द बॉस..!! (The Boss) - भाग 33

Story Of A Female Entrepreneur


तनिषा आणि इनाया प्रेरणाच्या घरी पोचतात. मुकेश दार उघडतो, दोघींना पाहून तो काहीही प्रतिसाद न देता त्याच्या खोलीत निघून जातो. तनिषाला समजतं की प्रकरण जरा गंभीर आहे. त्या दोघी हलक्या पावलाने आत येतात आणि प्रेरणा समोर येते.

"काकू..."

असं म्हणत तनिषाच्या गळ्यात पडून ती रडायलाच लागते.

"प्रेरणा...बाळा असं रडायचं नाही, काय झालंय सांग नीट..ये बस आधी.."

तिघीही सोफ्यावर बसतात आणि प्रेरणा सांगायला सुरुवात करते..

"मुकेश आता आधीसारखा नाही राहिला. शांत बसून असतो, काही सांगत नाही काही बोलत नाही. विचारलं तर चिडचिड करतो. त्यात नोकरी सोडली, दुसरी बघ म्हटलं तर घराच्या बाहेर पडायलाही घाबरतोय.."

तनिषा विचार करते, असं काय झालं असेल एकदम?

"तू काळजी करू नको, मी जावयांशी बोलून बघते.."

तनिषा मुकेशच्या खोलीत जायला निघते..

"इनाया, चल तुही.."

दोघीही त्याच्या खोलीत जातात. त्या काही बोलायच्या आधीच मुकेश म्हणतो..

"प्लिज मी आता कुठल्याही प्रश्नांची उत्तरं द्यायच्या मनस्थितीत नाहीये.."

तनिषा तरीही आत जाते..

"मुकेश, तुम्ही आमचे जावई आहात. तुम्हाला मान देतो आम्ही पण एक लक्षात घ्या की आमची मुलगी तुमच्या पदरात टाकलीय आम्ही, तुम्ही तिचा नीट सांभाळ कराल, तिला सुखी ठेवाल म्हणून...तुमचं हे असं वागणं आमच्या मुलीला त्रासदायक असताना निदान मी तरी गप बसणार नाही...जाब विचारायला आलीये मी...का असं वागताय?"

तनिषा जावई म्हणून मानपान देणारी असली तरी मुलीच्या संसारात संकट आलं असताना खंबीरपणे जाब सुद्धा विचारणारी होती. मुकेश वरमला, आपण जे बोललो त्याचं त्यालाच वाईट वाटू लागलं. त्याच्या चेहऱ्यावर दिसत असलेला गोंधळ बघून तनिषा म्हणाली..

"हे बघा, जे काही असेल ते स्पष्ट सांगा...आम्ही मदत करतो.."

मुकेश मोठ्या मुश्किलीने मनाची तयारी करतो आणि खरं खरं सांगतो..

"मामी, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मी एका cctv कंपनीत कामाला आहे. Cctv installation आणि monitoring चं बरंच काम माझ्याकडे आहे. शहरात जवळजवळ सर्वच कानाकोपऱ्यात आम्ही cctv बसवले आहेत. त्याच्या फुटेज ची गोपनीयता सांभाळणं आमचं काम आहे. असं असतांना काही लोकं मला आणि माझ्या सहकाऱ्याला धारेवर धरताय. सर्व cctv फुटेज चा access मागताय. ती लोकं भीतीदायक आहेत, माझा जीवही घेऊ शकतात. त्यांना cctv चा access देणं म्हणजे देशाच्या सुरक्षेशी खेळणं... सुरुवातीला त्यांनी आम्हाला खोटं सांगितलं की त्यांना याचा वापर करून संकटात असणाऱ्या लोकांना मदत करणारं सॉफ्टवेअर launch करायचं आहे 15 ऑगस्ट ला...आम्ही नकार दिला तेव्हा मात्र हमरीतुमरीवर आले...आमच्या वरिष्ठांना समजलं की मी तो access दिलाय तर जेल होऊ शकते मला. आणि नाही दिला तर ती लोकं मला मारून टाकतील. म्हणून मी बाहेरही पडत नाहीये..खूप टेन्शनमध्ये आहे मी, आणि प्रेरणाला हे कसं सांगू? ती काळजीने त्रस्त होईल...मोठ्या पेचात अडकलोय मी..ती लोकं मला सारखं फोन करताय, मी राजीनामा देऊन टाकलाय..."

तनिषा आणि इनायाला खरं कारण समजतं आणि त्याही हैराण होतात. एकीकडे मुकेशचा धोक्यात असणारा जीव आणि दुसरीकडे सायबर attack चा क्लु त्यांना मिळतो. मुकेशच्या वागण्याचा तिला राग आलेला पण खरं कारण समजल्यावर तिला वाईट वाटलं.

"मुकेश तुम्ही काळजी करू नका..आपण पोलिसांची मदत घेऊ.."

"अजिबात नाही, पोलिसात गेलो तर ती लोकं मला मारून टाकतील.."

"हे काय बोलताय तुम्ही? एवढं सगळं झालं? तुमचा जीव धोक्यात आहे तरी काही बोलला नाहीत?"

प्रेरणा दारामागून सगळं ऐकते आणि ऐकून प्रचंड घाबरते. तनिषा तिला समजावते..

"हे बघ प्रेरणा..मुकेश असे का वागले हे समजलं तुला, आता उगाच त्यांना दोष देऊ नकोस...तुला टेन्शन नको म्हणून तुझ्यापासून ते सगळं लपवत होते. मी माझ्या ओळखीने एक अंगरक्षक घरी पाठवते. तुम्हाला काहीही होणार नाही. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात अशी संकटं येतात पण ती कायमस्वरूपी नसतात हेही लक्षात ठेवा. तुम्ही आत्ता कुठे संसाराला सुरवात केलीये, असे कितीतरी संकटं पार करत संसार पुढे न्यायचा असतो. घाबरून जाऊ नका, कुणालाही काहीही होणार नाही.."

इतक्यात दाराची बेल वाजते..प्रेरणा आणि मुकेश घाबरतात. इनाया धीर करत पुढे येते आणि दार उघडते..

"मॅडम तुमचं सिलेंडर. "

सिलेंडरवाला बघून सर्वांचा जीव भांड्यात पडतो. पण प्रेरणा मुकेशकडे बघते आणि मुकेश प्रेरणा कडे. नोकरी सोडल्याने घरात पगार येत नसतो. जमापुंजी संपलेली असते. प्रेरणा काहीही बोलत नाही पण तनिषाला सगळं समजतं. ती पटकन पैसे काढून त्याला देते आणि सिलेंडर आत घेते. प्रेरणाला अजून भरून येतं. तनिषा पुढे येते..

"मुकेश, असं घाबरून राहून चालणार नाही. बाहेर पडा...तुमच्या सोबत एक अंगरक्षक राहीलच. हायवेवर असणारं ग्रीन लिफ हॉटेल माहितीये ना? ते सांभाळा तुम्ही..मालकी हक्क माझ्याकडे आहे पण तिथे लक्ष देणारं आपलं माणूस हवं...तुम्ही तिथली मॅनेजमेंट बघा...50% शेयर तुम्हाला असेल."

तनिषा येते काय आणि चुटकीसरशी आपल्या लेकीची प्रत्येक अडचण सोडवते काय..!!! बरं झालं काकूला सांगितलं नाहीतर काय झालं असतं कुणास ठाऊक असा विचार प्रेरणाच्या मनात येतो. वैशाली तिथे नसतांना आपल्या पुतणीकडे लक्ष देण्याची आपली जबाबदारी तनिषा चांगलीच ओळखुन होती.

दोघीही तिथून निघतात, गाडीत बसताच इनाया तनिषाला सांगू लागते..

"ही गोष्ट साधारण नाही, BPSM war चाच हा एक भाग आहे..."

"कसाकाय?"

"ही लोकं प्रत्येक cctv फुटेजचा access मागताय...म्हणजे प्रत्येकाला ते ट्रॅक करू शकतील...ट्रॅक? म्हणजे...इमेज प्रोसेसिंग ने तर.."

"इनाया काय बोलतेय तू काहीच समजत नाहीये.."

"तू फेसबुकवर जेव्हा ग्रुप फोटो अपलोड करते तेव्हा तुला फेसबुक ऑटोमॅटिक नाव दाखवतं फोटोतल्या चेहऱ्यांसमोर...की अमुक अमुक व्यक्तीला टॅग करा..हा इमेज processing चा एक भाग आहे...गुगल फोटोज मध्ये तू पाहिलं असशील, गुगल प्रत्येक व्यक्तीचा फोटो स्कॅन करतो, वरती प्रत्येकाचा वेगवेगळा चेहरा असतो आणि त्यावर क्लिक केलं की त्या व्यक्तीचे सगळे फोटो सॉर्ट होतात.."

"म्हणजे त्यांना फुटेज च्या माध्यमातून इमेज processing टेक्निक ने माणसाला ट्रॅक करायचं आहे तर.."

"अवघड आहे तनिषा...त्या पोलिसाने सांगितलं तसं आपण लवकरात लवकर सायबर हेड ऑफिसला जायला हवं.."

"हो, पण त्या आधी बरंच काम बाकिये ना..आपण बिन्नीच्या सिस्टीम चा backup घेतला...त्यात काय आहे ते बघूया आधी..."

दोघीही ऑफिसला पोचतात, तनिषाच्या केबिनमध्ये दोघीही बसतात. इनाया काही बोलणार तोच तनिषा तिला शांत राहण्याचा इशारा करते, दोघीही काहीच बोलत नाहीत. तनिषा पेपर वर इनायाला काहीतरी लिहून देते आणि सांगते.."

"हे app इंडियन मेड आहे, आपण तो हॅक केलाय आणि त्यात मलवेयर सोडलेला आहे..याचे सर्वात जास्त यूजर चायना मध्ये आहेत...आता app च्या पुढच्या अपडेट ला सर्व युजर्स चा डेटा हॅक होईल.."

एवढं बोलून दोघीही बाहेर येतात..

____

"बॉस...बॉस...तुमची शंका खरी ठरली..त्या बायका हॅकिंग expert आहेत आणि चायना युजर्स वर attack करणार आहेत."

"काय? हे इंडियन्स कधीपासून सायबर attack शिकले? चायनाला प्रोटेक्ट करायला हवं..."

"पण बॉस, आपल्या attack चं काय?"

"होईल...आपणही attack करू..ठरलेल्या वेळीच.."

_____

तनिषा आणि इनाया ऑफिसबाहेर येतात...

"तनिषा हे सगळं नाटक कशासाठी? पेपर वर असं का लिहून दिलंस की मी जे बोलतेय ते फक्त ऐक, काहीही रिप्लाय देऊ नकोस म्हणून?"

"माहितीये, म्हणूनच गेले काही दिवस केबिनमध्ये कुठलीही मिटिंग घेतली नाही मी...अद्वैत क्षीरसागर...मला म्हणे अवॉर्ड इन्स्टिट्यूटच्या जज कमिटी मध्ये आहे...अवॉर्ड नंतर सर्व जज ने माझी भेट घेतली होती, त्यात हा नव्हता तेव्हाच मला समजलं की हा हेर म्हणून आपल्या मागे लागलाय...मंदिरात जात असताना तो आमच्या मागावर होता, गाडीच्या आरशातून मी पाहत होते त्याला...त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे हे माझ्या लक्षात आलंच होतं, त्यामुळे फुलं घेतांना पर्स मधून मी मुद्दाम कॅश काढली नाही, या निमित्ताने तो पुढे येईल असं वाटलं आणि माझी शंका खरी ठरली..आपलं केबिनमध्ये जे संभाषण झालं त्याने शत्रूची दिशाभूल नक्कीच होईल.."

"पण आपली हेरगिरी करायची गरज का पडली? याचा अर्थ आपण जे करतोय त्याची खबर या लोकांपर्यन्त गेली असावी.."

"प्रकरण खूप गंभीर होतंय, आत्ताच्या आत्ता सायबर हेड ब्रँच ला भेटावं लागेल नाहीतर अनर्थ होईल..."

_____

दोघीही सायबर हेड ऑफिसमध्ये जायला निघतात. गाडीत दोघीही बोलत असतात..

"बिन्नी च्या backup मध्ये नक्कीच काहीतरी क्लु असेल...आपण ते बघण्यापेक्षा सायबर सेल ला देऊया..आपल्याकडे वेळ नाहीये आता ते बघण्याचा.."

"कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की सायबर attack सारखी गोष्ट युद्ध म्हणून वापरली जाईल.. पिस्तुल, बॉम्ब एवढंच युद्ध म्हणून माहीत होतं आपल्या पिढी ला.."

"सायबर वॉर म्हणजे बुद्धिमान लोकांचा सैतानी चेहरा...पण अशिक्षित, गरीब लोकं आजही खून दरोडे यावरच अवलंबून आहेत, मोहम्मद जातो ना बंदुकी बनवण्याच्या कारखान्यात, आजही तेवढीच डिमांड आहे."

इनाया एवढं बोलते आणि तिला अचानक काहीतरी आठवतं..

"ओहहह शीट.. शीट.. शीट.."

"काय गं काय झालं?"

"मोहम्मद ने एक पिस्तुल घरी आणलेलं, मला शंका आली म्हणून मी त्या पिस्तूलाच्या गोळीत मागच्या बाजूला मायक्रोचिप बसवली होती...मला जाणून घ्यायचं होतं की हे पिस्तुल घेऊन हा कुठे जातोय काय करतोय....पण अजून त्याचं रेकॉर्डिंग ऐकलंच नाही मी.."

"मग, फिरवू का गाडी?"

"नाही... ते नंतर करता येईल, आधी आपण सायबर हेड ला जाऊन त्यांना माहिती देऊन येऊ.."

_____

"हे तुझे 30 हजार...पिस्तुल पुरवल्याबद्दल... अशीच मदत करत रहा.."

"इतने पैसे देते रहोगे ते ये मोहम्मद आपकी खातीरदारी के लिये हमेशा तैयार रहेगा सहाब.."

"बॉस....बॉस म्हणायचं मला..."

क्रमशः

🎭 Series Post

View all