द बॉस..!!!(The Boss)

Story Of A Female Entrepreneur
घाईघाईने तानिषाने दिसेल तो भाजीपाला उचलला आणि दोन अवजड पिशव्या घेऊन ती counter वर बिल द्यायला आली, भाजी मार्केट मध्ये बरीच गर्दी होती, बायका एकेकाची किंमत विचारून उद्गारवाचक प्रतिक्रिया देत होत्या पण तनिषा मात्र किंमत न विचारता एकेक भाजीपाला बास्केटमध्ये टाकत होती. इतका सगळा भाजीपाला अन भलंमोठं बिल बघून भाजीविक्रेत्याने न राहवून विचारलं..

"तुमची मेस आहे का?"

"नाही...पण माझ्या लाईफ मध्ये मात्र खूप mess आहे.."

त्याला काही समजलं नाही, तो गोंधळला. तनिषा त्याला म्हणाली,

"भाऊ किती झाले?"

"860 रुपये.."

तनिषाने पटकन बॅग खाली ठेवल्या, कोड स्कॅन करून पेमेंट केले आणि पिशव्या उचलून चालायला लागली. तोच एक महत्वाचा फोन आला. भैरव चा..आता भैरवचा कॉल म्हटल्यावर अर्जंट काहीतरी असणार म्हणून तिला तो उचलणं भाग होतं. तिने पिशव्या परत खाली ठेवल्या आणि कॉल घेतला. तिकडून भैरव काहीतरी बोलला अन ही एकदम ओरडली,

"फक्त एकच? तीन कोटींची डील आहे..त्याला म्हणा 3 कोटीत ऐक नाहीतर दुसरे पाच-पाच कोटी देणारेही आहेत लाईनमध्ये.."

भाजी मार्केट मधल्या बायका डोळे मोठे करून तिच्याकडे बघायला लागल्या, सर्वांचे डोळे विस्फारले गेले,


एका साध्या वेषातली, विस्कटलेले केस अन ढगळा वेष घालून आलेली आणि भाजीपाला घेऊन जात असलेली ही बाई तीन कोटींचा सौदा करतेय? तेही हातात भाजीच्या दोन अवजड पिशव्या घेऊन?

गर्दी तिच्याकडे बघायला लागली तशी ती जरा ओशाळली, बाजूला जाऊन भैरवला सूचना दिल्या आणि घाईघाईने भाजीपाला उचलत घरी जायला निघाली. घरी जात असतांना डोक्यात असंख्य विचार सूरु होते. तिने एकदा भाजीपाल्याच्या पिशवीकडे बघितलं..मनात एका वेळी असंख्य विचार सूरु झाले..

"सगळं घेतलंय ना? माईंनी दोडका सांगितला होता..मेथीही घेतलीये..कधी निवडायला वेळ मिळेल देव जाणे. चवळी पण घेतलीये..स्वराची उद्या parents मिटिंग आहे, आर्याला प्रोजेक्ट साठी मदत करायची आहे, अरे देवा..!! तिची स्टेशनरी राहिलीच की..."

तनिषा ने पुन्हा गाडी वळवली आणि स्टेशनरी मध्ये जाऊन समान आणलं, परत येताना पुन्हा चवळीकडे लक्ष गेलं..
चवळी बघताच ऑफिसमधल्या जागृतीची आठवण झाली,

"जागृतीला चवळीच म्हणतात. फार टापटीप राहते बुवा ती, पण मार्केटिंग चा रिपोर्ट काढलाय का तिने? अरे देवा..मागच्या वेळी म्हटलेलं तिला की 2 दिवसात रिपोर्ट दे. मी मागितला नाही तर दिलाच नाही तिने..थांबा बघतेच तिच्याकडे. मिटिंग मध्ये काय सुरू असेल? मला अटेंड करायची होती यार...!! पण ह्या माई ना, फारच हट्टीपणा करतात, काय तर म्हणे आत्ताच्या आत्ता भाजीपाला आण.. माईंना डिपार्टमेंट हेड करायचं का? सगळे कसे शिस्तीत काम करतील, पण माईंचा तो आजार आडवा आला आणि..."

विचारांचं चक्र सुरू असतानाच घर कधी आलं कळलंच नाही. तनिषाने अवजड पिशव्या दारात ठेवल्या. माई हॉल मधेच होत्या, पिशवीकडे निरखुन बघत होत्या, माईंनी नवीन काहीतरी काढायच्या आधी तनिषा आत गेली पण माईंनी आवाज दिलाच..

"तने, येतांना कोपऱ्यावरच्या दुकानातून हेयर डाय घेऊन ये.."

"हुश्श.. मला वाटलं आता पाठवताय की काय.."

तानिषाने मान डोलावली अन चटकन खोलीत जाऊन दरवाजा लावून घेतला.

दरवाजा लावला तशी तनिषाची भूमिका बदलली, खोलीत tv सुरू होता, त्यावर फॅशन सिनेमातील "मर जावा..तेरे इश्क मे..मर जावा.." गाणं सुरू होतं, त्या गाण्यावर आणि त्याच्या संगीताला शोभेल अशी तानिषाची तयारी सुरू होती.

तिने कोमट पाण्याने हात पाय धुतले, अंगावरचा कुर्ता सलवार उतरवून तिने ट्राउजर आणि चकचकीत ब्लेझर अंगावर चढवलं, ओबडधोबड बांधलेले केस मोकळे सोडून स्ट्रेटनरने हेअरकट नीट केला, चेहऱ्यावर मेकअप चढवला, हातात महत्वाच्या फाईल्स, मोबाईल आणि पर्स घेऊन ती मागच्या दाराने शब्दांतर मध्ये जायला निघाली.

"शब्दांतर.." magazine च्या दुनियेतील अव्वल नाव. अल्पावधीतच शब्दांतर मासिक घराघरात पोहोचलं होतं. त्यातला अचाट कंटेंट वाचून वाचकांना वाचनाचं व्यसनच लागलं होतं. शब्दांतर ची लोकप्रियता बघून competitors दुसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी धडपडत असायचे, कारण पहिला क्रमांक शब्दांतरचा ठरलेला. पब्लिकेशन क्षेत्रात शब्दांतरचं नाव मानाने घेतलं जाई. देशभरात विविध भाषांमध्ये पसरलेल्या शब्दांतरची वर्षाला 60 कोटींची उलाढाल चाले, आणि याचं हेड ऑफिस म्हणजे जणू पर्यटनाचं एक स्थळच..मॉडर्न इंटेरिअर, चकचकीत फर्निचर आणि काम करणारे कर्मचारीही अगदी हाय क्लास. तनिषा तिथे जात होती..

तानिषा गाडीतून उतरली, रिसेप्शन जवळ जागृती आणि नेहा गप्पा मारत होत्या, तानिषा मागून जाऊन ऐकू लागली,

"अगं रोहननेच ब्रेकप केलं तिच्याशी, नाहीतर तिने कसलं सोडलं असतं.."

हे ऐकून तानिषाला वाईट वाटलं, ती म्हणाली..

"अरेरे...वाईटच झालं.."

तानिषाला मागे असं आलेलं पाहुन जागृती सरळ उभी राहिली, नेहाच्या हातातल्या फाईल्स तर खालीच पडल्या..कशीबशी सावरत ती उभी राहिली आणि म्हणाली.

"सॉरी मॅडम, सॉरी...ग..गुड मॉर्निंग मॅडम.."

तनिषाने एक कटाक्ष टाकला आणि ती आपल्या केबिनकडे जायला निघाली. एखादा राजा आपल्या सिंहासनाकडे मार्गस्थ होतांना वाटेतले दरबारी जसे मुजरा करतात तसं एकेक कर्मचारी तिला उभं राहून गुड मॉर्निंग करत होता.

होय, ही आहे तनिषा..घरात एक जबाबदार गृहिणी, बायको, आई, सून आणि बाहेर एक वर्चस्व असलेली तडफदार बिझनेस वूमन. शब्दांतरची सर्वेसर्वा.

तिने आपल्या केबिनमध्ये प्रवेश केला आणि चष्मा लावून एकेक रिपोर्ट बघू लागली. भैरवला बोलावून घेतलं आणि मिटिंग बद्दल माहिती घेतली..

"मॅडम मिटिंग चांगली झाली पण तुम्ही हव्या होतात. "

"कसं येणार होते मी, माई तर माहीतच आहेत तुला..ऐनवेळी हट्ट धरला, भाजीपाला आण म्हणे..त्यात दोन्ही मुलींचं...सोड, मी काय बायकी गप्पा मारत बसले.."

भैरव हसू लागला..

"तुला हसायला काय झालं?"

"हसू नको तर काय करू, कोटींच्या मालकीण तुम्ही, घरात प्रत्येक कामाला माणसं लावली तर काय हरकत आहे?"

"शक्य नाही ते..माईंमुळे.. माझ्या सासूबाई. त्यांना bp चा आणि वर मानसिक त्रास आहे काहीतरी. मानव म्हटला होता की त्यांना कसलाही मानसिक ताण नको, एकतर घरात बसणारी मुलगी करायची होती त्यांना..कसंबसं जॉबचं कारण सांगून निघतेय बाहेर..नवरा डॉक्टर आहे, त्यानेच ताकीद दिलीय.."

"किती वाईट आहे हे..आपली सून इतक्या मोठ्या कंपनीची मालकीण आहे हेही त्यांना माहीत नाही?"

"माहीत व्हायलाही नको, नाहीतर...जाऊदे.."

क्रमशः

तर वाचकांनो, आजपासून सुरू होतोय एका नव्या, अनोख्या कथेचा प्रवास. तनिषा सोबत. एका तडफदार, झुंजार आणि दुसरीकडे क्षणाक्षणाला गृहिणी आणि बॉस असे दोन्ही रुपं धारण करणाऱ्या एका विलक्षण स्त्री ची...आवडेल माझ्यासोबत हा प्रवास? लाईक, कमेन्ट नक्की करा...म्हणजे पुढचा भाग अजून जोरदार होईल..

🎭 Series Post

View all