दि बुमरँग भाग ११

ही एक चित्तथरारक रहस्यकथा

दि बूमरँग.. भाग ११

पुर्वार्ध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की,  जेनी प्रेमाचं नाटक करून सत्येनला अँथनी बेकर्स मध्ये घेऊन आली आणि तिने अल्बर्टलाही तिथे बोलावले होते. जेनीला कुमारने सांगितले की ही ती व्यक्ती नाही जिने केकची ऑर्डर दिली होती. पण अल्बर्ट आल्यावर मात्र कुमारने सत्येन आणि नेन्सीला घाबरून आपले शब्द बदलले आणि अल्बर्टसमोर पुन्हा एकदा जेनी खोटी ठरली. जेनीच्या संपत्तीसाठी नेन्सी आणि सत्येनने आखलेला प्लॅन समोर आल्यानंतर जेनीला आश्चर्याचा धक्का बसला. संपत्तीच्या कागदपत्रांवर सह्या करायला नकार दिला आणि त्यामुळे संतापून नेन्सीने कुमारची गोळ्या झाडून हत्या केली होती.  आता पुढे..

दि बूमरँग.. भाग ११

जेनीला हॉलमध्ये बसल्या ठिकाणीच बरीच रात्र उलटून गेल्यावर डोळा लागला होता. जेंव्हा जाग आली तेंव्हा पहाट झाली होती. बाहेर पाखरं किलबिलत होती. सकाळपासून तिचं डोकं भणभणत होती. जेनीने उठून शॉवर घेतला. फ्रेश होऊन आवरून बसली. मारियाने तिला कॉफी आणून दिली. सकाळी नेन्सी कागदपत्रं घेऊन येणार होती. आणि तिने अल्बर्टलाही बोलावलं होतं. खरा गुन्हेगार आता पकडला जाणार होता. सत्येनचा खरा चेहरा समोर येणार होता. जेनी अल्बर्टची आतुरतेने वाट पहात होती. लवकरात लवकर हा तिढा सुटावा म्हणून सर्वपित्या येशुकडे आर्जवे करत होती. इतक्यात सत्येन बाहेर आला. मारियाने सत्येनला कॉफी दिली आणि ती भाजी आणण्यासाठी बाजारात जाते असं सांगून घराबाहेर पडली. कॉफी घेत असताना सत्येन जेनीकडे तिरप्या नजरेने पाहत होता.  जेनीला हॉलमध्ये पाहून त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. 

सकाळच्या दहाच्या ठोक्याला जेनीला नेंन्सी येताना दिसली. आत आल्यावर तिने दार लावून घेतलं. जेनीला पाहून स्मित हास्य करत दबक्या आवाजात म्हणाली,

“गुड मॉर्निंग डिअर, कालच्या गोष्टीचा तू नीट विचार केला असशीलच. ही घे कागदपत्रं आणि कर लवकर सह्या त्यावर. मला जास्त वेळ नाहीये”

इतक्यात जेनीला अल्बर्ट येताना दिसला. तिच्या जीवात जीव आला. दारावरची बेल वाजली तसे सत्येन आणि नेन्सी चपापले. त्यांनी जेनीला दार उघडायला सांगितलं. जेनीने पटकन पळत जाऊन दार उघडलं. अल्बर्ट आत आला.

“इन्स्पेक्टर, बरं झालं तुम्ही वेळेवर आलात. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करत होते. ह्या दोघांनी माझ्या संपत्तीसाठी माझ्या नवऱ्याला गायब केलेय. ते पहा नेन्सीच्या हातात कागदपत्रं. ती माझ्या सह्या घ्यायला आलीय. यांना विचारा माझा सत्येन कुठे आहे? यांनी माझ्यासमोर त्या अँथनी बेकर्स च्या मालकाचा खून केला आहे.  हे खुनी आहेत. गुन्हेगार तुमच्या समोर उभे आहेत. प्लिज त्यांना अटक करा”

जेनी जीव तोडून अल्बर्टला सांगत होती. 

“काम डाऊन मिसेस बजाज, शांत व्हा. आज साऱ्या गोष्टींचा उलगडा होईलच.साऱ्या प्रकरणाचा छडा लावूनच मी जाणार आहे. सिस्टर नेन्सी तुम्ही इथे काय करताय? तुमच्या हातात ते पेपर्स कसले आहेत? ” 

नेंन्सीकडे पाहत अल्बर्टने प्रश्न केला. 

”इन्स्पेक्टर, मिसेस बजाज यांना मनःशांतीची गरज आहे. म्हणून त्या अशा काहीही बडबडत आहेत. हे आमच्या चर्चच्या कार्यक्रमाचे कागदपत्रं आहेत. मि. आणि मिसेस बजाज यांनी आमच्या संस्थेचे सभासद होऊन संस्थेसाठी काही निधी दान करावा या विचारांनी आले होते. त्याचेच हे पेपर्स आहेत. तुम्ही पाहू शकता” 

नेन्सी पेपर्स पुढे करत अल्बर्टला म्हणाली.

अल्बर्टने नेंन्सीकडून पेपर्स घेतले आणि तो ते पेपर्स पाहू लागला. एकदम संतापून म्हणाला. 

“मिसेस बजाज काय मूर्खपणा आहे हा!  हे घ्या पेपर्स आणि पहा काय आहे यात? तुम्हाला वेड लागलंय.” 

जेनीने त्याच्या हातून पेपर्स हिसकावून घेतले आणि पाहिलं. ती अवाक झाली. ती नेन्सीच्या संस्थेची कागदपत्रं होती. जेनीला काहीच समजत नव्हतं. तिच्यासोबत का हे कारस्थान रचलं जात होतं.

“अल्बर्ट हा खरंच सत्येन नाही आहे प्लिज विश्वास ठेवा. हा माझा नवरा नाही” 

जेनी व्याकुळ होऊन कळकळीने सांगत होती. 

“मिसेस बजाज, इनफ.. प्लिज स्टॉप ईट.. मी कंटाळलो आहे तुमच्या वागण्याला. रोज उठून तेच. मिसेस बजाज, तुम्हाला असं वाटतं का पोलिसांना काही काम नाही? आता डोक्यावरून पाणी जायला लागलंय. या गोष्टीचा मी आजच सोक्षमोक्ष लावून टाकणार आहे.  हेच सत्येन बजाज आहेत हे लवकरच सिद्ध होईल” - इन्स्पेक्टर अल्बर्ट

जेनी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत होती.  आता अल्बर्ट  कोणता पुरावा देणार? हा सत्येन नाहीच आहे..  ती विचार करू लागली. अल्बर्ट पुढे  पुढे काही बोलणार इतक्यात जेनीला तिचे सासूसासरे बंगल्यात शिरताना दिसले. तिला आश्चर्यमिश्रित आनंद झाला. दोघे घरात शिरताच जेनीचे सासरे दारातूनच सत्येनकडे पाहून गरजले,

“सत्येन, कुठे होतास? किती काळजीत पडलो होतो. शेवटी आम्हाला यावं लागलं. तुला सांगून जाता येत नाही?” 

आता मात्र जेनीला  भोवळ येण्याची वेळ आली. 

“पप्पा! काय बोलताय हे! हा आपला सत्या नाही. तुम्ही का खोटं बोलताय?” 

जेनी चिडून म्हणाली.

“हे काय बोलतेस जेनी! स्वतःच्या नवऱ्याला ओळखत नाहीस का? डोक्यावर परिणाम झालाय का तुझ्या? हा सत्येन आहे तुझा नवरा!” 

जेनीच्या सासूबाई तिच्यावर खेकसल्या. 

“नाही मम्मा, हा सत्येन नाहीये,कोणी तोतया आहे. पण तुम्ही सगळे खोटं का बोलताय मला खरंच काही समजत नाहीये” 

जेनी रडकुंडीला आली. कोणीच तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. अल्बर्ट चिडून म्हणाला.

“मिसेस बजाज, काय समजता काय तुम्ही स्वतःला? सगळे मूर्ख आहेत का? सगळेजण खोटं बोलत आहेत आणि फक्त तुम्ही एकट्याच खरं बोलताय.! मिसेस बजाज स्वतःचे आईवडील सांगत आहेत की हाच आमचा  मुलगा आहे. कोणी जन्मदाते असं का सांगतील? मला मूर्ख समजलात का? पीटर, मारिया, तुमचा टायगर हे सारे खोटे आहेत?”

अल्बर्ट खूप संतापून बोलत होता. जेनीही आता खूप भडकली होती. तिचा स्वतःवरचा ताबा सुटला. ती प्रचंड उद्विग्न झाली होती. भावना अनावर होऊन ती जोरात ओरडली.

“हो, मीच खरं बोलतेय. हे सगळे खोटं बोलत आहेत. हा माझा नवरा नाही. हा सत्येन नाही. हा सत्येन असूच शकत नाही. कारण.. कारण.. मीच मारलंय त्याला” 

जेनीच्या तोंडून शब्द बाहेर पडले. आणि ती आपल्याच जाळ्यात अडकली. 

अल्बर्ट शांतपणे हसत म्हणाला,

“देअर यु आर मिसेस बजाज!. हेच तुमच्या तोंडून वदवून घ्यायचं होतं”

सत्येनच्या आईचा राग अनावर झाला. पुढे चालत येऊन जेनीसमोर उभी राहिली. आत्यंतिक रागाने तिचा चेहरा लालबुंद झाला होता. नाकपुड्या फुगल्या होत्या आणि आरक्त डोळ्यांत अश्रू दाटून आले होते. तिने खाडकन जेनीच्या कानशिलात लगावून दिली. त्या फटक्यासरशी जेनी मागच्या सोफ्यावर कोसळली. पुढच्याच क्षणाला सत्येनच्या आईने हंबरडा फोडला. ती मोठमोठ्याने विलाप करू लागली. नेन्सीने तिला सावरलं आणि खुर्चीत बसवलं.

इतक्यात जेनीचे आईबाबाही तिथे येऊन पोहचले. मारिया आणि पिटरही हजर झाले. सर्वांना आलेलं पाहून अल्बर्टने पुढे सांगायला सुरुवात केली.

“मिसेस बजाज, मीच तुमच्या सासू सासऱ्यांना, आईवडिलांना इथे बोलावून घेतलंय. तुम्ही स्वतःहून गुन्ह्याची कबुली द्याल असं वाटलं होतं पण तुम्ही कबूली देत नव्हता म्हणून मग मला ही सर्व योजना करावी लागली.

ज्या दिवशी तुम्ही पोलीस स्टेशनला मिसिंग कम्प्लेन्ट दाखल करायला आला होतात त्याच दिवशी सकाळी आम्हाला  एक कार दरीत पडलेली सापडली होती. प्रथमदर्शनी ही अपघाताची केस वाटत होती पण दरीत आम्हाला कोणाचाच मृतदेह, किंवा काही अवशेष सापडले नव्हते. आम्ही  आरटीओ ऑफिसला कारच्या नंबर वरून चौकशी केली तेंव्हा आम्हाला समजलं की ती गाडी मुंबईतले मोठे उद्योजक करोडो  रुपयांच्या संपत्तीचे मालक सत्येन बजाज यांची आहे. मग आमच्या मनात शंका येऊ लागली. हा घातपात असू शकतो का? मि. बजाज यांच्या अपघाती मृत्यूचा कोणाला फायदा होऊ शकतो? त्यांचे कोणी हितशत्रू असतील का? आम्ही विचार करत होतो. आणि नेमकं त्याच दिवशी आम्हाला एका अनोळखी व्यक्तीचा निनावी कॉल आला. त्या व्यक्तीने  आम्हाला सांगितलं की मिसेस बजाज यांनी आपल्या नवऱ्याचा खून केला आहे. विचार केल्यावर लक्षात आलं की मिसेस जेनीफर बजाज ही एक व्यक्ती असू शकते  जिला मि. बजाज यांच्या अपघाती मृत्यूचा फायदा होऊ शकतो.  आमचा प्राथमिक अंदाज आणि समोर आलेली ही माहिती याची शक्यता पडताळून पाहणं गरजेचं होतं.  आणि मग मी या सर्व गोष्टींची पाळंमुळं शोधून काढायचं ठरवलं.

तुम्ही मिसिंग कम्प्लेन्ट करण्यासाठी आलात त्यामूळे आमचा संशय अजूनच बळावला. पण तुम्ही हा घातपात केला असेल याची कोणतीच सक्षम कारणं दिसत नव्हती. तुमच्याविषयी आमच्याकडे  पुरावे पण नव्हते. फक्त शंका आली म्हणून तुम्हाला अटक करू शकणार नव्हतो. त्यामुळे तुमच्याकडून कबूल करून घेणं हा पर्याय आम्हाला सुचला. म्हणून मग आम्ही तुमची तक्रार लिहून घेण्याचं नाटकं केलं. आम्ही मुद्दामच तुमच्याकडून फोटो मागितला नाही. त्यानंतर आम्ही मुंबई पोलिसांकडून मदत घेतली. त्यांनी  त्यांचे दोन ऑफिसर आमच्या मदतीला पाठवून दिले. मिसेस बजाज, हे खरंच सत्येन बजाज नाहीत. हे मुंबई पोलीस इन्स्पेक्टर ‘शंतनू इनामदार’ आहेत. आणि या सिस्टर नेन्सी नसून त्यांच्या सहकारी पोलीस ऑफिसर ‘अमृता देसाई’ आहेत. गोवा पोलिसांची मदत करण्यासाठी आम्हीच या प्लॅन मध्ये त्यांना सामील करून घेतलं होतं. आम्ही एक प्लॅन आखला आणि तुम्ही आमच्या जाळ्यात  बरोबर फसलात” 

अल्बर्टचे शब्द ऐकून जेनी चकित झाली. जेनीसाठी हा आश्चर्याचा धक्का होता. अवाक होऊन तिने नेन्सी, सत्येन म्हणजेच ऑफिसर शंतनू आणि अमृता यांच्याकडे पाहिलं. दोघेही तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसले.  थोडं थांबून अल्बर्ट म्हणाला,

“मिसेस बजाज, जेंव्हा सुरुवातीला मी चौकशीसाठी तुमच्या आईवडिलांच्या म्हणजेच मि. डिसूझांच्या घरी गेलो. तुमच्या वडिलांचा अविर्भाव पाहून मला त्यांच्यावरच दाट संशय येत होता. पण त्यावेळीस तुमच्या आई मला काही सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. पण तुमच्या वडिलांचं रौद्ररूप पाहून त्या शांत बसल्या. आमच्या तपासाची चक्र भरभर वेगाने फिरू लागली. इन्स्पेक्टर शंतनू मि. डिसूझा यांच्या घरी गेले. मि. डिसूझा यांच्या अनुपस्थितीत शंतनू तुमच्या आईला भेटले. तुमच्या आईकडून आम्हाला समजलं की २५ डिसेंम्बर रोजी त्यांनी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी  रात्री ठीक १२ वाजता फोन केला होता. त्यावेळीस तुम्ही खूप रडत होतात. आणि इतकंच म्हणालात, " मम्मा, सत्येनने मला फसवलं” आणि तुम्ही फोन ठेवून दिलात. आणि मग आईकडून मिळालेल्या माहिती वरून संशय पक्का झाला. पण बॉडी मिळत नाही तोवर कारवाई शक्य नसल्याने तुमच्याकडून कबूल करून घेणं हा एकच पर्याय होता. त्यासाठी आम्हाला  हा प्लॅन करावा लागला. आणि मग इन्स्पेक्टर शंतनू यांना तुमच्या आईकडूनच तुमच्या मांडीवर असलेल्या जन्मखुणेबद्दल माहिती मिळाली. आम्ही या माहितीचा उपयोग तुम्हांला संभ्रमात टाकण्यासाठी केला. 

त्यानंतर मी तुमच्या घरी आलो आणि माझा फोन बंद पडला असं मुद्दामच सांगितलं आणि मी कॉल करण्यासाठी तुमचा फोन घेतला त्याच वेळीस मी तुमच्या मोबाईल मधल्या गॅलरीतून सगळे फोटो डिलीट केले. त्यामुळे सत्येनचा फोटो तुमच्या मोबाइलमध्ये नव्हता. ज्या वेळीस मी इकडे तपास करत होतो, त्या दरम्यान ऑफिसर अमृता त्यांचं काम करत होत्या. 

मिसेस बजाज, आम्हाला माहीत होतं की, सत्येन बजाज यांची ओळख सिद्ध करण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाचा आधार घ्याल म्हणून मग आधीच ऑफीसर अमृता यांनी आमच्या आयटी विभागाची मदत घेऊन सत्येन बजाज यांची फेसबुक प्रोफाईल हॅक केली. आणि सर्व ठिकाणी सत्येनच्या जागी शंतनूचे फोटो ऍड केले. त्यानंतर बजाज ग्रुप ऑफ कंपनीज च्या वेबसाइटवरही शंतनूचेच फोटो टाकले”

अल्बर्टने हसून इन्स्पेक्टर शंतनू आणि अमृता यांच्याकडे पाहिलं. अल्बर्ट क्षणभर थांबला. त्याने सर्वांवर आपली नजर फिरवली. सर्वजण आश्चर्यचकित होऊन त्याचं बोलणं ऐकत होते. अल्बर्टने मारियाला पिण्यासाठी पाणी मागितलं. मारियाने पाणी आणून दिलं. ग्लासातलं थोडं पाणी पिऊन त्याने ग्लास टेबलवर ठेवला. आणि तो बोलू लागला.

“मिसेस बजाज, सर्व गोष्टी आमच्या प्लॅनप्रमाणे घडत होत्या. ठरलेल्या प्लॅनप्रमाणे ऑफिसर अमृताने सिस्टर नेन्सी बनून तुम्हाला चर्चमध्ये बोलावलं. आणि मग तिथे आमचे इन्स्पेक्टर शंतनू नकली सत्येन बनून तुमच्या समोर आले. तुम्ही त्यांना ओळखण्यास नकार दिलात. मग आपण बंद पडलेली कार पाहायला गेलो. खरंतर ती कार आम्ही आधीच पोलीसचौकीत आलेल्या चोरीच्या गाडीला त्या ठिकाणी नेऊन ठेवलं. तुमच्या गाडीची नंबरप्लॅट लावली. गाडीचे पार्ट चोरीला जाणं, सत्येनची  ओळखपत्रे गायब होणं., आपल्या आधीच सिस्टर नेन्सीचं तुमच्या घरात असणं, तुमच्या कपाटातले फोटो गायब होणं. तपासणी करताना तुमच्या मिनीबारची चावी सापडणं, सत्येनच आवडतं पेय आम्हाला माहीत असणं किंबहुना आम्ही पीटरकडून माहिती करून घेणं हा सगळा तुमच्याकडून सत्य बाहेर काढण्यासाठी केलेल्या प्लॅनचा भाग होता”

“जेंव्हा तुम्ही पीटर आणि मारियाला बोलावून घेतल्याचं मला कळवलं तेंव्हा लगेच आमच्या टीमने पीटर आणि मारियाला गाठलं आणि त्यांनाही या प्लॅन मध्ये सहभागी करून घेतलं. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना! टायगरने सुद्धा आमच्या इन्स्पेक्टर शंतनूला सत्येन म्हणून कसं ओळखलं? तर मिसेस बजाज तीही आमचीच योजना होती.  त्यानंतर जेंव्हा तुम्ही तुमच्या टायगरला आणायला जात होतात त्यावेळीस मी तुम्हाला थांबवलं आणि पिटरला टायगरला आता घेऊन यायला सांगितलं. त्याच दरम्यान आमच्या पोलीस टीमने टायगरला बदलून पोलीस पथकातील पोलिसी कुत्र्याला आणून ठेवलं होतं. त्यामूळे जसा सत्येन बदलला तसं टायगरच्या जागी आम्ही पोलिसी  कुत्र्याला आणून बसवलं. त्यामुळेच त्याने शंतनूला काहीच त्रास दिला नाही. टायगरने नकली सत्येनला का ओळखलं नाही. टायगरची आपल्या मालकाला ओळखण्यात चूक कशी झाली? तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील ना मिसेस बजाज? आणि बरेच आश्चर्याचे धक्के तुम्हाला बसतील? आता अजून एक धक्का सहन करावा लागणार आहे. 


 

पुढे काय होतं? अजून जेनीला कोणता धक्का मिळणार पाहूया पुढील भागात..

क्रमशः

©निशा थोरे..

🎭 Series Post

View all