द बॉस..!! (The Boss)- भाग 29

Story Of A Female Entrepreneur

तनिषा त्या माणसाकडे बघते, तिला तर काही ओळख पटत नाही.

"सॉरी मी तुम्हाला ओळखलं नाही.."

"तुम्ही तनिषा मॅम ना? शब्दांतरच्या सर्वेसर्वा?"

"हो...पण तुम्ही.."

"मी अद्वैत... अद्वैत क्षीरसागर.. अवॉर्ड शो ला मीही उपस्थित होतो.."

"ओहह...अच्छा...कुठली कंपनी तुमची?"

अद्वैत हसायला लागतो. तनिषा गडबडून जाते, आपण काही चुकीचं तर विचारलं नाही ना?

"मी नॉमिनी म्हणून नाही तर इन्व्हेस्टर म्हणून तिथे आलेलो..अवॉर्ड ची जी जज कमिटी आहे त्याचा मी मेम्बर.."

"खरंच सॉरी, मी ओळखलं नाही तुम्हाला.."

"तुमची चुकी नाही, जज म्हणून आमची ओळख आम्हाला लपवावीच लागते..पण तुम्हाला सांगायला काही हरकत नाही.. Anyway, you are a great entrepreneur. तुमच्यासोबत एक कॉफी झाली तर छानच.."

तनिषा माईंकडे बघते..तिच्या डोळ्यासमोर चित्र फिरू लागतं..

माई, तनिषा आणि अद्वैत एका कॉफी शॉप मध्ये बसलेत. माई अद्वैत ला विचारताय..

"कसलं बक्षीस म्हणत होता? हिला फक्त एकच बक्षीस मिळालंय आजवर, गणपतीत चमचा लिंबू स्पर्धा होती ना...त्यातही मी गपचूप चमच्याला लिंबू चिटकवून दिला होता म्हणून..नाहीतर आमचं हे ध्यान कुठे तीर मारतंय...पदर नीट कर, देवळातून घरी गेलो नाही अजून..."

अद्वैत चुटकी वाजवून तनिषाला तंद्रीतून बाहेर काढतो..

"मॅडम, कुठे?"

"काही नाही... सॉरी सर, मी सासुबाईंसोबत पूजेला आली आहे, आपण नंतर कधीतरी कॉफीला जाऊया..." आपल्या इज्जतीचा माईंकडून फालुदा होण्यापेक्षा नकार दिलेला बरा असा विचार तनिषा करते.

"Sure.. तुमचा एक नंबर द्या, मी लोकेशन पाठवतो.."

तनिषा घाईघाईत तिचं कार्ड त्याला देते आणि माईंजवळ पळते.

"इतका वेळ? कुणाशी बोलत होतीस?"

"ते...आपलं..मानवचे मित्र आहेत, तेच.."

"तेच म्हटलं, असा सुटबुटातला माणूस, तुझ्या ओळखीचा कसा असेल..आण ते पूजेचं ताट इकडे.."

_____

इनायाने चुकून तिची ऑफिसमधली मायक्रोचिप पर्स मध्ये टाकून घरी आणलेली असते. चिप खूपच लहान होती, अगदी शर्टच्या बटणा इतकी लहान. मोहम्मद च्या नजरेस सहजासहजी पडणारी नव्हती, तिने ती लपवून दिली. मोहम्मद घरी येताच तिने त्याला जेवायला वाढलं. आज मोहम्मद एक बॅग घरी घेऊन आलेला. पण त्याला त्याबद्दल विचारण्याची सोय नव्हती. त्याने काही सांगितलं तरच..

रात्री मोहम्मद झोपलाय हे लक्षात येताच तिने ती बॅग शोधायला घेतली. मोहम्मद ने ती कुठेतरी लपवून दिलेली. खूप शोधल्यावर इनायाला ती कॉट खाली सापडली. बॅग लपवली आहे म्हणजे मोहम्मद आपल्यापासून काहीतरी लपवतोय..तिने बॅग उघडून पाहिली. त्यात एक बंदूक आणि त्यात एक गोळी होती. इनाया घाबरली..तिने पटकन ती खाली ठेवली आणि विचार करू लागली..

"मोहम्मद च्या कंपनीत असली हत्यारं घरी आणायची परवानगी नाही...तरी याने का आणली असेल? मोहम्मद कुणाचा खून तर करणार नसेल ना? तसं झालं तर....नाही, हे व्हायला नको, मी बंदूक लपवून देऊ का? नको...पण, कारण काही वेगळंच असलं तर? मला समजायलाच हवं..."

ती खूप विचार करते आणि त्या बंदुकीच्या गोळीत काहीतरी फेरफार करत ती परत जागेवर ठेऊन देते.

दुसऱ्या दिवशी मोहम्मद ती पिशवी घेऊन निघतो तेव्हा ती विचारते..

"इसमे क्या है?"

नेहमीप्रमाणे मोहम्मद चिडतो,

"तुझे क्या करना है? जा अपना काम कर..!!!"

मोहम्मद काहीश्या भीतीने तिला हे सगळं बोलतो. बोलताना त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव होते, पण ते भाव आपल्या अहंकारापुढे लपवण्याचा त्याचा लाजिरवाणा प्रयत्न सुरू होता. इनाया गप बसली. मोहम्मद निघून गेला. अम्मीजी बाहेर आल्या,

"क्या था उस थैली में? कुछ बताया उसने?"

"नहि अम्मीजी..."

"या अल्लाह...मेरे बेटे को बुरा करने से बचाना...!!!"

मोहम्मद जाताच इनाया तिचं आवरून ऑफिसला जाते.

____


"बॉस...आपले documents रेडी आहेत.."

"Ok.. मी येतोय इंडियात.."

सायबर वर्ल्ड चा बॉस आणि त्याची माणसं चायनीज भाषेत बोलत असतात. माफिया बॉस भारतात एक काम पूर्ण करायला येत असतो. BPSM war आता अंतिम टप्प्यात आलेलं असतं. आता फक्त एक तारीख ठरवून सायबर हल्ला अख्या देशावर करण्याचा प्लॅन असतो. त्या आधी भारतात त्याला सगळी व्यवस्था करायची असते. ठिकठिकाणी त्याचे सर्व्हर आणि हॅकर्स कामाला लावायचे असतात.

ठरलेल्या दिवशी तो भारतात पोहोचतो.

____

तनिषा मंदिरातले सोपस्कार आटोपून माईंना घरी सोडते आणि घरातली कामं आटोपून ऑफिसला जाते. सध्या काम फार वाढलेलं असतं. एकीकडे इनाया सोबत या BPSM चा छडा लावणं आणि दुसरीकडे वेबसाईट आणि app launch साठी स्टाफची नेमणूक करणं. त्यातच अद्वैत क्षीरसागरचा तिला मेसेज..

"मॅडम, लोकेशन पाठवतो.. भेटू शकाल?"

या अद्वैतचं मधेच काय सुरुये, तनिषा वैतागून जाते. त्याला ऑफिसमध्येच भेटायला बोलावते. संध्याकाळी पाच वाजता तो भेटायला येणार असतो.

______

"मॅडम, त्या बिन्नीचा काही पत्ता लागला?"

"कुणी त्याच्या हरवण्याची तक्रारच केली नाही, कसा पत्ता लागेल त्याचा.."

"त्याला हुडकून काढलं तर हे BPSM वॉर काय आहे हे समजेल..देव करो काही अघटित नसावं.."

"ज्या पद्धतीने त्याने औषधं विकली आणि तो फरार झाला, त्या अर्थी नक्कीच काहीतरी गंभीर असणार आहे, आपण शोधून काढू.."

"मॅम, माझ्या सॉफ्टवेअरने मी त्यांची पूर्ण सिस्टीम क्रॅक करू शकते..पण एका पॉईंटला आपल्याला सरकारची मदत लागेलच.."

"त्यासाठी आपण शोभना मॅडमला सांगूच...hope so त्या मदत करतील..परवा मिटिंग आहे त्यांच्यासोबत, आहे ना लक्षात?"

"हो मॅडम.."

____

संध्याकाळचे पाच वाजतात, तनिषा घरी जायला निघते तोच अद्वैत केबिनबाहेर...

"May I come in mam?"

यालाही आत्ताच यायचं होतं, स्वतःशीच पुटपुटत तनिषा त्याला आत बोलावते. जुजबी गप्पा होतात. तनिषाचे गोडवे गात तो थकत नसतो..तनिषाला हे कौतुक ऐकायला जाम कंटाळा येई..तिला माहीत होतं ती कोण आहे, पुन्हा पुन्हा तेच ऐकायला तिचे कान अगदी विटले होते. अखेर कसंबसं त्याने आपलं बोलणं थांबवलं आणि तनिषाला जाता जाता एक धातूत मूर्ती कोरलेली फ्रेम भेट म्हणून दिली..

"ही मी फ्रांस मधून विकत घेतलीये, फार दुर्मिळ आहे ही कलाकृती.."

तनिषा पिऊनला बोलवून ती फ्रेम केबिनच्या भिंतीवर लावून घेते.

_______

संध्याकाळी तनिषा घरी गेल्यावर बघते तर देसाई बाई त्यांच्या मुलीला घेऊन आलेल्या..त्यांची मुलगी आर्याची मैत्रीण. तिच्या वाढदिवसाचे निमंत्रण द्यायला त्या आलेल्या. तनिषाला बघून..

"तनिषा... अगं किती उशीर, मी केव्हाची येऊन बसलीये..आमच्या गौरीच्या वाढदिवसाला यायचं हं नक्की...तुमची आर्या मॉनिटर आहे ना वर्गाची, आमच्या गौरीचं फार चाललेलं, की आमच्या मॉनिटरला बोलाव म्हणून.."

ऐकावं ते नवलच...आर्या वर्गाची मॉनिटर? कधी झाली? मला कसं बोलली नाही?

आर्या आणि गौरी पकडापकडी खेळत होत्या. खेळता खेळता तनिषाच्या पर्सला धक्का लागला आणि त्यातून काही कागदपत्रे बाहेर पडली. त्यात बिन्नीच्या आधार कार्डची xerox होती. तनिषाने घाईघाईत ते उचलले..

"एक मिनिट...हा जॅकी आहे का?"

"जॅकी? नाही, बिन्नी...कामाला होता हॉस्पिटलमध्ये.."

देसाई बाई फोटो नीट बघते.

"नाही, हा जॅकीच आहे..हाच मला ते immunity चे टॉनिक द्यायचा रिसेलिंग साठी..तुला सांगते इतकं मार्जिन मिळायचं मला..तो अगदी स्वस्तात विकायचा मला..पण नंतर भेटलाच नव्हता..मग एकदा बेंगलोर ला गेलेले ना पुतणीच्या लग्नाला तेव्हा तिथे दिसला मला..खूप आवाज दिला त्याला पण त्याचं लक्षच नव्हतं.."

तनिषाला एक क्लु मिळतो..

"नक्की कुठे दिसला तुम्हाला?"

"बेंगलोर ला rose garden म्हणून एक लग्नाचा हॉल आहे..त्याच्याच शेजारी एक बिल्डिंग आहे त्यात जाताना दिसला मला.."

आता कधी एकदा ही खबर इनायाला सांगते असं तनिषाला झालं..देसाई बाई पुरेपूर पाहुणचार घेऊन निघाल्या. इनायाला फोन करणं शक्य नव्हतं, कारण संध्याकाळी मोहम्मद घरी असल्याने तिच्याशी फोनवर बोलता येत नसे. त्यामुळे जे काही बोलायचं ते उद्याच.

तनिषा रात्री सगळं आटोपून मुलींच्या खोलीत आली. स्वरा झोपी गेलेली आणि आर्या तिचा होमवर्क पूर्ण करत होती. तनिषा तिच्याजवळ बसली आणि तिला म्हणाली..

"तू मॉनिटर आहेस वर्गाची?"

आर्या ने वर पाहिलं आणि ती फक्त हसली.

"आर्या तुला माहितीये, आमच्या शाळेत मॉनिटर व्हायला सर्वजण धडपडायचे... मॉनिटर म्हटलं की वर्गात त्याचा एक धाक असायचा, एक वेगळाच रुबाब असायचा..तू मॉनिटर आहेस हे ऐकून छान वाटलं..पण तू मला सांगितलं का नाहीस?"

"आई..मॉनिटर जरी असले तरी आपल्या मॉनिटर असल्याचा रुबाब का म्हणून मिरवायचा? मीही दुसऱ्यांप्रमाणे एक विद्यार्थीच आहे.. कुणी स्पेशल नाही..आणि रुबाबात राहिले तर माझ्या मैत्रिणींपेक्षा वेगळी दिसेन मी, मला वेगळं नाही राहायचं, त्यांच्यातच राहायचंच.. आणि मॉनिटर चा रुबाब किंवा अभिमान फक्त मनात ठेवायचा आहे, बाहेर दिखावा करायचा नाहीये.."

मानव दारातूनच ऐकत असतो..

"तुझीच मुलगी ती..तुझंच प्रतिबिंब... तुझ्यापेक्षा वेगळं कसं वागेन?"

आपल्या मुलीत आपली छबी बघून तनिषाच्या डोळ्यात पाणी आलं..

_____


क्रमशः

🎭 Series Post

View all