्ष करतात. ते सर्व ज्ञान द्यायचं काम वधू संहिता ने केलं. म्हणून मी परांजपे मॅडम व सरांची खूप खूप आभारी आहे. तसेच माझ्या पालकांनी मला इथे पाठवलं म्हणून त्यांनाही माझे खूप खूप धन्यवाद."

पूर्ण हॉलमधे टाळ्यांच्या गडगडाट झाला. 

अंजलीची ऍडमिशन सर्वात शेवटी झालेली. म्हणून तिचा  भाषणासाठी सर्वात शेवटी नंबर आला. मराठमोळी हिरवीकंच नऊवारी घातलेली, नाकात मयूर नथ, हातात हिरवा चुडा, लांब केसांचा मोठा अंबाडा बांधलेली अंजली बोलायला पुढे आली. लग्नाबद्दल महत्वाचे, चांगले वाईट सर्वच आधीच्या मुली बोलून गेल्या. 

म्हणून अंजलीने तेच सर्व परत न बोलता फक्त तिचं मत  मांडायचे ठरवले. 

"परांजपे मॅडम व सर यांचे खूप आभार मला आज इथे व्यक्त व्हायची संधी दिल्याबद्दल. तसेच सर्व पालकांना माझा नमस्कार. वधू संहिता मधे मला भरघोस आधार दिल्याबद्दल माझ्या मैत्रिणींची मी आयुष्यभर ऋणी राहणार.

आता लग्नाबद्दल बोलायचं तर कठीण वाटतंय, मन भरून येतंय की इथून गेल्यावर काहीच दिवसात माझं लग्न लावून एका अनोळखी घरात, अनोळखी व्यक्ती सोबत नांदायला पाठवून दिल्या जाईल. पण आशा आहे की माझ्या पालकांनी माझ्यासाठी घेतलेला निर्णय योग्यच निघेल. पण मी इथे उपस्थित असणाऱ्यांना विनंती करते की यापुढे मुलांची लग्न ठरवतांना त्यांची आवड निवड नक्की लक्षात घ्या, लग्ना आधी एकदा तरी त्यांना भेटून खरंच ते एकमेकांसाठी योग्य आहेत का हे बघू द्या आणि झालंच तर त्यांना त्यांच्या जीवनसाथीची निवड करू द्या.  मी तरी माझ्या मुलांना त्यांचा जीवनसाथी शोधायची मुभा नक्कीच देईल."

हॉल मधे एकच गलबला सुरु झाला. 

"काय बोलतेय ही मुलगी, हिला तरी कळतंय का?"

"पाटील पोरीवर लक्ष ठेवा." कोणीतरी गुणवंत पाटीलांना म्हणालं. पाटलांनी त्यांच्याकडे अशा नजरेने बघितलं जसं काही म्हणले, 
"माझी मुलगी मला माहितेय काय आहे ते, नसते सल्ले देऊ नये."
तो माणूस गपचूप बसला.

"असं कसं कोणाशी लग्न करतील ही कार्टी आपल्या मर्जीनी. दोन पैसे कमवायची अक्कल तरी आहे का यांना?"

"त्या सिनेमात दाखवतात तसंच करायला बघते आताची तरुण मंडळी."

"मुंबईची हवा लागलेली दिसतेय पोरीला."

"आपल्या तोंडून तर ब्र निघत नसे आपल्या मोठ्यांसमोर आणि यांना स्वतःच्या आवडीच्या मुलासोबत लग्न करायची मुभा हवी म्हणे."

श्री परांजपेनी सर्वांना शांत राहायची विनंती केली.

"मला वाटतं ही स्पर्धा आहे आणि प्रत्येक मुलीला तिचं मत मांडायला मुभा आहे तेव्हा सर्वांनी कृपा करून शांत बसावं ही विनंती. बाकी वोटिंग करतांना तिला वोट द्या ज्या मुलीचं तुम्हाला मत पटेल. आणि आपल्या विचारांना विजयी करा." सर्व शांत बसले. श्रीमती परांजपेनी अंजलीला बोलायचा इशारा केला. 

"तसं तर खूप काही बोलायचं होतं. पण त्याने हंगामाच होईल म्हणून फक्त एकच विनंती परांजपे मॅडम आणि सरांना करू इच्छिते की मुलींना प्रत्येकच अनुषंगाने आत्मनिर्भर करण्यासाठीही शिक्षण द्या. त्यांना फक्त शोभेच्या बाहुल्या बनवू नका तर वेळ पडल्यास गुंडं मवाल्यांशी दोन दोन हात करता यायला हवं म्हणून काहीतरी प्रशिक्षण समाविष्ट करा."

"या पोरीला काही लाज. ही घरच्या लक्ष्मीला मवाल्यांशी भिडायचं प्रशिक्षण द्या म्हणतेय." जायचे बाबा उभे होऊन म्हणाले. 

"का, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर किंवा राणी दुर्गावती या कोणाच्या घरच्या लक्ष्मी नव्हत्या का?" किंजलची आई उठून बोलली, "किंजलनी सांगितलं मला जुहू बिचवर अंजलीने कसं गुंडांना चोपलं होतं ते. तेव्हा तिथे ती होती म्हणून आपल्या मुली वाचल्या. यापुढे ती सोबत नसणार अशावेळी आपल्या मुलींना स्वरक्षणाचे धडे आपण द्यायला नको का?"

"अहो मग मुलींना एकटं घरातून बाहेर पडूच कशाला द्यायचं?"

"गजब माणूस हो तुम्ही? विसाव्या शतकात जातोय आपण. आपली पंतप्रधान एक स्त्री आहे आणि मुलींना एकटं बाहेर कशाला जाऊ द्यायचं म्हणता."

मिस वधू संहिता ची स्पर्धा राहली बाजूला आणि वादविवाद स्पर्धा सुरु झाली. 

"प्लीज मॅडम, सर, मी विनंती करतो की आपण शांत बसा. ही वेळ वादविवाद करायची नाही तर तुमच्या आवडत्या स्पर्धकाला वोट करायची आहे.

वोटिंग झालं. ग्रूमिंग टीचर गौरी आणि इंग्रजी संभाषण टीचर वोट मोजू लागल्या. 

 तेव्हापर्यंत श्री आणि श्रीमती परांजपे करत असलेल्या कार्याबद्दल पालकांनी त्यांचं गुणगान आणि आभार प्रदर्शन केलं.

निर्णय तोच आला जो सर्वांना अपेक्षित होता. जया मिस वधू संहिता झाली. सर्वांनी तिचं अभिनंदन केलं. ग्रुप फोटो काढण्यात आले. ताटा बाय बाय करतांना मुलींचे डोळे पाणावले.

जयाचे बाबा अंजलीवर खूप चिडलेले होते. त्यांनी जयाला तिच्याशी बोलूच दिलं नाही. अंजली तिला दुरूनच बाय केलं. जया मिस वधू संहिता जिंकूनही तिचा चेहरा स्पर्धा हरलेल्या स्पर्धका सारखा पडला. किंजललाही ते समजलं. तिने इशाऱ्यातच आपण सर्व एकमेकांना चिट्ठी लिहू असं सांगितलं.

किंजलच्या आईने फोटोग्राफरला स्पेशल अंजली आणि किंजलचे फोटो घ्यायला लावले. त्यांना अंजलीचे विचार खूपच आवडले. किंजलच्या लग्नाला नक्कीच ये असं सांगून त्याही गाडीत बसल्या. 

सर्व मुली आपापल्या पालकांच्या मागे चालत्या झाल्या. 

 गुणवंत पाटील अंजलीला घ्यायला आले होते. अंजलीत झालेला बदल बघून त्यांना खूप छान वाटलं. मंदारही बरंच इंग्रजी बोलायला शिकला. बारावीची परीक्षा झाल्यावर मुंबईला परत इंग्रजी शिकायला येईल म्हणाला. गुणवंत पाटील दोन्हीही मुलांना घेऊन अक्कलकोटला निघाले.

सलवार सूट आणि गॉगल घातलेल्या अंजलीने जेव्हा चारचाकीतुन उंच टाचेची सॅन्डल घातलेला पाय बाहेर टाकला. आजीनं तोंडावर हात ठेवला. 

"ही आपली अंजली आहे?"

"हो आजी तुझीच अंजली आहे मी." गॉगल काढून आजीला मिठी मारून अंजली म्हणाली.

"आजी आपली अंजली तर आता शहरची मड्डम झाली." मीरा अंजलीला बघून म्हणाली. अंजलीने गॉगल मीराच्या डोळयांवर लावला आणि म्हणाली, 

"तु पन आता गावाची मड्डम झाली." वेडी वाकडी तोंड करून दोघीही एकमेकींना चकवण्या दाखवू लागल्या.

"झालं परत तेच सुरु." आजीनं दोघींचे कान पकडले, "सासूच्या हातचा मार खाऊनच सुधारणार तुम्ही पोरी."

"तूझ्या हातचा मार खाऊन दगड झालोय आम्ही. सासूचा  मार आता काहीच नाही वाटणार आम्हाला." अंजली मीराला टाळी देऊन म्हणाली.

सीमा आरतीचे ताट घेऊन आली. अंजली वरून भाकर तुकडा ओवाळून टाकला. अंजलीने वाकून तिचा आशीर्वाद घेतला अन म्हणाली, 

"सीमा आई आज आराम कर, आज पोळ्या मीरा करणार आणि बाकी भाजी, वरण, भात आणि गुलाबजाम मी बनवणार."

"गुलाब.... काय?"

"गोड पदार्थ आहे तो. बनवल्यावर खा."

"पोरगी खरंच सुधरली." आजी आश्चर्यानं हात जोडून म्हणाली म्हणाली, "आल्या बरोबर स्वयंपाक करतो म्हणतेय. चला देव पावला."

"हात नको जोडू, फक्त आजच बनवणार मी स्वयंपाक." अंजली मीराचा हात पकडून आत गेली. 

"बरं आई मेजर वसंतची तार आली होती परवा. मार्च महिन्यात लग्नाची तारीख पक्की करा म्हणाले." पाटलांनी आजीला सांगितलं. 

"परक्याचं धन ती. किती दिवस आपल्याकडे राहणार !" आजीच्या चेहऱ्यावर आनंद आणि दुःखाचे मिश्र भाव जमा झाले. 

क्रमश :

धन्यवाद !

तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी. 

फोटो साभार गुगल, Pinterest वरून 


©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

🎭 Series Post

View all