Login

द बॉस..!! (The Boss) - भाग 12

Story Of A Female Entrepreneur


कथेचा रोज एक भाग प्रकाशित होतो, 16 जुलै पासून आम्ही पेजवर ब्लॉग टाकण्याच्या एक दिवस आधीच app वर टाकायचा असं ठरवल्याने 16 तारखेला बॉस चे एकाच दिवशी 2 भाग पोस्ट झालेत. रोज एक भाग हमखास येतो, याबाबत वाचकांनी निश्चिन्त असावे.

_____

प्रेरणाच्या हळदीचा दिवस उजाडला. सकाळी मांडव टाकायचा कार्यक्रम झाला, मग जेवणं उरकून सर्वजण संध्याकाळच्या हळदीच्या तयारीला लागली. हळदीचा कार्यक्रम सुरू झाला, मानव मुलींना घेऊन पोहोचला. मुलींच्या शाळा आणि त्याचा दवाखाना यामुळे ते लवकर आले नव्हते. शेजारच्या पाटील काकूंनी मुलींकडे लक्ष दिलं होतं आणि दिवसभर त्या मुलींसोबतच थांबायच्या. मानवला पाहून सर्वजण अदबीने त्याचं स्वागत करू लागले..

"मोठे डॉक्टर आहे बरं का..मोठमोठे ऑपरेशन करतात.."

"नाव ऐकून आहे..मोठा माणूस आहे हा.."

वैशालीला ओरडून सांगावसं वाटत होतं की अरे याची बायको याच्याहून कर्तृत्ववान आहे..पण माई आणि तनिषाला दिलेला शब्द, यापुढे ती हतबल होती.

हळद लावताना वैशाली आणि मोठे जेठ यांना भरून आलं. मुलगी आता सासरी जाणार म्हणून त्यांच्या मनात हुरहुर होती. त्या प्रसंगाला बघून इतरही भावुक झाले. पण तनिषावर याचा काडीमात्र असर झाला नव्हता. तिला साधं रडूही आलं नाही..

जेव्हा एखाद्या व्यक्तीचा दृष्टिकोन व्यापक होतो, चार चौघांच्या कुटुंबापेक्षा लाखोंचं कुटुंब जेव्हा तो सांभाळतो आणि असंख्य चढउतार ज्याने पाहिलेले असतात तो अश्या भावुक प्रसंगीसुदधा स्थितप्रज्ञ असतो.

हळदीचा कार्यक्रम झाला, सर्व निवांत झाल्यावर तनिषा भैरवला फोन लावते. भैरव उचलत नाही. झोपला असेल म्हणून तीही पुन्हा करत नाही. पण भैरव मुद्दामहून फोन घेत नाही, कारण तनिषाला लग्न उरकल्याशिवाय matrix ने उडवलेल्या शब्दांतरच्या खिल्ली विषयी त्याला सांगायचं नव्हतं. कारण ते ऐकल्यावर तनिषा थाऱ्यावर राहणार नाही हे त्याला माहित होतं. तो लग्न आटोपायची वाट बघत होता.

दुसऱ्या दिवशी लग्न साग्रसंगीत पार पडलं. बिदाई झाली, सर्वजण आपापल्या घरी परतू लागले. तनिषालाही थकवा आलेला..तिला घरची आणि शब्दांतरची ओढ लागली. पाणी पिण्यासाठी घराबाहेरच्या झाडाखाली ठेवलेल्या माठाजवळ ती गेली तेव्हा गावातले काही तरुण मुलं तिथे मोबाईल चाळत होते....

"अरे हे वाचलं का, कुणाल शेट्टी म्हणे रिया मेननला डेट करतोय.."

"कुठे वाचलं बे?"

"हे matrix म्हणून एक pdf आहे, तिथून.."

"मला पाठव ना.."

"अरे तो डाउनलोड नाही होत. तुला लिंक देतो.."

"आली आली..फॉर्म भरून मागताय.."

"भरून टाक.."

"नाव, मेल आयडी, पत्ता, फोन, वय, शिक्षण, व्यवसाय, उत्त्पन्न.. लई मोठा फॉर्म आहे रे.."

"भर की...फुकट मिळतंय ना, मग एवढं तर कर.."

"बरं..हे काय..allow access to camera, allow access to photo, allow access to contacts, allow access to location.."

"सगळं allow allow म्हण आणि पुढे जा.."

"केलं... हाssss... दिसलं दिसलं.."

मुलं खुश होती, मसालेदार गॉसिप त्यांना फुकट वाचायला मिळत होती..तनिषाला याचं गांभिर्य आता लक्षात येऊ लागलं. अगदी गावापर्यंत याचं वारं पोहोचलं होतं..कधी एकदा परत जाते आणि भैरवची भेट घेते असं तिला झालं. पण तरीही धीर नव्हता, ती भैरवला फोन लावते..

"भैरव..matrix चं काही नवीन?"

"मॅडम, लग्न उरकलं?"

"हो, आता निघतोय.."

भैरवला आता राहवलं नाही, त्याचा संयम सुटला आणि त्याने सांगितलं..

"मॅडम, शब्दांतरच्या ठिकऱ्या उडवल्या त्या वीर भोसलेने..matrix मासिकाने शब्दांतरचा अप्रत्यक्षपणे अपमान केलाय..शब्दांतर कसं जुनाट, गावंढळ अश्या भाषेत आपली इभ्रत काढलीये.."

हे ऐकून तनिषाचं अंग तापू लागलं, डोळे लाल होऊ लागले..ज्या शब्दांतर साठी जीवाचं रान केलं, घाम गाळला, पोटाच्या पोराप्रमाणे जबाबदारी उचलली त्याला आज एक कुणी भोसले नावाचा मुलगा उडवून लावतोय? त्याचा अपमान करतोय? नाही..आता त्याला मी सोडणार नाही..

तनिषा आतमध्ये तिची बॅग घ्यायला आली, तिथे काही बायका अजूनही ठाण मांडून बसलेल्या..तनिषाकडे बोट दाखवून म्हणाल्या..

"लग्नघरात अशी कामाची बाई हवी..कामाचा फार उरक हिला, सगळं एकटीने सांभाळून घेतलं...काय गं बाई, पुढच्या महिन्यात माझ्या मुलाचं लग्न आहे, येशील का 2 दिवस आधी? नाही म्हणजे..आमंत्रण देते तुला.. एक काम कर, तुझा नंबर दे, मी फोन करेल.."

तनिषा वेगळ्याच विचारात होती. तिने पर्स मधून तिचं visiting card काढलं अन त्यांना दिलं..त्या बाईने उलट सुलट करून पाहिलं..

"काय गं? कोरंच आहे हे..मागच्या बाजूला कोरी जागा आहे तिथे दे की नंबर लिहून.."

पुढच्या बाजूला असलेलं

Tanisha Desale
CEO
Shabdantar
Contact
Mail
Website

हे त्यांना काय कळणार होतं? मागच्या बाजूला तिने नंबर लिहून दिला..वैशालीला भेटून निघाली. पाठोपाठ मुलं, मानव आणि माई बसली आणि गाडी सुरू झाली..

"काय गं, डोळे इतके लाल का झालेत?"

माईंनी विचारलं..तनिषा मौन होती..

"धावपळ झाली असेल ना गं लग्नघरात... जागरण झालं असेल, त्यामुळे होतं असं.." मानव म्हणाला...

परत जातांना तनिषाला कांता आणि चंदू काका दिसले, दोघेही गावच्या टोकाच्या रस्त्याला उभं राहून काहीतरी बोलत होते, आणि चंदू काका तिला खिशातून काही पैसे काढून देत होते..तिला थोडं विचित्र वाटलं, पण त्याचा जास्त विचार केला नाही..
तनिषा कोणत्या भावनेतून जात होती तिचं तिलाच माहीत..तिची तळपायाची आग मस्तकात गेली होती..असं वाटत होतं जणू कुणीतरी तिच्या अस्तित्वावर प्रहार केला होता..तिने उभ्या केलेल्या साम्राज्याचं कुणीतरी हसू केलं होतं.. तिचाच नव्हे तर शब्दांतरसोबत जोडल्या गेलेल्या प्रत्येकाचा हा अपमान होता.

गाडी सुरू होती, मानव, माई आणि मुलं पेंगले होते. पण तनिषा ची नजर पूर्ण प्रवासात स्थिर होती..समोर एकटक ती बघत राहिली..ड्रायव्हरने गाणे सुरू केले..त्यात महिषासुरमर्दिनी स्तोत्र सुरू होतं..

अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते
गिरिवरविन्ध्यशिरोऽधिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते ।
भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १ ॥

सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते
त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते
दनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ २ ॥


या स्तोत्रात वेगळीच शक्ती होती. प्रत्येक कडवं तिच्यात ऊर्जा भरत होतं. याक्षणी ती खरोखर महिषासुरमर्दिनी भासत होती..matrix नावाच्या अधर्माचा नाश करण्यासाठी सज्ज होत होती...वीर भोसलेने केलेल्या प्रत्येक अपमानाचा बदला घेण्यासाठी तिचे हात शिवशिवत होते, आता असा काही वार करायचा की एका क्षणात matrix आणि वीर भोसले गारद होईल..matrix ने लावलेलं लांच्छन फक्त शब्दांतरचं नव्हतं..ते लांच्छन होतं एका स्त्री च्या कर्तृत्वावर, तो अपमान होता एका स्त्रीच्या बुद्धिमत्तेचा...तो वार होता एका स्त्रीच्या इच्छाशक्तीवर..अपमान होता एका स्त्री ने उभ्या केलेल्या साम्राज्यावर...

सर्वजण परतले.. रात्रीचे 9 वाजले होते. तनिषाने कपडे बदलले, मानवला कल्पना देऊन मागच्या दराने ती शब्दांतर ऑफिसमध्ये जायला निघाली. ऑफीस मधले सर्वजण घरी गेलेले..फक्त मोजका स्टाफ, कॅन्टीन मधला स्टाफ, सिक्युरिटी आणि भैरव तेवढा होता..

"मला माहित होतं मॅडम तुम्ही याल, म्हणून आज इथेच थांबलो.."

"भैरव तू घरी जा...मला आज काय तो सोक्षमोक्ष लावायचाच आहे या वीर भोसलेचा.."

"मॅडम.."

"तू खरंच जा..मला एकटं काम करू दे आज रात्री.."

तनिषा च्या चेहऱ्यावर असलेला ताण भैरवला आता स्पष्ट दिसू लागलेला. पण मॅम आल्या आहेत तर काहीतरी पर्याय नक्कीच निघणार या विचाराने तो काहीसा शांत झाला होता..

तनिषाने केबिनमध्ये 2 लॅपटॉप समोर ठेवले..प्रिंटर तयार ठेवलं...कॅन्टीन मधून कॉफी मागवली...इतका थकवा आलेला असतानाही शारीरिक मर्यादांवर मात करून एक रणरागिणी आता लढायला सज्ज झाली होती..

क्रमशः
0

🎭 Series Post

View all