द बॉस..!!(The Boss) - भाग 18

Story Of A Female Entrepreneur
तनिषा त्या महिलेचा पाठलाग करत असते, लोकं काय म्हणतील याचा विचार न करता रस्त्यावरून पळत असते, इनाया, इनाया आवाज देत ती पाठलाग करते..पण गर्दीत ते दोघे नवरा बायको दिसेनासे होतात..तनिषा दम खात एका ठिकाणी दुकानाच्या पायरीवर बसून राहते.. ती खूप दमून जाते. तोंडावर हात ठेवून डोळ्यांना चोळत बसते. तेवढ्यात मागून एकजण पाण्याची बॉटल पुढे करतो..

"अनिल? अरे तू? इथे?"

"हे मी तुला विचारायला हवं...अशी रस्त्याने कुठे पळतेस?"

"सगळं सांगते, आधी पाणी पिऊ दे मला.."

तनिषा घाटघट पाणी पिते आणि अनिलला म्हणते,

"चल इथल्या एखाद्या कॅफे मध्ये जाऊ, तिथे बसून बोलूया..इतक्या दिवसानी भेटलाय तू.."

दोघेही कॅफे मध्ये जातात.

"मग, कसं चाललंय तुझं काम? आणि अभिनंदन, तुला पुरस्कार मिळालाय.."

"थँक्स.." कपाळावरचा घाम पुसत ती म्हणते..

"तू सांगितलं नाहीस, अशी का पळत होतीस ते?"

"एक मैत्रीण आहे, ती दिसली अचानक..तिला भेटायचं होतं पण नाही भेटता आलं..असो, तुझं काय चाललंय?"

"विशेष नाही, सध्या नवीन विषय मिळालेत वर्तमानपत्रात लिहिण्यासाठी..नुकतंच आपल्या पंतप्रधानांचं, अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचं ट्विटर अकाउंट हॅक झालं होतं..हॅकर्स ने त्या अकाउंट वरून cryptocurrency मध्ये डोनेशन मागितलं होतं आणि असं भासवलं की ते एका नैतिक कामासाठी वापरणार आहेत, त्या अकाउंट मध्ये लाखोंने पैसे जमा झाले..याला पेगेसिस स्पायवेयर म्हणतात.."

तनिषा लक्ष देऊन ऐकत होती...तिच्या डोक्यात सध्या हेच सगळं चाललं होतं..

___

आज शलाका आणि भैरव सोबतच शब्दांतर च्या ऑफिसमध्ये जायला निघाले होते, मधेच त्यांची गाडी बंद पडली. गाडी एका बाजूला लावून ते पायी चालायला लागले, आणि ऑटो ची वाट पाहू लागले. इतक्यात मानव तिथून जाताना दिसला, त्याने भैरवला ओळखलं आणि गाडी थांबवली. दोघांना सोडून देतो असं सांगून दोघांना गाडीत बसवलं. शलाकाला मानव सरांबद्दल थोडासा राग होताच, त्यामुळे ती जरा नाराजीनेच गाडीत बसली. जाताना तिचं लक्ष बाहेर होतं, कॅफे मध्ये तिला तनिषा मॅम दिसल्या आणि नकळत ती ओरडली,

"अरे तनिषा मॅम इथे?"

मानवने गाडी थांबवली, तनिषा अनिल सोबत बसली होती हे पाहून शलाकाला ओरडल्याचं अपराधी वाटलं..तनिषा मॅम कामानिमित्त त्या माणसाशी बोलत असल्या तरी मानव सरांचा गैरसमज झाला तर? आपण उगाच ओरडलो असं तिला झालं..तनिषा मॅमच्या पर्सनल लाईफ मध्ये आपल्यामुळे भांडण नको..तिला राहवलं नाही, ती म्हणाली..

"सर, मॅम कामानिमित्त बोलत असतील त्यांच्याशी.."

मानव जोरजोराने हसायला लागला..

"अगं तुला काय वाटलं? तिला एखाद्या माणसाशी बोलताना पाहून मी चिडेल? Dont worry.. अगं माझी बायको खूप मोठी व्यक्ती आहे, कित्येक लोकांशी तिला संपर्क करावा लागतो.. कधी बाहेरगावी जावं लागतं. उगाच नाही तिने शब्दांतरसारखं इतकं मोठं विश्व उभं केलं..तिच्यात ही उमेद सुरवातीपासून होती, पण तिने प्रचंड मेहनत घेऊन आज इतकी यशस्वी झाली..किती अन काय काय संकटं आली तिच्या वाट्याला, पण ती डगमगली नाही..धीराने सामोरं गेली..त्या वीर भोसलेला तर तिने नाकात दम करून सोडला, बघितलं ना?"

मानव सर आपल्या बायकोचं कौतुक करता थकत नव्हते आणि शलाका एकेक वाक्य ऐकून आश्चर्यचकित होत होती. मानव सरांनी कितीही कांगावा केला तरी बायकोचं वर्चस्व त्यांना मान्य होतं, त्याचा अभिमान त्यांना होता...फक्त एवढंच की त्यांच्या पुरुषी अहंकारामुळे ते हे सगळं तनिषा मॅम समोर बोलत नव्हते..

____

"अनिल, मी..म्हणजे माझ्यासारखे बिझनेसमन यासाठी काही करू शकतील का?"

"तुम्हीच करू शकता, आजकाल बिझनेसमन फक्त स्वतःच्या प्रॉफिट वर लक्ष केंद्रित करताय, त्यांच्या टेक्नॉलॉजी चा वापर देशाच्या भल्यासाठी फार कमी लोकं करतात..तुझ्याकडे मॅनपॉवर आहे, बुद्धिमान लोकं आहेत..त्यांना कामाला लावून या हॅकिंग वर सायबर solution काढू शकता तुम्ही.."

"Exactly, त्यासाठीच मी आत्ता त्या मुलीच्या मागे पळत होते..ती मैत्रीण कोण होती सांगू? इनाया.."

"इनाया..अरे हा, त्या आसिफच्या कानाखाली मारलं होतं कॉलेजमध्ये तीच ना? आणि तिला सगळं हॅक करता यायचं तीच ना ही?"

"बरोबर, विचार केला की तिला सोबत घ्यावं.. पण तिच्याशी संपर्क होणं मुश्किल दिसतंय.."

"होईल होईल, ईच्छा असली की सगळं होतं.."

"असं वाटतं कॉलेज सोडतानाच तिच्याकडून कबूल करून घ्यायला हवं होतं की कितीही झालं तरी एकमेकांच्या संपर्कात राहू.."

"हम्म..काही गोष्टी वेळच्या वेळी केल्या नाहीत तर आयुष्यभर कुढत राहावं लागतं.."

"म्हणजे?"

"काही नाही, असंच आपलं.."

"अरे देवा..माईंना ही सुई आणि दोरा द्यायचा आहे, खूप उशीर झालाय, काहीतरी थाप मारावी लागणार..चल येऊ मी.."

"हो..पण...तनिषा..."

"बोल ना.." तनिषा आपली पर्स उचलत उठायला लागते..

"काही नाही.."

आजही अनिल मौनच राहिला...

____

वीर भोसलेला कोर्टाने चौकशीसाठी हजर राहायला लावलं, पोलिसांचा फेरा त्याच्या मागे लागला. चारही बाजूंनी तो पुरता अडकला होता. त्याचं करियर सम्पलं होतं, स्वतःला अति स्मार्ट समजणाऱ्या वीर भोसलेला हे सगळं पचवणं खुप कठीण जात होतं. तनिषा नावाच्या बाईने त्याचा केलेला सर्वनाश त्याला पचनी पडतच नव्हता..एके दिवशी खूप ड्रिंक्स घेऊन तो स्वतःशीच बरळू लागला..

"कोण कुठली ती बाई? वीर भोसलेला मात देते? अरे या वीर ला मात देणारा अजून जन्माला यायचाय.. मला कायद्याच्या फेऱ्यात अडकवलंस काय, अरे जरी मला बुद्धीने मात दिली असलीस तरी ताकदीने एक बाई एका माणससमोर कमजोरच पडणार.."

तनिषाला बुद्धीच्या स्पर्धेत हरवता आलं नाही, पण बळाच्या जोरावर तिचा खुनच करून टाकू या बदल्याच्या भावनेने त्याच्या मनात थैमान घातलं. तो सैरभैर झाला. झालेला अपमान, बरबाद झालेलं करियर यामुळे जवळजवळ त्याच्या डोक्यावरच परिणाम झाला आणि तो पोहोचला, शब्दांतर च्या ऑफिस मध्ये..रात्रीचे नऊ वाजेलेले असतात, सिक्युरिटीला चुकवून वीर आत शिरतो ते सरळ तनिषाच्या केबिनमध्ये. तनिषा फोनवर बोलत असते, वीर ला बघताच त्याचा उद्देश काय असेल हे तिला लक्षात आलं. ती फोन ठेवते आणि वीर ला म्हणते,

"ये, मला माहीत होतं की तू इथे येशील.."

"होका? जास्त स्मार्ट बनतेस? माझ्यापुढे तुझी काय ताकद ते बघतोच आता.."

"ती आता वेगळी का दाखवायला हवी? आत्तापर्यंत जे झालं त्यावरून पहिलीच असशील तू...माझी ताकद.." वीरच्या डोळ्यात डोळे घालून तनिषा वीरला म्हणते..वीर चवताळतो.. खिशातून सूरा बाहेर काढतो..हे बघून कुणीही घाबरलं असतं, पण तनिषा तटस्थ होती..वीर सूरा घेऊन तिच्यावर वार करायला जातो...सर्व ताकद एकटवून बरोबर तिच्या पोटात सूरा घुसणार तोच....


तोच ती त्याचा हात पकडते आणि पिरगळते.. वीर एकच किंकाळी फोडतो..हात असा पिरगळला गेलेला की एका क्षणात त्याची नशा उतरते..तिच्या हाताचा वेढा सोडवण्याचा तो जीवानिशी प्रयत्न करतो, पण त्याची ताकद कमी पडते..

"काय वाटलं तुला? डोक्याने हरवता आलं नाही मग ताकदीच्या बाबतीत मला हरवशील? तुला काय वाटलं? हे नाजूक हात फक्त घरकामच करतात? अरे दोन दोन मुलांना सांभाळताना कठोर झालेले हे हात आहेत...पापडाची खिशी घेतांना दहा माणसांचं बळ अंगात कसं आणायचं हे या शरीराला माहितीये...भांडी कपडे लादी करून करून सक्त झालेले हे हात आहेत...स्वयंपाक करतांना शंभर चटके सोसून मजबूत झालेले हे हात आहेत...इतक्या सहजासहजी नाही सुटणार....

क्रमशः

🎭 Series Post

View all