द बॉस- The Boss (पर्व 2- भाग 6)

Tanisha Is Thinking To Meet Investors


तिकडे आर्या पटापट सह्या करून निघून जाते. ज्या कर्मचाऱ्याने त्या सह्या घेतलेल्या असतात त्याचं नाव असतं मिस्टर दिवेकर. शब्दांतर मध्ये त्याचं वागणं जरा विचित्रच होतं. एकंदरीत तो विकृत स्वभावाचा होता, लालची होता. कुणी चार पैशाची लालूच दाखवली तर तो काहीही करायला तयार व्हायचा. त्याने त्या फाईल्स पाहिल्या, त्यावर नेहमीप्रमाणे न बघता सह्या झालेल्या होत्या. दिवेकर खुश झाला, त्याने पटकन फोन काढला आणि विवेक पटेलला लावला,

"सर, काम हो गया है.."

(आता तुम्ही म्हणाल हा विवेक पटेल कोण? शब्दांतरचे शत्रू कमी नव्हते...त्यातलाच हा एक, सविस्तर येईलच पुढे)

तर झालं असं की विवेक पटेल नामक एका प्रकाशकाला शब्दांतर च्या लोकप्रियतेला जमीनदोस्त करायचं होतं. आणि त्यासाठी एकच मार्ग होता, शब्दांतरबद्दल लोकांच्या मनात चीड निर्माण करायची, असं काहीतरी करायचं की ज्याने शब्दांतरवर लोकं बहिष्कार टाकतील, सोशल मीडियावर #ban_shabdanatar असे मथळे येऊ लागतील, एकदा का शब्दांतरची प्रतिमा मालिन झाली की मग जाहिरातदार, व्यावसायिक त्यांच्याकडे पाठ फिरवतील आणि शब्दांतरचा शेवट होईल.

तनिषा मॅम असत्या तर गोष्ट वेगळी होती, आधीच कामचुकार आर्याच्या हातात सगळं होतं आणि त्यात हे मोठं संकट खुणावत होतं.

दिवेकरने त्या फाईल्सची सॉफ्ट कॉपी प्रिंटिंग हेड ला दिली आणि सोबतच आर्या मॅमचं अप्रुव्हल त्यात दाखवलं. सर्वप्रथम एडिटर्स कडून आणि नंतर proofreader कडून मासिकात छापले जाणारे आर्टिकल्स तपासले जायचे, मग तेच एकदा भैरव सर तपासत आणि सर्वात शेवटी आर्या मॅडम.आर्या मॅडमचा शिक्कामोर्तब झाला की त्यात काहीही बदल होत नसे. पण दिवेकरने इथेच मुख्य खेळी खेळली, भैरव सरांकडून अप्रुव्ह झालेले आर्टिकल्स पुढे आर्या मॅम कडे देतांना त्यात काही खळबळजनक आर्टिकल्स ऍड केले. आर्याला वाटलं भैरव सरांनी अप्रुव्हल दिलं म्हणजे झालं...

प्रिंटिंग हेडचं काम फक्त एवढंच होतं की आलेल्या सॉफ्ट कॉपीज चे सेट करून मासिकं छापायला सुरवात करायची. दिवेकरने प्रिंटिंग हेडला सांगितलं..

"उद्या सकाळी सकाळी प्रिंटिंगला सुरवात करून टाका..."

प्रिंटिंग हेड ने होकार दर्शवला. आता दुसऱ्या दिवशी मासिकं छापले जाऊन लगेचच ते मार्केटमध्ये दिले जाणार होते.

*****

दिवेकर काम झाल्यावर विवेक पटेल कडे जातो.

"ये लिजीए आपके तीन लाख...बाकी दो लाख शब्दांतर जलने के बाद.."

"नुसतं जळणार नाही साहेब, बेचिराख होईल...बघाच तुम्ही..पण शब्दांतर सम्पल्यावर या गरिबाला तुमच्याकडे नोकरीला ठेवून घ्या प्लिज.."

"हा हा, क्यो नही..!!!"

दिवेकर खुश होतो आणि पैसे मोजत निघून जातो. विवेक पटेल त्याच्याकडे तुच्छ कटाक्ष टाकून मनाशीच म्हणतो..

"नमकहराम..तुझे तो खडा भी नही करुंगा मै, जिस थाली मै खाया उसीमे छेद करनेवाले..."

*****

(शब्दांतरचा लंच ब्रेक...)

"म्हणजे तनिषा मॅमला अमेरिकेत इन्व्हेस्टर्स ने बोलावलं, पण त्यांची जायची इच्छा नव्हती...मेघनाने त्यांना फोर्स केला..पुढे??"

(फ्लॅशबॅक)

बार मधून तनिषा आणि मेघना बाहेर पडतात. दोघींनीही ड्रिंक्स घेतलेली असल्याने टॅक्सी करून त्या घरी जातात. मेघना तनिषाला आधी सुखरूप घरी पोचवते आणि मग ती तिच्या घरी जाते. दुसऱ्या दिवशी जड डोकं घेऊन तनिषा उठते, आज पहिल्यांदा उठायला उशीर झालेला..कामं खूप होती पण डोकं थांबायचं नाव घेईना..

"काय हौस असते लोकांना ड्रिंक्स ची, अख्खा दिवस खराब होतो.. श्या.."

ती tv सुरू करते, एक गाजलेला अमेरिकन शो सुरू असतो. हा शो इतका लोकप्रिय होता की या वेळात रस्त्यावरही गर्दी कमी असायची. शो च्या मध्ये मध्ये जाहिराती दाखवत..या जाहिराती खूप मोठमोठ्या ब्रँड्स च्या होत्या. तनिषा विचार करू लागली, या जाहिरातींसाठी लोकं लाखो करोडो रुपये..सॉरी, डॉलर्स खर्च करत असतील...आपल्याला इतका खर्च करणं शक्य आहे पण कितीही म्हटलं तरी कंपनीच्या फायनांशील डिपार्टमेंटवर ताण येईल..इतका खर्च करून मार्केटिंग तर जबरदस्त होईल पण ...

इतक्यात तिला मेघनाचा फोन येतो..

"हॅलो तनिषा, बरी आहेस ना?"

"यापुढे मी अश्या पार्टीजला येणार नाही, आधीच सांगून ठेवते.."

मेघना हसायला लागते,

"डोकं जड झालंय वाटतं..बरं ते जाऊदेत..इन्व्हेस्टर्स पिच डेक चा काय विचार केलाय?"

समोर जाहिराती सुरू असतात, मनात शब्दांतर च्या मार्केटिंग चा आणि खर्चाचा विचार सुरू होताच, तिला positive संकेत येऊ लागले.

"प्रयत्न करायला हरकत नाही.."

"बरं मग आता छानपैकी एक प्रेझेंटेशन बनव आणि 24 ला तयार रहा.."

"अगं पण माझं मुख्य काम बाजूलाच राहिलं की, इथे ऑफिसमध्ये मी स्टाफ आणून ठेवलाय पण मी अजून गेले नाही.. बाकी स्टाफ अजून hire करायचा आहे..मासिक कसं हवं, त्यात काय काय हवं, मुखपृष्ठ कसं हवं..सगळं सगळं ठरवायचं बाकिये अजून.."

"तुला एकदा फंडिंग मिळालं ना की हे काम अगदी झटपट होईल बघ.."

का कुणास ठाऊक पण तनिषाला हे इन्व्हेस्टर्स कडून भांडवल घेणं पटत नव्हतं, पण खर्चाचा विचार करता त्याचा फायदा होईल असंही एकीकडे वाटायचं...तिलाच काय माहित, हे इन्व्हेस्टर् प्रकरण भविष्यात तिच्या आयुष्यात किती मोठी उलथापालथ करणार आहे ते..!!!

लंच ब्रेक संपला, निकिता पुन्हा दुसऱ्या दिवसाच्या वाटेकडे डोळे लावून बसली..दोघीही आपापल्या कामावर गेल्या.

*****

आर्या पार्टी वरून घरी परतली होती. माई दारातच उभ्या,

"आली का माझी ज्ञानेश्वरी.."

मानव तिथेच होता, त्याने डोक्याला हात लावला..

"आई सतत तिला ज्ञानेश्वरी म्हणून काय हाक मारते? आर्या नाव आहे तिचं.."

"ज्ञानेश्वरीच ती..मुलगा असती तर ज्ञानेश्वर नाव ठेवलं असतं. ज्ञानेश्वरांचे आई वडील, पोरांना असंच वाऱ्यावर सोडून नव्हते का गेले संन्यास घ्यायला...तेच झालंय हिचं.. हिची आई, गेली निघून कुठेतरी, मी म्हणत होते बाईचं काम नाही हे, इतकी मोठी उडी मारायला गेली आणि काय झालं? पडली ना तोंडघशी.."

"आजी, आई म्हटलीये ना, ती परत येणारे म्हणून? ती कायमची थोडीच गेलीये..आणि व्याप असणाऱ्या माणसाला ब्रेक हवाच असतो."

"असं संसारपाणी सोडून? संसारी बाई आहे ती, एकवेळ माणसाने असं केलं असतं तर समजू शकले असते..पण दोन मुलींची आई, बायको, सून असं करायला लागली तर कसं व्हायचं?"

मानव खोलीत निघून गेला. तनिषाच्या काळजीने तो बैचेन व्हायचा...त्याला आठवला तो दिवस, अमेरिकेहून तनिषाने त्याला फोन केलेला..

"मानव..सगळं संपलय, माझी इतक्या वर्षांची मेहनत, कष्ट...सगळं सगळं वाया गेलं...याक्षणी दुसरं कुणी असतं तर जीवाचं बरं वाईट करून घेतलं असतं, पण मी ते करणार नाही...मला वेळ हवाय, काही महिने, कदाचित वर्ष सुद्धा...अधूनमधून तुला मेसेज करत जाईन..."

क्रमशः

🎭 Series Post

View all