दि बुमरँग भाग १३

ही एक चित्तथरारक रहस्यकथा..

दि बूमरँग.. भाग १३

पुर्वार्ध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, इन्स्पेक्टर अल्बर्टने  जेनीला सत्येनचा खूनाचा जाब विचारला. जेनी गोव्याला घरी आल्यावर बंगल्याच्या बेडरूम मध्ये तिला कुजबुज ऐकू आली होती. तिने दार ठोठावल्यानंतर फक्त टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत सत्येनला पाहून जेनी खूप संतापली होती. बेडरूमच्या मागच्यादाराने कोणीतरी बाहेर पळून जाताना तिने पाहिलं होतं.. गेली बारा वर्षे तो तिची प्रतारणा करत होता. तिला फसवत होता. जेनी खूप चिडली होती. सत्येन समजावून सांगताना जेनीच्या अंगाशी झोंबू लागला.  टेबलावरचा फ्लॉवरपॉट जेनीने त्याच्या डोक्यात घाव घातला. तो गतप्राण झाला. जेनीने सत्येनला बागेत पुरून टाकला. गाडी दरीत फेकून दिली. त्यानंतर जे पुन्हा बेंगलोरला गेली आणि दुसऱ्या दिवशी फ्लाईट बुक करून ती संध्याकाळी गोव्याला आली. नंतर तिने पोलिसांत रीतसर कॉम्प्लेइंट देऊन आली होती. जेनीने सत्येनचा मृतदेह ठेवलेली जागा दाखवली. अल्बर्टने मृतदेह पोस्टमार्टेम साठी पाठवून दिला. आणि एक धक्कादायक  बातमी समोर आली आता पुढे..



 

दि बूमरँग.. भाग १३


 

अल्बर्ट ताडकन खुर्चीतून उठून उभा राहिला. 


 

“डॉक्टर, मी येतो लगेच हॉस्पिटलमध्ये तिथेच आपण सविस्तरपणे बोलूया. ओके? बाय.” 


 

असं म्हणून अल्बर्टने फोन ठेवून दिला. कॉन्स्टेबल फर्नांडिसला गाडी काढायला सांगितली. आणि तो हॉस्पिटलला जाण्यासाठी निघाला. गाडी वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने जात होती. अल्बर्टच्या डोक्यात विचारांचा ओघ काही थांबत नव्हता. विचारांच्या तंद्रीत तो हॉस्पिटलच्या दारात कधी पोहचला त्याचं त्यालाच समजलं नाही. हॉस्पिटलच्या आवारात गाडी थांबताच तो तडक आत गेला. 


 

“डॉक्टर विल्सन कुठे बसतात?”


 

रिसेप्शनिस्टने त्यांच्या केबिनकडे बोट दाखवलं. अल्बर्ट तिचे आभार मानून त्यांच्या केबिनच्या दिशेने गेला. 


 

“हॅलो डॉक्टर, मी इन्स्पेक्टर अल्बर्ट. मघाशी आपण फोनवर बोललो होतो.."


 

डॉक्टरांच्या केबिनमध्ये प्रवेश करत अल्बर्ट म्हणाला. 


 

“हो. या ऑफिसर, मी तुमचीच वाट पाहत होतो. हा घ्या पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट. या रिपोर्टच्या आधारे हेच दिसून येतंय की, साधारण सात ते आठ दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा. साधारण रात्रीच्या दोन ते तीन च्या दरम्यान. यांच्या डोक्यावर जोरात प्रहार झाल्याची खूण दिसतेय पण मृत्यू या आघातामुळे नाही तर गळा आवळून झाला आहे. तेव्हा त्यांनी अमलीपदार्थांचं सेवन केलं असावं. त्यांच्या रक्तात अमली पदार्थाचे घटक आढळून आले आहेत.”


 

सत्येनचा पोस्टमार्टेमचा रिपोर्ट अल्बर्टकडे सरकवत डॉक्टर विल्सन म्हणाले. 


 

पेचात पडल्यासारखं अल्बर्ट काही क्षण आश्चर्याने फक्त डॉक्टरकडे पाहत बसला. 


 

“डॉक्टर, मी सत्येनची डेडबॉडी पुन्हा एकदा पाहू शकतो का?” - 


 

भानावर येत अल्बर्टने विचारणा केली. 


 

”हो. का नाही! चला मी तुम्हाला शवागृहात घेऊन जातो.” 


 

मग ते दोघेजण शवागृहात गेले. वॉर्डबॉयने सत्येनची डेडबॉडी ज्या शीतकपाटात ठेवली होती तो कप्पा उघडून बॉडी बाहेर काढली.  एक विचित्र, अस्वस्थ करणारा दुर्गंध हवेत पसरलेला जाणवत होता. अल्बर्टने त्याच्या जीन्सच्या मागच्या खिश्यातून हात रुमाल काढून स्वतःच्या नाकावर धरला. अल्बर्ट सत्येनचा मृतदेह नीट निरखून पाहत होता. सत्येनच्या डोक्यावर खोलवर झालेली जखम दिसत होती पण गळ्याभोवती कसलेच, कोणतेच व्रण दिसत नव्हते. तो विचारात पडला. त्याच्या मनात आलेले विचार कदाचित डॉक्टरांच्या लक्षात आले असावेत. डॉक्टर विल्सन अल्बर्टकडे पाहत म्हणाले,


 

“हे पहा इन्स्पेक्टर, ही जखम इतकी खोलवर नाही की लगेच त्यांचा मृत्यू झाला असेल. त्यांचा गळा आवळण्यात आला आहे. श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झालाय हे नक्की..” 


 

“सरप्राईजिंग!” 


 

आश्चर्याने अल्बर्टच्या तोंडून आपसूक शब्द बाहेर पडले. अल्बर्टने रिपोर्ट घेतला पुढच्या सगळ्या फॉर्मलिटीज संपवून सत्येनचा मृतदेह अंतिम विधी करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना देण्याची अनुमती दिली. आणि त्याने डॉक्टरांचा निरोप घेतला. आणि तो पोलीस स्टेशनला येण्यासाठी निघाला. त्याने गाडी स्टार्ट केली. अल्बर्टला खूप आश्चर्य वाटत होतं.  जेनीने गुन्हा कबुल केल्यामुळे तपास संपला असं वाटत असतानाच आता हा नवीन पेच त्याच्या समोर उभा राहिला होता. तो विचार करू लागला. त्याने पुन्हा जेनीला भेटायचं ठरवलं. थोड्याच वेळात अल्बर्ट जेनीला भेटायला तुरुंगात पोहचला. जेनी एका कोपऱ्यात डोळ्यांतून वाहणारी आसवं टिपत शांत बसून होती. अल्बर्टने कॉन्स्टेबलला तुरुंगाचे दार उघडायला सांगितलं. तो आत येताच जेनीने अल्बर्टकडे पाहिलं आणि पुन्हा मान खाली घातली. 


 

अल्बर्ट जेनीशी बोलू लागला,


 

“मिसेस बजाज, मला तुम्ही ती घटना पुन्हा एकदा सांगाल का?”


 

“त्याने काय होणार आहे. मी सत्येनचा खून केलाय. मला शिक्षा तर होणारच ना!” 


 

जेनी निराश होऊन म्हणाली.


 

“तरीही मला पुन्हा एकदा ती घटना तुमच्याकडून ऐकायची आहे. सगळं नीट आठवून सांगा. सांगताना काहीही सुटायला नको. एकूण एक अगदी छोट्यात छोटी डिटेल मला सांगा." - अल्बर्ट. 


 

त्याच्याकडे एकदा पाहून काहीशा नाखुशीनेच जेनी सांगू लागली. 


 

“मला सत्येनचा प्रचंड राग आला होता. त्याच रागाच्या भरात मी त्याच्या डोक्यात फ्लॉवरपॉट मारला. आणि तो खाली जमिनीवर कोसळला. मम्माशी बोलून मी फोन ठेवून दिला. सत्येनची बॉडी पुरण्यासाठी मी बागेत गेले. तिथे मोठा खड्डा खणला आणि मग सत्येनला ओढत गार्डनमध्ये आणलं आणि खड्यात टाकून पुरलं. त्यानंतर मी कार आंबोली घाटात दरीत फेकून दिली. आणि पुन्हा बेंगलोरला गेले आणि मग बंगलोरहून संध्याकाळी फ्लाईटने पुन्हा गोव्याला आले.” 


 

“मिसेस बजाज, साधारण किती वाजले असतील तेव्हा? म्हणजे तुम्हाला वेळ आठवते का? आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या डोक्यात किती वार केले?” 


 

“नक्की नाही आठवत पण माझ्या मते साधारण साडे अकरा-बारा वाजले असावेत. मी एकदाच त्याच्या डोक्यात फ्लॉवरपॉट घातला होता आणि तो जमिनीवर कोसळला त्यानंतर साधारण पाच दहा मिनिटाने मम्माचा फोन आला होता.” 


 

“आणि तुम्हाला खड्डा खणायला साधारण किती वेळ लागला असेल?” 


 

“नीट वेळ आठवत नाही; पण साधारण एक ते दोन तास लागले असतील. पण सर तुम्ही हे असं का विचारताय? काय झालंय नेमकं?” 


 

जेनीने अल्बर्टला प्रश्न केला. 


 

“मिसेस बजाज, तुमच्या नवऱ्याचा मृत्यू डोक्यावर मार लागल्यामुळे नाही तर गळा आवळल्याने गुदमरून झालाय. तुम्ही खरंच काही लपवत नाही आहात ना?


 

“व्हॉट? हे कसं शक्य आहे? मी स्वतः मारलं त्याला.. फ्लॉवरपॉट डोक्यात घातला आणि तो तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला. अगदी त्याला पुरेपर्यंत तो हललासुद्धा नाही. कारण तो तिथेच मेला होता त्यामुळे बाकी काही करण्याचा प्रश्नच नाही येत सर.. मी जे आहे ते खरं सांगितलं आहे तुम्हाला. आय स्वेअर.."


 

आश्चर्यचकित स्वरात जेनीने उत्तर दिलं. ते ऐकून अल्बर्ट विचारात पडला. नेमकं काय झालं असेल? तो घटनाक्रम लावण्याचा प्रयत्न करू लागला.


 

“मिसेस बजाज रात्री साडे अकराच्या दरम्यान घरी आल्या. रंगेहाथ पकडल्या गेलेल्या सत्येनच्या डोक्यात रागाच्या भरात फ्लॉवरपॉटने प्रहार केला. मग त्यांना त्यांच्या आईचा फोन आला. फोनवर बोलून झाल्यानंतर त्यांनी सत्येनला बागेत पुरण्याचा निर्णय घेतला. आणि त्या खड्डा खणण्यासाठी बागेत गेल्या. खड्डा खणून व्हायला साधारण एक ते दोन तास लागले. याचा अर्थ एकतर मिसेस बजाज खोटं बोलत असतील की मी फक्त फ्लॉवरपॉट डोक्यात मारला नंतर गळा आवळला नाही किंवा त्या जर खरं बोलत असतील तर तेंव्हा बंगल्यात अजून कोणीतरी होतं किंवा तेवढ्या वेळात बाहेरून कोणीतरी आलं असावं आणि त्याने गळा आवळून खून केला असावा.  दोन्ही शक्यता नाकारता येत नाहीत. जर मिसेस बजाज खुनी नसतील तर मग कोणी खून केला असेल सत्येन बजाज यांचा? कोण मिसेस बजाज यांना अडकवण्याचा प्रयत्न करू पहात आहे? मला शोधून काढायलाच हवं. मला पुन्हा मिसेस बजाज यांच्या बंगल्यावर जाऊन नीट तपास करायला हवा. काही पुरावे मिळतात का ते पहायला हवं..” 


 

अल्बर्ट स्वतःशीच बडबडत होता. पुन्हा सत्येन बजाज यांच्या खुनाची बंद झालेली फाईल पुन्हा उघडली गेली या केसच्या पोलीस तपासाची सूत्रं अल्बर्टने स्वतःच्या हाती घेतली. कॉन्स्टेबल फर्नांडिसला सांगून मिसेस बजाज आणि सत्येन बजाज यांचे कॉल रेकॉर्ड्स मागवून घेतले. निनावी कॉल कुठून आला होता? लोकेशन ट्रॅक करण्याचा, शोध लावण्याचा प्रयत्न सुरू झाला. अल्बर्ट पुन्हा पुन्हा घटनांची उजळणी करत होता. 


 

सत्येन बजाज यांच्या खूनप्रकरणाची फाईल पुन्हा ओपन झाली ही बातमी मीडियापर्यंत पोहचायला जास्त वेळ लागला नाही. जेनी नक्की गुन्हेगार आहे की नाही या बद्दल सर्वांच्या मनात प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उभा राहिला होता. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण खूपच लावून धरलं होतं. वरिष्ठांकडून लवकरात लवकर हे प्रकरण निकाली लावण्यासाठी इन्स्पेक्टर अल्बर्टवर दबाब टाकला जात होता. अल्बर्टला लवकरात लवकर खुन्यापर्यंत पोहचायचं होतं. त्याने मुंबईला इन्स्पेक्टर शंतनूला कॉल केला. आणि त्यांची मदत मागितली. सत्येनच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करायला सांगितली. सत्येन बजाज यांचे नातेवाईक, मित्रपरिवार सर्वांची कसून चौकशी करायला सांगितली. सत्येनच्या खुनाचे काही धागेदोरे हाती लागतात का ते पाहणं गरजेचं होतं.


 

अल्बर्ट दिवसरात्र कसून तपास करत होता. अल्बर्ट आपल्या टीमसोबत सत्येन बजाज यांच्या बंगल्यावर गेला. ज्या खोलीत खून झाला त्या खोलीचा कोपरा न कोपरा धुंडाळून काढला. बेडरूमचे मागचे दार उघडून तो तपास करू लागला. तपासादरम्यान अल्बर्टला बंगल्याच्या मागे एक निळ्या रंगाचा स्कार्फ सापडला. अल्बर्टने फिंगरप्रिंट एक्स्पर्टला बोलावून घेतलं आणि बेडरूमधल्या वस्तूंवरचे फिंगरप्रिंट्स घेण्यात आले. बेडरूममध्ये अल्बर्टला एक लेडीज मनगटी घड्याळ आणि एक कानातील इयर रिंग सापडलं. अल्बर्टच्या हाती काही पुरावे लागले. अल्बर्टने त्या वस्तू जेनीला दाखवल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की, त्या वस्तू जेनीच्या नव्हत्या. त्या बेडरूम मध्ये सत्येनशिवाय असलेली दुसरी व्यक्ती कोण होती? याचा तपास सुरू झाला. 


 

दुसऱ्या दिवशी कॉन्स्टेबल फर्नांडिसने अल्बर्टला निनावी कॉलचं लोकेशन सांगितलं. तपासादरम्यान अल्बर्टच्या हे लक्षात आलं की तो निनावी कॉल मुंबईतून आला होता. बांद्रा परिसरातील एका टेलिफोन बूथमधून कॉल आला होता. अल्बर्टने इन्स्पेक्टर शंतनूला ही माहिती पुरवली. आणि मग पुढे शंतनूने तपासाची चक्र वेगाने फिरवली. त्या परिसरातील रस्त्यावरील ट्रॅफिक सिग्नलवर असणाऱ्या प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्यात आले. आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट त्याच्या निदर्शनास आली. 


 

पुढे काय होतं? जेनी खरं बोलतेय का? जेनी नसल्यास खरा गुन्हेगार कोण? तो सापडेल का? पाहुया पुढच्या आणि अंतिम भागात. 


 

क्रमशः

©निशा थोरे

🎭 Series Post

View all