Nov 30, 2022
// rablogging.com_GGINT //
नारीवादी

तिचा वाढदिवस अंतीम

Read Later
तिचा वाढदिवस अंतीम


पण घरात इतरांचे वाढदिवस औक्षण करून , गोड-धोड करून साजरे व्हायचे,पण दुसऱ्या दिवशीच्या पाडव्याच्या तयारीत हिचा वाढदिवस मात्र सारेच सोईस्करपणे विसरले .

त्यानंतर प्रत्येक वाढदिवसाला असंच काहीतरी घडे. एक-दोन वेळा हीनं आपली खंत नवऱ्याला बोलून दाखवली.

नवरा - "शब्दांपेक्षा भावना मोठी असते. सोपस्कारां पेक्षा आशीर्वाद महान."
नवऱ्याच्या या वाक्यावर ती फक्त मान डोलावी.

तीच्या वाढदिवसाला संध्याकाळी बाहेर जायचं म्हटलं तर , आधी घरचं सगळं करून , संध्याकाळचं स्वयंपाक - पाणी आटपून रात्री आठला निघून दहाला परतायचं असा नियम होता. शिवाय सोबत नणंद नाही तर लहान दीर किंवा अगदीच कोणी नाही तर मोठ्या जावेची मुलं त्यांच्यासोबत बाहेर जाण्यासाठी ठरलेली असायची. एक-दोनदा हे सगळं बघून तीनं वाढदिवसाला रात्री बाहेर जाणं बंदच करून टाकलं.

दुपारी चार वाजता तिचं लेकरू उठलं . त्याला फ्रेश करून ती ग्रामदेवतेच्या दर्शनाला गेली. खणा-नारळाने देवीची ओटी भरली. पूजाऱ्याला आज तिचा वाढदिवस आहे सांगितलं. त्यानं हिला देवीची साडी दिली.

मंदिराच्या बाजूच्या बगिच्यात तिचं लेकरू मनसोक्त हुंदडलं . रात्री परततांना तिने एका ठिकाणी पाणीपुरी आणि तिच्या लेकरांना दही - वडे खाल्ले. आईस्क्रीम खाऊन माय-लेक तृप्त होऊन रात्री नऊ - साडेनऊ ला घरी परतले. खेळून दमलेलं लेकरू पटकन झोपलं.

पण ती मात्र बिछान्यावर पडल्या पडल्या विचार करायला लागली -
ती - " नवऱ्याला मित्रांचे वाढदिवस , गटारी , होळी, कांदे नवमी एवढेच काय पण गेलाबाजार ऑफिसातले साहेब व त्यांच्या मुलांचे ही वाढदिवस लक्षात राहतात पण माझाच वाढदिवस तो विसरून जातो.

ते जाऊ देत. पण लेक तीही अगदी बापावर गेलेली आहे. बाबा साठी ग्रीटिंग बनवणारी, चॉकलेट आणणारी, आपलली लेक आपल्या वाढदिवसाला साध्या शुभेच्छांचे चार शब्दही आपल्यासाठी खर्च करत नाही."

असा विचार करून तिने एक उसासा टाकला आणि ती निद्रादेवीच्या अधीन झाली.

रात्री उशिरा नवरा लेकीला घरी घेऊन आला. आतापर्यंतच्या तिच्या इतर वाढदिवसा सारखाच तिने आजही एकटीनेच तिचा वाढदिवस साजरा केला. नाही म्हणायला तिचं लेकरू मात्र यावेळी तिच्यासोबत होतं.


©® राखी भावसार भांडेकर.
******************************************************?

वाचकहो आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी जणी असतात या कुटुंबासाठी आठवड्यातले सातही दिवस चोवीस तास सतत राबत असतात पण त्यांचा वाढदिवस मात्र त्यांच्या घरातले लोक मात्र अगदी सोईस्करपणे विसरून जातात.

कथा कशी वाटली नक्की अभिप्राय द्या.

जय हिंद.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now