द बॉस..!! (The Boss) - भाग 30.

Story Of A Female Entrepreneur


बिन्नीचा शोध लागला तर भविष्यात येणाऱ्या मोठ्या संकटाला टाळणं शक्य होतं. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी जरी सैनिकांवर असली तरी या शतकात शस्त्र मागे पडून युद्धाचे नवनवीन तंत्र शोधले जाताय. सायबर युद्ध त्यातलाच एक भाग. हे युध्द असं आहे की एकटा माणूस इंटरनेट च्या साहाय्याने पूर्ण जग हलवून टाकू शकतो.

उद्या शोभना मॅडम सोबत मिटिंग असते, आजचा दिवस दोघींकडे असतो बिन्नीची माहिती काढायला.

"इनाया, बिन्नीचा शोध घ्यायलाच हवा..आपण आपल्या हिशोबाने जेवढी माहिती काढता येईल तेवढी काढू, नंतर मग पोलिसांकडे जाऊन त्यांना रिपोर्ट करू. आता डायरेक्ट पोलिसांकडे गेलो तर आपल्या तोडक्या माहितीने पोलीस शोध घेणार नाही असं वाटतंय.."

"बरोबर आहे मॅम, त्या बाईंनी सांगितलं की बिन्नी बेंगलोर ला आहे..मला वाटतं आपण स्वतः तिकडे जाऊन शोध घ्यावा.."

"अर्ध्या तासात आवर, निघुया आपण.."

तनिषा घरी जाते, काही महत्वाचं सामान घेते. आज यायला रात्री उशिर होणार असतो, माईंना सांगून उपयोग नाही. ती मानवला कळवते आणि आवरायला घेते.

"तने...लवकर आलीस का गं? बरं झालं बघ...म्हटलं गावी जाऊन यावं... प्रेरणाचं लग्न झालं तेव्हापासून गेलोच नाही भेटायला..चल आवर, एका दिवसात परत येऊ.."

"माई, आज? लगेच?"

"हो.."

तनिषा पुन्हा पेचात.. माईंना आता काय कारण सांगावं? मी बेंगलोर ला जातेय हे कारण तर सांगू शकत नाही. थापा मारून मारून त्याही जवळपास संपल्या होत्या. माई वैशालीला फोन लावतात...

"बायडे...आज येतो म्हटलं आम्ही भेटायला..घरीच आहेत ना सगळे?"

"हो माई, जरा तनिषाला फोन द्या.."

"तने..वैशाली बघ काय म्हणते.."

"हॅलो, बोला वहिनी.."

"अगं मला किती आनंद होतोय तुम्ही येताय म्हणून काय सांगू..आणि मुक्कामालाच या बरं का.."

तनिषा पेचात असते...वैशाली वहिनींना माईंसमोर सांगताही येत नव्हतं.. पण तनिषाच्या बोलण्यावरून वैशालीला बरोबर समजलं.

"तनिषा...व्याप आहे का? आज येणं कठीण आहे का?"

"हो हो ताई... अगदी बरोबर.."

तनिषा ठसक्यात म्हणाली..

वैशालीला जे समजायचं ते समजलं. तनिषाला कामं असणार आणि माई इथे येण्याचा हट्ट धरून बसल्या असणार, तिने माईंकडे फोन द्यायला लावला..

"माई अहो सांगायचंच राहिलं...माझ्या माहेरी एक लग्न आहे तिथे चाललोय सगळे..आज कुणी नसेल घरी."

"चावी टाकून जा की मग शेजारी.."

"आम्ही 2-3 दिवस चाललोय माई..आम्ही निवांत झालो की मग या, उगाच इथे येऊन तुम्हाला त्रास, जेवणाचं परत तुम्हालाच पहावं लागणार.."

"तनी आहे की मग, घरात काही कामं असतील तर काढून ठेव..डबे वगैरे घासायचे तर काढून ठेव..गोधड्या, चादरी...तनीला काय काम असेल असंही, मोठ्या जावेकडे इतकी कामं तर करावीच लागतात.."

वैशालीला राग येतो. तनिषा कोण आहे आणि तिला ही कसली कामं सांगताय..

"माई, आम्ही आल्यावरच या..हट्ट करू नका.."

वैशालीने ठामपणे सांगितलं तेव्हा कुठे माईंनी ऐकलं.

वैशाली सारखी जाऊ मिळायलाही भाग्य लागतं. ज्या घरात आपल्याला स्वतःला सिद्ध करता आलं नाही त्या घरात दुसऱ्या येणाऱ्या मुलींना तरी वाटा मोकळ्या व्हायला हव्यात असा विचार आजकाल कोण करतं? "मला तर फार बंधनं होती, तिला बघा कसं मोकळं रान आहे" असं म्हणत ईर्षा असणारेच आज जास्त.

______

इनाया आणि तनिषा बेंगलोरला रवाना होतात. देसाई बाईंनी सांगितल्याप्रमाणे त्या लग्नाच्या हॉल शेजारील बिल्डिंग बाहेर त्या पोचतात. आता यापैकी नक्की कोणत्या फ्लॅट मध्ये तो असावा?

"मॅम, आपण इथेच समोर हॉटेल आहे तिथे room घेऊया..म्हणजे room वरून सतत लक्ष राहील बिल्डिंग वर..एकदा तरी तो बाहेर येईलच ना.."

दोघीही समोरच्या हॉटेल मध्ये एक रूम बुक करतात. बिल्डिंगमध्ये अनेक माणसं ये जा करत असतात पण बिन्नी मात्र दिसत नव्हता. संध्याकाळी होऊन जाते तरी तेच. आता काय करावं?

"मॅम, मला वाटतं आपणच बिल्डिंग मध्ये जाऊन तपासावं.. बिल्डिंग खूप जुनी आहे, तिथे कुणी सिक्युरिटी सुद्धा नाही.."

"एकेकाच्या घराबाहेर जाऊन दार कसं वाजवणार?"

दोघीही एकमेकींकडे बघतात..

(थोड्या वेळात)

टिंग टॉंग...

"Yes..?"

"सर आपके सिर्फ 2 मिनिट चाहिये...हमारे पास ये कुछ नये साबून और लिक्विड.." धप्पाक...
धाडकन दार बंद...

टिंग टॉंग..

"क्या है?"

दोघी एकमेकींकडे बघतात, हा तो नाही असा इशारा तनिषा इनायाला करते..

"कुछ नहि.."

"तो बेल क्यू बजाई?"

"ऐसेही...हमे मजा आता है.."

असं म्हणत दोघी पळत वरच्या मजल्यावर गेल्या..

सगळे मजले पालथे घातले, एक शेवटचा फ्लॅट उरला होता. बेल वाजवून सुद्धा तो दार उघडत नव्हता. दोघींना खात्री पटली की बिन्नी नक्की इथेच असणार. कारण आतून आवाज येत असूनही कुणी दार उघडत नव्हतं. तो दार उघडत नाही म्हटल्यावर दोघींना परत फिरावं लागलं..

दोघी परत हॉटेलमध्ये खोलीत आल्या.

"बिन्नी तिथेच असणार...दार उघडलं असतं ना त्याने तर त्याची कॉलर धरून त्याला जाब विचारला असता, मानव या बिन्नीमुळे किती मोठ्या धोक्यात आलेला.."

"हा बिन्नी मला काहीसा वेंधळा वाटतो.."

"कशावरून?"

"म्हणजे बघा ना, जर तो देशद्रोही असेल तर आपलं काम किती गुप्त ठेवावं याची काळजीच केली नाही त्याने. सरळ हॉस्पिटलमध्ये त्याच्या pc वर त्यांचे सगळे कट कारस्थान रचत होता. किती लोकांसमोर ती स्क्रीन येते तरी तो भीत नव्हता..मला वाटतं आपण त्याच्या याच वेंधळेपणाचा फायदा घ्यावा.."

"तो कसा?"

"तनिषा मला सांग, अशी एखादी गोष्ट जी त्याला फार आवडते, किंवा ज्यात त्याला इंटरेस्ट आहे.."

"बिन्नी कोण कुठला...त्याची आवड माहीत असणं दूरच.. पण, हो...बऱ्याचदा त्याला मी pc वर काही गेम्स खेळताना पाहिलंय.. फावल्या वेळेत तो तेच करत असावा.."

"अच्छा...त्याच्यावर "मृगजळ" स्ट्रॅटेजी वापरूया..

"मृगजळ स्ट्रॅटेजी? म्हणजे??"

"मृजगळ म्हणजे काय सांग बघू.."

"म्हणजे...समोर दिसतं पण प्रत्यक्षात ते नसतं.."

"एक्साक्टली... आता बघ मी काय करते ते..मला फक्त त्याचे documents आणि पेमेंट साठी कंपनीचं क्रेडिट कार्ड दे..आणि हो, आपल्याला आज मुक्काम करावा लागेल, घरी कळवून दे..मी अम्मीजींना सांगितलं आहे, त्या मोहम्मदला करतील मॅनेज.."

___
(चायनीज मध्ये)

"बॉस...Are you sure?"

"होय, त्याला जिवंत ठेवणं आपल्यासाठी धोक्याचं आहे..त्याच्याकडे आपली सगळी गुप्त माहिती आहे आणि ती जर कुठे leak झाली तर आपला प्लॅन फ्लॉप होईल.."

बिन्नीला मारण्याचा बॉसचा प्लॅन असतो..त्याने आपल्या वेंधळेपणामुळे ठिकठिकाणी पुरावे सोडलेले असतात. खूपदा वॉर्निंग देऊनही तो सुधरत नव्हता. त्याला मारणं आता खूप महत्त्वाचं होतं.

_____

"शलाका...एक महत्वाची बातमी हाती आलीये..एडिटिंग ला घे लवकर.."

अनिल घाईघाईने शलाकाला येऊन सांगतो..

"काय बातमी आहे सर?"

"भारताने चायनीज कंपन्यांचे apps ban केलेत, तिकडून येणाऱ्या आयातीवर निर्बंध घातलेत यामुळे चीनला मोठा आर्थिक फटका बसलाय, सरकारला एका अनोळखी मेल आयडी वरून सायबर हल्ल्याचा मेल आलाय. चायना वर असलेले हे निर्बंध उठवले गेले नाही तर मोठा हल्ला केला जाईल अशी चेतावणी त्यात आहे..आयपी अड्रेस ट्रॅक होत नाहीये.."

"बापरे...!!! अवघड आहे.."

शलाका हे सगळं एडिटिंग ला घेऊन बातमीचा फायनल draft पुढे मेल करते.

"गलवान हल्ल्यात इतका मोठा पराभव पत्करावा लागला तरीही चीनची इतकी हिम्मत? त्यांच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असावं..नक्की कोणता आणि कसा हल्ला होईल हे त्यांनी नमूद केलेलं नाहीये..." शलाका स्वतःशीच विचार करत असते.

तेवढ्यात अनिल सर पुन्हा येतात..

"शलाका, उद्या तुला एक मुलाखत घ्यायची आहे...शोभना तिवारी शहरात येणार आहेत. पत्रकार परिषद होईल, तिथे तू जायचं आणि प्रश्न विचारायचे..."

"सर?? मी??"

"होय...नवीन जबाबदारी घ्यायला शिका..प्रमोशन झाल्यावर काय कराल?"

"होना..." शलाका काळजीत पडते आणि अनिल सर हसत निघून जातात..

"एक मिनिट...काय म्हणाले सर आत्ता? प्रमोशन?? माझं?? हे काय ऐकतेय मी.."

शलाका खुश होते. एक वेळ अशी होती की तिची नोकरी धोक्यात होती, पण जेव्हा तनिषा मॅम च्या सहवासात ती आली तेव्हापासून तिच्यात अमुलाग्र बदल झाला होता, जीवनाकडे विजिगीषु वृत्तीने ती बघू लागलेली, तनिषा मॅम कडे बघून तिलाही प्रेरणा मिळत होती. तेजस्वी व्यक्तींच्या सहवासात आल्यावर त्यांच्या सकारात्मकतेचा प्रकाश आपल्यालाही खूप काही देऊन जातो..!!!

____

"इनाया काय करतेय सांग की जरा...हे flatcart चं डोमेन का परचेस करतेय? Already ते डोमेन रजिस्टर्ड आहे, मोठी e-कॉमर्स कंपनी आहे ती.."

"मृगजळ...फसलीस ना तुही?"

"म्हणजे?"

"नीट वाच...ते "flatcart" नाही, "faltcart" आहे..

क्रमशः

(काय असेल मृगजळ स्ट्रॅटेजी)

🎭 Series Post

View all