द बॉस..!!! (The Boss) - (भाग 7)

Story Of A Female Entrepreneur
भाग 7

समोर जागृतीला सूचना द्यायच्या असतात आणि फोनवर देसाई बाईला सांभाळायचं असतं, देसाई बाईला ignore करणं म्हणजे पुढच्या parents मिटिंगला जाम डोकं खाईल हे तिला माहीत होतं.

"जागृती हे घे..." तनिषा फाईल्स तिच्या हातात देते..

"अगं अशी मार्केटिंग करतात का? हे घे म्हणत?"

"हो..मी करते..काळजी करू नका.."

"हे बघ मी तुला जो कॅटलॉग दिलाय ना त्यातले निदान दहा प्रोडक्ट तरी विकून दाखव..जमेल ना?"

"हो..."

तनिषा दोन्ही गोष्टी शिताफीने करत असते, एकीकडे ऑर्डर देणं आणि दुसरीकडे ऑर्डर ऐकणं. आता काहीही करून त्या कॅटलॉग मधल्या वस्तू विकून त्याचं कमिशन देसाई बाईला द्यायचं होतं.

"मॅम रिपोर्ट ok असतील तर मी जाऊ? "- जागृती

तनिषा जागृती कडे एकदा बघते. ऑफिसमधली फॅशनिस्टा..नवनवीन पेहरवाचे आणि मेकप चे प्रयोग करणारी म्हणून ऑफिसमध्ये ओळख. हुशार पण वेंधळी. तिचा अर्धा दिवस मटकण्यात मुरडण्यात जाई आणि उरलेला वेळ भैरववर लाईन मारण्यात..!!! होय, भैरव...तनिषाचा राईट हॅन्ड. घर आणि नोकरीच्या कसरतीत तो सारथी सारखा तिच्या पाठीशी उभा होता. त्याला वडील नव्हते, एकट्यावर सगळी जबाबदारी होती. तनिषाने त्याला हाताशी घेतलं आणि इतकं मोठं काम सुरू केलेलं... त्याची सुरवात कशी झाली, भैरव कसा आला ते कथेत येईलच पुढे..!!!

इकडे शलाका त्या लेखकाला शोधण्याच्या मागे लागलेली. @sbtr.com हे डोमेन कुणाचं असेल? तिने गुगल वरून माहिती काढली आणि तिला समजलं की हे शब्दांतरच्या सुरवातीच्या काळातील डोमेन, म्हणजेच जुनं डोमेन. म्हणजे शब्दांतर मधून कुणीतरी लेख लिक करतंय? की कुणीतरी पार्ट टाइम तिथे राहून लेख पाठवत आहे? स्तंभ लेखनाचे लेखकाला पैसे मिळतात, मग त्यासाठी कुणी तिथलाच एम्प्लॉयी हे करत तर नसेल? एक ना अनेक वितर्क लावून तिचं डोकं बधिर झालं. याचा सोक्षमोक्ष कसा लावावा हेच तिला समजेना. सगळं बाजूला ठेऊन ती शेवटी डोक्याला हात लावून बसते, तेवढ्यात अनिल सर तिच्याजवळ येतात..

"मिस शलाका, काय झालं?"

शलाका एकदम दचकते आणि उठून उभी राहते.

"एकदम दचकलात तुम्ही तर.."

शलाका पुन्हा खाली बसून घेते आणि सांगते,

"सर हे लेख कुणाचे आहेत हे ओळखणं अवघड होऊन बसलंय.."

"तू त्याच आर्टिकल्सच्या मागे इतकी का लागलीये कळत नाही मला..असं काय आहे त्यात? दाखव बरं मला एकदा.."

शलाकाने त्या लेखांची प्रिंट काढून ठेवलेली असते. ते ती अनिल सरांना दाखवते. अनिल सर ते एकदा नजरेखालून घालतात.. आणि एकदम त्यांचे हावभाव बदलतात.

"काय झालं सर?"

"हे तर... तनिषा ने लिहिलेलं आहे.."

"काय?? कशावरून?"

"तिचे शब्द, तिची वाक्य, तिची भाषा, तिचे विचार..सगळं परिचित आहे मला.."

"Are you sure?"

"शंभर टक्के.."

"पण तनिषा मॅडम का असं करतील? स्वतःच्या मॅगेझिन मध्ये लिहायचं सोडून वर्तमानपत्रात का पाठवतील?"

"तारीख आणि वर्ष बघ.. कधी मेल आलेत हे?"

"हे सगळे साधारण 2013-14 मधले आहेत.."

"शब्दांतर 2015 साली सुरू झालं..तिने त्या आधी पाठवलं असेल.."

"पण आता? आता आपण हे पेपर मध्ये दिलं तर?"

"तिची परवानगी घे आणि कर.."

शलाकाला आता पुन्हा एकदा शब्दांतर मध्ये जायची संधी चालून आली. का कोण जाणे पण तिथे गेल्यावर तिला एक वेगळीच एनर्जी मिळत असायची.

_____

संध्याकाळी घरी आल्यावर तनिषा स्वयंपाक करत होती. आज ती जरा दमलीच होती. इतर कामं माफ होऊ शकतात पण स्वयंपाक मात्र कधीच माफ नसतो. ती कामाला लागली. बाहेर माईंशी गप्पा मारायला त्यांची एक लांबची बहीण आलेली. त्यांचा पाहुणचार सुद्धा एकिकडे सुरू होता. मानव किचनमध्ये सारखा येजा करत होता. त्याला भूक लागलेली, पण स्वयंपाकाला अवधी होता. मग उगाच फ्रीज उघड, डबे उघड, काहीतरी तोंडात टाक असे त्याचे उद्योग चाललेले. माई आणि त्यांची बहीण मोठमोठ्याने गप्पा मारत होत्या.

"तुझी सून नोकरी करते का?"

"हो, मी तर नाहीच म्हणत होते, पण मुलांचा हट्ट...काय करणार. जाते एका पुस्तकाच्या दुकानात कामाला..असेल पाच दहा हजार पगार...मी तर नेहमी म्हणते, माझा डॉक्टर मुलगा महिन्याला लाखो कमावतो, तुला काय गरज आहे त्या 5-10 हजार साठी इतकी वणवण करायची? पण ऐकते कुठे.."

कोटींची मालकीण ती, आपल्या देखत हे सगळं निमूटपणे ऐकते..मानव सगळं बघत असतो, तिच्या मनात चाललेली घालमेल तो ओळखतो.. फक्त तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर देतो आणि तिथून निघून जातो.. तानिषाला हा अपमान नेहमीचा झालेला असला तरी प्रत्येकवेळी तेवढीच वेदना तिला होई.आपलं इतकं वर्चस्व असूनही माईंच्या नजरेत एक साधारण व्यक्ती म्हणून वावरावे लागे..तिला सात वर्षांपूर्वीचा काळ आठवला..

माईंना bp चा त्रास होता. तनिषाने शब्दांतर चं काम नुकतंच सुरू केलेलं. ती असंच कामात असताना माईंनी तिला हाक दिली. ती कामात इतकी व्यग्र होती कीं तिला ऐकूच आलं नाही. माई चिडून तिच्या खोलीत आल्या,

"काय गं केव्हाही हाक देतेय मी.."

"होका? मला खरच ऐकू आलं नाही.."

"हे काय काम करतेय तू?"

"माई ऐका ना, मी ना काही कथा लिहिल्या आहेत..त्याच्या प्रिंट्स आणल्या मी, याचं एक छोटंसं पुस्तक बनवावं असं वाटतं मला.."

"आणि किती पैसे मिळणार त्यातून?"

"फार नाही..पण.."

"फार नाही ना? मग बंद कर असले उद्योग, मला फक्त घरकाम करणारी सून हवी. आणि तू कितीही केलंस तरी माझ्या मुलाइतकं कर्तृत्व तुला जमणार नाही..समजलं?"

"माई हे अति बोलताय तुम्ही, मला कुणाशीही स्पर्धा करायची नाहीये..पण स्वतःला सिद्ध करायचं आहे.."

"माझ्याशी वाद घालतेस?"

हेकेखोर अश्या माईंना असं प्रतिउत्तर सहन झालं नाही. त्यांचा bp वाढला, त्यांना घाम येऊ लागला आणि त्या खाली कोसळल्या. नशिबाने मानव घरीच असल्याने त्याने पटकन उपचार केले. माईंना आराम करायला लावून मानव तनिषा कडे आला. ती अधिक घाबरलेली होती..तिने मानवला झालेलं सगळं नीट सांगितलं..ते ऐकून मानव चिडतो..

"कुणी सांगितलं तुला हे असले उद्योग करायला? पुस्तक कुणी विकत घेणार आहे का तुझं? आणि माईंना हे सगळं सांगायची काय गरज होती?"

"अरे मला वाटलं की माई मला सपोर्ट करतील.."

"कसला सपोर्ट? तू नवीन पदार्थ बनव, नवीन व्रत वैकल्य कर..माई तुला हवा तेवढा सपोर्ट करतील, पण या असल्या फालतू कामाला माई का मदत करेल तुला? आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव...माईला हे कधीच सहन होणार नाही की तिची सून तिच्या मुला सारखं बाहेर नाव कमवू बघतेय, ते शक्य तर नाहीच म्हणा..पण लक्षात ठेव, माईंना bp चा त्रास आहे...आत्ता सौम्य झटका येऊन गेला तिला..उद्या जर असंच bp शूट झालं तर अनर्थ होईल..पॅरालिसिस किंवा हृदयविकाराचा झटका...काहिही येऊ शकतो..आणि तुझ्या वागण्याने जर माईला काही झालं तर याद राख.."

मानव चे ते शब्द आजही जसेच्या तसे आठवत होते.
आपली सून मुलाहुन कर्तृत्ववान आहे हे त्यांना सहनच होणार नव्हतं..आणि उगाच त्या गोष्टीमुळे माईंच्या जीवाशी खेळ करणं म्हणजे...!!!

केवळ याच एका गोष्टीमुळे तनिषाने तिचं वर्चस्व लपवलं होतं.

____

दुसऱ्या दिवशी ऑफिसबाहेर एकच गोंधळ सुरू होता..भैरव घाईघाईने केबिनमध्ये आला..

"मॅडम, त्या झोपडपट्टीतल्या लोकांनी बाहेर ठिय्या आंदोलन केलंय.. जोवर आपण आपली तक्रार मागे घेत नाही तोवर ते उठणार नाही असं म्हणताय...खूप लोकं आहेत मॅम, कदाचित ऑफिसमध्ये येउन तोडफोड सुद्धा करतील...बायकाही बऱ्याच आहेत.."

तनिषा असं रिऍक्ट करते जसं काही झालंच नाही...आपलं काम बाजूला ठेऊन ती उठते आणि भैरवला म्हणते..

"चल...त्यांचं आंदोलन कायमचं बंद करू..."

"बंद करू? असं कसं बंद करणार? ती लोकं गुंड प्रवृत्तीची आहे मॅडम.."

तनिषा सरळ उठते अन केबिनबाहेर जायला लागते, भैरव तिथेच असतो. ती परत थांबते आणि त्याला म्हणते..

"ती गुंड प्रवृत्तीची असतील तर मी त्यांचा बाप आहे असं समज.."

मॅम च्या बोलण्यात इतका आत्मविश्वास होता की भैरवने तिथेच समाधानाचा सुस्कारा टाकला. बाहेर सिक्युरिटी त्या लोकांना आवरत होता. स्टाफ मधील काहीजण त्यांची समजूत घालायचा प्रयत्न करत होते, पण लांब उभं राहूनच..ती माणसं तर अगदी चालू सुरा सुद्धा घेऊन आलेले.

"हे बघा तुमची घोषणबाजी बंद करा, आत्ता आमच्या बॉस येतील त्यांच्याशी बोला.."

"कोण आहे तो बॉस, येउदेत त्याला." एकाने सरळ सुरा बाहेर काढला आणि धमकी दिली. स्टाफ मागे झाला..तनिषाने मागून एन्ट्री केली. समोर उभे असलेल्या लोकांच्या नजरेला नजर भिडवून बघायला लागली..तिच्या भेदक नजरेनेच ते जरासे घाबरले..ती फक्त बघत होती आणि डोळ्यांनी बोलत होती..त्यातल्या एकाने हिम्मत करून तिला म्हटलं..

"ओ बाई.."

तनिषाने ऐटीत मान डोलवत त्याच्याकडे फक्त बघितलं आणि तो ओशाळला..

"हे बघा मॅडम, ही आमची जमीन आहे..तुम्हाला पैशाची काही कमी नाही, आम्ही अतिक्रमण करणार म्हणजे करणार.."

तनिषाने त्याच्याकडे पाहिलं आणि खिशात हात टाकला, समोरचे लोकं मागे झाले. त्यांना वाटलं बंदूक बिंदूक काढतेय कीं काय..!!!

तिने हळूच फोन काढला आणि वकिलाला लावला..

"तक्रार मागे घ्यायची तर नाहीच ए, नवीन तक्रार नोंदवा..कामकाजात अडथळा आणि धमकवण्याची.."

ती लोकं आता चिडून गेली..त्यातला एकजण पुढे आला आणि सुरा पुढे करून तिला म्हणाला..

"गपगुमान ऐकलं तर ठीक नाहीतर आज एकाचा खून होईल.."

वातावरण भयानक झालं..स्टाफ मागे सरकला, भैरवला घाम फुटला..मानव सरांना बोलवून घ्यावं की काय त्याला वाटू लागलं..अश्या कठीण प्रसंगाला माणूसच तोंड देऊ शकतो अशी समाजाची धारणा..!!! तो माणूस पुन्हा म्हणाला.

"गपगुमान ऐकलं तर ठीक नाहीतर आज एकाचा खून होईल.."

तनिषा फक्त हसली..मागून एक आवाज आला..

"अन त्यो खून तुझा असल.."

क्रमशः

🎭 Series Post

View all