Login

दि बुमरँग भाग १०

ही एक चित्तथरारक रहस्यकथा

दि बूमरँग.. भाग १०

पुर्वार्ध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की,  जेनीचे विश्वासू नोकर पीटर आणि मारियाला जेनीने लवकर घरी बोलवुन घेतलं. पण अल्बर्ट समोर पीटर आणि मारियाने त्यांच्या समोर असलेल्या व्यक्तीलाच सत्येन म्हणून आवाज दिला. तेच मि. बजाज आहेत पुन्हा एकदा सिद्ध झालं. जेनीच्या टायगरनेही सत्येनच्याच बाजूने निर्णय दिला. सत्येन चौकशीच्या दरम्यान सत्येनने जेनीच्या जन्मखुणे बद्दल सांगितली. इतकी गोपनीय गोष्ट जी फक्त नवरा बायकोमध्ये होती. ती याला कशी कळली? या विचारांनी जेनी बुचकळ्यात पडली. ‘अँथनी बेकर्स’ च्या रूपाने जेनीला एक शेवटचा आशेचा किरण दिसत होता.  आता पुढे..


 

दि बूमरँग.. भाग १०

संध्याकाळ झाली होती. जेनी तयार होऊन बसली होती. इतक्यात सत्येन घरी आला. जेनीला म्हणाला,

“डार्लिंग, दोन मिनटं थांब हा, मी फ्रेश होऊन येतो. आपण लगेच निघू.” 

“हो चालेल आवर पटकन.  मी तोपर्यंत मारियाला जेवणाचं सांगून येते.” 

असं म्हणत जेनीने मारियाला आवाज दिला. थोड्याच  वेळात दोघेही घराच्या बाहेर पडले. सत्येनने भाड्याने कार आणली होती. दोघे गाडीत बसले. कार केक शॉपच्या दिशेने वेगाने धावू लागली. अँथनी बेकर्स हे शहरापासून थोडं दूर, वर्दळीपासून लांब होतं. दुकानात पोहचेपर्यंत अंधार पडू लागला होता. थोड्याच वेळात ते दोघे केकच्या दुकानाजवळ पोहचले. सत्येनने बाहेर कार पार्क केली. आणि त्यांनी केकशॉपमध्ये प्रवेश केला. दुकानात जास्त वर्दळ दिसत नव्हती. एक दोनजणच केक घेण्यासाठी आले होते. जेनी केक पाहण्याचं नाटक करत होती. खरंतर अल्बर्ट येण्याची वाट पाहत होती. बाकीचे केक खरेदी करून निघून गेले. आता दुकानात फक्त जेनी आणि सत्येन बाकी उरले होते. जेनीने दुकानदाराला  प्रश्न केला

“हॅलो, मी मिसेस बजाज. इथे कुमार कोण आहे?” 

“येस मॅम मीच कुमार, बोला न कोणता केक फायनल केला तुम्ही? कोणता केक पॅक करून देऊ?” 

कुमार अदबीने बोलत होता. जेनीने त्याला प्रश्न केला. 

“मि. कुमार काही दिवसांपूर्वी म्हणजे २४ किंवा २५ डिसेंबर रोजी केक घेण्यासाठी एक व्यक्ती आली होती. त्यांचं नाव होतं सत्येन बजाज. मला सांगा ती व्यक्ती हीच आहे का?” 

“जेनी, तू परत सुरू झालीस. काय बोलतेस तू हे? म्हणजे केक घेणं हा एक बहाणा होता?”- सत्येन 

“शांत रहा जरा.. मि. कुमार प्लिज सांगा हेच आहेत का सत्येन बजाज?” 

जेनीने सत्येनला दरडावून पुन्हा कुमारला प्रश्न केला. 

“नाही मॅडम, हे सत्येन बजाज नाहीत. ते वेगळे होते. त्या दिवशी आलेले साहेब हे नाहीत.." 

कुमारने उत्तर दिलं. ते ऐकून जेनीला खूप आनंद झाला. पहिली व्यक्ती होती. जी समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला हा सत्येन नाही असं म्हणाली होती. 

“प्लिज तुम्ही ही गोष्ट पोलिसांना सांगाल का? पोलिस आता येतच असतील. इथे रेंज मिळत नाही आहे. तुम्ही याच्यावर लक्ष ठेवा. मी आलेच दोन मिनिटांत पोलिसांना कॉल करून. प्लिज तुम्ही या तोतया माणसावर लक्ष ठेवा. मी आलेच..” 

असं म्हणत ती केकशॉपच्या बाहेर आली. आणि तिने अल्बर्टला फोन लावला. अल्बर्ट वाटेतच होता. त्याने फोन उचलून दोन मिनिटांत पोहचतोय असं जेनीला सांगितलं. जेनी त्याची वाट पहात होती. इतक्यात अल्बर्टची पोलीस व्हॅन दुकानाच्या दारात येऊन थांबली. जेनी पटकन त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली,

“अल्बर्ट, बघा मी म्हटलं होतं ना हा सत्येन नाही. हा माझा नवरा नाही. आताच मि. कुमार यांनी मला सांगितलं की २४ डिसेंम्बर रोजी आलेला सत्येन बजाज हा नाही. बघा मी तुम्हाला जीव तोडून सांगत होते तुम्ही ऐकतच नव्हता. चला आत आणि स्वतः बघा तुम्ही.."

जेनीला खूप आनंद होत होता. कारण सत्य सर्वांसमोर येणार होतं. तोतया माणूस पकडला जाणार होता. 

अल्बर्ट पटकन केक शॉपमध्ये गेला. पाहतो तर काय! सत्येन आणि कुमार हसत एकमेकांशी गप्पा मारत होते. जेनीला ते पाहून खूप आश्चर्य वाटलं. ती कुमारला ओरडून म्हणाली.

“कुमार, सांगा  इन्स्पेक्टर साहेबांना हे सत्येन बजाज आहेत की नाहीत?”

“येस मिसेस बजाज.. हेच सत्येन बजाज आहेत. हेच आले होते २४ तारखेला केकची ऑर्डर द्यायला. त्यांना २५ डिसेंम्बर रोजी डिलिव्हरी हवी होती. आम्ही हो म्हटलं आणि ठरल्याप्रमाणे केकची डिलिव्हरी दिलीसुद्धा.” - कुमार. 

“ मि. कुमार, तुम्ही का खोटं बोलत आहात? तुम्ही आताच तर मला सांगितलं की ही ती व्यक्ती नाही जिने २४ तारखेला केक ऑर्डर केली आणि २५ तारखेला त्यांच्या घरी डिलीव्हरी द्यायला सांगितली होती आणि आता तुम्ही पोलिसांसमोर खोटं बोलत आहात.."

जेनी आश्चर्यमिश्रित रागाने बोलत होती. तिचा पारा चढला होता. इतक्यात अल्बर्टने तिला अडवत कुमारला प्रश्न केला. 

“तुम्ही इतकं ठामपणे कसं सांगू शकता की ती व्यक्ती ही नाही. तुमच्याकडे तर सारखे लोक ये जा करत असतात. मग तुम्ही हे सत्येनच आहे हे तुम्ही कसं सांगू शकता?"

“अहो साहेब, काय सांगू तुम्हाला.. माणसं येतात पण अशी माणसं फार क्वचितच येतात. या साहेबांनी केकच्या किंमतीएवढी टीप दिली होती मला. दोन हजाराचा केक आणि दोन हजाराची टीप. साहेब खूप खुश होते. अशा माणसांना कोण कसा विसरेल? म्हणून ते चांगले लक्षात राहिले माझ्या..”

आता जेनी उद्विग्न झाली. कुमार धडधडीत खोटं बोलत होता. अल्बर्टला वारंवार सांगूनही त्याचा विश्वास बसत नव्हता. आणि जेनी आता पुन्हा खोटी ठरली होती.

अल्बर्टने रागाने जेनीकडे पाहिलं आणि काही न बोलता रागाने तिथून निघून गेला. जेनी रडकुंडीला आली होती. ती चिडून कुमारला म्हणाली, 

“का तुम्ही खोटं बोललात कुमार? तुम्ही आधी सांगितलं होतं की हा सत्येन नाही. मग पोलिसांसमोर का खोटं बोललात?” 

“मॅडम, मला माफ करा. मी पोलिसांसमोर खोटं बोललो कारण मला माझा जीव प्यारा आहे.."

कुमार अगदी भयभीत होऊन कपाळावरचा घाम पुसत म्हणाला.

“म्हणजे?” 

जेनी प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहून उद्गारली. 

इतक्यात दुकानाच्या आतल्या बाजूने तिला एक व्यक्ती बंदूकीचा रोख कुमारवर धरून पुढे सावकाश चालत येत होती. ती व्यक्ती समोर आली आणि जेनीच्या पायाखालची जमीनच हलली. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सिस्टर नेन्सी होती.

सत्येन मोठयाने हसून म्हणाला,

”जेनी, आता तुझी माझ्या तावडीतून सुटका नाही. कितीही जिवाच्या आकांताने ओरडलीस तरी तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. आता तुला आयुष्यभर माझ्याच तालावर नाचावं लागेल” 

“पण तू असं का करतोयस? काय हवंय तुला?” 

जेनीने रडकुंडीला येऊन विचारलं.

ती बोलत असताना नेन्सी सत्येनकडे पाहिलं आणि हसून म्हणाली

“कारण तुझी संपत्ती.. जेनी आम्हाला माहीत आहे. सत्येनच्या नावावर असलेली करोडो रुपयांची संपत्ती जी आता तुझ्या नावावर आहे. ती संपत्ती तू आमच्या नावावर कर. एकदा का ती कंपनी आमच्या नावावर झाली की आमचं काम फत्ते होईल. तुझ्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवत नाहीच. पण तुझ्या आतापर्यंतच्या वागण्याने तुला वेड लागलंय हे सिद्ध होईल. स्वतः इन्स्पेक्टर अल्बर्टच हे सांगेल आणि मग तुला वेड्याच्या इस्पितळात पाठवणं आम्हाला सोप्प जाईल. मग या त्या करोडो रुपयांच्या संपत्तीचे आम्हीच एकमेव मालक होऊ.  जेनी, तू आता पुरती फसली आहेस. आमचं ऐकण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. त्यामुळे निमूटपणे आम्ही जे म्हणतोय ते ऐक. उद्या सकाळी ठीक दहा वाजता मी तुझ्या घरी येतेय. सर्व कागदपत्रं तयार आहेत तू फक्त सही कर. तुला जर तुझा जीव प्यारा असेल तर नक्की येशील.समजलं का तुला?”

“अच्छा तर हा प्लॅन होता तुमच्या दोघांचा. मला आधीपासूनच या हरामखोर माणसाचा संशय होताच. सिस्टर नेन्सी, हा माणूस लबाड आहे, बनेल आहे हे मला आधीच ठाऊक होतं पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. देवाची सेविका म्हणवतेस आणि असली नीच कामे करतेस. देव तुला कधीच माफ करणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव  मी मुळीच सही करणार नाही. आता सगळं मी हे इन्स्पेक्टरला सांगते. नाही तुम्हाला अटक केली तर बघाच!”

जेनी चिडून म्हणाली. 

सत्येनने रागाने तिच्याकडे पाहिलं. आणि म्हणाला,

“तुला सह्या कराव्याच लागतील. नाहीतर….”

“नाहीतर काय? काय करशील तू नालायक माणसा!” 

जेनी मोठ्याने ओरडली. 

सत्येनने नेन्सीकडे पाहिलं. नेन्सीने जेनीकडे एक कटाक्ष टाकला. आणि क्षणाचाही विलंब न करता तिने कुमारवर गोळ्या झाडल्या. कुमार रक्ताच्या थारोळ्यात पडला.

जेनीला दरदरून घाम फुटला. नेन्सी छद्मीपणे मोठंमोठयाने हसत म्हणाली,

“सह्या नाही केल्यास तर तुलाही याच्याकडे यमसदनी पाठवून देईन. एक लक्षात ठेव, तुला आता आमच्यापासून कोणीच वाचवू शकत नाही. निमूटपणे सह्या कर”

नेन्सीने सत्येनकडे पाहिलं आणि म्हणाली,

“सत्येन आता हिला घरी घेऊन जा. हिच्यावर लक्ष ठेव. आणि जर हिने काही चलाखी केली किंवा इन्स्पेक्टर अल्बर्टला सांगण्याचा प्रयत्न केला तर डायरेक्ट वर पाठवून दे.  उद्या मी ठीक दहा वाजता येते. तयार रहा. आणि याचं काय करायचं ते बघ”

कुमारच्या मृतदेहाकडे बघत नेन्सी तिथून निघून गेली. सत्येन जेनीच्या दंडाला धरून खेचत कारपाशी घेऊन आला. कारचा दरवाजा उघडून तिला आत ढकललं. दरवाजा बंद करून गाडी चावीने बंद केली. जेनी त्याच्याकडे पाहत होती. सत्येनने कुमारचा मृतदेह गाडीच्या डिकीमध्ये टाकला. आणि त्याने गाडी स्टार्ट केली. जेनी प्रचंड घाबरली होती. एका सैतानाच्या तावडीत ती सापडली होती. जेनीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. 

रात्र पुढे सरकत होती. सत्येनची गाडी वेगाने अंतर कापत होती. अचानक सत्येनने एका डोंगराळ दरी असलेल्या ठिकाणी गाडी थांबवली. सत्येन गाडीमधून खाली उतरला. गाडीची डिकी उघडून त्याने कुमारचा मृतदेह बाहेर काढला.  ओढत ओढत कुमारचा मृतदेह दरीत फेकून दिला. बाहेर काळाकुट्ट अंधार होता. काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. जेनी बंद कारच्या काचेतून डोळे विस्फारून समोरचं दृष्य पाहत होती. ती खूपच घाबरली होती. 

कुमारचा मृतदेह दरीत फेकून दिल्यावर सत्येन गाडीजवळ आला. त्याचे ते असुरी डोळे पाहून भीतीने जेनीच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. सत्येन गाडीत येऊन बसला आणि गाडी सुसाट वेगाने त्याच्या बंगल्याच्या दिशेने धावू लागली. थोड्याच वेळात जेनी आणि सत्येन घरी पोहचले.  मारियाने जेवणाबद्दल विचारलं जेनीने भूक नाही असं सांगून ती आपल्या खोलीत गेली. सत्येनही तिच्या मागोमाग खोलीत गेला. कपडे बदलून तो पलंगावर आडवा झाला. जेनी तिथेच बसून होती. मध्यरात्र उलटून गेली. सत्येन पूर्णपणे निद्रेच्या आधीन झाल्याची खात्री झाल्यावर जेनी बेडरूमचा दार उघडून  बाहेर आली आणि तिने इन्स्पेक्टर अल्बर्टला कॉल केला. 

“हॅलो इन्स्पेक्टर अल्बर्ट, मी जेनी बोलतोय.” 

“अरे मिसेस बजाज, इतक्या रात्री फोन केलात. आता काय झालं? ”- अल्बर्ट

“अल्बर्ट, मी तुम्हाला सांगत होते ना! हा सत्येन बजाज नाहीये. ते सत्य आहे. माझी संपत्ती हडपण्यासाठी सत्येनचा हा प्लॅन आहे.  आणि त्यात त्याला नेन्सी साथ देतेय. आणि त्याने आताच एका केक शॉपच्या दुकानदाराचा खून केलाय. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. वाटल्यास तुम्ही  आंबोली घाटातल्या दरीच्या ठिकाणी तपास करू शकता.प्लिज अल्बर्ट माझ्यावर विश्वास ठेवा.त्यांनीच माझ्या सत्येनला गायब केलंय” - जेनी

“पुन्हा तेच. म्हणजे आता तुम्हाला सत्येन खुनी असल्याची पण स्वप्नं पडू लागलीत का? मॅडम, किती वेळा सांगू तुम्हाला? तो सत्येनच आहे. उगीच एवढ्या रात्री फोन करून माझ्या झोपचं खोबरं करू नका. झोपू द्या मला.” चिडून अल्बर्ट जेनीवर खेखसला.

“प्लिज अल्बर्ट,  ट्रस्ट मी. तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर एक काम करा. उद्या दहा वाजता माझ्या घरी या. नेन्सी माझी संपत्ती त्यांच्या नावावर करण्याचे कागदपत्रं घेऊन येणार  आहे. त्यावर माझ्या सह्या हव्यात त्यांना. आता प्लिज तुम्ही वेळ दवडू नका. उद्या सकाळी माझ्या घरी या. मी तुम्हाला विनंती करतेय अल्बर्ट. फक्त एकदाच या”

जेनी अल्बर्टला काकुळतीला येऊन विनंती करत होती. 

“ठीक आहे मिसेस बजाज. मी उद्या येतो. आणि उद्या जर तुम्ही जे सांगत आहात ते खोटं सिद्ध झालं तर मी विनाकारण पोलिसांना त्रास दिला त्यांचा वेळ वाया घालवला या आरोपाखाली अटक करेन. नीट विचार करा”- अल्बर्ट

“ठीक आहे अल्बर्ट, तुम्ही म्हणता ते मला मान्य आहे. पण प्लिज तुम्ही लवकर या” 

असं म्हणून जेनीने फोन ठेवून दिला. आणि तिथेच बाहेरच्या हॉल मध्ये बसून राहिली. 

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

©निशा थोरे

🎭 Series Post

View all