Oct 24, 2021
कथामालिका

वधू संहिता भाग 13

Read Later
वधू संहिता भाग 13

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

तिकडे संध्याकाळी 'इंग्रजी संभाषण आणि व्यक्तीमत्व विकास ' वर्गात  मुलांचीही इंग्रजी व्याकरण संदर्भात परीक्षा घेण्यात आली. ज्या मुलांना शंभर पैकी पंचाहत्तर पेक्षा जास्त गुण मिळतील त्यांना श्री परांजपे अमिताभ आणि परवीन बॉबी चा शान हा सिनेमा दाखवणार असं ठरलं. 

अजयने मुद्दाम चुकीची उत्तरं लिहिली. त्याला खोलीत राहून, सर्व सिनेमा बघायला गेल्यावर त्यांचं सामान तपासायचं होतं. 

दुसरा दिवस उगवला. योगा वर्ग झाल्यावर अंजलीने चपराशीला सांगून मंदारला भेटायला बाहेर बोलावलं. 

"कशी आहेस ताई? मी ऐकलं तू स्वयंपाक बनवण्याच्या परीक्षेत नापास झाली."

"हो रे, लय त्रासदायक आहे. खायला बसलं कि पोटात कसं पटपट जातं. पण बनवायला इतका वेळ आणि त्रास घ्यावा लागतो हे माहितच नव्हतं."

"हो ना, पण तुला सिनेमा पाहायला जाता नाही येणार, म्हणून मीही जाणार नाही असं ठरवलं. आपण दोघं सर आणि मॅडमची परमिशन घेऊन रविवारी जाऊ सिनेमा बघायला."

"झालं तुझं?" अंजली त्याच्या डोक्यावर बोटांनी टिचकी मारून म्हणाली, "मला त्या अमिता बचू.. बच्चा... "

"ताई अमिताभ बच्चन !"

"हा त्याच्यात काहीच रस नाही. तु जा खुशाल पाहायला सिनेमा."

"हो " मंदार हसून म्हणाला, "मला वाटलं तु दुःखी आहेस म्हणून मला भेटायला बोलावलं."

"नाही, मी म्हटलं खोलीतच बसून बसून बोर होते मी. तर आज तुझं शर्ट आणि विजार धुवून काढते. दे तुझे कापडं धुवायचे."

"तुझी तब्येत ठीक आहे ना ताई? कि मी उभ्या उभ्या स्वप्न पाहतोय?" मंदार डोळे चोळून म्हणाला.

अंजलीने त्याला चिमटा काढला. 

"आ SSS तायडे दुखलं ना."

"हा म्हणजे तु स्वप्नात नाहीस." अंजली बिचारी बनून म्हणाली, "बघ लग्न झाल्यावर खूप काही काम करावं लागेल असं दिसतंय मला. नाही आलं तर लोकं सरळ आईचा उध्दार करतात. हे मला इथे येऊन समजलं. सीमा आईने तर खूप प्रयत्न केला मला शिकवायचा पण मीच नाही शिकले तर ती काय करणार बरं. पण असं दिसतंय मी काम नाही केलं तर तिला बोलणी ऐकावे लागेल. म्हणून म्हटलं आता एक एक करून सर्व काम शिकायचं."

"खरंच? " मंदारने आश्चर्यानं विचारलं, "मला तर वाटलं तुला स्वयंपाक करायला शिकावं लागतंय म्हणून तु तूझ्या होणाऱ्या नवऱ्याची वरात कशी कशी काढता येईल ते ठरवत असशील."

"हा मी तर तोच विचार करत होती." ती स्वतःशीच बडबडली मग त्याला म्हणाली, 
"नाही रे, चल लवकर दे कपडे. इंग्रजी संभाषण वर्ग झाल्यावर मला आज परत स्वयंपाक बनवायचा आहे."

"होहो आणतो." मंदारने त्याचे दोन शर्ट आणि एक विजार आणून अंजलीला दिली.

अंजली मनातल्या मनात हसत मंदारचे कपडे तिच्या बेड खाली लपवून ठेऊन इंग्रजी वर्गाला गेली.

...............
दोन वाजता श्री व श्रीमती परांजपे मुला मुलींना घेऊन सिनेमा बघायला गेले.

योजने नुसार अजयने राजेशला पास होऊन सिनेमा पाहायला जाऊ दिलं कारण तो मिलनसार, हसमुख स्वभावाचा. त्याला जास्तीत जास्त मुलांसोबत मिसळून घ्यायला सांगितलं. त्यांची माहिती, स्वभाव जाणून घ्यायचं. अर्थातच त्यांना हवी असलेली मुलं जास्त बोलणं मिसळून घेणं पसंत करणार नाहीत आणि संभाषण वर्गाच्या पन्नास साठ विद्यार्थ्यांपैकी ते कोण या पर्यंत पोहचता येईल. 

जयाचा फुगलेला चेहरा पाहून ती चिडणार म्हणून मेघा काहीच न बोलता, चुपचाप झोपली. तर अंजली मंदारचे कपडे धुवायला बाथरूममध्ये गेली.

अजयने बघितलं सिक्योरिटी गार्ड गेटवर बसला होता आणि चपराशी खाली टेबलवर डोकं ठेऊन झोपला होता, तर ज्या चार मुलांना कमी मार्क मिळाले होते. तेही बाहेर गेले होते. 

अजय एकेकाचे सामान चेक करू लागला. पाच सहा मुलांचं सामान बघून झालं. त्याला कोणीतरी बघत असल्याचा भास झाला. त्याने इकडे तिकडे बघितलं, कोणीच नव्हतं. त्याला वाटलं मांजर असेल. तो परत आपल्या कामाला लागला. कोणाला आपलं सामान तपासलं अशी शंका येऊ नये म्हणून अजय लक्ष पूर्वक सगळं सामान जसंच तसं ठेऊ लागला. 

तो वामनच्या खोलीत शिरला. त्याला परत कोणीतरी आजूबाजूला असल्याचा भास झाला. त्याचे कान अलर्ट झाले. त्याच्या डोक्यावर कोणीतरी लाकडी बॅट मारणार तोच त्याने बॅट सकट त्या व्यक्तीला समोर ओढलं आणि त्याच्या तोंडावर असलेल्या लोकरी टोपीला ओढून काढलं. तिच्या लांबसडक केसांचा अंबाडा सुटून केसं टोपी सोबत मोकळे झाले. अंजलीने तिचा चेहरा दोन्ही हाताने झाकून घेतला. त्याच्या पुढ्यात, त्याच्या एका हाताने घट्ट पकडलेल्या, मुलाचे कपडे घालून असलेल्या तिला तो एकटक बघू लागला.

"ही तर तीच आहे." बिचवरची घटना आठवून तो मनातच विचार करू लागला , "पण ही इथे का? ही वेडी आहे का? की अति हुशार आहे? कशीही असो खूप इंटरेस्टिंग आहे." त्याला तिच्या वरून नजर हटवावी वाटतच नव्हती जणू. 

 अंजलीलाही उमेश आणि वामनचे सामान तपासून पुरावा  जमा करायचा होता. म्हणजे ती ठामपणे श्री आणि श्रीमतीला त्यांच्याबद्दल, त्यांच्या मुंबई दहशतवादी हल्ले करायच्या योजने बद्दल सांगू शकेल. पण तिने त्यादिवशी फक्त संभाषण ऐकलं. चेहरा तर बघितलाच नव्हता. म्हणून तिने त्याच खोलीत जाऊन तिथल्या मुलांचे सामान तपासायचं ठरवलं.  पण मुलीच्या वेषात मुलांच्या वसतिगृहात जाणं कठीण. मुलाचा वेष धारण करता यावा म्हणून तिने मंदार कडून त्याचे कपडे धुवायच्या निमित्ताने घेतले. लोकरीच्या टोपीला समोरून डोळ्यांनी दिसेल अशी दोन छिद्र पाडून ती घातली आणि भिंत ओलांडून मुलांच्या वस्तीगृहात गेली.

अजयने तिच्या चेहऱ्यावरून टोपी काढताच तिला वाटलं ती मेली आता. पण हे काय दोन तीन मिनिट होऊनही काहीच झालं नाही. मात्र अजयच्या लोखंडी मजबूत हाताने घट्ट पकडून ठेवल्यानं तिचा खांदा दुखला.

"सोड मला, सोड, दुखतंय खूप." अंजली चेहऱ्यावरून हात बाजूला करून त्याच्या हाताची पकड काढायचा प्रयत्न करू लागली. तो भानावर आला. तिला सोडून तो उभा झाला. 

"इथे मुलांच्या वसतिगृहात, मुलाचा वेष घेऊन काय करायला आलीस? कोणत्या संघटनेची जासूस आहेस तु?" त्यानं गंभीर होऊन विचारलं. मात्र अंजली तितकीच गंमतीशीर. उत्तरली, 

"झाँसीची राणी लक्ष्मी बाई." तिला अगदी जासूस झाल्याचा फिल आला, "माझीच संघटना आहे. सध्या तर  मी एकच आहे यात. लवकरच माणसं भरती करणार आहे मी. तू येणार का माझ्या संघटनेत?"

"मी गंमतीच्या मूड मधे नाही."

"ओके ओके, मी कोणत्याच संघटनेत काम नाही करत. पण तु कोणत्या संघटनेसाठी इतकं वाईट काम करतोय? काही दिवसांपूर्वी मी वधू संहिता च्या मुलींच्या वसतिगृहातुन,  पळून इकडे आली होती तेव्हा तुमचं संभाषण ऐकलं मी. एका चांगल्या घरचा दिसतोय. काही त्रास आहे का आयुष्यात म्हणून अश्या मार्गाला लागलास? मला माहित आहे लोकांना वाटतं मुलींवरच खूप अत्याचार होतात. पण मुलांवरही काही कमी अत्याचार होत नाही. माझ्या लहान भावाला तर आतापासून बाबा व्यवसायाचं सर्व पाहायला लावतात आणि जमलं नाही की खूप रागावतात. तसें ते खूपच चांगले पण... " अंजली उभी  होऊन निरागस चेहऱ्याने सांगत होती. पण अजय आता इरिटेट झाला. पण तिला चूप कसं करावं तेही त्याला कळत नव्हतं. 

त्याने  पिस्तूल काढून तिच्या कपाळावर ठेवली,

"वायफळ बडबड नको. काय ऐकलं होतं ते सांग फक्त."

"हेच कि बबन पकडला गेला आहे. त्यामुळे सर्व जबाबदारी तुमच्यावर आहे. म्हणून लवकरात लवकर मुंबईत इतके  बॉम्ब हल्ले  करायचे, रक्ताने जमीन इतकी लाल झाली पाहिजे कि 26 जानेवारीला सर्वांना लाज वाटेल तिरंग्याकडे पाहायची." अंजलीने भीत भीत सांगितलं. 

"त्यांची इतकी हिम्मत?" अजयचा चेहरा रागानं लाल झाला. बाजूला असलेल्या लाकडी स्टूलला त्यानं जोरात पाय मारला. तसा तो स्टूल  भिंतीवर जाऊन आदळला. 

अंजली घाबरून खाली बसली.

"कोण आहे, कोण आहे तिकडे?" चपराशी, त्याच्या मागोमाग सिक्योरिटी गार्ड , स्टूलचा भिंतीवर आदळण्याचा आवाज ऐकून वर येऊ लागले.

अजयने पटकन अंजलीचा हात धरून तिला त्याच्या रिकाम्या खोलीत नेलं आणि तोंडावर बोट ठेऊन शांत राहायचा इशारा केला.

अंजलीचं लक्ष अजयने पकडून ठेवलेल्या तिच्या हातावर गेलं. 

"हा तर अगदी त्या जासूसी कादंबरीतल्या हिरो सारखा वागतोय? तसाच दिसायलाही दमदार आहे.  हा व्हिलन असूच शकत नाही." अंजली गोड हसून त्याच्याकडे बघत मनोमन बोलली, "मी याचं मन वळवूनच दम घेणार आणि याला  सरकार कडून माफीचा साक्षीदार बनवणार."

चपराशीला आणि सिक्योरिटीला वाटलं मांजर वगैरे आलं असेल. स्टूल व्यवस्थित ठेवून त्यांनी खोलीच दार लावून  घेतलं. त्यांना वाटलं सिनेमा बघायला जायच्या घाईत मुलं दार लावून घ्यायला विसरली.

ते खाली निघून गेले.

"तु माझ्या कडे अशी का बघतेय?" अजयने अंजलीला विचारलं.

"कारण तू खूपच गोड आहेस." इतकं बोलून अंजलीने त्याच्या गालावर तिचे ओठ टेकवून पप्पी घेतली आणि तिथून पळ काढला. 

"ही पागल आहे का? किती सहजपणे एखाद्या लहान मुलाची पप्पी घ्यावी तसं तिने माझी.. " ओठावर पुसटस हसू उमटलेला अजय गालाला हात लावून बोलला, "अतिच आहे एकदम."

तो तिच्या मागे धावत गेला. खाली चपराशी   जवळच उभा होता. म्हणून अंजली मध्येच थबकली. तिचा जीव घाबरून आला. आता कसं जायचं परत खोलीत? पकडल्या गेली तर सगळं पितळ उघडं पडेल आणि ते दहशतवादी. काहीही करून जायचंच भिंत ओलांडून. म्हणून ती पायऱ्या उतरू लागली तोच, 

मागून आलेल्या अजयने तिला जवळ ओढलं आणि ती आवाज करेल म्हणून तिच्या तोंडावर हात ठेवला. त्यांची नजरा नजर झाली. 

"हम तुम एक कमरेमे बंद हो 
और चाबी खो जाय 

तेरे नैनोके भूल भुलैयामे 
बॉबी खो जाय."

चपराशीच्या रेडिओवर गाणं लागलं. 

अंजलीने त्याला बाजूला केलं.

"काय करतोय? मला जाऊ दे."

"मी चपराशीला बोलण्यात गुंतवतो. मग जा."

"हो हो. ते ठीक होईल."

तो वरती कशाचा आवाज झाला होता म्हणून चपराशीला विचारू लागला. अंजली सटकली हे पाहून तो परत वर गेला. 

त्याला तिच्या टोपीची आठवण झाली. तो परत हळूच त्या खोलीत गेला तिची टोपी घेतली. त्याला आठवलं अंजली म्हणाली होती या खोलीतच तिने ते संभाषण ऐकलं. त्यानं टेबलवर असलेली पुस्तकं चाळली. परत जशीच्या तशी मांडून ठेवली. त्याची नजर एका मॅगझीन वर गेली. त्यावर मुंबईच्या फेमस डिस्को क्लबचा फोटो होता. त्याला लाल पेन ने मार्क केलेलं होतं.

त्याला समजलं कि त्यांची  पुढची मिटिंग तिथे होणार आहे.
तो पूर्ण मॅगझीन चाळनार तो त्याला राजेशचा किंचाळण्याचा आवाज आला. अजयनेच त्याला सांगितलं होतं कि  परत येताच कशालाही ठेचून किंवा टक्कर होऊन ओरडायचं. म्हणजे अजय सतर्क होऊन त्याच्या खोलीत निघून जाईल. 


क्रमश :

धन्यवाद !

तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी. 

फोटो साभार गुगल, Pinterest वरून 


©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Archana Wasatkar

HR assistant

An optimistic person. Like to express myself through writing stories, articles & poems. Thank you