दि बूमरँग..
© निशा थोरे
(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. नाव, गाव स्थळ, घटना पूर्णपणे काल्पनिक आहे. कथेचा मूळ हेतू हा फक्त मनोरंजन असल्यामूळे कोणीही कथेचा वास्तवाशी संबंध जोडू नये. या कथेचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)
****************************************************
आज जेनी प्रचंड खुश होती. दिल्लीमध्ये असलेली क्लायंट मिटींग लवकर उरकून तिला मुंबईहून लगेच सत्येनसोबत गोव्याला निघायचं होतं. किती प्लॅन्स, किती स्वप्नं पाहिली होती तिने या दिवसांची! ख्रिसमसच्या सणापासून ते नवीन वर्षाचं सेलिब्रेशन तिला गोव्यातच साजरी करायचं होतं. एक महिन्यांपूर्वी आठ दिवसांची टाकलेली सुट्टी मंजूर झाली होती. रोजच्याच ऑफिसच्या टेन्शनमधून, घरातल्या जबाबदाऱ्यातून इतक्या वर्षांनी जेनीला पहिल्यांदा निवांत वेळ मिळणार होता.
जेनीने मीटिंग संपवली. क्लायंटचा निरोप घेऊन दिल्ली एअरपोर्टला जाण्यासाठी टॅक्सी पकडली. टॅक्सीमध्ये बसल्यावर तिने सत्येनला फोन केला.
“हाय हबी, काय करतोयस? माझं इथलं काम झालंय. आता दिल्ली एअरपोर्टला निघालेय. मुंबईत आले की लगेच आपल्याला गोव्याला निघायचं आहे. मी गोव्याला जाण्यासाठी रात्रीच्या विमानाची तीन तिकीटं आधीच बुक करून ठेवलेत. तू तुझं काम पटकन आवर हा! सत्या, यावेळीस मला काहीही कारणं नकोयत. आधीच सांगते तुला? मी खूप प्लॅन्स बनवलेत. हे आठ दिवस मला एकदम मेमोरेबल बनवायचे आहेत. एकदम यादगार.! आर यु गेटिंग माय पॉईंट?”
जेनी जरा दरडावून म्हणाली. त्यावर सत्येन हसून म्हणाला,
“हो ग स्वीटहार्ट! यावेळीस तुला तक्रारीसाठी मी एकही संधी देणार नाही. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे मी. बघच तू! तू लवकर ये. मी इथे ऑफिसमधली सर्व कामे संपवतो. आय एम ऑलसो एक्सायटिंग यार! सेकंड हनिमून आहे ना आपला! यादगार तर बनवायचाच”
असं म्हणून सत्येन मिश्कीलपणे मोठ्याने हसला.
“चल चावट कुठला! ठेवते आता. आल्यानंतर बोलू”
जेनीच्या चेहऱ्यावर लाजेची लाली उमटली. खरंतर मनातून मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. नुसत्या कल्पनेने तिच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले होते. ती अंगोपांगी मोहरली. थोड्याच वेळात ती दिल्ली विमानतळावर पोहचली. मुंबईत पोहचल्यावर तिला ज्यूलीच्या हॉस्टेलवर जाऊन तिला सोबत घ्यायचं होतं. कधी एकदा मुंबईत पोहचतोय आणि गोव्याला जातोय असं तिला झालं होतं.
गोव्याला त्यांचा अलिशान बंगला होता.. पीटर आणि मारिया हे जोडपं तिथेच गेस्टहाऊस मध्ये राहत असत. साफसफाई, बंगल्याची देखरेख करत असत. कधीतरी सत्येन बिझनेस मीटिंगनिम्मित गोव्याला आला की त्याच्या बंगल्यावर जायचा. दोन चार दिवस मुक्काम करून परत घरी मुंबईला निघून यायचा. जेनीही अधूनमधून गोव्याला जात येत असे. पण कधी एकत्र जाणंयेणं होत नव्हतं. नेहमी एकटेच जात असत. त्यामुळे एकत्रपणे एकमेकांच्या सोबत त्यांना कधी वेळ घालवता आला नव्हता. सत्येन सदैव त्याच्या व्यवसायाच्या व्यापांमध्ये आणि जेनी एका नामांकित कंपनीची सी.ई.ओ. होती. त्यामुळे तीही नेहमी बाहेर टुरवर असायची. नवनवीन कंपनीशी भेटी व्हायच्या. कंपनीचा व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी, सेल्स प्रमोशनच्या निमित्ताने ती कायम बाहेर फिरतीवर असायची. मोठमोठया कंपनीच्या डायरेक्टर्स सोबत ती एकटी डील करायची, आतापर्यंत तिने बऱ्याच मोठमोठ्या कंपन्यांशी टायअप केलं होतं. एकंदरीत काय तर दोघेही कायम आपापल्या कामात व्यस्त.. आपपल्या क्षेत्रात अग्रेसर..
पण यावेळीस मात्र इतक्या वर्षांनी सत्येनने त्याच्या व्यवसायाच्या व्यापातून तिच्यासाठी आणि ज्यूलीसाठी वेळ काढला होता. कारणही तसंच खास होतं. दोन दिवसांनी तिच्या आणि सत्येनच्या लग्नाला बारा वर्षे पूर्ण होणार होती. आणि लग्नाचा बारावा वाढदिवस ते गोव्याला जाऊन साजरी करणार होते. गेली एक महिनाभर ती प्लॅन्स आखत होती. हे आठ दिवस तिला खास संस्मरणीय बनवायचे होते.
जेनी मुंबईला विमानतळावर पोहचली. विमानतळावरून वरळी सीफेसला जाण्यासाठी टॅक्सी पकडली. मुंबईत पोहचल्या पोहचल्या तिने पहिला कॉल पीटरला केला.
“हॅलो पीटर, जेनी बोलतेय. आम्ही आठ दिवसांसाठी गोव्याला येतोय. तू बंगला नीट टापटीप, स्वच्छ ठेव. सत्येन, मी आणि ज्यूली तिघेही येतोय. मारियाला फिशमार्केटमधून चांगले फिश घेऊन आणायला सांग. डिनरला राईस आणि फिश करायला सांग. साहेबांना आवडतात न.! रात्री अकरा पर्यंत पोहचू आम्ही. हे बघ पीटर, आमच्या लग्नाचा वाढदिवस छान सेलिब्रेट करायचा आहे मला. बंगला छान सजव. साहेब एकदम खुश झाले पाहिजेत. मला त्यांची कोणतीही तक्रार नकोय. समजलं का पीटर तुला?”
जेनी पीटरला सूचना देत होती. जेनीचा उत्साह ओसंडून वाहत होता.
“हो मॅडम, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. मी सगळं छान आवरतो. छान सजवतो आपला बंगला. साहेब एकदम खुश होतील बघाच तुम्ही”
पीटर उत्साहाने जेनीला म्हणाला. इतर काही सूचना देऊन जेनीने फोन ठेवून दिला.
जेनी घरी पोहचली. फ्रेश होऊन थोडा आराम केल्यावर तिने बॅग पॅक करायला सुरवात केली. लग्नाच्या वाढदिवसाला घालण्यासाठी तिने खास ड्रेस बनवून घेतला होता. ब्लू कलरचा सिल्वर वर्क असलेला वन पिस शिवून घेतला होता. सत्येनसाठी सफेद रंगाचा सूट शिवून घेतला होता. समुद्रकिनारी गेल्यावर वापरण्यासाठी वेगळे कपडे घेतले होते. ज्युली आणि सत्येनसाठी पण तिने शॉपिंग केलं होतं. सगळ्या बॅगा भरून झाल्या. आता फक्त रात्री नऊ वाजताच्या फ्लाईटने गोव्याला जाणं बाकी होतं.
इतक्यात जेनीच्या मोबाईलची रिंग वाजली. तिच्या कंपनीच्या एम. डीं.चा कॉल होता.
“हॅलो जेनी, तुला अर्जेंटली बेंगलोरला जावं लागेल. खूप महत्त्वाची मीटिंग आहे. ती मीटिंग यशस्वीपणे पार पडली तर आपल्या कंपनीला दरवर्षी दोन ते तीन कोटींचा बिझनेस मिळणार आहे. कंपनीचा खूप मोठा फायदा होईल आणि पर्यायानं सर्वांचाच”
तिचे एम.डी. तिला बेंगलोरला मिटींगला जायला सांगत होते.
“अहो सर, पण माझी आज रात्रीच्या फ्लाईटची तिकीटं बुक आहेत. मी कशी जाऊ बेंगलोरला? प्लिज सर दुसरं कोणी नाही का जाऊ शकत?”
जेनी काकुळतीला येऊन विचारत होती.
“सॉरी जेनी, तू सुट्टीवर असताना तुला जायला सांगतोय. कारण तुझ्याशिवाय ही मीटिंग कोणीच यशस्वीपणे पार पाडू शकत नाही. प्लिज जेनी तुलाच जावं लागेल. हवं तर पुढे दोन दिवस सुट्टीचे वाढवून घे. पण या मिटींगला जा”
ते इतकी आर्जवे करू लागले म्हटल्यावर जेनीचा नाईलाज झाला. आणि ती मिटींगला जायला तयार झाली. तिने पटकन सत्येनला फोन करून सांगितलं.
“सत्येन, मला अर्जंटली बेंगलोरला जावं लागणार आहे. प्लिज तू ज्यूलीला घेऊन पुढे जा. मी लवकरच परत येते मीटिंग आटोपून. आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी मी गोव्यात असेन. प्लिज शोना, जाशील न तू आधी? माझं बुकिंग मी कॅन्सल करते. तू आणि ज्यूली पुढे जा”
ती सत्येनला विनंती करत म्हणाली.
“काय यार जेनी तू! तुझं हे नेहमीचं असतं ऐनवेळेस काम निघतं तुझं! बरं ठीक आहे आम्ही जातो पुढे. तू मीटिंग आटोपून लवकर ये”
थोडं नाराजीच्या स्वरात सत्येन बोलत होता. जेनीने त्याची समजूत घातली.
“सगळं पॅकिंग झालंय, मी ज्यूलीला हॉस्टेलवरून घेऊन येते आणि तिच्या ग्रँडपा आणि ग्रँडमाच्या घरी ठेवते. तिला तिथून सोबत घे आणि बॅग्स घेऊन पुढे जा. मी येतेच लगेच तुमच्या मागोमाग. सॉरी डियर.. लव्ह यू.. बाय..”
जेनीने फोन ठेवला. आणि ती पुढच्या तयारीला लागली. सर्व बॅगा तिने कार मध्ये टाकल्या. तिचं विमानाचं तिकीट कॅन्सल केलं. मग ज्यूलीच्या हॉस्टेलवर जाऊन तिने ज्यूलीला तिच्या आजीआजोबांच्या घरी सोडलं. पॅकिंग केलेल्या बॅगा तिथे ठेवल्या. जेनीने सत्येनच्या आई बाबांना त्यांच्या गोव्याला फिरायला जाण्याच्या प्लॅन बद्दल आधीच कल्पना दिली होती. आणि मग तिने थोडा वेळ थांबून त्यांचा निरोप घेतला आणि ती बेंगलोरला जाण्यासाठी एअरपोर्टला पोहचली.
दुसऱ्या दिवशी जेनी बेंगलोरला पोहचली. बेंगलोरच्या क्लायंट सोबतची मिटिंग ठरलेल्या वेळेत उरकली. मीटिंग छान झाली. क्लायंटसोबतच डील फायनल झालं. तिने ही आनंदाची बातमी एम. डी. ना कळवली. त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी जेनीचं अभिनंदन केलं. दरवर्षी दोन ते तीन कोटींचा बिझनेस कंपनीला मिळणार होता. जेनीलाही त्याचा मोबदला मिळणार होता. जेनीही खूप आनंदात होती. आता ती निर्धास्तपणे गोव्याला जाऊ शकणार होती. आणि सुट्टीचा आनंद घेऊ शकणार होती. सत्येन सोबतच्या स्वप्नांत रंगून गेली. सत्येनचा विचार मनात घोळत होताच की तिचा मोबाईल वाजला. सत्येनचा कॉल होता.
“हाय जेनी, कशी आहेस? आणि कशी झाली तुझी मिटिंग? तू कधी येणार आहेस? किती वाट पहायला लावणार आहेस यार!”
जेनीला चिडवण्यासाठी सत्येन चेष्टेने म्हणाला.
“शंभर वर्षे आयुष्य आहे बघ तुला. आता तुझाच विचार करत होते आणि तुझा कॉल आला. माझी मिटिंग छान झाली. डील फायनल झालं. ते कॉन्ट्रॅक्ट माझ्या कंपनीला मिळालं. मी उद्या संध्याकाळी येईन. तू काय म्हणतोस? तू पोहचलास का?”
जेनीने आनंदाने त्याला प्रश्न केला.
“मी एकटाच गोव्याला आलोय. ज्यूली माझ्यासोबत यायला नको म्हणाली. आजीआजोबांच्या सोबत वेळ घालवायचा म्हणाली. मी पण म्हटलं ठीक आहे. तेवढाच आपल्याला एकांत मिळेल. तसंही आपलं सेकंड हनिमून आहे ना! आपण दोघंच असायला हवं ना! आणि जेनी, तुला माहित आहे का! मी आधीच फोन करून पीटर आणि मारियाला सुट्टी दिली. ते सुद्धा गावाला गेलेत. दोन दिवसांनी परत येतील. म्हणजे आपल्याला डिस्टर्ब करायला कोणीच नाही. आणि आता मलाही कोणाचा व्यत्यय नकोय आपल्या दोघांत.. म्हणजे तू विचार कर, आता एवढ्या मोठ्या बंगल्यात फक्त तू आणि मी. हाऊ एक्सायटिंग न !! कम सून यार!! अब और इंतजार नही होता. ये जुदाई सही नही जाती.. ”
सत्येन फिल्मी डायलॉग मारत मिश्कीलपणे हसत म्हणाला,
“सत्या,तू पण ना! एकदम नौटंकी आहेस बघ.! मी येईपर्यंत उद्याची तयारी कर.. मी येते उद्या संध्याकाळी. बोलू नंतर. चल बाय!”
जेनीने हसून फोन ठेवून दिला. आणि ती पुढच्या प्रवासाची तयारी करू लागली. उघड्या डोळ्यांना उद्याची स्वप्नं पडू लागली.
दुसऱ्या दिवशी जेनी गोव्याला तिच्या घरी आली. बंगल्याच्या दरवाज्याला भलं मोठं कुलूप पाहून तिला आश्चर्य वाटलं. ती दारात येताच बंगल्याच्या गार्डनमध्ये छोट्याशा लाकडी घरात बांधून ठेवलेला तिचा लाडका कुत्रा, ‘टायगर’ तिला पाहून भुंकू लागला. तिने टायगरच्या लाकडी घराचं कुलूप उघडलं. तसा टायगर तिच्या जवळ येऊन शेपटी हलवून तिच्या पायाशी घटमळू लागला. जेनीने टायगरला जवळ घेतलं. प्रेमाने कुरवाळलं. दारात उभी असलेली तिची लाल रंगाची पोलो कार पण दिसत नव्हती. बहुतेक सत्येन कार घेऊन कुठेतरी बाहेर गेला असेल. तिने विचार केला. आणि बंगल्याचं कुलूप उघडून आत आली. प्रवासामुळे जेनी खूप दमली होती. घरी आल्यावर ती शॉवर घेऊन फ्रेश झाली. तिने घड्याळाकडे पाहिलं. बराच वेळ झाला होता पण सत्येन अजून आला नव्हता. जेनीने पुन्हा एकदा सत्येनच्या मोबाईलवर कॉल केला. पण त्याचा मोबाईल बंद होता.
“कुठे गेलाय सत्या, नेहमीचंच आहे त्याचं. आयत्या वेळेस आपले प्लॅन बदलत असतो. बहुतेक मला सरप्राईज गिफ्ट द्यायचं असेल. तेच आणायला गेला असेल. मोबाईलही बंद लागतोय. चार्जिंग संपलं असेल. येईल परत.. बर्थडे केक कट करण्याच्यावेळेपर्यंत तरी नक्कीच येईल.”
जेनीच्या मनात अनेक विचार पिंगा घालत होते. जेनीने हॉल आवरला. थोडं डेकोरेशन केलं. इतक्यात दारावरची बेल वाजली. तिला वाटलं सत्येन आला. धावत येऊन दार उघडलं.
“कुठे होतास सत्या तू?” दार उघडता उघडता ती ओरडली.
पण समोर सत्येन नव्हता. केक शॉप मधून केकची डिलिव्हरी घेऊन एक मुलगा आला होता.
“मॅडम, साहेबांनी केकची ऑर्डर दिली होती. केक घेऊन आलोय”
केकचा बॉक्स पुढे करत डिलिव्हरी बॉय म्हणाला. सत्येनला समोर न पाहून जेनी हिरमुसली. जेनीने त्याच्या हातून केक घेतला. त्याचं पेमेंट करून टाकलं. त्या मुलाने जेनीच्या शुभेच्छा दिल्या. जेनीने हसून आभार व्यक्त केलं. आणि तो मुलगा तिथून निघुन गेला.
जेनीने केक टेबलवर ठेवला. रात्रीच्या जेवणासाठी तिने बाहेरून जेवण ऑर्डर केलं होतं. ते सुंदररीत्या टेबलवर मांडून ठेवलं. रात्रीच्या सेलिब्रेशनसाठी तिने घेतलेला नवीन घोळदार ब्लू कलरचा वन पिस घातला. हलकासा मेकअप केला. आज तिला सत्येनसाठी नटायचं होतं. छान दिसायचं होतं. जेनीने स्वतःला आरश्यात पाहिलं.
“किती छान दिसतेय मी! लग्नाच्या बारा वर्षांनी सुद्धा!” सत्येनने मला या ड्रेसमध्ये, या रुपात पाहिलं तर वेडाच होईल.”
जेनी मनातल्या मनात पुटपुटली. स्वतःच्याच सौन्दर्याचा तिला मोह होत होता. सत्येनच्या विचारांनी ती मोहरली. आजच्या रोमँटिक रात्रीची कल्पना करून जेनी गोरीमोरी झाली. लाजेची लाली गालावर उमटली.
रात्रीच्या सेलिब्रेशनची तयारी पूर्ण झाली. जेनी सगळं छान आवरून सत्येनची वाट पाहत बसली. सत्येनची वाट पाहून जेनी कंटाळली. मध्यरात्र टळून गेली तरी अजून सत्येन घरी आला नव्हता.
कुठे गेला होता सत्येन? तो मुंबईत होता की गोव्यात?
पाहूया पुढील भागात..
क्रमशः
© निशा थोरे
प्रिय वाचक मित्रमैत्रिणींनो,
आजवर मी सर्वाधिक सामाजिक कथा लिहल्या. तुम्ही सर्वांनी त्या कथांना भरभरून प्रेम दिलंत. सर्वांचे मनःपूर्वक आभार. तुमच्या सर्वांचा स्नेह असाच मिळो हीच सदिच्छा.. 'रहस्यकथा’ या स्पर्धेच्या निमित्तानं मी पहिल्यांदाच रहस्यकथा लिहण्याचा प्रयत्न करत आहे. माझा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला? जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया माझं लिखाण समृद्ध करतील यात शंकाच नाही.
आपली शब्दसखी
© निशा थोरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा