द बॉस..!! (The Boss) - भाग 6

Story Of A Female Entrepreneur


भाग 6

सर्वप्रथम ज्यांनी pro blog साठी सबस्क्रिप्शन घेतले आहे त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानते, आपली वाचनाची आवड वाखाणण्याजोगी आहे. त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. पूर्ण कथा अधिकाधिक रंजक होईलयाची खात्री देते.
----------


तनिषाने देसाई बाईला घरी सोडलं. मुलींना घरी आणून जेवण खाऊ घालून खोलीत झोपायला सांगितलं आणि कपडे बदलून ती तडक माईंकडे गेली..

"तने...इतका उशीर?"

"अहो माई काय सांगू, ते रणजित आणि मालिष्का आले होते ना त्यांनी ट्रॅफिक जाम करून सोडली, मुली अडकल्या बस मधेच..मग काय त्यांनाही आणलं.."

"बरं सामान आणलं का?"

"हो हे काय.."

तनिषाने पर्स मधून तयार मसाला आणि पापडखार काढून दिला.

"अगं हा तर मीच बनवलेला मसाला आहे.."

"होना..आर्याने तिच्या दप्तरात टाकला होता.." आर्या इथे नाही ना हे बघत तनिषा उतरली. माईंनी पटापट आंधन ठेवलं, पाणी उकळताच त्यात मसाला टाकला तनिषाला पीठ टाकून खिशी घ्यायला लावली. तनिषाने पूर्ण ताकदीनिशी खिशी घेतली. खरं तर तिची खूप धावपळ झाली होती. पोटात काहीही नव्हतं पण सर्व जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या. पण शरीर तरी किती साथ देणार, तिला भोवळ येऊन ती जागीच बसली..माई घाबरल्या, पटकन गॅस बंद केला आणि मानवला फोन करून घरी बोलावलं. मानव घरी आला, तनिषाने त्याला सगळी हकीकत सांगितली. मानवला पुरुषी अहंकार असला तरी आपल्या बायकोबद्दल सुप्त अभिमान होताच, एवढं सगळं एकटीने पेललेलं बघून त्याला नवल वाटलं. तो माईंना म्हणाला..

"आई कशाला उगाच तिला असली जड कामं सांगतेस. अशक्त झालीये ती..सलाईन लावावी लागेल.."

"पोरी मला खरंच माहीत नव्हतं गं, तू कर आराम बाकीचं मी बघते.."

माईं घाबरल्या तर होत्याच पण मानव त्यांना असं म्हणाला तेव्हा त्यांना वाईटही वाटलं. त्याहून जास्त वाईट तनिषाला वाटलं. मानव ने आईला असं बोलायला नको होतं. तिच्या डोळ्यासमोर सगळं गोल गोल फिरत होतं पण विचारचक्र थांबेल ती तनिषा कसली..!!

थरथरत्या हातांनी तिने तिचा फोन घेतला..मानव ओरडला..

"आता कशाला हवाय फोन?"

"प्लिज..एकच कॉल.."

तनिषा भैरवला फोन लावते आणि एक प्लॅन सांगते..
"मॅडम? Are you sure?"

"हो...जा आणि पटकन काम फत्ते कर.."

तिकडे भैरव कामाला लागतो आणि इकडे तनिषा एक सुस्कारा टाकते. मानव तिच्या कपाळावर हात ठेवून तिथेच बसतो. थोड्या वेळाने काही 7-8 बायका बंगल्यावर येतात. माई विचारतात,

"कोण आपण?"

"आम्हाला मॅडमने बोलावलं आहे, आम्ही खास पापड बनवायला मदत करतो.."

माई आनंदून गेल्या, सर्व बायकांना पटापट कामाला लावून त्यांनी पापडाचं काम करायला घेतलं. बायका खुश होत्या, त्यांना काहीतरी काम मिळालं होतं. बायकांच्या मदतीने माईंनी 4 तासात पापडाचं काम उरकून घेतलं आणि त्यांचे पैसे द्यायला त्यांना तनिषाकडे पाठवलं..

"ताईसाहेब, कशी आहे तब्येत? माई सांगत होत्या तुम्हाला भोवळ आली म्हणून.."

"हो, तुम्ही मात्र अगदी देवासारख्या धावून आल्या. खूप आभार तुमचे. काय करणार..!! बाईच्या जातीला काम कधी संपतं का, माझा नवरा एक तर दारूड्या, काल दारू पिऊन आला आणि जाम मारलं मला..."

बायका तोंडात बोटं घालू लागल्या,

"अगं आई गं, तुम्हाला सांगते ताई आमचीही परिस्थिती काही वेगळी नाही, आमचे नवरे दारू पिऊन येतात. काडीचा पैसा -(?कमवायची अक्कल नाही, तुम्हाला सांगते त्या राजकारणी लोकांच्या नादी लागून नको ते उपद्व्याप करत बसतात"

"माझ्या पोराला काल शाळेबाहेर बसवलं, फी भरली नाही म्हणून..आता सांगा कसं करायचं आम्ही.." डोळ्याला पदर लावत ती बाई रडू लागली..

"थोडक्यात काय, तुम्ही काय अन मी काय..बायकांची दुःखं मेली सारखीच.."

समदुखी या सगळ्या बायकांना तनिषा जवळची वाटू लागली. तनिषाने प्रत्येकीच्या हातात 2-2 हजार च्या नोटा दिल्या. बायकांना आनंद तर झालाच ओण नवलही वाटलं..

"ताई फार तर आम्हाला 500 रुपये मिळतात, पण तुम्ही मात्र.."

"तुमच्या कष्टाचे पैसे आहेत हे..आणि हो, हे पाच हजार advance, सर्वांना मिळून..तुमच्याच घरी तुम्ही वाळवण बनवत जा, त्यासाठी जे सामान लागेल त्याचे हे पैसे. तुम्ही पापडं, कुरडया तयार ठेवा...मी ते विकायची सोय करते.."

बायका एकमेकांकडे पाहू लागल्या, ऐकतोय ते खरं की खोटं असं त्यांना वाटू लागलं. घरात आर्थिक चणचण, त्यात साथ न देणारे नवरे.. यामुळे पिचलेल्या या महिलांना काम मिळालं म्हणून त्या प्रचंड खुश झाल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, तनिषाचे कसे आभार मानावे ते त्यांना कळत नव्हतं. खुश होऊन त्या तिथून निघून गेल्या. तनिषाने एक सुस्कारा टाकला, तोच मानव तणतणत आत आला..

"अगं नावाजलेला डॉक्टर आहे मी..लोकांत मान आहे मला..आणि मी दारूड्या? दारू पिऊन तुला मारतो? खरंच करू काय असं?"

"अररर...तू ऐकलं?"

"नाहीतर काय, यात नक्की तुझी काहीतरी स्ट्रॅटेजी असणार माहितीये मला म्हणून बोललो नाही काही.. पण म्हणून, दारूड्या???"

"सॉरी..खरंच सॉरी..पण कोर्टाचं टेंशन मिटवायला हे करणं जरुरी होतं.."

"कोर्ट आणि पापड.. काय संबंध?"

तनिषाने गोड स्माईल दिली अन काही न बोलता ती झोपी गेली. मानव तिच्याकडे बघत राहिला, एक अपराधीपणा त्याला नेहमी सतवायचा..पण..माईंसाठी...!!! असो...

_____

तिकडे शलाकाला अनिल सरांनी नवीन काम दिलं. निलातिष वर्तमानपत्रात एक स्तंभलेखन संपत आलं होतं.त्याजागी नवीन सदर सुरू करायचं होतं. तिथे एखाद्या दिग्गज लेखकाला लिहिण्यासाठी तयार करायचं काम शलाकाकडे आलं.

"शलाका, वर्तमानपत्राच्या दुसऱ्या पानावर लोकांचं लवकर लक्ष जातं. तिथे आता असं सदर हवं की लोकांनी हमखास वाचायला हवं आणि प्रतिक्रियाही द्यायला हव्यात..."

"चालेल सर, मी बघते असे लेखक..आपल्याकडे यादी आहे का लेखकांची? म्हणजे मला संपर्क करायला सोपं जाईल.."

"एक काम कर ना, बऱ्याच लेखकांचे मेल्स येतात, त्यांचे आर्टिकल वर्तमानपत्रात छापून येण्यासाठी. त्यातून बघ एखादा चांगला वाटत असेल तर.."

"चालेल सर, मी आज हे काम करून टाकते.."

शलाका कामाला लागली. आज काहीही करून नवीन सदरासाठी लेखक शोधून त्याला तयार करायचं होतं. शलाका मेल्स बघते.ते इतके होते की नजर भिरभिरायला लागली. कुणाचे वाचू अन कुणाचे नको...!!! बापरे, जवळपास 20 हजाराच्या वर मेल्स, त्यातून चांगला लेखक शोधून काढायचा, कसा?

शलाकाने पटापट मेल स्क्रोल केले, काही आर्टिकल्स मात्र तिचे विशेष लक्ष वेधून घेत होते. त्या मेल च्या subject मध्ये विशिष्ट फॉन्ट मध्ये शीर्षक आणि काही सिम्बॉल होते. शिर्षकही लक्षवेधी होते..

"पिंजऱ्याच्या पलीकडचं जग", "आकाशही जिथे थिटे पडले..", "स्वयंपाकघरातील विश्व.."... शालाकाला कुतूहल जागृत झालं. तिने एक आर्टिकल वाचायला मेल उघडून बघितला..त्यात लिहिलं होतं..

"स्त्रीवादी पणाच्या अखिल वैश्विक कल्पनांना छेद देणारे मत आज मी मांडणार आहे, यानंतर कितीही सामाजिक खळबळ माजली तरी त्याची पर्वा मला नाही. स्त्री म्हणून आपण कुणीतरी वेगळे आहोत, आपल्याला अनंत वेदना होतात, आपण बाळाला पोटात वाढवतो... हे सगळं करतो म्हणजे काहीतरी पराक्रम गाजवतो का? निसर्गाने जे बहाल केलंय ते तसंच होणार...अगदीच तुम्हाला स्त्री यातना सहन होत नसतील तर खुशाल लिंगबदल शस्त्रक्रिया करावी...स्त्रीपणाच्या वेदनांचं भांडवल करायचं आणि पुरुषाच्या नावाने खडे फोडायचे हा कसला स्त्रीवादीपणा? स्त्रीवादीत्वाचं भांडवल करून बळी गेलेल्या पुरुषांना समोर आणलं जातं का? त्यांच्या हक्कांबद्दल किती लोक बोलतात??"

इतकं परखड आणि मुद्देसूद लिहिलेलं बघून शलाकाला विशेष वाटलं, व्हायरल होण्यासारखा हा लेख इतका दुर्लक्षित कसा राहिला?? तिने लेखकाचं नाव बघितलं, तिथे अनामिक असं लिहिलं होतं. शलाकाने अनिल सरांना या बद्दल सांगितलं..

"हे बघ शलाका लेखकाचं नाव माहीत असेल तरच लेख प्रकाशित करता येऊ शकतो, अन्यथा उद्या कुणीही येऊन लेखावर हक्क दाखवेल आणि आपण उगाच अडकू.."

"पण सर हे लेख बघा.. खळबळ माजवून देतील राज्यात..आजवर इतके ज्वलंत आणि वेगळे विषय कुणिही पुढे आणलेले नाहीयेत.."

"ठीक आहे, मग लेखकाचा शोध घे, मग करू पब्लिश.."

शलाका मेल बघते, ज्या मेल आयडी वरून मेल आलेले असतात तो वेगळाच असतो..

aanamik.person@sbtr.com

यात तर नावही नाहीये, आणि हे कुठले डोमेन? sbtr.com?

शलाका ने इतर लेख वाचले पण या मेल वरून आलेले लेख खूपच वरच्या दर्जाचे होते. आणि निलातीषला हेच लेख पुढे घेऊन जातील याची तिला खात्री होती..अनिल सरांची परवानगी घेऊन तिने या लेखाच्या लेखकाला शोधायची जबाबदारी घेतली.

______

"मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही वाळवणाची जाहिरात आपल्या मासिकात दिलीये, पण त्याचं पेमेंट अजून आलं नाही, कोणाची जाहिरात आहे ती?" - भैरव

"माझीच आहे.."

"मॅडम? तुम्ही शब्दांतर सोडताय की काय?"

"मला स्टोरी सांगायला अजिबात वेळ नाही, जागृतीला बोलाव आत..रिपोर्ट तयार आहेत का विचार.."

"ठीक आहे मॅडम.."

जागृती मटकत आत येते.

"मॅडम...रिपोर्ट कुठेय??"

"हे घ्या...तयार आहेत मॅम.."

जागृती रिपोर्ट file मॅम कडे देते. त्यातल्या गोष्टी दोघीही डिस्कस करत असतात..

"या महिन्याच्या sell मध्ये 2.6 टक्क्यांनी वाढ झालीये...पण वार्षिक नोंदणीचं प्रमाण कमी झालंय.. याचं कारण..."

तेवढ्यात तनिषाला देसाई बाईचा फोन..

"कॅटलॉग पाहिला का गं?"

"आं.. ते..म्हणजे.."

"वाटलंच...झोपा काढ फक्त...अगं बायका आज चंद्रावर पोचल्या, अन तू बसून रहा घरीच..मला आजच्या आज ते बॉडी लोशन सेल झालेले हवे.."

"हो..."

जागृती मध्ये मध्ये बोलत असते..ते ऐकून देसाई बाई म्हणते..

"कुणीतरी बाई आहे वाटतं, चल तिला विकून दाखव..आत्ताच्या आत्ता..."

क्रमशः

शलाकाने शोधून काढलेले ते लेख कुणाचे? त्याचा शब्दांतरशी काही संबंध आहे का? तनिषा ने ती जाहिरात फुकट का दिली मासिकात? तनिषा क्रीम विकायचं काम कसं करेल? वाचा पुढील भागात...


🎭 Series Post

View all