वधू संहिता भाग 11

Adventures story of a young girl & her groom. Thank you

शीला, जया, मेघा आणि इतर मुलीही मागे होऊन एकमेकींच्या कानाशी कुजबुजु लागल्या. 

"ही असली शर्यत कशालाच लावली किंजलनी?"

"किंजलला हसून बोलायला हा मवालीच सापडला."

"हम्म, तिच्या शर्यतीत तीच फसली. बरं झालं."

"अगं हो पण तिला काही झालं तर आपल्या वधू संहिता वर्गाचे नाव खराब होईल."

"हो ते आहेच. पण आपण काय करू शकतो?"

"हो ना त्या गुंडाच्या हातातला चाकू बघ किती धारदार आहे ते."

अजय पाठीशी लावलेली पिस्तूल काढून त्या गुंडांवर दागनार, त्यांना धमकावणार तोच त्याला एक नव तरुणी  त्या गुंडांसमोर आलेली दिसली.

अंजली सहजच इकडे तिकडे बघत असतांना तिला या पोरींनी काहीतरी उठाठेव केल्याच लक्षात आलं. नक्की काय झालं हे पाहायला आली तर बघते काय शारदा आणि किंजलला दोन मवाली, गुंडे तरुण चाकू दाखवून सोबत न्यायच्या विचारात. तिने परकर चा समोरचा काठ दोन्ही पायातून मागे घेऊन लुगड्याच्या काष्ठ्या सारखा कमरेत खोचला आणि त्यांच्या समोर गेली. 

"काय  भाऊ पोरींना सोडायचं काय घेणार?" अंजलीने मागे हात घेऊन ताठ उभी राहून त्यांना विचारलं. 

तिचा असा अवतार पाहून तर आधी ते दोघेही जाम हसले.  मग तिला म्हणाले, 

"आजचा आमचा कोटा पूर्ण झाला म्हणून नाहीतर तुलाही नेलं असतं सोबत." एक म्हणाला. 

"हो पण आमचं मन भरलं कि दोन तीन दिवसांनी आम्ही या दोघींना इथे सोडून देऊ. तेव्हा ये तु इथे. तुलाही मज्जा करवू." दुसरा बोलला. 

"पण मी म्हणते कशाला तेव्हापर्यंत वाट बघावी राव? मी आता इथेच करवते ना मज्जा तुम्हाला." इतकं म्हणून ती हसतच वर्गात मॅडमनी शिकवलं तसं लाजत बुजत त्यांच्यात एखाद फूट अंतर राहील इतकी जवळ गेली आणि त्यांना कळलंही नाही इतक्या वेगात एकाच्या डोळ्यात हातातली रेती फेकली व दुसऱ्याच्या कमरे खाली जोरात लात हाणली. दोघांच्या हातातले चाकू खाली पडले. 

एक डोळे चोळू लागला तर दुसरा वेदनेनं विव्हळला. किंजल आणि शारदा, अंजलीला आश्चर्यानं पाहू लागल्या. 

"अरे मला काय पाहताय? हाना त्यांना लाता बुक्यांनी चांगलं." अंजली त्या दोघींना म्हणाली. बाकी मुलीही पुढे आल्या. सर्वांनी त्या गुंडांना चांगलं चोपलं.

"इंटरेस्टिंग !" अजय त्याची पिस्तूल परत होती तिथेच ठेवत राजेशला म्हणाला, "मला माहित नव्हतं कि जगात कुठेतरी अशीही मुलगी मला पाहायला मिळेल म्हणून."

"खूपच इंटरेस्टिंग. तुला आवडली ती?" राजेशनं त्याला अगदी गंभीर होऊन विचारलं, "खरं सांग. तु पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडलास?"

"वायफळ बोलू नकोस." अजयला त्याचा खूप राग आला, "एक तर माझं लग्न आधीच जुळलेलं आहे आणि दुसरं मी इथे एका महत्वाच्या कामा निमित्त आलो आहे. समजलं."

"अरे मी फक्त कन्फर्म करतोय." राजेश त्याला शांत करत म्हणाला, "कारण मला ती खूप आवडली. आमची जोडी खूप छान जमेल."

"मग घे लग्न करून." अजय बोलून गेला.

"हो ना, मलाही तसंच वाटतंय." राजेश तिच्या दिशेने जाऊ लागला तसं अजयने त्याला पकडलं. 

"कुठे चाललास?" 

"तिला प्रपोज करायला लग्नासाठी."

"तु वेडा आहेस कि विसरलास, आपण इथे एका मिशनसाठी आलो आहे आणि त्या पोरीनं आताच दोन गुंडांची वाट लावली. तु असलं तसलं काही म्हणशील तिला. तुलाही चांगला चोप बसेल."

"त्या निमित्ताने तिचे नाजूक हात माझ्या गालावर तरी पडतील. आमची नजरा नजर होईल, मग ओळख होईल आणि मग आमच्या प्रेम प्रकरणाला सुरवात होईल." अजयने त्याच्या शर्टची कॉलर पकडली, "मला समजत नाहीये कमिशनर साहेबांना तूझ्या सारख्या नगात काय दिसलं तें? मुलगी दिसली नाही कि तोंडातून लाळ टपकते...."

 राजेशला वाटलं आता त्याला नक्कीच मार पडणार. तो कमिशनर कांबळेचा भाचा म्हणजे त्यांच्या बहिणीचा मुलगा. हुशार, तरबेज आणि कराटेत पारंगत, नुकताच IPS परीक्षा पास होऊन ASP म्हणून मुंबई पोलीस मध्ये दाखल झालेला. पण तो आयुष्या बाबत अगदीच निष्काळजी . म्हणून बहिणीने मागे लागून कमिशनरला, राजेशला एखाद्या गंभीर अधिकारी सोबत कामावर लावायला सांगितलं. अशा प्रकारे अजय सोबत मुंबईत अवैध दारू गोळा आणि हत्यार बाबत छानबिन करायला कमिशनर साहेबांनी राजेशला पाठवलं. तेव्हाच त्याला कमिशनर साहेबांनी सांगितलं होतं कि नको ती वायफळ बडबड केली तर तो अजयच्या रागाचा भक्ष होऊ शकतो. अजयला त्याच्या कामा शिवाय आणखी कशातच रस नाही. राजेश त्याचा पाय धरून बसला,

 ""भाऊ क्षमा, क्षमा प्लीज भाषण नको देऊ. मी नाही भेटत तिला ना नाव गाव विचारत. माझ्या भारत मातेवर अशा हजार मुली कुर्बान. अन माझं प्रेम खरं असेल तर आमची भेट परत नक्की होईल."

"हुम्म्म, नाटक पुरे. चल तें वधू संहिता आणि व्यक्तीमत्व विकास च्या कार्यालयात जायची वेळ झाली. उठ."

.................
तें गुंडे पळून गेले अंजली आणि गँग पाण्यात मनसोक्त खेळली. किंजलला अंजलीचं हे रुप आवडलं. 

"Baby I am impressed." अंगावर लाटा घेत किंजलने अंजलीला विचारलं. 

"काय?" अंजलीला इंग्रजी समजलं नाही. 

"अगं मला आवडलं तुझं असं वागणं. तु हे असं निर्भीड जगणं कशी शिकली?" किंजलनी तिला विचारलं.

"असंच, आवडतं मला. आपण कधी एखाद्या अडचणीत सापडलो किंवा कोणी आपल्यावर हल्ला केला तर कोणीतरी आपल्याला वाचवेल याची वाट बघत न बसता आल्या परिस्थितीशी दोन दोन हात आपल्याला करता यायला हवा मग तो मुलगा असो कि मुलगी ."

"छान आहे. आपण मिसेस परांजपेला म्हणायचं का कराटे ट्रेनिंग सुरु करा म्हणून मुलींसाठी." मेघा उत्साहात म्हणाली. 

"आजच हे का सुचलं असं त्यांनी विचारलं म्हणजे?" जयाने प्रश्न उठवला. 

यांचं संभाषण ऐकून अंजली त्यांना म्हणाली , "मी तर स्वयम घोषित शिष्या आहे झाँसी ची राणी लक्ष्मी बाईंची. त्यांना डोळ्यासमोर ठेऊन, त्यांच्याबद्दल पुस्तकं वाचून मी स्वतःच शिकली वाईट लोकांचा सामना करायला. तेव्हा काळजी नको. मी शिकवेल सर्वांना."

"काय गजब कॅरेक्टर आहे तु." किंजल खूप हसली तिच्यावर, "छान छान. आई वडिलांना माहितेय तूझ्या?"

"हो, त्यांना सगळंच माहितेय. म्हणून तर इथे पाठवलं आहे नाजूक पणाने राहायला शिकायला."

"हम्म, त्यांना नक्की भीती वाटत असेल, तु तुझ्या नवऱ्याला ठोकनार म्हणून." जया म्हणाली. 

"ए पण खरंच खूप हिम्मत दाखवली हा अंजलीने." शारदा म्हणाली, "नाहीतर माहित नाही आमचं काय झालं असतं? आपल्या परांजपे मॅडमला किती त्रास झाला असता."

"हो अंजली तु आम्हाला वाचवलं त्याबद्दल मी खूप आभारी आहे हं. पण मी तुला इंग्रजी वगैरे शिकवणार नाही हा. I am the one and only piece, the gem of वधू संहिता." किंजल तिचा गॉगल स्टाईलमधे डोळ्यांवर चढवून म्हणाली. 

"नको शिकवू, पण कृपा करून माझ्याशी मराठीतच बोलत जा. माझं डोकं गांगरून जातं."

"मग तर सर्वच मुलींनी तूझ्याशी इंग्रजीतच बोलायला हवं. नाहीतर तु इंग्रजी शिकणार कशी आणि माझ्या लग्नात बोलणार कशी?"

"म्हणजे तु अंजलीला तुझ्या लग्नात आमंत्रित करतेय?"

"हो." किंजल तिच्या मॉडर्न स्टाईल मध्ये उठत म्हणाली, "उठा आता. जायची वेळ झाली. मिसेस परांजपे शोधत असतील आपल्याला. त्यांना कोणीच काही सांगणार नाही. काय अंजली?"

"ह्या, मी तर अजिबात नाही. माझीच झडती व्हायची गुंडांशी भिडली म्हणून, मग बाबाला तार जाईल आणि आजी मला खूप रागवणार आणि मीरा माझी गंम्मत घेणार. नको बाबा आपलं गप्पच राहणं बरं."

"गुड." किंजलनी टाळी द्यायला हात पुढे केला. पण अंजलीला काय करायचं समजलं नाही.  किंजल तोंडातच हसून पुढे गेली. 

जातांना सर्व ओले आणि पाण्यात खेळून थकलेल्या म्हणून मुली श्रीमती परांजपे सोबत टॅक्सी करून गेल्या तर मुलं आपली आरामात पैदल वारी करून आले. 

अजय आणि राजेशने श्री परांजपे ला भेटून 'व्यक्तीमत्व विकास आणि इंग्रजी वक्तृत्व ' या अभ्यासक्रमाला दाखला घ्यायला आले. 

"नमस्कार " श्री परांजपे त्यांना म्हणाले, "कमिशनर साहेबांनी सांगितलं मला त्यांच्या भाच्याला आणि त्याच्या मित्राला इंग्रजी वक्तृत्व पारंगत होऊन विदेशात नौकरी करायला जायचं आहे तें व त्यासाठी इथे दाखला घ्यायचा आहे म्हणून." 

"हो हो, बरोबर." अजय म्हणाला.

"हो आम्ही कंटाळलो भारतात हमाली करून. आता आमच्या दोघांनाही वॉशिंगटनला जायचं आहे US डॉलर कमवायला." राजेशनेही छान बहाणा सांगितला. 

"हा मग तर छानच. आमच्याकडील विद्यार्थी देश विदेशात शिक्षणाला आणि नोकरी करायला गेले आहेत. तुम्हीही दोन महिन्यात फाडफाड इंग्रजी बोलाल बघा." श्री परांजपे आत्मविश्वासाने म्हणाले, "फक्त मेहनत तेवढी दिवस रात्र करावी लागेल तुम्हाला आणि कोणी कितीही हसलं तरीही इंग्रजीतच बोलायचा प्रयत्न करावा लागेल. काय आहे कि जेव्हा पर्यंत शब्द तोंडात बसत नाहीत, पाठांतर होत नाहीत, भाषा आपल्या अंगवळणी पडत नाही."

"हो हो नक्कीच. तुम्हाला भेटून तर माझा इंग्रजी बोलायचा कॉन्फिडन्स द्विगुणित झाल्यागत वाटतंय. पण प्लीज कोणाला आम्ही कमिशनर साहेबांच्या रेफरन्सनी आलो हे सांगू नका. उगाच मुलं भिऊन राहतील आम्हाला. आणि मग इथे एकटे पडू आम्ही."

"हो, कमिशनर साहेबांनी सांगितलं मला तसं. तेव्हा तुम्ही निष्काळजी राहा त्याबाबत. मी कोणालाही तुम्ही माझ्या दूरच्या नातेवाईकची मुलं आहात असंच सांगेल."

"धन्यवाद !"

"अरे नको, विद्यार्थ्यांना मदत करणं हे माझं कर्तव्य आहे." श्री परांजपे त्यांना बोलले. मग त्यांनी चपराशीला अजय आणि राजेशला त्यांच्या खोलीत न्यायला सांगितलं. 

क्रमश :

धन्यवाद !

तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी. 

फोटो साभार गुगल, Pinterest वरून 


©®अर्चना सोनाग्रे वसतकार

🎭 Series Post

View all