वधू संहिता भाग 12

The story of a mischievous bride to be & her groom to be. Thank you

सकाळी योगा झाल्यावर श्रीमती परांजपेनी सूचना दिली, 

"आज आपलं जेवण आपल्यालाच बनवायचं आहे. म्हणजे आज कुकिंग क्लास आहे."

"Wow मॅम म्हणजे आज मज्जा येईल." किंजल आनंदी होऊन म्हणाली, "तुमच्या साठी मी स्पेशल बटाटा रस्सा बनवेल."

"हो हो नक्कीच. मी तुम्ही तेराही मुलींनी बनवलेलं चाखून बघेल. तुमच्या रूम पार्टनर नुसार चार ग्रुप ला पोळी, भाजी, वरण, भात आणि एक गोड पदार्थ बनवायचा आहे. खाली स्वयंपाक खोलीत सर्व पदार्थ ठेवले आहेत. चार गॅस शेगडी आहेत. शांत आणि प्रसन्न मनाने चार लोकांना होईल स्वयंपाक बनवायचा. गोड पदार्थ तेवढा जास्त बनवायचा. आपल्या 'इंग्रजी संभाषण आणि व्यक्तीमत्व विकास ' वर्गाच्या मुलांना आपण गोड पदार्थ परीक्षण करायला देऊ. त्यांना कोणी कोणता गोड पदार्थ बनवला याची अजिबात माहिती राहणार नाही.

बाकी इतर पदार्थ परीक्षण मी व साहेब करू आणि हो अर्थातच आज तुमच्यासाठी दुसरा स्वयंपाक बनणार नाही.  तुम्ही जे बनवलं तेच तुम्हाला जेवायचं आहे."

"काय?" अंजली अनावधानाने ओरडली. 

"काय झालं?  झुरळ दिसलं का?" श्रीमती परांजपेनी तिला विचारलं. 

"मॅम तें दिसलं असतं तर मारलं असतं हो, पण स्वयंपाक?"

"का काय झालं त्यात?" श्रीमती परांजपेने तिला विचारलं. 

"मला काहीच येत नाही स्वयंपाकातील. मी कधी कांदाही कापला नाही." अंजली बिचारा, केविलवाणा चेहरा करून म्हणाली. 

"नाही येत तर शिकून घे आता. मुलगा असो कि मुलगी आपलं खाण्यापुरतं तरी स्वयंपाक यायला हवा आणि तुझं तर लग्न होणार आहे लवकरच.

असं म्हणतात कि माणसाच्या हृदयाचा रस्ता, त्याच्या पोटातुन होऊन जातो.

कारण पोट खुश तर माणूस खुश. 

समजलं."

"पण मॅडम.... " अंजलीला स्वयंपाक शिकायची किंवा करायची अजिबात इच्छा दिसत नव्हती. 

"पण बिन काही नाही." श्रीमती परांजपे जया कडे बघून म्हणाल्या, "जया, मेघा अंजली कडून पूर्ण स्वयंपाक चांगल्याने करून घ्यायची जबाबदारी तुम्हा दोघींची. कारण तुम्हाला तेच खावं लागेल जे ती बनवेल."

"हो मॅम " जया मेघा एकमेकींना बघून एकसुरात बोलल्या. 

"आज जे दोन ग्रुप सर्वात उत्तम आणि चवदार जेवण बनवेल त्यांना उद्या दुपारी तीन वाजताचा अमिताभ बच्चनचा नवीन सिनेमा पाहायला घेऊन जाण्यात येईल, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ग्रुपला नवीन भरतकाम केलेले रुमाल मिळतील. तर चौथ्या क्रमांकावर आलेल्या ग्रुपला पुढे तीन दिवस स्वतःचा स्वयंपाक स्वतःच बनवावा लागेल प्रॅक्टिस म्हणून. मी हॉल मध्ये बसून आहे. काही अडचण आल्यास सांगा."

श्रीमती परांजपे हॉल मध्ये गेल्या तसं मुलींचं आपापल्या स्वयंपाकाला हवं असलेलं सामान घेत बडबडनं सुरु झालं. 

"मला तर वाटलं होतं कि ही गावातील गोरी, म्हणून हिला उत्तम स्वयंपाक येत असेल. पण ही तर आपल्या पेक्षाही जास्तच रईस निघाली." शीला बोलली. 

"मग काय? इतकं लाडवतात का मुलीला कोणी? कांदाही कापता नाही येत म्हणे." रुपालीने तिला हो ला हो लावलं. 

"अमिताभ बच्चनचा नवीन सिनेमा, wow !" शारदा उडी मारून किंजलला म्हणाली, "पहिला क्रमांक आपलाच येईल बघ."

"मला आज येतांना टॉकिज वर  अमिताभ बच्चनच्या 'शान ' या सिनेमाचे पोस्टर दिसलं. नक्कीच धमाकेदार सिनेमा असेल. Action फिल्म आहे. मज्जा येईल बघायला. तेव्हा आपल्याला जिंकावेच लागेल." किंजल शारदाच्या हातावर टाळी देऊन म्हणाली. 

"आपल्याला तर नवीन रुमाल सुद्धा मिळणार नाहीत असं दिसतंय." जया पातेलं गॅस वर आपटून रागात अंजलीकडे बघत म्हणाली. 

"असू दे गं." मेघा जयाला शांत करत म्हणाली, "आपल्याकडे काय कमी रुमाल आहेत आणि अमिताभ बच्चनचा सिनेमा मी दाखवेल तुला आपले वर्ग झाल्यावर."

"तु तिला जास्तच बाजू घेत आहेस असं नाही वाटत का तुला?" जया भडकली. 

"अगं मी फक्त तुला शांत ठेवायचा प्रयत्न करतेय. नाहीतर तिच्याकडून व्यवस्थित स्वयंपाक कोण करून घेईल? शेवटी आपल्याला तिने बनवलेलंच खायचं आहे."

जयाच्या डोक्यात जणू प्रकाश पडला. एका कोपऱ्यात उभी राहून त्यांचं बोलणं ऐकत असलेल्या अंजलीच्या हातात कांदा आणि चाकू देऊन जया तिला म्हणाली, 

"चला कांदा कापा." 

"याने " अंजली चाकू हातात धरून त्याला बघू लागली, "आमच्या कडे तर पावशीनं कांदा कापतात. याने नाही."

"इकडे शहरात चाकूनेच कापतात सर्व भाज्या. तुही लग्नानंतर शहरातच जातेय राहायला. तेव्हा तुला यायलाच हवं चल काप." जया तिला डोळे दाखवून म्हणाली. 

"होहो कापते." 

अंजलीला चाकूही नीट धरता येत नाही हे पाहून मेघाला तिची कीव आली. तिने श्रीमती परांजपे कडून आज अंजलीचा कुकिंग करायचा पहिला दिवस म्हणून तिला भाजीपाला कापून द्यायची आणि इतर हातभार लावायची परवानगी मागितली. पण कणिक अंजलीलाच मळायला सांगितलं.

वांग्याची भाजी मेघा आणि जयाने सांगितलं तशी फोडणी देऊन शिजवायला ठेवलं. फोडणीच्या वासाने त्रस्त झालेल्या अंजलीने कणिक मळायला घेतली.

"थोडं थोडं पाणी टाक, आता हाताने मळ." मेघा तिला सांगत होती, "ती बघ शीला कशी मळतेय. तसं पाणी आणि पीठ एकजीव कर."

अंजलीनं हात तर टाकला गहू पिठात, वरून पाणी टाकलं. अन मग तिची मज्जा झाली सुरु. तिच्या दोन्ही हातांना कणिक चिकटू लागली. ती कशी काढावी तिला सुचत नव्हतं. 

"मेघा पीठ हाताला लावून, हात चोळून काढायला सांग तिला." तांदळाची खीर बनवण्यासाठी भिजलेले बदाम सोलून, त्याचे छोटे छोटे काप करत असलेली जया बोलली, "मला तर वाटतंय आज पोळ्यांच्या ऐवजी कणिकच खावी लागेल. कांदा, वांगी तेही तूच कापलं, कुकर मी लावून दिला, डाळ धु म्हटलं तर पाण्यासोबत अर्धी खाली जात होती. हिच्या आईने काही शिकवलं कि नाही?"

"तिने खूप प्रयत्न केला, मीच नाही शिकली." अंजली रागात बोलली, "आता करतेय ना सगळं तुम्ही सांगताय तसं. तेव्हा परत आईचं नाव नाही काढायचं. खूप चांगली आहे ती. जो तो तिलाच बोलतो." 

अंजलीचे डोळे भरून आले. तिला स्वयंपाक हा शब्द नकोसा झाला. आजी इतकी ओरडूनही ती कधीच स्वयंपाक खोलीत शिरली नाही. पण आज तिला जवळ जवळ दोन तीन तास गरमी सहन करत गॅस जवळ थांबावं लागलं. का तर लग्न झाल्यावर पती देवाचं मन जिंकण्यासाठी त्याला चांगलं गरम गरम खाऊ घालता यावं म्हणून. 

"मी पण माझ्या पती देवाला पत्नी आणि पनौती या शब्दात फक्त काना मात्रेचा फरक असतो हे चांगल्यानं समजावून नाही सांगितलं तर माझं नाव अंजली नाही." स्वयंपाक पूर्ण झाल्यावर चेहऱ्यावर पाणी मारून, आरशात बघून अंजली स्वतःलाच म्हणाली.

 अंजलीने बनवलेल्या पोळ्या अगदीच वातळ झाल्या. भाजीतील कांदा लसूण करपले होते. खीर, वरण भात तेवढं जमलं होतं. 

अर्थातच अंजलीच्या ग्रुपला काहीच बक्षीस मिळालं नाही. उलट पुढे तीन दिवस त्यांना त्यांचा स्वयंपाक बनवायचा होता.

मुलांच्या वसतिगृहात आज आनंदी आनंदगडे होता. मुलींनी बनवलेले गोड धोड पदार्थ, तांदळाची खीर, मुंगाचा  शिरा, बेसन बर्फी, बासुंदी त्यांना चाखायला मिळाली. 

"मला वाटतं, मुंबई आपल्या अंगी लागतेय." राजेश दुपारचं जेवण झाल्यावर पोटावरून हात फिरवत म्हणाला, "बघ ना, काल मी माझ्या स्वप्न परीला भेटलो, आज 'वधू संहिता'च्या नाजूक साजूक मुलींनी बनवलेले गोड धोड खायला मिळालं. म्हणजे दुधात साखर झालं आज तर. असं वाटतंय मी लवकरच तिला परत भेटणार आहे."

"हो मलाही तसंच वाटतंय. कारण आज संध्याकाळी  आपण आपल्यासाठी काम करणाऱ्या एका स्केच आर्टिस्टला भेटायला जाणार आहे. तु त्याला त्या मुलीचं वर्णन सांग. त्यावरून तो स्केच बनवेल. आपण ते स्केच वर्तमान पत्रात छापू आणि खाली संदेश लिहू, 

तु कोण आहेस? 
तुझा नाव गाव, 
पत्ता, शिक्षण, वय,
मला काहीच माहित नाही 
पण तुला त्या दिवशी जुहू बिचवर दोन गुंडांशी दोन दोन हात करतांना पाहून मी माझं हृदय तुला देऊन बसलोय.  आता दिवस रात्र मला फक्त तुझ्याच भेटीची आस आहे. फक्त तुझाच.... "

"किती सुंदर? अगदी मनातलं. खरं सांग तुझ्याच हृदयात तर ती नाही ना?"

"नाही, तू चुपचाप पुढचं ऐक." अजय त्याला सांगू लागला, 
" मग ती तुला भेटेल, तुझ्याशी कदाचित भांडण करेल, तू तिचा पिच्छा पुरवणार. तिचा तुझ्यावर विश्वास बसण्यासाठी ती म्हणेल ते सगळं करणार आणि तिला आपल्या प्रेमात पाडणार."

"मग?"

" मग आम्ही तुझं लग्न तिच्याशी लावून देऊ. मग तु तुझा संसार थाट मस्त पैकी आणि मी माझं मिशन एखाद्या दुसऱ्या अधिकारी सोबत पूर्ण करतो."

"काय?" राजेश अजयच्या पाया भोवती हात टाकून पडला, 
"सॉरी यार, परत चुकूनही कोणत्याच मुलीचं नाव नाही घेणार मी, नाही मुलीबद्दल बोलेल.  पण इतकं मिशन मला तुझ्या सोबतच करू दे. माझ्या आईचं मन तुटेल. प्लीज !"

"मग आपल्या कामाप्रती गंभीर व्हायला शिक." अजयने त्याला दोन्ही खांद्याला धरून उठवलं, "इथे शिकायला येणाऱ्या सर्व मुलांसोबत मैत्री कर. यांच्यातच कोणीतरी दहशतवाद्यांच्या संपर्कात राहून काम करतोय. समजून घे आपल्याला लवकरात लवकर पाऊल उचलायचं आहे. मुलींवर टाईम पास करायला आपल्याकडे वेळ नाही."

क्रमश :

धन्यवाद !

तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी. 

फोटो साभार गुगल, Pinterest वरून 


©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

🎭 Series Post

View all