द बॉस..!! (The Boss) - भाग 5

Story Of A Female Entrepreneur

भाग 5


तनिषा तिथेच उभी..माईंचा पारा चढू लागला..तनिषा पटकन माईंजवळ गेली आणि माईंचं लक्ष विचलित केलं..गपचूप तिने पापडांसाठी बनवलेला मसाला आणि पापडखार आपल्या पर्स मध्ये टाकला...आणि माईंना म्हणाली..

"कपडे असुदेत..आधी पापड करूयात.."

माईंनी गॅस वर मोठं पातेलं चढवलं त्यात गरम पाणी उकळत ठेवलं..

"आता पाणी उकळलं की मसाला आणि पापडखार टाक त्यात.."

"चालेल..कुठेय तो?"

"हा बघ..अरे? इथेच तर होता.. कुठे जाईल?"

माई शोधू लागल्या..कुठे सापडेना..!!! असं कसं होईल? मी बनवला होता ना नक्की? की मला आता विस्मरण होतं?

"माई अहो कुठे जाईल? मुली आता इथे काहीतरी करत होत्या..सांडलं असेल आणि घाबरून लपवलं असेल त्यांनी..!!!"

"अरे देवा..आता काय करायचं? एक काम कर, मसाल्याचं सामान घेऊन ये पटकन.."

"पण कोपऱ्यावरचं दुकान तर बंद आहे, त्याच्या मुलाचं लग्न आहे आज.."

"अरे देवा...म्हणजे गावात जावं लागणार की काय आणायला? अरे राम..बरं आता पर्याय नाही काही, जा लवकर आणि घेऊन ये.."

"आत्ता आणते माई.."

तनिषाला घाई होती, गर्दीतून कार काढायला वेळ लागेल म्हणून तिने तिची स्कुटर काढली आणि आधी ऑफिस गाठलं. मुली बसतील थोडावेळ बस मध्ये म्हणत तिने मुलींना घ्यायला नंतर जायचं ठरवलं.केबिनच्या खिडकीतून भैरव वाटच बघत होता. तनिशाला असं स्कुटर वर आलेलं बघून त्याला जरा विचित्रच वाटलं..शब्दांतरचं स्टेटस तनिषा मॅडम स्वतःला मात्र लावून घेत नाही हे विशेष..!!!

घाईघाईने ती केबिनमध्ये आली. मघाशी नागलीचं पीठ बघताना तिच्या ब्लेझरला काहीसं पीठ लागलं होतं..पण कुणाची बिशाद..शब्दांतर च्या ऑफिसमध्ये, तिच्याच केबिनमध्ये तिलाच कोण बोलणार?

समोर मुव्ही चे डायरेक्टर, निर्माते आणि इतर महत्वाची मंडळी होती. मिटींगला सुरवात झाली..

"हॅलो मॅम, बहोत सुना है आपके बारे मे..इतनी कमी उम्र मे आपने इतना बडा कारोबार संभाला.."

तनिषाला तिचं कौतुक ऐकण्यात काडीचा इंटरेस्ट नव्हता. तिने दुर्लक्ष करत मूळ मुद्द्यात हात घातला..

"Let\"s discuss about the movie promotion. What we can do is, we can conduct your actor\"s interview regarding this movie and we will publish it.."

"हा मॅम, हमारा यही मानना है की.."

एवढ्यात तनिषाचा फोन खणाणतो..माईंचा फोन..

"हॅलो तने..मिळालं का सामान? ये लवकर.."

समोर बसलेल्या डायरेक्टर आणि निर्मात्याकडे बघून ती तोडकच उत्तर देते..

"हो हो.."

एवढं म्हणून ती फोन ठेऊन देते.

"Let\"s conduct the actor\"s interview today itself, what says? But where are they?"

"मॅम वो आ रहे है दुसरी कार से, बस पहुचही रहे होंगे.."

तनिषा कडे जास्त वेळ नव्हता. तिला मुलीना घ्यायला जायचं होतं..तिने थोडक्यात सर्व प्लॅनिंग सांगून भैरवला कामाला लावलं आणि ऑफिसमध्येच असणाऱ्या तिच्या कारची चावी ती पर्स मध्ये शोधू लागली. पर्स मध्ये चाळत असतांना पापडखार ची पुडी खाली पडली आणि सर्वांचं तिकडे लक्ष गेलं..
ते एकमेकांकडे पाहू लागले..

"ड्रग्स?"

तनिषा पटापट ते उचलू लागली. तो निर्माता हळूच म्हणाला..

"मॅम हमे नही पता था की आप भी..by the way हमारे पास इसके बहोत सारे सप्लायर्स है...आप चाहो तो.."

"अरे भिकारड्या पापडखार आहे तो...ड्रग्स घेत असेल तुझा बाप.."

टीमला मराठी येत नसल्याने ते एकमेकांकडे पाहू लागले, भैरवने लगेच सावरतं घेतलं..

"मॅम कह रही है की वो आपको बतायेगी जरूरत पडी तो.."

तनिषा वैतागतच बाहेर पडली, स्कुटर वर न जाता तिने तिची कार काढली आणि मुलींना घ्यायला गेली. प्रचंड घाई होती, डोक्यात एकाच वेळी मिटिंग, मुली, ट्रॅफिक आणि पापड यांचे विचार..रेडिओ वर फॅमिली मॅन वेब सिरीज चं प्रमोशन सुरू होतं आणि त्याचं थीम सॉंग वाजत होतं..

कल करे सो आज कर आज करे सो अब
घीस रहा है रोज तू फल मिलेगा कब

किसके लिए तू देगा जान अपना जान बोल

Soch Soch Soch
Dimaag को Khod Khod Khod Khod Soch Soch Dimaag को Khod Khod Khod Khod

तू जिया अपने प्यार के लिये संसार के लिए सारे संसार के लिए
तू जीया संस्कार के लिए घर बार के लिए.
कोई जीये ऐतबार के लिये ईएमआय वाली कार के लिये
किस्का मकशाद भांड हो ना बस शनिवार इतवार के लिए

हे गाणं खरं तर या क्षणी तिच्यावर जास्त सूट करत होतं...

बस ज्या रस्त्यावर अडकली होती तो पूर्ण जाम झालेला. मालिष्का आणि रणजितने त्यांची गाडी रस्त्याच्या मधोमध उभी केली होती आणि जवळच्या कॅफे मध्ये ती दोघे गेलेली. ती दिसताच लोकांनी गर्दी केली..ऑटोग्राफ, सेल्फी साठी लोकं गर्दी करू लागले. इतर नागरिक खोळंबले, पोलिसही आले पण त्यांच्याकडून काही गर्दी आवरली जाईना..

तनिषा प्रचंड चिडली. या लोकांना असं बेजबाबदार वागताना काहीच कसं वाटत नाही? आपल्यामुळे इतकी लोकं खोळंबून आहेत, जवळच शाळा आहे याचं काहीही नाही या दोघांना.

तिची कार रस्त्यातच अडकून पडली. शेजारूनच देसाई बाई त्यांच्या मुलाला घेऊन जात होत्या. तनिषाला बघताच त्या गांगरून गेल्या...खिडकीची काच तिने टकटक केली..

"दुष्काळात तेरावा महिना.."

असं बडबडतच तिने काच उघडली..

"अय्या तुला कार येते? कधी वाटलं नव्हतं तू चालवशील.. ऐक ना, आम्हाला सोडून दे ना..जवळच राहतो आम्ही.."

असं म्हणत देसाई बाईंनी मुलाला मागच्या सीट वर कोंबलं आणि स्वतः तनिषाशेजारी जाऊन बसली..

"तू कधी शिकलीस गाडी? कुणी शिकवली? मी दिलेला कॅटलॉग पाहिला का? किती लोकांना क्रीम विकल्या तू? Whatsap वर मार्केटिंग केलीस का?"

एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती देसाई बाई करू लागली. गर्दी काही कमी होत नाही लक्षात येताच तनिषाने बाजूने कार पुढे घेत घेत कॅफे जवळ आणली. आता तिची सहनशीलता सम्पली होती. देसाई बाईला तिने तिथेच बसून राहायला सांगितलं आणि स्वतः गर्दीतून वाट काढत कॅफे मध्ये घुसली. तिथे मलिष्का आणि रणजित सेल्फी काढत होते, लोकांना हातवारे करत एका ठिकाणी उभे होते.. तनिशा आत गेली आणि तडक त्या दोघांजवळ पोचली..

तिला असं जवळ आलेलं बघताच रणजित म्हणाला..

"नो मोर सेल्फीज प्लिज .."

"सेल्फी?" तनिषा ओरडली आणि त्याचा हात पकडून त्याला बाजूला ओढू लागली. त्याच्या सोबतची मलिष्का चिडली...

"Hey you bloody woman ..How dare you to touch him...तेरी औकात क्या है..!!!"

"औकात? सांगते...ज्या प्लॅटफॉर्म वर मुव्ही च्या प्रमोशन साठी तुम्ही आलात त्याची सर्वेसर्वा आहे मी...ज्या मासिकावर झळकण्यासाठी इतका मोठा पल्ला गाठून आलात त्याची मुख्य आहे मी...जिथे प्रमोशन करून तुम्ही audience मिळवणार होता ते माध्यम आहे मी..आता एक काम करा, इथून तडक मुंबईला वापस जा...प्रमोशन तर सोडाच, तुमची मुजोर वृत्ती लोकांसमोर आता आणतोच.."

रणजित आणि मलिष्का घाबरले...कारण या प्रमोशन वर त्यांच्या चित्रपटाचं बरंच काही अवलंबून होतं. तनिषाच्या मागे तिची माफी मागायला धावू लागले पण गर्दीत ती केव्हाच नाहीशी झाली. त्या दोघांनी पटापट आवरतं घेऊन आपल्या गाड्या काढल्या आणि रस्ता मोकळा केला. रस्ता मोकळा होताच तनिषाने मुलींची बस गाठली आणि मुलींना ताब्यात घेतलं.

"मिळाला का सेल्फी? इतक्या गर्दीत तुला कसा फोटो देतील गं ते..मला वाटलंच तू त्यांच्यासोबत सेल्फी साठी गेलेली..नाही मिळाला ना? कशाला उगाच आगाऊपणा करायचा.."

तनिषाने एकदा देसाई बाईकडे बघितलं आणि फक्त मान डोलावली. दोन मिशन फत्ते झाले, आता मिशन पापड...!!!


क्रमशः


🎭 Series Post

View all