दि बुमरँग भाग २

ही एक चित्तथरारक रहस्यकथा..


 

दि बूमरँग.. भाग २

पुर्वार्ध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, जेनी आणि सत्येनच्या लग्नाला बारा वर्षे होणार होती. आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी  गोव्याला जाण्याचा त्यांचा प्लॅन ठरला होता. अचानक जेनीला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी बेंगलोरला जावं लागलं. तिने सत्येनला पुढे जायला सांगितलं आणि ती मीटिंगहुन तडक गोव्याला येणार असं ठरलं.. जेनीची मीटिंग आटोपली आणि ती दुसऱ्या दिवशी गोव्याला पोहचली. आता पुढे..

दि बूमरँग.. भाग २


 

सत्येनची वाट बघून जेनी कंटाळली. जेनीला सत्येनचा खूप राग येत होता. लग्नाच्या वाढदिवसादिवशी तो गायब होता. कुठे जातोय? हे सांगण्याचं सुध्दा सौजन्य त्याने दाखवलं नव्हतं. जेनीच्या सगळ्या प्लॅन वर पाणी पडलं होतं. ‘मनात मांडे आणि पदरात धोंडे’ अशी तिची अवस्था झाली होती. जेनीच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं. रागाने नाकपुड्या लाल झाल्या होत्या. सत्येनच्या या अशा बेजबाबदार वागण्याचा तिला प्रचंड मनस्ताप होत होता. तिने सोफ्याच्या बाजूला टेबलवर ठेवलेला दोघांचा फोटो घेतला आणि फोटोमधल्या सत्येन सोबत भांडू लागली. 

“सत्या, परिस्थितीचं काही गांभीर्य आहे की नाही तुला? नेहमीच असं काहीतरी सुरू असतं तुझं.. कामाचं कारण सांगून एरव्ही मला वेळ देत नाही. आणि आता थोडा निवांत वेळ मिळाला तर असा गायब झालायस! ये घरी चांगलीच खरडपट्टी काढते तुझी!”

जेनी रागाने एकटीच बडबडत होती. तिने पुन्हा एकदा सत्येनला फोन केला. पण अजूनही सत्येनचा मोबाईल बंदच येत होता. 

“अरे सत्या, कुठे आहेस तू? का मला टेन्शन देतोयस? इतका कसा रे बेफिकीर तू? तेव्हाही तसाच होतास तू! बेफिकीर, मनमौजी..! इतक्या वर्षांनीही तुझ्यात काहीच बदल झाला नाही. पूर्वी होतास तसाच आजही. काय करू रे मी तुझं!” 

जेनीच्या डोळ्यांत सत्येनच्या आठवणीने पाणी आलं. तिला सत्येन आणि तिचे जुने दिवस आठवू लागले. ती तिच्या भूतकाळातल्या जुन्या आठवणीत रमून गेली.

बघता बघता बारा वर्षे सरून गेली होती. कधी एक तप उलटून गेलं होतं ते  तिचं तिलाच कळलंच नाही. जणू काही काल परवा घडलेलीच गोष्ट! जेनीला कॉलेजचे दिवस आठवले.

कॉलेजचे सोनेरी दिवस. स्वप्नांचा वेध  घेणारे. फुलपाखरांचे पंख लावून उडण्याचे. प्रेमात वेडं होण्याचे, फुलायचे दिवस. झोपळ्या वाचून झुलायचे दिवस. सत्येन इंजिनिअरिंग कॉलेजच्या शेवटच्या वर्षांला होता. कॉलेजमध्ये तो सगळ्यांच्या चर्चेचा विषय असायचा. दिसायला देखणा, रुबाबदार, अभ्यासात हुशार. कॉलेजमधल्या प्रत्येक गोष्टीत उत्स्फूर्तपणे सहभाग असायचा. स्वभावाने थोडा मिश्कील. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारा. थट्टा मस्करी करणारा, शिक्षकांचा आवडता विद्यार्थी. मुलींचा चॉकलेट हिरो. मुली अगदी सत्येनसाठी वेड्या व्हायच्या.  

आणि एक दिवस जेनी त्याच्या आयुष्यात आली. आणि त्याचं आयुष्यच बनली. ती इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षासाठी कॉलेजमध्ये आली होती.  सत्येन आणि त्याचे मित्र कॉलेजच्या आवारात उभे होते. इतक्यात ती समोरून त्याला येताना दिसली.  दिसायला खूप सुंदर होती ती. गुलाबी रंगाचा लॉंग स्कर्ट आणि ब्लॅक रंगाचा टॉप घातलेली. गोरा वर्ण, नाक चाफेकळी, गालावर गोड खळी,पाणीदार काळेभोर बोलके डोळे, नाजूक गुलाबी ओठांच्या पाकळ्या, हातात नाजूक सोन्याचं ब्रेसलेट, काळेभोर केस मोकळे सोडलेले, चेहऱ्यावर तिला त्रास देणारी ती अवखळ बट नाजूक बोटाने मागे सारत मध्येच तिचं ते गोड मधाळ हसू,  हृदयाचा ठोका चुकवणारा तिचा तो कटाक्ष..

“ओहो सुरेख, ब्यू..टीफुल..”  

सत्येनच्या मुखातून कौतुकाने आपसूक शब्द बाहेर पडले. आणि तो तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या लक्षात आलं तीची भिरभिरती नजर काहीतरी शोधत होती. सत्येन तिच्या जवळ आला. मोठ्या अदबीने त्याने तिला विचारलं, 

“एक्सक्यूज मी, आय एम सत्येन बजाज. मे आय हेल्प यू?” 

ती स्मित हास्य ओठांवर आणत आपल्या मधुर आवाजात म्हणाली,

“वर्ग शोधतेय, तिसरे वर्ष- इलेक्ट्रिकल ”  

सत्येनने समोर बोट दाखवत वर्ग दाखवला. जेनी हसून  त्याचे आभार मानत म्हणाली,

“ओह्ह, थॅंक्यु मि. सत्येन. मी जेनीफर डिसूझा, न्यू ऍडमिशन. नाईस टू मिट यू”

जेनीने पटकन हस्तोलंदन करण्यासाठी हात पुढे केला. बावरलेल्या सत्येनने तिच्या हातात मिळवला. पहिल्याच भेटीत तिच्या  इतक्या मोकळ्या स्वभावाचं त्याला आश्चर्य वाटत होतं आणि कौतुकही. मग दोघांनी एकमेकांची  ओळख करून घेतली. किरकोळ गप्पा झाल्यानंतर त्याने जेनीचा निरोप घेतला आणि सत्येन तिथून निघून गेला. खरंतर सत्येन तिथून निघून गेला खरा पण हृदय मात्र तिथेच हरवून गेला होता. त्याचं मन तर अजून तिथेच थिजून राहिलं होतं. तीच्या भोवती घुटमळत राहिलं. सत्येनला जेनीफर खूप आवडली होती. पाहता क्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता. रम्य तो क्षण!, जणू तिथेच थांबलेला. तीच बोलणं, तिचं ते मधाळ हसू. त्याला पुन्हा पुन्हा आठवत होतं.

हळूहळू सत्येन आणि जेनिफर यांच्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत होऊ लागलं. छान नातं रुजू लागलं. सत्येनने जेनिफरची त्याच्या कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपशी ओळख करून दिली. आपल्या मनमोकळ्या स्वभावानं तिने सर्वांना आपलंस केलं. तिची सर्वांशी छान मैत्री झाली.  ग्रुपमधले सगळे मित्रमैत्रिणी तिला ‘जेनी’ म्हणू लागले. 

जेनीशी मैत्री झाल्यावर सत्येनला समजलं की, जेनी मूळची गोव्याची. आईवडिलांचं एकुलतंएक कन्यारत्न. त्यामुळे  लाडाकोडात वाढलेली. आजवर जेनीच्या आईवडिलांनी  तिचे सगळे हट्ट पुरवले होते. बिनधास्तपणा आधीपासूनच तिच्यात मुरलेला. जन्मतःच मनमोकळा स्वभाव घेऊन आली होती जणू.! वडिलांचा हॉटेल्सचा बिझनेस. गोव्यात दोन तीन रेस्टॉरंटस जेनीच्या नावावर. गोव्यात आलिशान बंगला, गाडी सारं सुख तिच्या पायाशी लोळण घालत होतं. जेनी मुंबईत शिक्षणासाठी आली होती. सध्या ती तिच्या मावशीकडे राहत होती. इंजिनिअरिंग पूर्ण झालं की ती परत तिच्या घरी गोव्याला जाणार होती. 

हळूहळू जेनी आणि सत्येनची मैत्री घट्ट होत होती. जेनीलाही सत्येनचं सोबत असणं आवडत होतं. सत्येनचा रुबाबदार पेहराव, मिश्किल स्वभाव आवडू लागला होता. तासंतास दोघांच्या गप्पा रंगायच्या आणि मग दोघांनाही वेळेचं भान उरायचं नाही. सत्येनला जेनी कायम ‘सत्या’ म्हणून हाक मारायची. सत्येनलाही  जेनीचा स्वभाव, तीच वागणं, तीच बोलणं आवडू लागलं होतं. रोज सत्येनचे डोळे जेनीचा शोध घेत असायचे. ती दिसली नाही की तो बैचेन व्हायचा. जेनी त्याच्या अवतीभवती असली  की  तो आनंदी असायचा. एक हलकीशी गोड कळ हृदयात यायची. तो तिच्या प्रेमात पडला होता. 

दोघांची मैत्री होऊन जवळजवळ वर्ष उलटून गेलं होतं. सत्येनचं कॉलेज संपणार होतं. फायनल परीक्षा संपल्यावर सत्येन कॉलेजला येऊ शकणार नव्हता. आणि अजूनही  जेनीच्या मनाचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. सत्येनने जेनीला अजून प्रपोज केलं नव्हतं. जेनीच्या मनात त्याच्याबद्दल नक्की काय आहे? हे जाणून घेण्यासाठी त्याने जेनीची मैत्रीण मधूची मदत घेण्याचं ठरवलं. सत्येनने मधूला जेनीबद्दल वाटणाऱ्या प्रेमाबद्दल सांगितलं. जेनीला कॉलेजच्या बाहेर असलेल्या ‘कॉफी कॅफे डे’ मध्ये  संध्याकाळी भेटायला येण्याचा निरोप मधूकडे दिला. मधूने त्याचा निरोप जेनीला दिला. 

मधूचा निरोप मिळताच जेनी थोडी अस्वस्थ झाली. 

“सत्येनने कॅफेमध्ये का बोलावलं असेल? आणि सरळ मला सांगायचं ना! मधूकडे का निरोप पाठवला? हा सत्या पण ना! नेहमी काहीतरी घोळ घालत असतो. काय माहिती अजून काय उचापती करून ठेवल्यात?” 

जेनी स्वतःशीच बोलत होती. संध्याकाळ झाली आणि जेनी ठरलेल्या वेळेनुसार सत्येनला भेटायला कॅफेमध्ये आली. सत्येन आधीच कॅफेमध्ये येऊन बसला होता. जेनीला पाहताच तो उठून उभा राहिला आणि तिला त्याच्या टेबलजवळ बोलावलं. त्याने वेटरला दोन कॉफी घेऊन यायला सांगितलं. वेटर निघून गेला. 

थोड्याच वेळात वेटर कॉफी घेऊन आला. सत्येनने जेनीला कॉफी घ्यायला सांगितलं. अचानक बोलवल्यामूळे जेनी काळजीत होती. 

“काय रे सत्या? काय झालं? असं अचानक तातडीने बोलून घेतलं? एनी प्रॉब्लेम?” 

सत्येनचा गंभीर चेहरा पाहून जेनीने काळजीच्या स्वरात सत्येनला विचारलं. सत्येन थोडा घाबरला होता. त्याने खिश्यातून रुमाल काढला. कपाळावरचा घाम पुसला. टेबलवर ठेवलेल्या ग्लासमधलं पाणी प्यायला. आणि तो बोलू लागला,

“जेनी, तुला माहीत आहेच की हे माझं इंजिनिअरिंगच शेवटचं वर्ष आहे. दोन महिन्यांनी माझी वार्षिक परीक्षा आहे. त्यामुळे लवकरच कॉलेजला सुट्टी लागतील. त्यानंतर मी पुन्हा कॉलेजला येऊ शकणार नाही. म्हणूनच  आज मी तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायला इथे बोलावलं आहे. बऱ्याच दिवसांपासून तुला सांगायचं होतं. पण धीर होत नव्हता. आज हिंमत करून मी तुला  बोलतोय! जेनी तू मला फार आवडते. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय जगू नाही शकत. आय लव्ह यू जेनी, माझ्याशी लग्न करशील?“ 

जेनीला हे सगळं अनपेक्षित होतं. अचानक ओढवलेल्या या प्रसंगामुळे ती गोंधळली. पण मनात मात्र आनंदाला उधाण आलं होतं.  जेनीलाही सत्येन खूप आवडत होता. ती सुद्धा त्याच्यावर प्रेम करू लागली होती. पण सत्येनने तिला विचारलं नव्हतं. म्हणून ती शांत राहिली होती. पण आज  सत्येनने असं प्रपोज करणं तिला खूप आवडलं होतं. सत्येनने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मनातला राजकुमार तिला मिळणार होता. ईश्वराने जणू तिच्या साऱ्या इच्छा पूर्ण केल्या होत्या. पण ती क्षणभर शांत झाली. आणि विचार करून म्हणाली,

“सत्या, हे सगळं मला अनपेक्षित आहे. मलाही तू खूप आवडतोस. पण पुढे काय होणार मला माहित नाही. मनापासून प्रेम करते मी तुझ्यावर. लग्न करून संपूर्ण आयुष्यभर तुझ्यासोबत  राहण्याची इच्छासुद्धा आहे. पण सत्या, आपले घरचे तयार होतील आंतरजातीय विवाहाला? अजून तुझं करीयर व्हायचं. तू नोकरी की बिझनेस करणार हेही तुला माहीत नाही. माझं कॉलेज पूर्ण नाही. मग कसं करणार?” 

“ऐकतील आपले आईबाबा. आपण समजावू त्यांना. आपल्या सुखापेक्षा त्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे का? मी वडिलांच्या बिझनेसमध्ये त्यांना मदत करणार आहे. आणि नक्कीच सर्व ठीक होईल. पण तू तयार आहेस ना!”

यावर जेनी गोड हसली आणि लाजत तिने मान हलवून होकार दिला. जेनीच्या होकाराने सत्येन खूप आनंदात होता. 

पुढे हा हा म्हणता संपूर्ण कॉलेजभर त्यांच्या प्रेमाची  बातमी 

पसरली. आणि कॉलेज तरुणींमध्ये दुःखाची अवकळा पसरली. ‘कॉलेजचा चॉकलेट हिरो कोणाच्यातरी प्रेमात’ हे ऐकल्यानंतर त्याच्यावर मरणाऱ्या मुलींची मनं तुटली होती. दोघांचं कॉलेज संपलं आणि जेनी आणि सत्येनने त्यांच्या प्रेमाबद्दल घरी सांगितलं आणि दोघांच्याही घरी वादळ उठलं. दोघांच्याही घरच्यांची आंतरजातीय विवाहाला मान्यता नव्हती. त्यांनी विरोध केला. त्यावेळीस त्यांचे मित्रपरिवार त्यांच्या मदतीला धावून आला होता. सगळ्या मित्रांनी मिळून त्यांचं लग्न लावून दिलं होतं. कोर्ट मॅरेज केलं आणि सत्येन आणि जेनी विवाहबद्ध झाले. 

आधीच प्रवासाच्या दगदगीमूळे जेनी खूप दमली होती. सत्येनची वाट पाहताना तिचा डोळा लागला आणि ती बसल्या जागीच फोटो उराशी कवटाळून सोफ्यावर झोपी गेली. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जेनीला जाग आली. तिने घड्याळ्यात पाहिलं. सकाळचे सात वाजले होते. अजून सत्येन घरी आलेला नव्हता. जेनी एकदम उठून बसली. आली. रात्रभर भूतकाळात धावत गेलेलं मन पुन्हा वर्तमानात आलं. तिने पुन्हा घड्याळाकडे पाहिलं. 

काहीशा रागानेच चरफडत तिने तिच्या सासूसासऱ्यांना घरी फोन केला. तिच्या सासूबाईंनी फोन उचलला.

“हॅलो मम्मा, सत्येनचा काही कॉल आला होता का? त्याने काही निरोप दिलाय का?” - जेनी

“अग जेनी, तो दोन दिवसांपूर्वीच गोव्याला गेलाय. ज्यूली गोव्याला जायला नको म्हणाली म्हणून तिला आमच्या जवळ ठेवून तो पुढे निघून गेला. का काय झालं?  सत्येन पोहचला नाही का? सत्येन ठीक आहे ना?” - सत्येनची मम्मा.

जेनीच्या सासूबाईंनी जेनीवर प्रश्नांचा भडिमार केला. त्या खुप घाबरल्या होत्या आणि काळजीतही होत्या. आता मात्र जेनीचं धाबं दणाणलं. जेनीला आता सत्येनची काळजी वाटू लागली. ती पुन्हा पुन्हा मोबाईलवर कॉल करून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. पण सत्येनचा मोबाईल बंद होता. 

जेनीने मुंबईला सत्येनच्या ऑफिसमध्ये कॉल करून पाहिलं.पण जो तो  ‘साहेब गोव्याला गेलेत’  हेच सांगत होता. सत्येनचे कॉलेजमधले काही मित्र त्याच्या सानिध्यात होते. मधूही अजून संपर्कात होती. जेनीने सत्येनच्या सर्व मित्रांना फोन करायला सुरुवात केली. पण कोणालाही सत्येन बद्दल माहित नव्हतं. सत्येन कोणाकडेही गेलेला नव्हता. 

दुसरा दिवसही सरत चालला होता. आता जेनीच्या रागाचं काळजीत रूपांतर होऊ लागलं. जेनीला मधूची आठवण झाली आणि  शेवटी  तिने मधूला फोन केला. 

पुढे काय होतं? सत्येन नक्की कुठे होता? पाहूया पुढील भागात.. 

क्रमशः

© निशा थोरे

🎭 Series Post

View all