वधू संहिता भाग 14

Romantic, adventurous story of a young girl & her groom to be

दिनांक : 17 /01/ 1980

अंजलीचे कपडे शिवून आले. फिट्ट कुर्ता आणि चुडीदार घालताच तिला तिचा दम घुटल्या सारखं वाटू लागलं.

"अगं बाई हे काय कपडे घालता गं तुम्ही?" अंजलीने  मेघाला विचारलं.

"ही आताची फॅशन आहे गं. आरशात बघ किती मस्त फिगर दिसते तुझी." मेघा उत्तरली.

"अरे पण किती फिट्ट? पायातून लवकर जात नाही. असं तर अर्धा तास कपडे घालण्यातच जातील."

"नको घालू मग. कशाला आमचं डोकं खातेस?" जया त्रासून म्हणाली, "प्रत्येकच गोष्टीत समस्या असते तुला. बाकी येत जात काहीच नाही."

अंजली चेहरा लटकवून बसली.
"हे घेऊन पायात घालत जा, मग चुडीदार घालत जा. सोप्प होईल." जया तिला प्लास्टिकची पिशवी देत म्हणाली.

"हे काय आहे?"

"हे देवा?" जया परत रागावली, "तु आदिवासी भागात राहते का?"

"रागवू नको जया. आपल्या देशातील खूपशा भागात अजून प्लास्टिक पिशव्या प्रचलित व्हायच्या आहेत." मेघाने तिला समजावलं, "चला इंग्रजी संभाषण वर्गात. वेळ झाला तर शिक्षा होईल. माहितेय ना?"

"होहो, चला." अंजली कुर्ता चुडीदार घालून तयार झाली.

आज किंजलचा एकविसावा वाढदिवस. अर्थातच ती रोज पेक्षा जास्तच आनंदी दिसत होती. सर्व वर्ग झाल्यावर श्रीमती परांजपेनी स्वतः बनवलेला केक कापण्यात आला. जेवणातही इतर padarthaan सोबत साजूक तुपात बनवलेला मुगाचा शिरा मिळाला.

"मग आज काय स्पेशल आहे का?" जेवायला बसल्यावर मेघाने किंजलला विचारलं.

"हो, आज सॅटर्डे नाईट आहे आणि मी डिस्को क्लब मध्ये माझा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे."

"Wow मज्जा आहे तुझी. मी तर मुंबईत येऊनही काही फायदा नाही असं वाटतं." मेघा नाराज होऊन म्हणाली.

" डिस्को क्लब, ते काय असते?" अंजलीने विचारलं.

"एक जागा असते जिथे, डान्स, मस्त नाचतात, खातात, धम्माल करतात." मेघाने माहिती पुरवली.

"नाराज नको होऊ मेघा. तुही ये आणि अंजली तू चल आणि बघ तुझ्या डोळ्यांनी. मज्जा येईल तुला ."

"अगं तिला कशाला घेतेय सोबत? ती गावंढळ पार तमाशा करेल आपला. तिला नीट इंट्रोडक्शनही देता नाही येत इंग्रजीत. " शारदा किंजलच्या कानात बोलली.

"शटअप शारदा, It will be fun, my friends want to meet her." किंजल तिला डोळा मारून म्हणाली, "लाईव्ह शो पाहायला मिळेल आपल्याला. तेव्हा शांत राहा."

"काहीही, मिस परांजपे कोणालाच रात्री बाहेर जाऊ देत नाही. नाहीतर आम्ही नसतो आलो का सोबत आतापर्यंत?" जया किंजलला म्हणाली.

"त्यांना सांगायचं किंवा विचारायचंच कशाला?" किंजल म्हणाली.

"हो सरळ लपून छपून निघून जायचं." अंजली म्हणाली, "I am exciting to go." अंजली एक एक शब्द आठवून म्हणाली. सगळ्यांनी चमकून तिच्याकडे बघितलं.

"माझं चुकलं का?" अंजलीने विचारलं.

"नाही गं, बरोबर बोललीस तू." मेघा म्हणाली. मग तिने अंजलीच्या कानात विचारलं , "अंजली तुला खरंच डिस्को क्लबमधे जायचं आहे? मी ऐकलं आहे तिथे नशा करतात."

"आपण फक्त नाचू गं. तू, मी आणि जया आपण तिघीही जाऊ."

"ओके जाऊ मग. पण तुम्ही पकडल्या गेल्या तर मी सरळ म्हणेल मला यातलं काहीच माहित नाही." जया बोलली, "आपापल्या जबाबदारी वर जायचं. आणि हो अजिबात ड्रिंक, दारूला हात लावायचा नाही."

"अरे पाणीही पिऊ नाही आपण तिथलं. मी आपली पाण्याची बॉटल घेते सोबत." अंजली बोलली तसा जयाने डोक्यावर हात मारला आणि बाकी हसू लागले.

"आज रात्री काही खरं नाही आपलं. डिस्को नाही तर चांगला भांगडा होणार आहे आज." शारदा हसत म्हणाली.

"जे होईल ते बघून घेऊ. मी आठ वाजता कार घेऊन ती बाजूची इमारत आहे ना, तिथे थांबते तुमची वाट बघत. ओके !" किंजलने सांगितलं.

"ओके !"
..........
रात्री भूक लागली असं म्हणून डिनर लवकर करून अंजली, मेघा आणि जया चोर पावलांनी गेट जवळ गेल्या. थंडी चांगलीच पडल्याने बाहेर एकट दुकट माणूसच होते तर सिक्योरिटी गार्ड शेकोटी समोर बसून डुलकी देत होता. 
अजून गेटला कुलूप लावण्यात आलेलं नसल्याने जयाने हळूच किंचित गेट उघडला आणि तिघीही किंजलने सांगितलेल्या जागी गेल्या. किंजल कार घेऊन त्यांची वाटच बघत होती.

"Sit in girls" किंजल मुलींना म्हणाली. तिची नजर  टाचेच्या थोड्या वर, आकाशी रंगाचा छोट्या बाह्यांचा फ्रॉक घातलेल्या आणि मोकळे केस सोडलेल्या अंजलीवर गेली.

"ओह माय गॉड ! अंजली आज ओळखूच येत नाहीये."

"थँक्यू !" अंजली गोड लाजून म्हणाली.

"बापरे आज सगळी पोरं अंजलीलाच डान्स करायला विचारतील. आपला नंबरच येणार नाही." शारदा तोंड वाकडं करून म्हणाली, "बस हिने एखाद्याच्या तोंडात  हाणायला नको म्हणजे झालं."

"त्याची हमी नाही देऊ शकत मी." अंजली म्हणाली.

"म्हणून मी नको म्हटलं हिला ... "

"बस, मी कार चालवते. शांत बसा." किंजल शारदाला मधेच थांबवून म्हणाली.

साडे आठला त्या डिस्को क्लब मध्ये गेल्या.

एक मोठ्ठा हॉल. त्यात खूप सारे रंगीबेरंगी चमकणारे लाईट्स, एका बाजूला एका ओट्या मागे तीन चार मुलं मुली उभ्या. त्यांच्या मागे दारूच्या लहान मोठया शिश्या ठेवलेली काचेची आलमारी. वर काचेचे लटकणारे ग्लास. समोर उंच खुर्च्या अन त्यावर बसून म्युझिक ऐकत आवडीचं पेय पिणारी मंडळी.

ब्लॅक, शॉर्ट वन पीस आणि हाय हिल सॅन्डल घातलेल्या किंजलने तिच्या सर्व सम वयीन मित्र मंडळीला जया, मेघा आणि अंजलीची ओळख करून दिली. सर्वांनी एकमेकांच्या हातात हात देऊन शेक हॅण्ड केलं. अंजलीने मात्र दुरूनच हात जोडून नमस्कार केला. ती खरंच सोबत बॉटल घेऊन गेली. पण शारदाने तिला डिस्को क्लब च्या आत ती नेता येत नाही म्हणून कार मधेच ठेवायला लावली.

एक सुंदर बाहुली असलेला केक आणण्यात आला. केक कटिंग झालं.
"लेट्स स्टार्ट डिस्को... " किंजल ओरडली तशी लाईट डिम करण्यात आली आणि लाऊड म्युझिक सोबत गाणं सुरु झालं,

"डिस्को दिवाने आहा
डिस्को दिवाने आहा,

नशिली है रात, हातोमे हात
नाचे सीतारो के साथ

सुंदर बदन
ये चंचल है मन
नाचे गाये साथ

डिस्को दिवाने आहा
डिस्को दिवाने आहा"

अंजली आणि ग्रुप डान्स करू लागले. अंजली फक्त उडया मारू लागली. तिला बघून सर्व हसू ही लागले आणि उडयाही मारू लागले. अंजलीने थोडा वेळ म्युझिक वर रममाण होऊन उडया मारल्या. आजूबाजूला बघते तर ओळखीचे कोणीच दिसलं नाही. ती उडया मारत दुसऱ्याच बाजूला आली.

"हे बेबी कम डान्स विद मी." एक मुलगा तिला म्हणाला.

"सॉरी सॉरी." म्हणत ती बाजूला निघून आली. पण लाईट डिम असल्याने तिला तिचा ग्रुप नक्की कोणत्या बाजूला आहे हे दिसत नव्हतं आणि तिचा आवाज कोणाला ऐकू जाणं ही शक्य नव्हतं.

अंजली थोडीशी भिली, ती हरवून जाणार म्हणून. पण लगेच तिने स्वतःला सावरलं. कारण एक राउंड झाल्यावर अर्थातच संगीत बंद करण्यात येईल आणि लाईटही लावण्यात येतील किंवा ती मॅनेजरशी बोलून हे थांबवून आत्ताच तिच्या मैत्रिणी जवळ जाऊ शकते. पण तिच्या मुळे त्यांच्या आनंदात व्यत्यय नको म्हणून ती वॉशरूम शोधू लागली.

तिला एका बाजूला प्रकाशात लेडीज वॉशरूमचा साइन बोर्ड दिसला. आत जाऊन तिने चेहऱ्यावर पाणी मारलं. स्वतःकडे बघितलं, ही आणि ती खेड्यातील अंजली, किती वेगळी दिसते. स्वतःवर हसतच ती बाहेर आली अन वामनला धडकली. तो तिला,
"सॉरी, प्लिज समोर बघून चालत जा." असं म्हणून निघून गेला.

अंजलीला त्याचा आवाज कुठेतरी ऐकल्या सारखा वाटला. तिला आठवलं, तिने हा आवाज ती पहिल्यांदा वसतिगृहात गेली तेव्हा ऐकला होता.

"हा नक्कीच त्याचा (अजयचा ) साथीदार, म्हणजे तोही इथे आला असेल. तो इथे काही बॉम्ब स्फ़ोट वगैरे  करणार तर नाही. मला त्याला थांबवायलाच हवं." ती मनोमन विचार करू लागली,
"तो वाईट नाही. मी त्याच्या डोळ्यात बघितलं. नक्कीच अतिरेक्यांनी त्याच्या आई बाबा भाऊ बहीण किंवा प्रेयसीला बंदी बनवलं असेल."

जासूसी पुस्तकात वाचलेले प्रसंग आठवून तिच्या मनात आलं. ती त्याच्या मागे मागे बार च्या मागच्या बाजूला एका खोलीत गेली. त्या खोलीत सहा सात माणसं बसली होती. अंजलीला असं खोलीत शिरलेले बघून सगळ्यांना शॉक बसला.

अंजलीला काही कळायच्या आत वामननी त्याच्या मजबूत पंजानी तिला मानगुटीला धरून आत नेलं.

"ही नक्कीच पोलिसांची हेर आहे." तो त्याच्या बॉसला म्हणाला, "आत्ता वॉशरूम समोर ही मला धडकली आणि माझा पिच्छा पुरवत इथे आली."

"बोल तुला कोणी पाठवलं इथे आमच्या मागे आणि तुला काय काय माहित आहे आमच्या बद्दल?" उमेशने तिचा खांदा जोरात दाबून विचारलं.

"मला कोणीच नाही पाठवलं आणि मला काहीच माहितही नाही."

"खूप काही माहित आहे तुला. कोणी पाठवलं ते सरळ सरळ सांगून टाक. नाहीतर परिणाम खूप यातना दायक होईल." इतकं म्हणून वामनने तिच्या फ्रॉकच्या दोन्हीही बाह्या फाडल्या. तसं अंजलीने तिचा पाय मागून जोरात त्याच्या कमरे खाली हाणला.

"पहिल्यांदाच घातला मी हा फ्रॉक. परांजपे मॅडमला माहित झालं तर किती रागावतील माहित आहे तुम्हा लोकांना?"

"आमच्या समोर भोळी बनायचं नाटक करतेस?"  उमेशनं तिला जोरात त्याच्या बॉसच्या पुढ्यात लोटली. ती टी टेबल ला जाऊन पडली. तिच्या डोक्याला लागलं त्यातून रक्त येऊ लागलं आणि ती बेशुद्ध झाली.

"हिला चांगला धडा शिकवा बॉस. परत कोणीच आपली हेर गिरी करायची हिम्मत करायला नको." वामन विव्हळत पाणी पिऊन खुर्चीत बसून म्हणाला.

लाल जरद डोळे असलेल्या मध्यम वयीन बॉसने अंजलीच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला करून तिच्याकडे बघितलं.

"खूपच सुंदर माल आहे. अजून कोणी स्पर्श न केलेला." तो हसत बोलला, "पण काय कामाचा? मारावंच लागेल हिला."

बाजूलाच खुर्चीत अरब अमीर शेख बनून बसलेला राजेश पिस्तूल काढून जागेवरून उठणार तोच अजयने त्याचा हात दाबला. अजय आणि राजेश, उमेश व वामनच्या साथीदारांना रंगेहात पकडायला क्लबमधे आलेले. राजेशने त्या दोघांशी मैत्री करून, त्यांच्या खोलीत येणे जाने करून खूप काही माहित करून घेतलं होतं. आज त्यांना स्फ़ोट करायला तयार बॉम्ब  मिळणार होते आणि संध्याकाळी सूर्यास्त होताच मुंबईत पाच ठिकाणी, गर्दी च्या ठिकाणी बॉम्ब स्फ़ोट घडून आणायचे. अशी त्यांची योजना होती.

"आपण केवळ एका मुलीसाठी आपली योजना फेल होऊ देणं योग्य नाही." अजय राजेशच्या कानाशी पुटपुटला.

"पण आपलं पहिलं कर्तव्य भारतीय नागरिकांच रक्षण करणे आहे."

"हो पण म्हणून एका मुलीसाठी आपण हजारो लाखो लोकांचं आयुष्य पणाला नाही लावू शकत. मला यांना जिवन्त पकडायचं आहे. आपल्याला कमिशनर सर इतर पोलीस फौज इथे घेऊन येईपर्यंत वाट पाहावीच लागेल."

"केशव आताच गेला. त्याला मदत घेऊन यायला खूप वेळ लागेल. तेव्हापर्यंत तिला काही झालं तर.... " राजेश कळवळून म्हणाला, "तु ओळखलं नाही का तिला. ती तीच आहे. बिचवरची गुंडांना मारणारी. मी खरंच तिच्या प्रेमात पडलोय. प्लीज काहीतरी कर माझ्यासाठी."

क्रमश :

धन्यवाद !

तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी.

फोटो साभार गुगल, Pinterest वरून

©®अर्चना सोनाग्रे वसतकार

🎭 Series Post

View all