द बॉस- The Boss (पर्व 2- भाग 7)

Tanisha Raised A Funding Of 3 Million Dollars
तनिषाने फोन ठेवला आणि मानवच्या पोटात गोळाच आला. तिथे काय झालंय हे त्याला टीम कडून समजलं, खूप मोठा आघात होता तो तिच्यासाठी. अश्या परिस्थितीत तनिषाला आधार द्यायला तोही जाऊ शकत नव्हता, कारण तनिषानेच त्याला मनाई केलेली. तिला वेळ हवा होता आणि त्याने तो तिला दिला. मुली मोठ्या झालेल्या, काही वर्षे भैरवने जबाबदारी सांभाळली आणि पदवी घेतल्यानंतर आर्याकडे ती जबाबदारी आली. मानवला तनिषाची काळजी होतीच, पण त्याहून जास्त त्याला विश्वास होता, तनिषा शांत बसणार नाही, कारण तीव्र वेदनेतून घेतलेल्या झेपेला चारपट अधिक गती असते हे तो जाणून होता. गेली अनेक वर्षे तनिषा अज्ञातवासात होती. तिने कुणालाही काहीही खबर कळू दिली नाही. अधूनमधून तिचा फोन येई, ती सुखरूप आहे हे सांगायला. बाकी ती काय करतेय, कुठे आहे हे सांगणं कटाक्षाने टाळत असे.

मानव ती येण्याची वाट बघत होता. एक ना एक दिवस ती परत येईल...पण जेव्हा येईल तेव्हा वादळ घेऊन येईल..!!!

****

"अनुष्का मग ते पिच डेक चं काय झालं? मॅम ने ते सादर केलं की नाही? त्यांचं प्रेझेंटेशन आवडलं का इन्व्हेस्टर्स ला?"

(फ्लॅशबॅक)
तनिषाने पिच डेक साठी तयारी केली, छानपैकी प्रेझेंटेशन बनवलं..आपल्या सर्व आयडियाज त्यात टाकल्या. SWOT analysis, revenue model, project flow, content analysis, market research हे सगळे मुद्दे व्यवस्थित टाकले. मनात चलबिचल होती, अजूनही द्विधा मनस्थिती होती. पण कुठेतरी रिस्क घ्यायलाच हवी त्याशिवाय एक पाऊल पुढे टाकता येणार नाही असं म्हणत तिने मनाचं समाधान केलं.

24 तारखेचा दिवस उजाडला, इव्हेंटच्या ठिकाणी अगदी सुसज्ज व्यवस्था होती. प्रेक्षकांसाठी कोऱ्या करकरीत खुर्च्या, हाय टेक स्टेज, डोळे दिपवून टाकणारी प्रकाशसज्जा... आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या देशातून आलेले हुशार कॅण्डीडेट्स. आपलं स्टार्टअप पुढे जावं यासाठी भांडवल मिळवण्यासाठी सर्वजण चढाओढ करायला आले होते. इन्व्हेस्टर्स सुद्धा अश्या शंभर उमेदवारातून अश्या एकाच्या शोधात असतो ज्यात त्याला उद्याचा स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकेरबर्ग किंवा एलोन मस्क दिसेल. अश्यांना भरभरून भांडवल आणि इतर सुविधा दिल्या जातात.

तनिषाच्या प्रेझेंटेशन मध्ये सर्व गोष्टी होत्या, फक्त एक गोष्ट अर्धवट होती. ती मुळात इथे आलेली ते अमेरिकन लोकांचा अभ्यास करायला, त्यांना वाचायला, त्यांना जे हवंय ते ते मासिकातून त्यांच्यापर्यंत पोहोचायला.. पण तिचं ते रिसर्च अर्धवटच राहिलेलं..आत्तापर्यंतच्या अमेरिकेच्या वास्तव्यात तिला जे जे अनुभव आले त्यावरून तिने थोड्याफार आयडियाज त्यात टाकल्या.

इव्हेंटला सुरवात झालेली. तिथे सलग खुर्च्यांच्या ओळी नव्हत्या, गोलाकार टेबलभोवती पाच-पाच खुर्च्या होत्या आणि त्यावर एकेक टीम बसली होती. बहुतांश स्टार्टअप कंपन्या पार्टनरशिप मध्ये तयार होतात. मोठमोठ्या university मधून शिकलेले, सिलिकॉन व्हॅली मधून शिक्षण घेतलेले नव्या दमाचे तरुण तिथे होते. नेहमीप्रमाणे पुरुषच जास्त, महिला अगदी नगण्य. शब्दांतर साठी एक टेबल दिला गेला होता. तनिषा एकटीच त्यावर बसलेली. मेघना कंपनीचा भाग नसल्याने तिला आत येण्याची परवानगी नव्हती. तनिषा टेबलवर बसली असता समोर काही पुस्तकं ठेवली होती, ते ती चाळत बसली. स्टीव्ह जॉब्स चं एक पुस्तक होतं ते ती वाचत होती. आसपासच्या टेबलवरून तिच्याकडे बघून खोचक कमेंट्स पास होत होत्या, वर्णभेदी इथेही होतेच. अमेरिकेतील IT क्षेत्र भारतीयांनी कब्जा केल्याचा राग कुणाच्या मनात होता, काहींना गोऱ्या माणसांनीच वर्चस्व सिद्ध करावं असं वाटत होतं तर काहीजण प्रांतवादी... आमच्याच राज्यात येऊन आमच्यावर हुकूमत गाजवणारे तुम्ही कोण? असा सूर मन(से) दिसतच होता.

तनिषाचं लक्ष तरी कुठे होतं, ती तिच्या पुस्तक वाचनात बुडालेली. एकेक पिच सुरू झाले. नवनवीन तरुण आपापल्या स्टार्टअप बद्दल माहिती सांगत होते. इकडे तिच्या बाजूच्या टेबलवर काही आगाऊ मुलं होती. तेही त्यांच्या कंपनीचं प्रेझेंटेशन घेऊन आलेली. तनिषाकडे बघून "one man company" असं चिडवत होती. तनिषाला ते समजलं, स्टेजवर प्रेझेंटेशन सुरू होतं... ती मधेच उठली आणि म्हणाली,

"Excuse me sir.."

"Yes?"

सर्वजण तिच्याकडे पाहू लागले..

"These guys are passing a comments as this event is just a crap, now you decide...Over to you.."

इव्हेंट मॅनेजर चिडला, ती मुलं गपगार झाली..एक तर आपण असं नाही बोललो यावर कुणी विश्वास ठेवणार नव्हतं आणि खरं काय बोललो हेही सांगणं शक्य नव्हतं. मॅनेजरने त्यांची चांगलीच शाळा घेतली, पुढचा पूर्ण इव्हेंट ती मुलं मान खाली घालुन बसून होती.

तनिषा पुस्तक वाचत असतांना तिने एक प्रसंग वाचला आणि ती विचलित झाली, तिच्या मनात चलबिचल सुरू झाली. तेवढ्यात तिचं नाव पुकारलं गेलं..

ती पुढे गेली आणि आपल्या कंपनी बद्दल पूर्ण प्रेझेंटेशन दिलं. तनिषा काही स्टार्टअप कंपनीमधली नव्हती, भारतात बिझनेसमध्ये मुरलेली व्यक्ती होती, बिझनेस मधले बारकावे, प्रॅक्टिकल गोष्टींना धरून चालणारं आर्थिक नियोजन, मार्केटिंग स्ट्रॅटेजीज..हे सगळं तिने अधोरेखित केलं. शब्दांतरची सर्वेसर्वा.. करोडोमध्ये चालणारे व्यवहार आणि मोठी टीम घेऊन कंपनी चालवणाऱ्या व्यक्तीचं प्रेझेंटेशन आवडणार नाही तर काय..टाळ्यांचा गडगडाट झाला...तिच्या बुद्धिमत्तेची चुणूक इन्व्हेस्टर्सला दिसून आली.तरी एका इन्व्हेस्टर ने तिला प्रश्न विचारला..

"तुमचं सगळं छान आहे, पण इथे स्पर्धा खूप आहे..खूप संघर्ष आहे..त्यासाठी तुमची तयारी कितपत आहे?"

तनिषा हसली..

"सर, भारतात करोडोची कंपनी चालवतेय... सुरवात केली तेव्हा दोन लेकी हाताशी होत्या..एकीच्या गृहपाठाला मदत करत होते आणि दुसरीला छातीशी धरून पाजत होते.. घरात हट्टी सासू आणि कायम बाहेर असणारा नवरा...यातून शब्दांतरचं साम्राज्य उभ्या केलेल्या व्यक्तीच्या संघर्षावर प्रश्नचिन्ह उभं करताय?"

तिच्या या उत्तराने सर्वजण भारावून गेले. इन्व्हेस्टर्स ने तिथेच घोषित केलं की तिला 3 मिलियन चं फंडिंग जाहीर करत आहोत..

"सर पण एक गोष्ट राहिली..मला हे सांगायचं आहे की मला फंडिंग नकोय...मी फक्त स्वतःची लायकी पारखायला आलेले.."

सर्वजण चकित झाले..

🎭 Series Post

View all