वधू संहिता भाग 10

A romantic & sweet, entertaining Story of a young mischievous girl & her groom. Thank you

अंजलीला वाटलं आता आलोच आहे मुलांच्या इमारतीत तर मंदारची भेट घ्यावी. सर्व मुलं आपापल्या खोलीत आराम करत होते. ती पावलांचा आवाज न करता  दुसऱ्या मजल्यावर जाऊन मंदारला शोधू लागली. मंदारच्या आवाजा वरून त्याची खोली लवकर समजेल म्हणून तिने एका खोलीच्या दाराला कान लावला, तेव्हा जे काही तिने ऐकलं त्यावर तिचा विश्वास बसेना, ते असं, 

"बबन पकडल्या गेला आहे. बॉस चांगलाच रागात आहे. तेव्हा काहीही करून आपल्याला बम्बईची वाट लावावीच लागेल." बावीस तेवीस वर्षाचा उमेश, त्याच्या वयाच्या वामनला म्हणाला.

"हो दादा, तु अजिबात काळजी नको करू. बम्बईची अशी वाट लागेल कि 26 जानेवारीला तिरंग्या कडे वर मान करून बघायचीही लाज वाटेल यांना, इतका तो तिरंगा रक्तात माखला जाईल."

"हम्म, चल कोणी आपल्या वर शंका घ्यायच्या आधी मी जातो माझ्या खोलीत." उमेश बाहेर निघतोय हे बघून धांदरलेली अंजली लपायला जागा शोधू लागली अन तिचा धक्का भिंतीवर ठेवलेल्या एका कुंडीला लागला. कुंडी खाली पडली. धपकन आवाज झाला. 

"काय झालं, कोण पडलं? " असं म्हणत सर्व मुलं आणि श्री परांजपे बाहेर येऊ लागले. 

अंजलीला समजलं आता या इमारतीच्या बाहेर पडल्या शिवाय मार्ग नाही. ती जशी आली होती तशीच परत दोन्ही इमारतीच्या मधात असलेली कंपाउंड भिंत ओलांडून गेली.

तिकडे श्रीमती परांजपे, मायाला अंजलीला असं घाबरवू नको  म्हणून समजवून सांगत होत्या. 

"गावातून आली आहे ती. हे सगळं नवीन आहे तिच्यासाठी. थोडा वेळ द्यायला हवा आपण तिला. आता गेटवर गार्ड असतांना कुठे पळाली ही मुलगी. काही झालं तर काय तोंड दाखवायचं तिच्या आई वडिलांना?"

"मला वाटलं नव्हतं ती इमारतीच्या बाहेर जाईल. सॉरी मॅडम." माया पश्चातापाने म्हणाली. 

श्रीमती परांजपेचे शब्द ऐकून अंजलीला हायसं वाटलं. ती लगेच त्यांच्या समोर गेली. 

"मी इथेच होती बाथरूम मध्ये लपलेली."

"पण आम्ही सर्व बाथरूम बघितले." मुली म्हणाल्या. 

"हो तेव्हा मी दुसरी कडे होती."

"कुठे?" जयाने विचारलं.

"असू दे कुठेही. अंजली सुखरूप आहे तेच खूप आहे. " श्रीमती परांजपे म्हणाल्या. 

"मी  सर्वांना खूप पळवलं, त्रास दिला. माफ करा. पण खरंच मला हे waxing  वगैरे पचायला वेळ द्या." अंजली कान पकडून म्हणाली. 

"ठीक आहे अंजली." श्रीमती परांजपे मुलींना म्हणाल्या, "चला ज्यांना waxing आणि इतर काही करायचं त्यांनी करून घ्या आणि इतर मुली आपापलं होमवर्क वगैरे करा. साडे सहाला हात पाय धुवून, वेणी फणी करून हॉल मधे बसा. आपण ध्यान आणि श्लोक पठन करू ."

"पण आज आपण बिचवर जाणार होतो ना?" शीलाने विचारलं. 

"हो, पण या सर्व गोंधळात खूप वेळ गेला. तेव्हा बिच वर उद्या जाऊ."

"मॅडम आपण रामरक्षा स्तोत्र घ्यायचं?" अंजलीने विचारलं. 

"तु म्हणशील?" श्रीमती परांजपेनी विचारलं. 

"हो, मला पाठांतर आहे." अंजली. 

"ठीक आहे तुझ्या मागे मागे म्हणू आम्ही. चला आता जा आणि साडे सहाला तयार राहा."

"ओके मॅडम ."

त्या दोघांचं संभाषण ऐकलं तेव्हापासून अंजलीचा जीव खूप घाबरायला. तिला मंदारची खूप काळजी वाटू लागली. मनात आलं श्रीमती आणि श्री परांजपेला सांगावं म्हणून.  पण त्यांनी विश्वास नाही ठेवला तर? आणि विश्वास ठेऊन जर सर्व मुलांची विचारपूस केली तर ती दोघं अलर्ट होतील. आपली चोरी पकडली गेली म्हणून वसतिगृहात कोणालाही इजा पोहचवतील. त्यात इमारतीत असलेल्या तिस मुलांपैकी कोणती दोन ति मुलं आहेत, तेही अंजलीला माहित नव्हतं. तिने फक्त त्यांचं संभाषण ऐकलं होतं. चेहरा नव्हता पहिला ना.

आता जे काही करायचं ते शांततेत आणि त्या दोघांना शंका येणार नाही अशा पद्धतीने करायचं. फक्त सर्व मुलांच्या हालचाली वर नजर ठेवायचं तिने नक्की केलं. 

स्वतःला शांत करण्यासाठी संध्याकाळी रामरक्षा स्तोत्र म्हणनं बरं वाटलं. 

.......................

दुसरा दिवस उगवला. आधीच्या दिवसा सारखं योगा, इंग्रजी, व्यक्तीमत्व विकास असे वर्ग झाले.

दोन वाजता अंजलीसाठी नवीन कपडे बनवायला डिझायनर हेमा आली. तिने घातलेली साडी नक्की कुठून सुरु होते आणि कुठे संपते तेच बिचाऱ्या अंजलीला कळेना. कारण त्या साडीचा पदर बाहेर दिसतच नव्हता.

"हे कसल्या पद्धतीची कापडं घालतात इथे?" अंजलीला प्रश्न पडला. 

अंजलीचा शुभ्र रंग आणि नितळ कांती पाहून हेमाने तिच्या साठी गुलाबी, पांढरा शुभ्र  आणि पिस्ता अशा रंगाचे तीन सलवार सूट, एक आकाशी रंगाचा टाचेच्या थोडा वर येईल असा फ्रॉक  रामलाल शिंपी ला शिवायला सांगितलं. दोन्हीही सूट वर समोर सुंदर शोभेल अशा रंग संगतीचे भरतकाम करायला दिलं. तसेच एक हिरवं सोनेरी काठ असलेलं ब्लाउज बनवायला बोललं. त्यांच्या सहकारी मुलीने  अंजलीची मापं लिहून घेतली. 

नवीन कपडे मिळतील म्हणून अंजली अर्थातच खुश होती. पण इथले नियम कायद्यांनी तिचा जीव  नकोसा केला होता, त्यात ते बम्बईत काहीतरी कांड करायचं त्या दोघांचं संभाषण!

दुपारी तीन वाजता श्री व श्रीमती परांजपे सर्व मुलं व मुलींना घेऊन जुहू बीचवर पायीच निघाले. बिचवर जायचं म्हणून मुली मस्त रंगीबेरंगी टि शर्ट जिन्स , स्कर्ट टॉप, फ्रॉक, टाईट सलवार सूट असे कपडे घालून आल्या. 

"Oh my god, yellow yellow dirty fellow." स्लीव्हलेस लाल गर्द फ्रॉक घातलेली किंजल अंजलीला बघून म्हणाली, "This girl will definitely low our class today."

अंजलीला किंजल काय बोलली ते जरी समजलं नाही तरी इतकं समजून आलं कि ती अंजलीच्या कपड्यांची गंम्मत उडवतेय. तिने स्वतः च्या पिवळ्या परकर, पोलक्याला बघितलं.  तिला किंजलच्या डोक्यात काहीतरी फेकून मारावंस वाटलं. ती काही बोलणार तोच मंदार आला. 

"ताई कसा गेला तुझा पहिला दिवस?" मंदारने अंजलीला विचारलं. पण अंजलीचं सगळं लक्ष इतर मुलांवर होतं. त्यातले कोण ते दोघं असतील? याचा विचार ती करत होती. 

"ताई?" मंदार तिला हलवून म्हणाला, "काय झालं? तुला कोणी आवडलं का यांच्यातलं?"

"मंदार, मार पाहिजे तुला?" अंजलीने त्याचा कान पकडला, "मी सहजच बघत होती,  कि या मुलांनी असे कसे केस कापलेत?"

"अगं त्याला अमिताभ बच्चन ची केसं लावायची म्हणतात."

"हा कोण? नवीन मित्र का तुझा?"

"नाही ताई. तो मोठा हिरो आहे सिनेमाचा."

"मग आपल्या गावात त्याचा सिनेमा का नाही आला?"

"कारण त्यात जास्त मारधाड आणि बरंच काही असतं म्हणे. आपल्या गावात कसे कौल दे खंडेराया, राजा छत्रपती, राजा हरिश्चंद्र, विष्णू पुराण असले सिनेमे आणतात पडद्यावर दाखवायला."

"हम्म !''

"अंजली" श्रीमती परांजपेनी तिला आवाज दिला, "इकडे ये. मुलींसोबत जा समुद्र पाहायला. मंदार तु मुलांसोबत जा."

"ए समुद्र आला वाटतं जवळ. बघ कसला भारी आवाज येतोय कानावर."

"हो ताई. आज मज्जा आहे आपली."

"हो ना. माझी खूप इच्छा होती समुद्राला भरती, ओहोटी घेतांना पाहायची. भूगोल च्या मास्तरांनी सांगितलं होतं कि भरती आली कि समुद्र समोर समोर येतो आणि ओहोटी आली कि मागे मागे जातो."

"हो" मंदार मान हलवून म्हणाला. त्याचं लक्ष त्या दोघांना बघत असलेल्या श्रीमती परांजपे कडे गेलं, "चल ताई जा तु त्यांच्यासोबत."

"हो हो बिच फिरून झालं कि भेटू!"

दोघेही आपापल्या ग्रुपमधे गेले. 

श्री आणि श्रीमती परांजपे मुला मुलींना जास्त पाण्यात जाऊ नये, अनोळखी लोकांशी बोलू नये, आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं वागू नये. वगैरे वगैरे सूचना देऊन समुद्राच्या लाटांना पाहत किनाऱ्यावर वाळूत बसले. 

"किंजल, शर्यत हरलीस तु काल." शीलाने कालच्या शर्यतची किंजलला आठवण करून दिली, "मायाने अंजलीची  waxing काय पण आयब्रोही नाही केली. तेव्हा तुला माहितेय ना तुला काय करायचं आहे?"

"काय?" शारदा म्हणाली, "किंजल मुळीच असं काही करणार नाही."

"It's ok Sharda, अनोळखी मुलासोबत हसून बोलायचंच तर आहे. त्यात काय इतकं?" किंजल तिच्या डोळ्यांवरचा गॉगल नीट करत बेफिक्रीने म्हणाली. 

"काय, कसली शर्यत लावली होती तुम्हा लोकांनी माझ्या नावानं?" अंजलीने कुतूहलानं विचारलं. 

"तु पळून गेल्यावर किंजलने शर्यत लावली होती म्हणे पोरींशी कि तु कितीही धावलीस तरीही माया तुझ्या आयब्रो आणि waxing करूनच दम घेणार." मेघाने माहिती पुरवली, "पण ती हरली आणि जो हरणार त्याला अनोळखी मुलासोबत हसून बोलायचं आहे."

"गजब रे बाबा तुम्ही पोरी. करा काय करायचं ते. मी तर मस्त बसून अंगावर लाटा घेणार आहे समुद्राच्या." अंजली ओल्या वाळूत, लाटा अंगावर येतील तिथे बसली.

मुलासोबत हसून बोलायचं आहे म्हणून किंजल मुलींना घेऊन श्री व श्रीमती परांजपेला त्या मुलासोबत बोलतांना दिसणार नाहीत इतक्या दूर गेल्या.

मुलांना सक्त ताकीद होती कि 'वधू संहिते' च्या कोणत्याच मुली सोबत बोलायचं नाही किंवा वळूनही पाहायचं नाही. जो कोणी हा नियम तोडेल त्याला व्यक्तीमत्व विकास या कोर्स मधून वगळण्यात येईल.  म्हणून मुलं विरुद्ध दिशेने फिरायला गेले. 

किंजल कोणत्या मुलासोबत बोलायचं म्हणून इकडे तिकडे बघत होती. तिला एका मक्याचे कनूस भाजून देणाऱ्या एका हात गाडी जवळ दोन तरुण मुलं दिसली. दिसण्या वरून ती कॉलेजला जाणारी चांगल्या घरची मुलं वाटली. 

"हाय, मी किंजल !" किंजल त्यांच्या जवळ जाऊन त्यातल्या एकाला म्हणाली, "मला नवीन लोकांशी ओळख करायला आवडतं."

"छान!" तो किंजलला वर पासून खाली न्याहाळत म्हणाला, "आम्हालाही आवडतं."

"चल आमच्या सोबत. तुला मज्जा करवू." दुसरा तिला डोळा मारून तिचा हात पकडत म्हणाला. 

"ए सोड तिचा हात." शारदा त्याला म्हणाली. 

"ओहो सॉरी हा, तुला नाही विचारलं सोबत यायला. म्हणून रागावलीस वाटतं. तुही चल."

"हो आम्हा दोघांना दोघी होतील. उगाच वाट पाहायची झंझट नको." पहिला शारदाचा हात पकडून डोळे मिचकावून म्हणाला.

आजूबाजूला फिरणाऱ्या काही मुलांनी त्यांना हटकलं. पण त्याने मुलांना खिशातला चाकू काढून आपल्या कामाशी काम ठेवायला सांगितलं नाहीतर आतडी बाहेर काढायची धमकी दिली. म्हणून मग कोणीच समोर आलं नाही.

"हा आमचा अन या पोरींचा मामला. यात कोणीच पडायचं नाही." पहिला म्हणाला. 

"तसही आम्ही नव्हतो गेलो यांच्याकडे. ह्याच आल्या अन मैत्री करायची म्हणाल्या." दुसऱ्यानी कनूस भाजनाऱ्याला विचारलं, "हो कि नाही भाऊ?"

"हो हो." तो बिचारा भीत भीतच म्हणाला, "मी गाडी पुढे नेतो. तिकडे लोकं दिसताहेत."

दुरून त्यांना कोणीतरी बघत होतं,

"या मुलींना स्वतःचं रक्षणही करता येत नाही. मग घराबाहेर पडतातच का?" तो त्याच्या सोबत्याला म्हणाला.

"हो पण सामान्य नागरिकांचं रक्षण करणं आपलं पहिलं कर्तव्य आहे." त्याचा सोबती बोलला. 

"नाही आपण या मुलींसाठी आपली खरी ओळख बाहेर आणायची जोखीम नाही घेऊ शकत." तो. 

"मग त्या गुंडांना घेउन जाऊ द्यायचं का त्या मुलींना आपल्या डोळ्या देखत?"

"म्हणून मला माझ्या आयुष्यात कोणती मुलगी नको आहे. यांना अक्कल कवळीची नसते. स्वतःला नको तितकं जपतात. नको तिथं फुलपाखरू बनून फिरतात अन मग आशा जाळ्यात अटकतात" तो अत्यंत रागात बोलला. त्याचे डोळे रागानं लाल झाले, " वाटतंय आपली  पूर्ण योजना या मुलींना वाचवण्याच्या पायी खड्ड्यात जाणार आहे." 

क्रमश :

धन्यवाद !

तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी. 

फोटो साभार गुगल, Pinterest वरून 


©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

🎭 Series Post

View all