द बॉस..!!(The Boss) - भाग 42

Story Of A Female Entrepreneur


कीर्ती आणि मानवचं बोलणं तनिषा ऐकते..कानात कुणीतरी तप्त ज्वालामुखी ओतावा तसा एकेक शब्द तिला जबरदस्त धक्का देत होता. मानवने आपल्याला खोटं सांगितलं की माईंपासून तुझं यश लपवून ठेव नाहीतर माईंच्या जीवावर बेतेल म्हणून. कशासाठी? कुणासाठी?

आजवर तिचं यश लपवण्यासाठी तिला काय काय करावं लागलं हे सगळं तिच्या डोळ्यासमोर आलं..

शब्दांतर, जिथे ती मालकीण होती तिथेच एक कारकून म्हणून माईंसमोर स्वतःला सादर केलं..कित्येकदा माईंनी प्रश्न विचारू नये म्हणून मागच्या दाराने ऑफिसला गेले...घरात मोलकरणीला द्यायला इतके पैसे कुठून आणले याचं उत्तर देता येत नसे म्हणून स्वतः राब राब राबत गेली..भाजीपाला आणणं, किराणा भरणं ही सगळी कामं नोकरांना ठेऊन करता येत असताना तिने स्वतः तो भार उचलला..एकीकडे कंपनी सांभाळन्याचं टेन्शन असतानाही दुसरीकडे माईंच्या समाधानासाठी पापड लाटणं, खिशी घेणं, गोधड शिवणं अशी कामं केली...ऑफिसच्या कामाने थकवा येत असतानाही घरी आल्यावर सगळं बळ एकटवून काम करत गेली..अवॉर्ड मिळाले tv वर नाव झळकलं.. पण त्या यशाचा आनंदही लपवावा लागला..खोटं बोलून बाहेर पडावं लागलं...जिथे 10-10 करोड चे व्यवहार सांभाळत असताना घरी माईंनी "5-6 हजार कमावणारी साधारण बाई" म्हणून हिणवलं, मानवपेक्षा 50 पटीने जास्त कमाई होत असतानाही माईंसमोर त्याच्याकडे पैसे मागण्याचं नाटक केलं..

सगळं सगळं अगदी तिच्या डोळ्यासमोर फिरू लागलं.. असं वाटत होतं आकांत करावा, ओरडून ओरडून मानवला जाब विचारावा...पण एकीकडे शरीर अशक्त आणि दुसरीकडे मनावर झालेला आघात...अश्या परिस्थितीत ती अगदी गळून गेली.काहीही न बोलता खोलीत येऊन मेल्यासारखी पडून राहिली...

"तनिषा...अगं...आम्ही..ते.."

दोघेही घाबरून तिला सावरण्याचा प्रयत्न करतात..पण तनिषा एकही शब्द ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती..

"जीजू, मी तनिषाला सांगणारच होते सगळं...पण तिला आता सगळं समजलं आहे...अजूनही वेळ गेलेली नाही, तिची माफी मागा आणि चूक सुधारा.."

मानवला मेल्याहून मेल्यासारखं होतं. आता तनिषाला समजावू तरी कसं? मी कितीही पश्चाताप करण्याचा प्रयत्न केला तरी ती मला माफ करू शकेल का?

मानव खूप घाबरलेला असतो, दबक्या पावलाने तो खोलीत जातो. तनिषा शून्यात नजर लावून बसलेली असते. डोळे लाल झालेले असतात, तिच्या चेहऱ्यावर असलेला भावच सगळं काही सांगून जात होता. मानव मोठ्या मुश्किलीने तिला म्हणतो,

"तनिषा..."

पण तनिषाचा जराही प्रतिसाद नव्हता. मानव बोलण्याचा प्रयत्न करतच होता पण तनिषा अजिबात उत्तर देत नव्हती..

"तनिषा, मान्य आहे मी खोटं बोललो..तुझं यश लपवण्यास भाग पाडलं...काय करू, लहानपणापासूनच आईने कायम मला अव्वल बघितलं आहे, शाळेत एकदा माझा फक्त दुसरा नंबर आलेला तेव्हा आई दोन दिवस नाराज होती..मी सतत पहिल्या क्रमांकावर असावं असं आईला वाटायचं. माझ्या मित्रांनी आर्टस् कॉमर्स घेतलं, पण आईचं म्हणणं की माझा मुलगा सर्वांहून जास्त शिकायला हवा..माझी ईच्छा नसून माईंसाठी डॉक्टरकीला गेलो. तिथेही मी अव्वल हवा होतो आणि मीही जीव काढत अव्वल येत गेलो. माझा मुलगा सर्वांहून जास्त कमाई करतो याचं माईंना समाधान असायचं..पण नंतर तू शब्दांतरची सुरवात केली आणि सगळं गणितच बदललं..माझ्याहून कितीतरी पटीने जास्त तुझी कमाई होऊ लागली, समाजात नाव होऊ लागलं, प्रसिद्धी मिळू लागली...ज्या आईला अगदी माझ्या चुलत भावंडानेही पुढे गेलेलं चाललं नाही तिला हे कसं सहन होईल की आपली सून आपल्या मुलाच्याही पुढे आहे? सॉरी मी सारवासारव करत नाहीये पण जे आहे ते सांगतोय, मी मनापासून तुझी माफी मागतो, मला माफ करशील??"

तनिषाने हे ऐकून दीर्घ श्वास घेतला आणि उशी घेऊन झोपी गेली.. मानवसोबत काही बोलायच्या मनस्थितीत ती नव्हतीच..

___

"भैरव, माझ्या घरी लग्नाची बोलणी करायला ये..लवकरात लवकर..तू यायच्या आधी मी सांगेन की आमचं एकमेकांवर प्रेम आहे.."

"माझ्या घरी मान्य असेल गं, पण तुला जी मुलं पाहायला येतात ती मोठ्या हुद्द्यावरची, गलेगठ्ठ पगाराची, त्यांना डावलून तुझ्या घरचे मला का होकार देतील?"

"कारण आपलं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून.."

"नुसतं प्रेम असून चालत नाही शलाका, सुखसोयी प्रेमाने विकत घेता येत नाहीत..त्यासाठी पैसाच लागतो.."

"तुला काय म्हणायचं आहे? मी तुला सोडून दुसऱ्या मुलाशी लग्न करू?"

"मला एवढंच म्हणायचं आहे की आज भावनेच्या भरात तू हा निर्णय घेते आहेस त्याचा उद्या तुला पश्चात्ताप नको व्हायला.."

"नाही होणार, पैशात सुख बघणारी मुलगी मी नाही...आणि पैसा लागतच असेल तर आपल्यात एवढी धमक नक्की आहे की काही न काही करून ते आपण कमवून घेऊ.."

_____

दुसऱ्या दिवशी तनिषा उठली तसा चहा पुढ्यात आला..मानव चहाचा कप घेऊन उभा होता...तनिषाला समजलं की आपल्याला आता भाव लावायचं काम सुरु आहे..

"तनिषा, तुला नाश्त्याला काय बनवू? काय आवडतं तुला?"

त्याचं काहीही न ऐकता तनिषा बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला निघून गेली..बाहेर आली तरी मानव तिथेच उभा...ती खोलीबाहेर गेली, मानव तिच्या मागोमाग गेला.. काही वेळाने कमला आली...कमलाला बघून माई तिला सांगू लागल्या,

"तनी ची खोली राहू दे, तिला बरं वाटतंय आता...आणि तुपकट भांडे सुद्धा ठेव तसेच..तनी घासून घेईन.."

मानव हे ऐकून काही बोलणार तोच तनिषा पुढे झाली..

"कमला, तुला पगार मी देते, मी सांगेन तेवढी सगळी कामं झाली पाहिजेत.."

तनिषाच्या या वाक्याने सगळेच हादरून गेले, तनिषा पहिल्यांदा इतकं ठामपणे बोलत होती. इतर वेळी माईंचा विचार करून करून कितीतरी गोष्टी तिने मनातच दाबल्या होत्या. असं ऐकायची सवय नसल्याने माई चिडल्या..

"तू कसला पगार देते, माझा मुलगा तुला पैसे देतो ते तू हिला देतेस.."

तनिषाने दीर्घ श्वास घेतला..आता माईंना दाखवलंच पाहिजे, मी कोण आहे आणि काय आहे ते..!!!

___

"तनिषा, मान्य आहे की जीजू तुझ्याशी खोटं बोलले, पण आता त्यांना पश्चात्ताप वाटतोय, जमत असेल तर माफ कर त्यांना.."

"माफ करू? कशासाठी माफ करू? त्याच्या खोटेपणामुळे दोन व्यक्तिमत्त्व बनून मला वावरावं लागलं. आपल्या घरात मोलकरीण बनून बाहेर बॉस म्हणून परावर्तित व्हायला माझी काय मानसिक स्थित्यंतरे झाली असतील कल्पना आहे तुला? कितीतरी वेळा माईंच्या हट्टाला पूर्ण करावं म्हणून महत्वाची कामं सोडली, मिटिंग सोडल्या, कितीतरी प्रपोजल सोडून दिले...मला अवॉर्ड मिळाला तेव्हा पूर्ण जग टाळ्या वाजवत होतं, पण माझं मन त्या एका टाळीच्या प्रतीक्षेत होतं जे माझ्या घरून माझ्या माणसांकडून मिळणार होतं.. जगाने कितीही गोडवे गायले तरी आपल्या माणसांची कौतुकाची थाप मिळाली नाही तर अपूर्ण वाटतं ! मी किती मोठी आहे हे मला दाखवायचं नाहीये, मला एवढंच अपेक्षित आहे की माझ्या मेहनतीला माझ्या घरच्यांनी मान्य करावं, मी काहीतरी करून दाखवलं हे मान्य करावं.. मी कुणीतरी आहे, माझी स्वतंत्र ओळख आहे हे जाणून घ्यावं.."

कीर्ती दीर्घ श्वास घेते अन तनिषाला विचारते,

"मग आता काय करणारेस तू.."

"एल्गार...!!!"

"म्हणजे?"

"आजपर्यंत जे काही गमावलं त्याचा...ज्या ज्या गोष्टींना मुकले त्याचा...आता वेळ आली आहे, जगाला दाखवून द्यायचं आहे...मी कोण आहे, काय आहे आणि माझी पोहोच किती आहे ते.."

_____

"भैरव ऐक, परवा मला बघायला तो मुलगा येतोय, तुला जे करायचं ते उद्याच कर..वेळ नाही आपल्याकडे.."

"तनिषा मॅम ला सांगायचं आहे मला आधी.."

"का?"

"त्यांच्यामुळे आयुष्य रुळावर आलं माझं, मोठ्या बहिणीप्रमाणे माझी काळजी घेतली त्यांनी...तुला बघायला येताना आई आणि मॅमला घेऊन येईन मी.."

"चालेल, हरकत नाही..."

______

"हॅलो....who is this?"

"बॉस.."

"कोण बॉस?"

"Boss from China.."

"Ok...Why you called me?"

"To destroy the Shabdantar.."

फोनवर एक प्लॅन ठरला...आणि दात विचकावत वीर भोसलेने फोन ठेऊन दिला...

क्रमशः

🎭 Series Post

View all