द बॉस..!! (The Boss) - भाग 36

Story Of A Female Entrepreneur
तनिषा सगळी कामं तशीच टाकून खोलीत जाते, माईंना राग येतो.. आता ही कामं अशीच पडू देणार का ही?
"तने...घे गं आवरून.."

तानिषा आज काही एक ऐकायच्या मनस्थितीत नसते. खोलीत जाऊन ती दार लावून घेते..मानवला सांगून पार्सल मागवून घेते. तिकडे माईंच्या तोंडाचा पट्टा सुरूच असतो.

तनिषा इनायालाही फोन करू शकत नव्हती, तिच्या घरी आधीच महाभारत झालं असणार..पण आपल्याला स्वस्थ बसुन चालणार नाही..काहीतरी करावंच लागेल...

____

"हॅलो...भैरव, मॅमच्या आयुष्याचे जवळजवळ सगळे मुद्दे पुस्तकात आलेत..पण मला त्यांच्या चालू प्रोजेक्ट्स बद्दल, किंवा आत्ता त्यांचं काय काम सुरू आहे, कोणत्या फेज मध्ये त्या आहेत याची जरा माहिती दे ना.."

"शलाका थोडे दिवस थांब, तुला सांगायला तशी हरकत नाही पण मॅम ने सांगितलंय की त्या एक खूप मोठं धोक्याचं काम करताय..त्याची सगळी माहिती गुप्त ठेवलीये त्यांनी..मलाही काहीच माहीत नाही.."

"धोक्याचं काम? काय असेल ते? मला माहित व्हायला हवं, पुस्तकात ते टाकलं तर सगळे मुद्दे कव्हर होतील.."

"कळेल लवकरच, मलाही तसा प्रश्नच पडलाय पण त्यांची प्रायव्हसी सध्या जपायला हवी.."

शलाकाला राहवत नाही, शेवटी पत्रकारच ती...भैरवला न सांगता मॅम चा पाठपुरावा करूया असं ती ठरवते.

"भैरव, मॅम कुठे असतील आता?"

"घरी गेल्यात त्या.."

शलाका फोन ठेवते. दुसऱ्या दिवशी मॅम चा पाठलाग करूया असं ती ठरवते.

____

"हॅलो...अगं तनिषा..उद्या आर्याच्या शाळेत 15 ऑगस्टचा कार्यक्रम आहे...येणारेस ना? बरं आपण सर्व बायकांनी एक थीम ठरवली आहे..तुला सफेद साडी नेसावी लागेल...नेसशील ना?"

तनिषा काही न बोलता फोन ठेऊन देते. मानव नुकताच हॉस्पिटलमधून आलेला असतो. फ्रेश व्हायला खोलीत येतो.

"या डायनिंग वर, मी वाढते.."

मानव तिच्याकडे बघतो, काहीतरी गंभीर प्रकरण आहे असं त्याला तिच्या चेहऱ्यावरून कळतं. डायनिंग टेबल पुढ्यात मानव बसतो, तनिषा ताट घेते..पोळ्या मोडते आणि परत डब्यात ठेवते.. भाजी घेते आणि पातेलंच ताटात ठेऊन देते..पाण्याचा रिकामा ग्लास पुढ्यात ठेवते...

"तनिषा...मी घेतो वाढून. तू बस इथे.."

तनिषा भानावर येते,

"अरे मी हे काय करून ठेवलं? थांबा मी परत वाढते.."

"असुदे..तू खोलीत जा..मी आलोच जेवून.."

तनिषा डोकं चोळत खोलीत येते. वेळ कमी असतो. उद्या attack होणार असतो आणि ही गोष्ट फक्त तनिषाला माहीत असते. इनायाची सोबत सुद्धा आता नसते..घरात बसून काहीही होणार नव्हतं. उद्या attack करणार आहे हे माहीत आहे, पण या BPSM चा अर्थ काय? नक्की काय होणार आहे? याचा शोध लावायला ऑफिसमध्येच जावं लागेल...

"मानव...मला ऑफिसमध्ये जायचं आहे.."

"तनिषा 10 वाजत आलेत...रात्रीचे.."

"मानव...प्लिज.."

"ठीक आहे, मी सोडतो...आणि घ्यायला मीच येईन, मला फोन कर.."

"हो.."

तनिषा ऑफिसमध्ये जाते. मानव काळजीत पडतो, नक्की काय सुरू आहे हिच्या मनात? फायनान्शियल काही प्रॉब्लेम झाला असेल का? की कुणी केस केलीये शब्दांतर वर? तिला विचारलं तर सांगणार नाहीच..पण यावेळी तिला एकटीला सगळं करू देणं योग्य, असा कुठलाही प्रॉब्लेम नाही जो तिला सोडवता येणार नाही.

तनिषा इनायाच्या केबिनमध्ये जाते. तिच्या सिस्टीम वर काही गोष्टी तपासू लागते..बिन्नी चा backup, माफिया ची ऑडिओ क्लिप, मुकेशने दिलेली माहिती, टॉनिकबद्दल मिळालेली माहिती..

तनिषा डोळे मिटते, मनाला स्थिर ठेवते आणि शांतपणे सगळ्या गोष्टीचा ताळमेळ बनवते..

"त्या माफियाने cctv फुटेज मागितला...काय अर्थ त्याचा? त्याने पेगेसिस सर्वांच्या मोबाईल मध्ये अवैधपणे टाकलं, कशासाठी? लोकं स्वतःहून जीव देतील, का? आणि एक सिक्रेट अजूनही आहे असं म्हटला...काय होतं ते?

B P S M .. काय अर्थ याचा?

11 वाजतात...तनिषा डोळे चोळते आणि इंटरनेट वर काही गोष्टी सर्च करते..आत्तापर्यंत झालेले सायबर फ्रॉड, त्याचा क्रम...सगळा अभ्यास करते...

12 वाजतात...
तनिषाला डुलकी येते पण ती स्वतःला सावरते..कँटीन मधून कॉफी ऑर्डर करते..कॉफी समोर येताच 2 घोट पिऊन परत कामाला लागते...तिला इनायाची आठवण येत असते, ती असती तर काम सोपं झालं असतं.. तिला ऑफिसमधल्या त्यांच्या गप्पा आठवू लागतात...

"तनिषा ऑफिसबाहेर म्हणेन..इथे मॅमच म्हणेन...तनिषा मानलं तुला, फक्त शब्दांतर चा विचार न करता देशाचा विचार करतेय तू..सासूबाईंमुळे वाचल्या तुम्ही, नाहीतर त्या मेल मुळे आपल्या सर्व्हर चा access त्यांना मिळाला असता...चायनाची पण कमाल आहे, आपलं वर्चस्व सिद्ध करायला तो वेड्यासारखा मोबाईल, tv, लॅपटॉप, कॅमेरा यांचं प्रोडक्शन करायला लागलाय, लवकरच ते नवीन उपकरणं मार्केटमध्ये आणणार आहेत अशी न्यूज आहे.."

एक मिनिट, शेवटचं वाक्य काय आठवलं मला?

"आपलं वर्चस्व सिद्ध करायला तो वेड्यासारखा मोबाईल, tv, लॅपटॉप, कॅमेरा यांचं प्रोडक्शन करायला लागलाय, लवकरच ते नवीन उपकरणं मार्केटमध्ये आणणार आहेत अशी न्यूज आहे.."

तनिषाला आता सगळा उलगडा होतो आणि टेबलवर ती जोरात हात आपटते..

B - banking attack
पेगेसिस मधून यूजर चा आयडी, पासवर्ड , transaction पासवर्ड सगळं त्या माफियाला मिळालं आहे, आता त्यातून पैसे काढतांना otp लागेल तोही त्याच्याकडे लगेच ट्रान्सफर होईल आणि लोकांच्या खात्यातून एकेक करून पैसे कट होतील...

P- personal attack
त्याने सर्व cctv चा access घेतलाय..Cctv मधून तो फुटेज स्कॅन करेल आणि इमेज प्रोसेसिंग करून प्रत्येक माणसाला ट्रॅक करेल..तो माणूस कुठे आहे काय करतोय हे GPS शिवाय ओळखणं सोपं होईल, याने त्याच्या घरच्यांना त्रास दिला जाईल...तुमचा मुलगा/मुलगी/नवरा इथे आहे...आता तो तिथे आहे..लोकांना समजणार नाही की मोबाईल जवळ नसतानाही आम्ही ट्रॅक कसे होतोय? याचाच तो गैरफायदा घेऊन लोकांमध्ये दहशत माजवेल

S- Social attack
लोकांच्या सोशल मीडिया वरील मेसेजेस पब्लिक होतील, लोकांच्या मोबाईल मधले प्रायव्हेट फोटो सुद्धा इंटरनेट वर अपलोड होत जातील...अश्या ठिकाणी जिथून ते डिलीट करता येणार नाही. माफियाच्या वेबसाईटवर लोकांचे प्रायव्हेट मेसेज पब्लिक होतील आणि त्या व्यक्तीचे कुटुंबीय, शत्रू, नातेवाईक कुतूहलाने एकेकाला सर्च करून त्याचे गुपितं जाणून घेतील..

M- medical attack
भारतात त्या टॉनिकचा प्रसार करून त्यातील slow poison मुळे लोकांमध्ये आजार वाढत जातील, दुर्मिळ असे आजार ज्याच्यावर औषध फक्त माफिया कडे असेल...

आणि जेव्हा हा अटॅक होईल तेव्हा लोकं आपापले मोबाईल फेकून देतील...स्मार्टफोनचा धाक त्यांना बसेल..बाहेर पडणं सोडून देतील..आजाराने त्रस्त होतील आणि तेव्हा माफियाने चायनातील ज्या कंपन्यांसोबत डील केलंय ते डोकं वर काढतील..

"आलाय एक नवीन स्मार्टफोन, ज्याने कधीही तुमच्या मोबाईल मधला डेटा हॅक होणार नाही...लोकेशन ट्रॅक होणार नाही...आलेत नवीन cctv कॅमेरे, ज्याचा access फक्त एकालाच मिळू शकेल..आलंय हे नवीन औषध, दुर्मिळ आजारांवर 100% मात करणार...आलंय एक नवीन पेमेंट app, ज्यातून तुमच्या पैशाला कधीच धक्का लागणार नाही...आलीय एक नवीन सोशल मीडिया साईट, जिथले फोटो कधीच चोरी होणार नाही आणि ते कधीच हॅक होऊ शकत नाही.."

भारत सरकारने चायनीज वस्तु आणि app वर बंदी घातली त्याचाच सूड आहे हा..!!! भारताला नाईलाजाने पुन्हा बंदी उठवावी लागेल, औषधासाठी भीक मागावी लागेल..

तर हे आहे BPSM war... आपले बँकेतले पैसे कट होताय, आपल्याला ट्रॅक केले जातेय, आपले प्रायव्हेट फोटो, मेसेज लोकं वाचू शकताय, आपल्याला दुर्मिळ असा आजार उदभवू लागलाय...हे सगळं घडल्यावर लोकांचं जगणं मुश्किल होईल.आपले काही आक्षेपार्ह फोटो अपलोड झाल्यास लज्जेने महिला तर स्वतःचा जीवच देतील...आयुष्याची जमापुंजी खात्यातून कट झाल्यावर आता खायचं काय? कुटुंबाला पोसायचं कसं या विचारानेच माणसं मरून जातील, आपल्याला दुर्मिळ आजार झालाय, आपण बरे होऊ की नाही? घरचे आपला खर्च उचलतील तेव्हा त्यांना बर्डन तर येणार नाही ना? आपण मरणार की काय? या विचारानेच माणसाला attack येईल..तुमचा मुलगा इथे आहे, उचलू का त्याला...तुमची मुलगी तिथे आहे, तुमचा नवरा इथे आहे...असं सतत सतत धमकी येत असेल तर वेड लागायची पाळी येईल...

खूप भयानक आहे हे...सीमारेषेवरील युद्धपेक्षाही भयानक...जे भारतीय उद्या काय होईल याची चिंता न बाळगता शांत झोपले असतील त्यांची झोप उद्यापासून उडणार...सैरभैर होतील लोकं... पण याला रोखायचा एकच उपाय होता, इनायाने बनवलेलं अँटी स्पायवेयर... ते जर प्रत्येक भारतीयाच्या मोबाईलमध्ये रात्रीतून इन्स्टॉल केलं गेलं तरच देश वाचेल...!!!

"मॅडम, कुणीतरी रुपाली म्हणून तुम्हाला भेटायला आलं आहे.."

सिक्युरिटी फोन करून सांगतो..

"आत्ता यावेळी?? बरं पाठव.."

पाऊस सुरू असतो, रुपाली म्हणून एक महिला आत येते...आत येताच आपली छत्री बंद करून बाजूला ठेवते आणि तनिषाच्या केबिनमध्ये जाते...तिला बघून तनिषा काहीतरी आठवायचा प्रयत्न करते...रुपाली...अरे हो..!!! ही आपल्या कॉलेजमध्ये होती...एकदा हिची फी मी भरून दिलेली, बरोबर, तीच ही.."

"रुपाली, काय गं अचानक आणि यावेळी इथे?"

"हो...माझ्या ऑफिसमधून कळलं की 2 महिलांना मला भेटायचं होतं...नितीन ने सांगितलं मला...जेव्हा तनिषा नाव ऐकलं तेव्हा समजलं की ती तूच होतीस तर तडक इथे आले...आधी सिक्युरिटीला कॉल करून विचारलं मी, की ऑफिसमध्ये मॅम आहेत का म्हणून...!!!

क्रमशः

🎭 Series Post

View all