द बॉस - The Boss (पर्व 2-भाग 26)

When Tanisha And Bhairav Come Face To Face !
"मेघना मावशी? ती असं कसं वागू शकते?"

"अमेरिकेत आल्यावर एक गोष्ट मला समजली, इथे प्रत्येकजण आपला स्वार्थ बघतोय. स्वार्थाशिवाय कुणीही दुसऱ्याला मदत करत नाही. भारतात तसं नव्हतं, शत्रू होते पण ते समोरून वार करायचे..असं पाठीमागून नाही"

"समोरून वार केल्यावर त्याचा वीर भोसले होतो हे माहित असेल त्यांना, म्हणूनच पाठीमागून वार चाललेत"

"आर्या, आपल्याला खूप सावध रहावं लागेल. बिझनेसमध्ये शह देण्यासाठी प्रतिस्पर्धी कुठल्याही थराला जाऊ शकतो"

****

हेझल, कार्ल आणि आर्या आपापल्या डिपार्टमेंट साठी माणसं नेमायच्या कामाला लागलेले असतात. सर्वांना सक्त ताकीद दिली जाते की आपल्या प्लॅन्स बद्दल बाहेर कुठेही वाच्यता करायची नाही. आपल्या पेपर बॅग ची आयडिया असो वा saracastic लिखाण असो..त्याबद्दल कुणालाही कळता कामा नये. सर्वजण याची खबरदारी घेऊनच काम करत होते.

तनिषाने सगळं बजेट काढलं, आधीच्या बजेट मध्ये बऱ्याच गोष्टी वगळून हिशोब केलेला पण आता तिच्या लक्षात आलं की आहे त्या बजेट मध्ये काम करणं अशक्य आहे..मिस्टर रॉन यांनी खोटी केस करून तनिषाचं बँक account फ्रीझ केलं होतं. तिकडे टीम मोठ्या उत्साहाने कामाला लागली होती, कधी एकदा काम सुरू करतोय असं त्यांना झालेलं. पण तनिषाला याचं टेन्शन येऊ लागलं, एकतर स्वतःचा पैसा वापरू शकत नव्हती, देणगीतून आलेले पैसे पुरेसे नव्हते आणि कुणी इन्व्हेस्टर बघण्याचा विचार तिने मनातही आणला नाही. सगळी सोंग करता येतील पण पैशाचं सोंग करता येत नाही. एकीकडे टीम कामाला लागलेली आणि दुसरीकडे तनिषापुढे आर्थिक संकट येऊन उभं टाकलं.

***

(शब्दांतर)

"तर मॅनेजमेंट मधील सर्व लोकांच्या एकमताने आम्ही CEO म्हणून बिनविरोध आपली नेमणूक करत आहोत, अभिनंदन इनाया मॅडम.."

काहीही पर्याय शिल्लक नसल्याने इनाया इच्छा नसतांना शब्दांतर ची CEO म्हणून रुजू होते. एखाद्याच्या आयुष्यातला हा सर्वात मोठा क्षण असता, पण इनाया, तनिषा आणि शब्दांतर.. ही केवळ कंपनी नव्हती..स्त्रीजातीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या रणरागिणींचं ते रसायन होतं.. आत्मा झोकून देत अनंत अश्या संकटांना तोंड देत, अनेक अपमान झेलत, असंख्य त्याग करून साकारलेलं ते एक विश्व होतं..आणि ते विश्व फक्त तनिषाचं होतं याची जाणीव इनायाला होती.

"मॅडम, केबिनमध्ये बसा तुम्ही..CEO च्या खुर्चीवर"

सर्वजण इनाया मॅम खुर्चीवर बसून पदभार हाती घेतील हे बघण्यासाठी जमले. तिथे जाताच इनायाने एकदा केबिनकडे पाहिलं..

"रामू... ए रामू.."

"काय झालं मॅडम? काही हवंय का?"

"एक खुर्ची..."

सर्वजण आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले..रामुने सांगितलेलं ऐकत एक खुर्ची आणून दिली. इनायाने ती CEO च्या खुर्चीशेजारी ठेवली आणि म्हणाली,

"हे पद फक्त नावाला आहे, शब्दांतर च्या CEO कायम तनिषा मॅमच असतील. त्यांच्या खुर्चीवर बसण्याची माझी योग्यता नाही. ही खुर्ची तनिषा येईपर्यंत रिकामी राहील, मी दुसऱ्या खुर्चीवर बसून काम बघेन"

तिथल्या सर्वांना या गोष्टीचं प्रचंड कौतुक वाटतं.

इनायाने CEO ची सूत्रं हातात घेतली पण त्यावर ती कधीच बसली नाही.

***

तनिषाच्या टीम ने एकेक एम्प्लॉयी नेमायला सुरवात केली. कधी एकदा काम सुरू करतोय असं त्यांना झालेलं. पण तनिषाच्या चेहऱ्यावरची काळजी आर्याला स्पष्ट दिसत होती.

"आई, काही अडचण आहे का?"

"नाही.."

"तू कितीही लपवलं तरी स्पष्ट दिसतंय"

"माझं भारतात जाणं रद्द केलंय, इथली घडी नीट बसल्याशिवाय मला चैन पडणार नाही."

"अगं पण.."

"ठरलंय, बस्स...!"

तनिषा ऑफिसमधून घरी जायला निघते. वाटेत काही समान घेण्यासाठी एका मॉल मध्ये थांबते. बिल भरत असताना काउंटर वर अचानक भैरव दिसतो..तनिषा त्याला पाहून खूप खुश होते...

"भैरव? कधी आलास?"

भैरव तनिषाला असं पाहून एकदम चमकतो, पण तो आधीचा भैरव राहिलेला नसतो..अहंकार, मत्सर याने त्याच्या मनात घर केलं होतं.

"मी, मागच्या आठवड्यात"

"आणि अभिनंदन... CEO झालास तू.."

"ही स्तुती आहे की टोमणा?"

"भैरव? बहीण मानतोस ना मला?"

भैरव प्रश्नाचं उत्तर न देता मोठ्या फुशारकीने बोलतो..

"आज खूप मिटिंग आहेत मला, मला जायला हवं.."

असं म्हणत भैरव जातो खरं, पण इकडे तनिषाच्या डोळ्यात पाणी आल्यावाचून राहिलं नाही. तिचे एम्प्लॉयी फक्त एम्प्लॉयी नव्हते, तर तिचे सख्खे होते, जिवलग होते... आणि त्यांनीच अशी पाठ फिरवली..आपल्या माणसांचं असं रंग बदलणं तिच्या मनाला आता सहन होत नव्हतं!

क्रमशः

🎭 Series Post

View all