दि बूमरँग.. भाग ३
पुर्वार्ध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, जेनी आणि सत्येनच्या लग्नाचा बारावा वाढदिवस गोव्यात साजरी होणार होता. पण वाढदिवसाच्या दिवशी सत्येन बेपत्ता होता. मध्यरात्र उलटून गेली तरी अजूनही सत्येन घरी आला नव्हता. सत्येनच्या बेफिकीर वागण्याने जेनी खूप संतापली होती. जेनीला जुने दिवस आठवले. कॉलेजमध्ये असताना त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. कॉलेज संपल्यावर त्यांनी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता मित्रांच्या मदतीने आंतरजातीय विवाह केला. आता पुढे..
दि बूमरँग.. भाग ३
जेनीची काळजी वाढत चालली होती. सत्येनचा अजूनही काहीच पत्ता लागत नव्हता. जेनीने सर्व मित्रांना कॉल केला पण कोणालाही त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. सत्येन गोव्याला गेलाय इतकीच माहिती जो तो सांगत होता. शेवटी जेनीने मधूला कॉल केला.
“हॅलो मधू, मी जेनी बोलतेय” - जेनी
“बोल जेनी, कसा काय फोन? तेही इतक्या दिवसांनी!” - मधू
“काही नाही ग! सत्येन आलाय का तिकडे? घरी नाहीये न. त्याच्या सर्व मित्रांना फोन केला. पण तो कुठेच नाहीये. एकदा तुला फोन करून विचारू म्हटलं म्हणून कॉल केला” -जेनी
“ सत्येन आणि इथे! नाही ग जेनी, तो कशाला इथे येईल? काय झालंय? नीट सांगशील का मला?” - मधू
“मी सांगते तुला नंतर.आता ठेवते चल बाय”
असं म्हणून जेनीने फोन ठेवून दिला. मधूच्या घरीही सत्येन नाही म्हटल्यावर आता मात्र जेनी खूप घाबरली. आईबाबांकडेही सत्येन नव्हता. तो मुंबईतही नव्हता. मग कुठे गेला असेल? तो गोव्यातच असेल का? सत्येन बेपत्ता होऊन दोन दिवस उलटून गेले होते. वाईट साईट विचार तिच्या मनात पिंगा घालू लागले. जेनीने आजूबाजूला चौकशी करायला सुरुवात केली. बाजूच्या बंगल्यात राहणाऱ्या शेजारच्या लोकांना तिने विचारलं. पण ख्रिसमस असल्याने बहुतेक जण सुट्टीला बाहेर फिरायला गेले होते. त्यामुळे कोणालाच सत्येन बद्दल सांगता येत नव्हतं. शेजारच्या बंगल्यात राहणाऱ्या सुझी आंटीला जेनीने विचारलं.
“सुझी आंटी, तुम्ही सत्येनला पाहिलं का?” - जेनी
“नाही बेबी, आम्ही काल रात्रीच बाहेरगावावरून आलो. काय झालं? एनीथिंग सिरीयस? सगळं ठीक आहे न!”- सुझी आंटी
“आंटी, काल आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. पण सत्येन कालपासून घरी आला नाहीये. त्याचा मोबाईलही बंद आहे. मी सगळ्यांना फोन केले. त्याच्या मित्रांना, मुंबईच्या ऑफिसमध्ये, माझ्या सासूसासऱ्यांना. पण सत्येन कुठेच नाहीये.आता मला खूप भीती वाटतेय आंटी”
बोलता बोलता जेनीला भरून आलं आणि ती रडू लागली. सुझी आंटी तिला समजावत म्हणाल्या,
“जेनी, सत्येन कालपासून बेपत्ता आहे. आणि तू सर्वांना फोन करूनही तो कुठे सापडत नसेल तर ही गंभीर बाब आहे. तू पोलीस स्टेशनला जाऊन ‘मिसिंग कम्प्लेन्ट’ देऊन ये. एकटी तू कुठे शोधणार? ऐक बेटा, आता पोलिसांची मदत तुला घ्यावीच लागेल. आणि काळजी करू नको सत्येन सापडेल. गॉड ब्लेस यू बेटा!”
सुझी आंटी जेनीचं सांत्वन करत होत्या. त्यांनी तिला पोलीस स्टेशनला जाण्याचा सल्ला दिला. जेनीलाही त्यांचं म्हणणं पटलं आणि ती पोलीस स्टेशनला सत्येन हरवल्याची तक्रार करायला निघाली.
जेनी पोलीस स्टेशनला पोहचली. तिथे गेल्यावर तिथले हवालदार फर्नांडिस यांनी इन्स्पेक्टर आले नसल्याचं सांगितलं. त्यांनी तिला थोडा वेळ वाट पाहायला सांगून बाहेर बसायला सांगितलं. ती पोलीस स्टेशनबाहेर ठेवलेल्या बाकावर बसून राहिली. डोळ्यांतून पाणी वाहत होतं.
थोड्याच वेळात पोलिसांची व्हॅन पोलीस स्टेशनच्या दारात येऊन उभी राहिली. आणि व्हॅनमधून एक उंच धिप्पाड इन्स्पेक्टरचा गणवेश धारण केलेला साधारण तिशीच्या वयाचा युवक खाली उतरला. भरभर वेगाने तो तडक आत शिरला. त्याच्या चालण्यात एक शिस्त, जरब होती. त्याने त्याच्या कडक आवाजात हवालदार फर्नांडिसना आवाज दिला. हवालदार फर्नांडिस धावतच त्याच्यासमोर येऊन उभे राहिले.
“अरे फर्नांडिस, बाहेर बसलेल्या मॅडम कोण आहेत? काय काम त्यांचं? आत पाठवून दे त्यांना”
“हो साहेब, आता बोलावतो त्यांना”
हवालदार फर्नांडिस यांनी जेनीला आत बोलावलं. इन्स्पेक्टर साहेबांनी तिला खुर्चीत बसायला सांगितलं.
“ येस मॅडम, बोला काय काम आहे तुमचं?”
जेनीने खुर्चीत बसता बसता इन्स्पेक्टर साहेबांच्या टेबलवर ठेवलेली नावाची पाटी वाचली. ‘अल्बर्ट लोबो’
“सर, मी जेनीफर बजाज डिसूझा. माझा नवरा सत्येन कालपासून घरी आलेला नाहीये. मी कालपासून त्याला फोन करतेय पण फोन बंद आहे त्याचा. मी सर्वांना कॉल करून पाहिलं पण तो कुठेच नाहीये. प्लिज सर, माझ्या नवऱ्याला शोधून काढा”
जेनी थोडी थांबली. कंठात दाटून आलेला उमाळा ती आवरू शकली नाही. ती रडू लागली.
“मॅडम, शांत व्हा. हे पाणी घ्या आणि मला नीट सांगा काय झालं आहे?”
इन्स्पेक्टर अल्बर्टने पाण्याचा ग्लास पुढे केला.
जेनी पुढे बोलू लागली.
“सर, मी आणि माझे पती, सत्येन बजाज मुंबईला राहतो. माझे पती व्यावसायिक आहेत आणि मी एका मल्टिनॅशनल कंपनीची सी.ई.ओ. आहे. काल आमच्या लग्नाचा बारावा वाढदिवस होता. आम्ही तो सेलिब्रेट करण्यासाठी मुंबईहुन इथे गोव्याला आठ दिवसांनी सुट्टी काढून आलो होतो. गोव्यात आमचा बंगला आहे. गेली चार वर्षांपासून आमचे विश्वासू नोकर पीटर आणि मारिया तिथेच राहतात. बंगल्याची देखभाल करतात. मला अचानक माझ्या ऑफिसच्या एका क्लायंट मीटिंगसाठी अर्जेंटली बेंगलोरला जावं लागलं. म्हणून मग मी सत्येन आणि माझी मुलगी ज्यूली यांना पुढे जायला सांगितलं. परवाच्या दिवशी सत्येनचा मला फोन आला आणि त्याने सांगितलं की तो ज्यूलीला सोबत घेऊन जात नाहीये. ती तिच्या आजी आजोबांच्या सोबत राहणार होती. म्हणून तो एकटाच पुढे गोव्याला निघुन आला होता. आणि त्याने पीटर आणि मारियाला सुट्टी देऊन टाकली होती. ते दोघे आठ दिवसांसाठी त्यांच्या गावी गेले आहेत. आम्ही दोघेच असणार म्हणून तो खुश होता. पण मी काल संध्याकाळी घरी पोहचले तेंव्हा घरात कुलूप होतं. मी सत्येनला फोन केला. त्याचा फोन बंद लागला. मी दरवाजा उघडून आत गेले. सेलिब्रेशनची तयारी केली. आणि त्याची वाट पाहत बसले पण तो आलाच नाही. कुठे असेल काहीच माहीत नाही”
जेनी रडत होती. तिला सत्येनची काळजी वाटू लागली. इन्स्पेक्टर अल्बर्टने तिचं सगळं बोलणं ऐकून घेतलं आणि शांत स्वरात तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली.
"मिसेस बजाज, तुमचं त्यांच्याशी काही भांडण?”
“नाही इन्स्पेक्टर, उलट आम्ही पहिल्यांदाच इतके दिवस एकमेकांसाठी निवांत वेळ काढला होता. खूप वर्षांनी आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवणार म्हणून सत्येन जास्त आनंदी होता” - जेनी
इन्स्पेक्टर अल्बर्ट थोडा विचार करून जेनीला म्हणाला,
“सी मिसेस बजाज, आपण आजच्या दिवस त्यांची वाट पाहू. इथेच कुठेतरी कामानिम्मित गेले असतील. येतील ते. आम्ही तुमची लेखी तक्रार लिहून घेतो. तुम्ही मिसिंग कम्प्लेन्ट लिहून घरी जा. तुमचे पती आले तर आम्हाला कळवा. ते उद्यापर्यंत आले तर उत्तमच नाहीतर मग आम्हाला आमची पुढील कारवाई सुरू करावी लागेल. तुमचा मोबाईल नंबर देऊन जा. कदाचित आम्हाला तुमच्या घरी पुढील तपासासाठी यावं लागेल. काळजी करू नका”
त्याने जेनीला धीर देण्याचा प्रयत्न केला. आणि हवालदार फर्नांडिस यांना तिची लेखी तक्रार लिहून घ्यायला सांगितलं. जेनीने मिसिंग कम्प्लेन्ट दिली. आणि जेनी आपल्या घरी निघून आली.
इन्स्पेक्टर अल्बर्टने तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने जेनीची लेखी तक्रार पुन्हा एकदा वाचायला घेतली. आणि घटनाक्रम समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला.
“मुंबईचे मोठे व्यावसायिक मि. सत्येन बजाज आणि जेनीफर बजाज हया त्यांच्या धर्मपत्नी. २५ डिसेंबर रोजी त्यांचा लग्नाचा वाढदिवस. तो सेलिब्रेट करण्यासाठी त्यांनी गोव्यात येण्याचा प्लॅन केला. अचानक जेनीफरला २३ डिसेंबर रोजी त्यांच्या कंपनीच्या कामानिमित्त बेंगलोरला जावे लागले. म्हणून सत्येन बजाज २३ डिसेंबर च्या रात्री ९ वाजताच्या फ्लाईटने गोव्याला जाणार होते. २४ डिसेंबर रोजी जेनीफर यांनी बेंगलोर मधली त्यांची ऑफिसची मीटिंग संपवली. मीटिंग संपवून बाहेर पडत असताना मि. बजाज यांचा त्यांना कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की ते एकटेच गोव्याला आलेत. त्यांचे नोकर पीटर आणि मारिया यांना सुट्टी दिलीय. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबर रोजी संध्याकाळी जेनीफर आपल्या घरी आल्या तेंव्हा तिथे त्यांना घरी कुलूप दिसलं. दारात त्यांची गाडीही नव्हती. त्यामुळे सत्येन कुठेतरी बाहेर गेले असतील असं वाटून त्या त्यांची वाट पहात बसल्या. पण सत्येन घरी आले नाहीत.”
“नेमकं काय झालं असेल? सत्येन गोव्याला आला होता. की अजून दुसरं काही वेगळं असेल? समथिंग ईज मिसिंग”
इन्स्पेक्टर अल्बर्ट स्वतःशीच पुटपुटला. जेनीचा मोबाईल नंबर स्वतःच्या मोबाईलमध्ये सेव करून ठेवला. आणि मग ‘वाट बघू उद्यापर्यंत काय होतंय ते?’ असं म्हणून त्याने दुसरी फाईल हातात घेऊन पुढंचं काम करू लागला.
दुसऱ्या दिवशी जेनीने पोलीस स्टेशनला फोन केला. इन्स्पेक्टर अल्बर्टने टेबलवरचा फोन उचलला.
“हॅलो, गोवा पोलीस स्टेशन.” -
“हॅलो इन्स्पेक्टर अल्बर्ट, माझ्या नवऱ्याबद्दल काही समजलं का? तो अजून घरी आलेला नाही”
जेनी फोनवरही खूप रडत होती. इन्स्पेक्टर अल्बर्ट जेनीला धीर देत म्हणाला,
“मिसेस बजाज, आम्ही त्यांना शोधण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. तुम्ही थोडं धीराने घ्या. मी तुमच्या घरी चौकशीसाठी येतोय. मी येतोच. आल्यावर बोलू. बाय”
असं बोलून अल्बर्टने फोन ठेवून दिला.
थोड्याच वेळात इन्स्पेक्टर अल्बर्ट जेनीच्या बंगल्यावर पोहचला. तो भव्य अलिशान बंगला पाहून क्षणभर जागच्या जागीच थबकला. बंगला खूपच सुंदर होता. प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच टायगर जोरजोरात भुंकू लागला. जेनी पटकन बाहेर आली. इन्स्पेक्टर अल्बर्ट समोर उभा होता. तिने टायगर शांत केलं. आणि अल्बर्टला आत यायला सांगितलं.
अल्बर्टने बंगल्यात प्रवेश केला. सोफ्यावर बसत तो आजूबाजूच्या वस्तू न्याहाळू लागला. आलिशान बंगल्यातली प्रत्येक वस्तू सुरेख आणि मौल्यवानच होती.
अल्बर्टने जेनीला विचारलं,
“मिसेस. बजाज तुमच्या लग्नाला बारा वर्षे झाली. बरोबर ना! मग तुमचं आणि तुमच्या पतीचं नातं कसं होतं? तुमचे वैवाहिक जीवन कसं होतं? - अल्बर्ट
जेनी पुन्हा आपल्या भूतकाळात रमली.
पुढे काय होतं? सत्येनचा तपास लागेल का? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
© निशा थोरे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा